अनुराधा सत्यनारायण-प्रभुदेसाई
प्रवेश परीक्षा ते नोकरीतला ताण… कधीना कधी त्याला सामोरे जावे लागतेच. त्यावर मात करण्यासाठी काय करायचे याचा उलगडा या सदरातून. दर पंधरा दिवसांनी.
आयआयटीमधून नुकत्याच पदवीधर झालेल्या सोहमला वारंवार रडणे, पॅनिक अटॅक आणि एकटेपणा तसंच सतत तणावात असणे यासाठी माझ्याकडे आणण्यात आले होते. सोहम माझ्याकडे आला तेव्हा तो नैराश्यातच होता. निरुत्साही, झुकलेले खांदे, काळवंडलेला चेहरा आणि चेहऱ्यावर तणावाचे आणि घाबरलेल्याचे भाव. त्याची देहबोलीही वेगळीच होती.
त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याने मला सांगितले की, तो आयआयटीतून पदवीधर झाला असूनही त्याला कॅम्पस इंटव्ह्यूमधून नोकरी मिळालेली नाही. ही त्याच्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब होती. त्यामुळे त्याने इतके टेन्शन घेतले की त्याने आत्मविश्वास गमावला. त्यामुळे तो इतरत्रही नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी स्वत:ला तयार करू शकत नव्हता. त्याला अपयशाची भीती वाटत होती.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : सागरी वाहतुकीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या?
आयआयटीयन असणं ही तेथील विद्यार्थ्यांसाठी खूप अभिमानाची बाब असते. त्यातच जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे उत्तम पगाराची नोकरी मिळते तेव्हा हा अभिमान आणखीच दुणावतो. आयआयटीतून पदवीधर झाला म्हणजेच, पुढे एक गौरवशाली करिअरचा मार्ग सुकर आहे, सहज आहे, अशीच सगळ्यांची धारणा असते. ती गोष्ट जेव्हा होत नाही तेव्हा मात्र येथील किंवा सोहमसारखे अनेक जण त्यांचा आत्मविश्वासच गमावून बसतात.
सोहमने स्वत:वर काम केले, आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला, स्वत:च्या समस्येकडे वस्तुनिष्ठपणे पाहिले. सोहमला त्याचा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्याने एका ठिकाणी यशस्वी मुलाखत दिली. सध्या तो एका प्रतिष्ठित कंपनीत उत्तम पगाराची नोकरी करत आहे. तेही अतिशय आनंदाने आणि आत्मविश्वासाने…
सोहमला उपयुक्त ठरलेल्या काही टिप्स…
उत्तम संभाषण कौशल्य : सोहमला स्पष्ट आणि थेट बोलण्यात सक्षम नसल्याचं माझं निरीक्षण होतं. दोन-तीन वाक्ये बोलल्यावर त्याचा आवाज कमी होत असे. ही सवय त्याला स्वत:बद्दल खात्री नाही हेच दर्शवायची. सोहम शैक्षणिकदृष्ट्या पारंगत होता पण त्याचे ज्ञान मुलाखतीत परावर्तीत होत नव्हते. त्याला स्पष्ट आणि थोडक्यात म्हणणे मांडण्यास सांगितले.
तुमचा गृहपाठ करा : ज्या ठिकाणी मुलाखतीला जायचे आहे, त्या कंपनीची तसेच तिथले मुख्य उत्पादने किंवा सेवा यांची माहिती घ्या.
स्पष्ट आणि खरे बोला : मुलाखत घेणारे प्रामाणिकपणाला महत्त्व देतात. त्यामुळे तुम्हाला जर एखादे उत्तर माहीत नसेल, तर प्रामाणिकपणे तसे सांगा. मुलाखत जर अयशस्वी ठरली तर त्यात स्वत:ला दोष देण्याऐवजी त्यातून काय शिकता येते ते पाहा. पुन्हा त्या चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. सोहमने केलेली ही सर्वात मोठी गोष्ट हीच होती.
तुमचे कौशल्य, क्षमता आणि पूर्वी केलेले काम मांडण्याचा प्रयत्न करा. मात्र, सादरीकरणात नम्रपणा असावा. प्रत्येक मुलाखतीनंतर स्वत:च्या सादरीकरणाचे मूल्यमापन करा. अनेकदा मुलाखतीच्या वेळी घाबरून जाऊन नैराश्य येते. ते टाळण्यासाठी मुलाखती देत असल्याची कल्पना करा. स्व-प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. यश आणि अपयशाबद्दल आपल्या मूल्यांचे परीक्षण करा.