सागर भस्मे

UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याअंतर्गतच यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-४ (नीतिशास्त्र)साठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पनांचा अभ्यास आपण या लेखातून करू. मागील लेखातून आपण नैतिकता म्हणजे काय? नीतिशास्त्राच्या स्रोत आणि नैतिकतेचे महत्त्व यांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण नीतिशास्त्राच्या शाखा आणि नैतिकतेसमोरील आव्हानांबाबत जाणून घेऊ.

नीतिशास्त्राच्या शाखा

नीतिशास्त्राच्या साधारण चार शाखा आहेत. वर्णनात्मक नीतिशास्त्र, आदर्शवादी नैतिकता, अधिनीतिशास्त्र व उपयोजित नीतिशास्त्र.

१) वर्णनात्मक नीतिशास्त्र (Descriptive Ethics ) : वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे नैतिकतेबद्दलच्या लोकांच्या विश्वासांचा अभ्यास होय. त्यात प्रायोगिक तपासणीचा समावेश असतो. हे आपल्याला एक सामान्य पॅटर्न किंवा विविध प्रकारच्या समुदायांमधील लोकांची जीवनशैलीची ओळख करून देते. वर्णनात्मक नीतिशास्त्र नैतिकतेचा इतिहास आणि उत्क्रांतीचा अभ्यास करते. तसेच ते कुटुंब किंवा विवाह यांसारख्या संस्थांचा इतिहासही सांगते. लॉरेन्स कोहलवर्गचा नैतिक चेतनेचा सिद्धांत वर्णनात्मक नीतिशास्त्राचे उदाहरण आहे.

२) आदर्शवादी नीतिशास्त्र (Normative Ethics) : आदर्शवादी नीतिशास्त्रात नैतिक मानकांवर पोहोचणे समाविष्ट आहे. यांद्वारे योग्य आणि अयोग्य आचरण नियंत्रित केले जाते. आदर्शवादी नीतिशास्त्रात नैतिक सिद्धांतांचा अभ्यास केला जातो. त्यात लोकांनी कसे वागले पाहिजे, हे सांगितले जाते. आदर्शवादी नीतिशास्त्रात एखाद्या कृतीच्या बरोबर किंवा चुकीच्या मानकांचे परीक्षणही केले जाते. अॅरिस्टॉटलचे सदगुण नीतिशास्त्र आणि भगवदगीतेचे निष्काम कर्मयोग हे आदर्शवादी नीतिशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : नैतिकता म्हणजे काय? नीतिशास्त्राचे स्रोत कोणते?

३) अधिनीतिशास्त्र (Meta Ethics) : नैतिक संकल्पनांच्या उत्पत्तीचा आणि अर्थाचा अभ्यास म्हणून अधिनीतिशास्त्राची व्याख्या केली जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास अधिनीतिशास्त्र म्हणजे नैतिक अटी आणि सिद्धांत कशाचा संदर्भ घेतात याचा अभ्यास करणे होय. अधिनीतिशास्त्रात प्रामुख्याने दोन प्रश्नांचा अभ्यास केला जातो. एक म्हणजे मानवापासून स्वतंत्र नैतिकतेचे काही अस्तित्व आहे का? आणि दुसरे म्हणजे आचरण आणि नैतिक निर्णयांना मानसिक आधार आहे का?

४) उपयोजित नीतिशास्त्र (Applied Ethics) : उपयोजित नीतिशास्त्रात गर्भपात, प्राणी हक्क, किंवा इच्छामरण यांसारख्या विशिष्ट आणि विवादास्पद समस्यांचे विश्लेषण केले जाते. उपयोजित नीतिशास्त्र नैतिक तत्त्वाचे ज्ञान वापरून दुविधा मांडण्यास मदत करते. अनेकदा नव्याने स्वीकारलेल्या जीवनशैलीमुळे काही समस्या उदभवतात. अशा वेळी या समस्या सोडवण्यासाठी उपयोजित नीतिशास्त्राची मदत घेतली जाते.

नीतिशास्त्रासमोरील आव्हाने

व्यक्तिवाद, धर्म व संस्कृती ही नीतिशास्त्रासमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. व्यक्तिवादात एखादी व्यक्ती इतर गोष्टींपेक्षा स्वत:चा स्वार्थ महत्त्वाचा समजतो. उदा. परीक्षेत कॉपी केल्याने कदाचित इतरांपेक्षा जास्त मार्क मिळतील. मात्र, कॉपी करणे हे अनैतिक आहे. यात इतर गोष्टींपेक्षा स्वत:चा स्वार्थ महत्त्वाचा समजला जातो.

धर्म : प्रत्येक धर्म हा माणसाला शिस्त आणि नैतिकता शिकवतो. मात्र, अनेकदा धर्म हा नीतिशास्त्रासमोरील आव्हान म्हणून उभे राहतो. उदाहरणार्थ- सती प्रथा; सती प्रथा ही पूर्णपणे चुकीची होती. मात्र, धार्मिक कारणांमुळे १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ती सुरू होती.

संस्कृती : अनेकदा संस्कृतीदेखील नीतिशास्त्रासमोर आव्हान म्हणून उभी राहते. उदाहरणार्थ- पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असते आणि ते नैतिक वर्तनसुद्धा आहे. मात्र, दिवाळी, जलीकट्टू यांसारख्या सणांच्या वेळी आपण निर्धास्तपणे पर्यावरणाचे नुकसान करतो.

Story img Loader