Success Story : काही महिलांमध्ये पडेल ते काम करून, त्या कामात स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद असते. अनेक मोठमोठ्या क्षेत्रांतील महिलांपासून ते अगदी स्वतःचे अस्तित्व विसरून, कुटुंबासाठी झटणाऱ्या महिलापर्यंत प्रत्येकीमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. हल्ली अनेक गृहिणी घर सांभाळण्यासह स्वतःचा व्यवसाय सुरू करीत आहेत. पोळी भाजी, नाश्ता, फळ, फुलं, भाजी अशा अनेक गोष्टींची विक्री करून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. आज आम्ही अशाच एका महिलेची यशोगाधा तुम्हाला सांगणार आहोत, ज्या महिलेनं रोपं विकून लाखो रुपये कमावले आहेत.
रुबी कुमारी, असे या महिलेचे नाव असून, ती बांके येथील रहिवासी आहे, तिचे लग्न सुदर्शन कुमारशी झाले होते. लग्नानंतर रुबीचे आयुष्य गावातील इतर महिलांसारखेच चालले होते; पण एका अपघातामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. रुबीचा नवरा मजूर म्हणून काम करायचा; पण तो मजुरीचं काम सोडून घरी आला आणि मशीनवर काम करू लागला. अचानक एके दिवशी मशीनमुळे तिचा पती जखमी झाला आणि त्याचा हात कापावा लागला. उपचाराचा खर्च उचलणे खूप कठीण होते, घरात कमावणारे कोणी नव्हते. घराची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यानंतर रुबीने
नर्सरीचा व्यवसाय सुरू केला.
रुबीने काही रोपे लावली. त्यानंतर तिने रोपे विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचे घर रोपवाटिकेत बदलले. चांगली गोष्ट म्हणजे तिला ‘मुख्यमंत्री निजी रोपवाटिका योजनेच्या’अंतर्गत रोपवाटिका उभारण्याची जबाबदारी मिळाली. पहिल्या खेपेस रुबीला प्रतिरोप २४ रुपये दराने ४,८०,००० रुपयांच्या २० हजार रोपांची ऑर्डर मिळाली. तिने वन विभागाला २० हजार रोपे दिली आणि गेल्या वर्षी रुबीने एक लाखाहून अधिक रोपे पुरवली. हळूहळू तिचे काम वाढले. तिच्या कठोर परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने तिचा आत्मविश्वास वाढला.
अनेक महिलांसाठी रूबी ठरली आदर्श
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुबीचा नवरा म्हणतो की, जर रुबी नसती, तर मी आणि माझे कुटुंब जगले नसते. माझ्या पत्नीने माझे उपचार केले. आज तिच्यामुळे आमचे घर आहे आणि आमचा मुलगा चांगल्या शाळेत शिकत आहे. माझी पत्नी इतर महिलांसाठी एक उदाहरण आहे. सुदर्शन कुमार म्हणतात की, आजच्या काळात गरिबी आणि पतीमधील कमतरतांमुळे बायका पतींना सोडून जातात; परंतु माझ्या पत्नीने मला साथ दिली. माझा हात कापला गेल्यामुळे मी बाहेर कामावर जात नाही, तर मी माझ्या पत्नीच्या नर्सरीत येऊन काम करतो. आता आमचे आयुष्य आनंदाने जात आहे.