Success Story: आपल्या देशात असे अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी काही मोजक्या पैशांतून सुरू केलेला आपला छोटा व्यवसाय आज कोट्यवधींच्या घरात नेऊन पोहोचवला आहे. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्याने केवळ २,५०० रुपयांपासून आपला व्यवसाय सुरू केला आणि त्याची उलाढाल ५० कोटी रुपयांपर्यंत नेऊन ठेवली. हे यश त्याला काही दिवसांत मिळालेले नाही, तर त्यासाठी त्याने हर प्रकारे प्रयत्न करून ही मजल गाठली आहे.

एकेकाळी प्रमोद कुमार यांनी २,५०० रुपयांच्या भांडवलातून हातगाडीवर लाडू विकण्यास सुरुवात केली होती. पण, आता ते करोडपती व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्याशिवाय ते त्यांच्या व्यवसायाद्वारे हल्दीराम व बिकानेर यांसारख्या ब्रँडसह स्पर्धा करीत आहेत.

प्रमोद कुमार भदानी यांनी काही वर्षांतच बिहार-झारखंड, तसेच जवळच्या राज्यांमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे. त्यांची उलाढाल आणि उत्पन्न दोन्ही कोटींच्या पुढे गेले आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रमोद यांचे वडील हातगाडीवर लाडू विकून घर चालवीत होते.

प्रमोद यांना त्यांच्या कुटुंबाने सरकारी शाळेत दाखल केले; पण कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. ते त्यांच्या वडिलांच्या व्यवसायाचाच विचार करीत होते. प्रमोद यांनी वयाच्या १४ व्या वर्षी शिक्षण सोडले आणि त्यांच्या वडिलांकडून २,५०० रुपये उसने घेऊन, त्या भांडवलातून त्यांनी लाडूविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावाबरोबर मिळून गाडीवर लाडू बनवले आणि ते विकले.

त्यांचे हे लाडू लोकांमध्ये झपाट्याने प्रसिद्ध झाले. त्यांनी बनविलेल्या लाडवांची चव आणि गुणवत्ता यांमुळे लोकांना ते खूप आवडू लागले. हळूहळू त्यांचा हा व्यवसाय अनेक पटींनी वेगाने वाढला. जेव्हा प्रमोद कुमार काम करू लागले तेव्हा विश्रांती घेण्याऐवजी ते दुप्पट मेहनत करू लागले. त्यांनी दररोज २४ पैकी १९ तास काम केले. ते रात्री लाडू बनवायचे आणि दिवसा विकायचे. हळूहळू त्यांनी एक दुकान विकत घेतले आणि तेथे ते लाडू विकू लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडवांच्या चवीमुळे व्यवसायात भरभराट

त्यांच्या लाडवांचा दर्जा चांगला असल्यामुळे लाडवांची मागणी वाढू लागली. मग त्यांनी बिहारच्या इतर जिल्ह्यांमध्येही लाडवांचा पुरवठा सुरू केला. त्यानंतर त्यांनी आपले कर्मचारीही वाढवले. हळूहळू त्याच्या व्यवसायाने कारखान्याचे रूप धारण केले. आज त्यांचा लाडू आणि इतर मिठायांचा व्यवसाय उत्तर प्रदेश, बंगाल, छत्तीसगड, ओरिसा व कोलकाता येथे पसरलेला आहे. सध्या प्रमोद शॉपची एकूण आठ आउटलेट्स आहेत. त्यांची उलाढाल दरवर्षी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.