भूषण केळकर / मधुरा केळकर
तंत्रज्ञान, जागतिक अर्थव्यवस्था, वातावरणीय बदल आणि सामाजिक स्थितीत होणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेंड्समुळे पुढील काही वर्षांत नोकरीची गरज, स्वरूप, आणि आवश्यक कौशल्ये या सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. याच विषयावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’ मध्ये २०३० साठी काही महत्त्वाचे निष्कर्ष दिले आहेत. सॉफ्ट स्किल्स आणि टेक्निकल कौशल्ये दोन्ही महत्त्वाच्या ठरणार आहेत. नव्याने नोकरी करणाऱ्या व्यक्तीने कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, ते पाहू.
अहवालाचे काही प्रमुख आकडे असं सांगतात की २०३० पर्यंत सुमारे १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि ९.२ कोटी नोकऱ्या कमी होऊन, सुमारे ७.८ कोटी दशलक्ष नोकऱ्यांची वाढीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सध्याच्या नोकऱ्यांतील अंदाजे ३९ कौशल्ये बदलतील — ती जुनी होऊन नवीन गरजेनुसार अपडेट होणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जागतिक कंपन्यांमध्ये ६३ मानव संसाधन अधिकारी म्हणतात की, ‘‘स्किल गॅप’’ ही व्यवसाय परिवर्तनातली सर्वात मोठी अडचण आहे.
२०३० च्या अहवालानुसार, ज्यांना वाढती मागणी असणार आहे, अशी सगळ्यात महत्त्वाची तीन तांत्रिक कौशल्ये ठरली आहेत :
● AI आणि बिग डेटा – डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI यांसारख्या तंत्रज्ञानांबद्दल चांगली माहिती असावी. या बाबत आपण पुढेल काही लेखांमध्ये तपशीलवार पाहू.
● नेटवर्क्स आणि सायबरसुरक्षा – माहितीची सुरक्षा, नेटवर्क्सची देखभाल इत्यादी बाबी महत्वाच्या ठरतील.
● तंत्रज्ञान साक्षरता – नवीन साधने, सॉफ्टवेअर, प्लॅटफॉर्म यांचा वापर, डिजिटल कौशल्ये असणे आवश्यक आहे. फक्त तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाच्या, संवादाच्या आणि मनोबलाच्या बाबतीत खालील सात सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाची ठरणार आहेत:
● विश्लेषणात्मक विचार – समस्या समजून घेणे, डेटा वाचणे, माहितीचे परीक्षण करणे. अहवालानुसार सुमारे ७० कंपन्यांना हे कौशल्य अत्यावश्यक आहे.
● लवचिकता – बदलांना तोंड देणे, अस्थिर परिस्थितीत टिकून राहणे.
● नेतृत्व आणि सामाजिक प्रभाव – टीमला चालना देणे, लोकांशी प्रभावी संवाद करणे, प्रेरणा देणे.
● नवोन्मेषी विचार – नवीन उपाय शोधणे, कल्पनाशील असणे, कल्पना वास्तवात रूपांतरित करणे.
● स्व-प्रेरणा व आत्म-जागरूकता – स्वत:मधून काम करण्याची क्षमता, आपली शक्ती- कमकुवत बाजू ओळखणे.
● कुतूहल आणि जीवनभर शिकण्याची वृत्ती – सतत नव्या गोष्टी शिकायची इच्छा, अद्यायावत राहणे ही गरज आहे.
● संवेदनशीलता आणि सक्रिय ऐकणे – सहकारी, ग्राहक यांच्याशी चांगला संबंध ठेवणे, इतरांची भावना समजून घेणे.
पूर्वीच्या काळात एक मोठी अडचण असायची की बऱ्याच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी कमी असायची किंवा अनेक लोकांना Upskilling / Reskilling परवडायचे नाही. आता सुदैवाने अनेक संसाधन उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साधने वापरणे, नवीन ट्रेंड्सशी सुसंगत राहणे याने ते करता येईल आणि ते आपण आधीच्या लेखांमध्ये बघितले पण आहेत. आजची मुख्य समस्या ही संसाधन कमी असण्यापेक्षा नवीन शिकण्याबद्दल अनुत्सुक असणे हे आहे! जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या कामाची नवी भूमिका स्वीकारायची असेल तर त्याला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी हवी. म्हणजेच, शाळा किंवा कॉलेज फक्त नाही, तर सतत शिकण्याची वृत्ती टिकवून ठेवावी लागेल.
सामाजिक कौशल्य हे ‘मानवी’ भाग आहेत; असे सिद्ध झाले आहे की जरी AI आणि ऑटोमेशन यांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढली तरी या कौशल्यांची गरज कमी होणार नाही. भावनांक-आधारित कामे, मानवी संवाद, सहकार्य या गोष्टी कायमच महत्त्वाच्या असतील.
अशा प्रकारे, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा २०३०’ साठीचा अहवाल हे स्पष्ट करतो की भविष्यातील कामगाराला तांत्रिक कौशल्ये तसेच सॉफ्ट स्किल्स दोन्हीचे विशेष महत्त्व आहे. जे कर्मचारी दोन्ही प्रकारच्या कौशल्यांवर लक्ष देतील, त्यांना बदलत्या नोकरीच्या बाजारात अधिक संधी मिळतील. त्यामुळे नवीन नोकरी लागणाऱ्यांनी हे गुण आत्मसात करणे आवश्यक आहे.
bhooshankelkar@ hotmail.com / mkelkar_2008 @yahoo.com