Success Story: आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अपयशांना तोंड देत, लोक आपली चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करतात. आज आम्ही अशाच एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास घेऊन तुमच्यासमोर आलो आहेत, ज्याने बेकरी काउंटर बॉयपासून ‘९९ पॅनकेक्स’ नावाच्या एका यशस्वी पॅनकेकची साखळी दुकाने सुरू केली आहेत.

विकास शहा असे या यशस्वी उद्योजकाचे नाव असून, त्यांचा प्रवास कष्टांनी भरलेला होता. जेव्हा ते फक्त पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना शेअर बाजारात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्या आईवर आली. या कठीण काळात विकास यांनी दहावीपासून काम करायला सुरुवात केली. चर्चगेटमधील एका बेकरीमध्ये त्यांना दरमहा ७०० रुपये काउंटर बॉय म्हणून मिळत होते. अभ्यास सुरू ठेवत ते काम करू लागले. १८ वर्षांचे झाल्यावर ते बेकरीचे व्यवस्थापक बनले. त्यांनी अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या, ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये काम करण्यापासून त्यांनी लायटर आणि परफ्यूम विकण्यापर्यंतची कामे केली.

१९९८ मध्ये विकेश शाह यांना बेकरीतील नोकरी गमवावी लागली. महिनाभर त्यांच्याकडे वडापाव खाण्यासाठीही पैसे नव्हते. त्यांनी फक्त स्वस्त बन खाऊन दिवस काढले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्पा होता; पण त्यांनी हार मानली नाही. १९९९ मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या मित्राच्या घरातून ‘बेक पॉइंट’ हा पहिला उपक्रम सुरू केला. हा एक B2B व्यवसाय होता. त्यामध्ये ते मुंबईतील प्रमुख केटरर्सना काँटिनेंटल मिष्टान्न आणि पेस्ट्री पुरवत असत. व्यवसाय चांगला चालू लागला. २००९ मध्ये त्यांनी ‘हॅपीनेस डेली’ नावाने स्वतःचे केक शॉप उघडले, जे अजूनही चालू आहे. हे त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील पहिले मोठे यश होते.

‘९९ पॅनकेक्स’ची अशी सुचली कल्पना

२०१४ मध्ये अ‍ॅमस्टरडॅमच्या ट्रिपदरम्यान विकेश शाह यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर पॅनकेक बनवताना पाहिले. त्यांना ही संकल्पना इतकी आवडली की, ते तीन दिवसांत पॅनकेक्स बनवायला शिकले. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर जेव्हा त्यांचा केटरिंग व्यवसाय मंदावला तेव्हा एका युक्रेनियन शेजाऱ्याने त्यांचे पॅनकेक्स खाल्ले आणि ते किरकोळ उत्पादन म्हणून लाँच करण्याचा सल्ला त्यांना दिला. जून २०१७ मध्ये, विकेश यांनी मुंबईतील काळा घोडा येथे नऊ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह पहिले ‘९९ पॅनकेक्स’ आउटलेट उघडले. सुरुवातीला विक्री कमी होती. परंतु, काही मित्रांनी रस दाखवल्याने हळूहळू ग्राहकांची ओळख वाढत गेल्याने व्यवसायाने वेग घेतला.

आज ‘९९ पॅनकेक्स’चे पाच राज्यांत आणि १० शहरांमध्ये ४० आउटलेट आहेत. त्यापैकी ३० फ्रँचायजी मालकीच्या आहेत. कंपनीत सुमारे ७० लोक काम करतात. त्यांची उलाढाल कोटींमध्ये आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यवसायावर परिणाम झाला. परंतु, विकास यांनी तो पुन्हा रुळावर आणला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास शाह यांची संपत्ती

आता विकास शाह एक विलासी जीवन जगत आहेत. त्यांनी त्यांचे स्वप्नातील घर आणि बीएमडब्ल्यूसारख्या गाड्यादेखील खरेदी केल्या आहेत. त्यांच्या प्रवासातून असे दिसून येते की, प्रतिकूल परिस्थितीतही जर एखाद्या व्यक्तीमध्ये शिकण्याची इच्छा, कठोर परिश्रम करण्याची आवड असेल, तर तो खडतर प्रवासातूनही यशस्वी होऊ शकतो.