Success Story Walki Village : चिंच तुम्ही अनेकदा खाल्ली असेल; पण याच चिंचांचा व्यवसाय करून तुम्ही पैसेही कमवू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा सुरू झाला की, हंगामी फळे बाजारात दिसू लागतात. कैरी, आंबा, कलिंगड, आंबट चिंचा. उन्हाळ्यात फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा काळात विक्रेता ही हंगामी फळे विकून मोठा नफा कमावतात.
महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये एक असे गाव आहे, जे फक्त तीन महिने चिंचांचा व्यवसाय करून पैसे कमावतात. उन्हाळ्यामध्ये राहाता तालुक्यातील वाळकी गावातील रहिवाशांची एक गोड यशोगाथा या आंबट चिंचांमध्ये दडलेली आहे. हा व्यवसाय शेतीची कामे नसलेल्या महिन्यांमध्ये गावकऱ्यांना व्यग्र ठेवतो. त्याचबरोबर त्यांना ‘कृषी उद्योजक’ बनवतो, ज्यामुळे ते चिंचा विकून लाखो रुपये कमवतात आणि स्वावलंबी होतात. दरवर्षी मार्च ते मेदरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील हे छोटेसे गाव एक हंगामी व्यापाराचे केंद्र बनते, जिथे चिंचांचा व्यवसाय नव्या पातळीवर पोहोचतो.
रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर येथील शेतकरी शेतीच्या कामातून काही काळ विश्रांती घेतात. मग ते शेतकऱ्याच्या भूमिकेतून व्यापाऱ्याच्या भूमिकेत प्रवेश करतात. या काळात हे शेतकरी गावोगावी फिरतात, चिंचेची झाडे शोधतात आणि चिंचा खरेदी करतात. चिंचा विकण्याची ही एक साधी प्रक्रिया आहे, जी प्रत्यक्षात एक सुव्यवस्थित हंगामी अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था फक्त दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत लाखो रुपयांचे उत्पन्न निर्माण करते.
वाळकी गावात सुरू असलेला चिंचेचा व्यवसाय हा फक्त एक-दोन लोक वा कुटुंबांपुरता मर्यादित नाही; तर हा व्यवसाय अनेक कुटुंबांना एकत्र आणतो आणि त्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतो. चिंचेच्या उत्पादन आणि आकारानुसार साधारण दोन ते आठ हजार रुपयांना एक झाड खरेदी केल्यानंतर, खरे काम सुरू होते. झाडे हलवून, चिंचा पाडायला सुरुवात होते. काही लोक चिंचा गोळा करायला सुरुवात करतात, तर कुटुंबातील इतर सदस्य ओट्याखाली आणि अंगणात चिंचा गोळा करून ठेवतात. त्यानंतर या चिंचा फोडतात, सोलतात आणि वेगळ्या करतात. चिंच आणि त्याचे कवच वेगळे झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. या चिंचा मुंबई, वाशी, अहिल्यानगर व श्रीरामपूर यांसारख्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.
या चिंचा विकून मोठ्या व्यापाऱ्यांना चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते आणि लहान व्यापाऱ्यांना विक्रीच्या प्रमाणात ५० ते ६० हजार रुपये निश्चितच मिळतात. नेहमीची शेतीची काम कमी होतात तेव्हा या हंगामी फळाची विक्री ६० ते ७० कुटुंबांना आधार देते.
सध्या बाजारात चिंचेची प्रति क्विंटल किंमत सात ते आठ हजार रुपये आणि चिंचेच्या कवचाची किंमत १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल इतकी आहे.
“उन्हाळ्यात ही आंबट फळे आम्हाला जगवतात,” एका व्यापाऱ्याने ‘ईटीव्ही भारत’ला माहिती देताना सांगितले. “रब्बी हंगामानंतर जेव्हा आमची शेतीची कामे कमी होतात आणि शेतात पीक नसते, तेव्हा आमच्या अंगणातील चिंच आम्हाला व्यग्र ठेवते. तसेच, आम्हाला चांगले पैसे कमवण्याचा पर्याय देऊन आमचे कुटुंब चालवते.”
वाळकी गावात लहान आणि मोठे असे दोन्ही मिळून सुमारे ६० ते ७० चिंचेचे व्यापारी आहेत आणि येथे सर्व धर्म आणि समुदायांचे रहिवासी एकत्र येऊन काम करतात. सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून येथे विशेषतः मुस्लीम कुटुंबांनी या व्यवसायात पुढाकार घेतला आहे आणि दरवर्षी दोन महिने चालणारी एक मजबूत पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.
चिंचेचा हंगाम संपतो आणि पावसाळा सुरू होतो तेव्हा गावकरी त्यांच्या नेहमीच्या शेतीच्या कामात व्यग्र होऊन जातात.
जेव्हा चिंचेचा हंगाम संपतो आणि पावसाळा सुरू होतो, तेव्हा गावकरी त्यांच्या नियमित शेतीच्या कामांसाठी शेतात परततात.
भारतात चिंचेची लागवड (CEIC डेटा आणि रिसर्च गेट निष्कर्ष) :
- प्रमुख उत्पादक राज्ये : तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ व महाराष्ट्र ही भारतातील चिंचेची अव्वल उत्पादक राज्ये आहेत.
उत्पादन प्रदेश :
- कर्नाटक : २०२४ मध्ये, कर्नाटकने अंदाजे ३५,०४० मेट्रिक टन चिंचेचे उत्पादन केले.
- तमिळनाडू : त्याच वर्षी तमिळनाडूचे उत्पादन सुमारे ४२,६७२ मेट्रिक टन होते.
- आंध्र प्रदेश : २०२४ मध्ये सुमारे २०,२०१ मेट्रिक टन उत्पादन झाले.
सीईआयसीच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये महाराष्ट्रात १.५८७ हेक्टरपेक्षा जास्त चिंचेची लागवड झाली.
- उत्पादन आणि उत्पन्न :
- सरासरी उत्पादन : ८-१० टन प्रति एकर
- बाजारभाव : ८० रुपये प्रति किलो
- एकूण उत्पन्न : ६,४०,००० रुपये
चिंचेची झाडे कणखर असतात आणि एकदा त्यांची चांगली वाढ झाल्यावर त्यांना कमीत कमी काळजी घ्यावी लागते. चिंचेचे झाड चिंचेव्यतिरिक्त, कवच, चिंचोके, पाने व लाकूड देते. या सर्वांना बाजार मूल्य असते. ही झाडे मृदासंवर्धनास मदत करतात आणि विविध प्रकारच्या मातीत वाढू शकतात.