सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारताच्या भौगोलिक स्थानाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील राज्ये आणि त्यांच्या निर्मितीबाबत जाणून घेऊ. भारताला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यातून भारताची राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक जडणघडण झालेली दिसते. ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश संस्थाने ही स्थानीय प्रांत व कमिशनर स्टेटस या प्रकारची राज्ये होती. ब्रिटिशांच्या अनेक कायद्यांतून भारताचे प्रशासनाच्या सोईसाठी विभाजन केले गेले; तसेच स्वातंत्र्याच्या वेळी अनेक राजांचे प्रांत एकत्र करून, त्यापासून राज्ये बनविण्यात आली.

godavari river system
UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गोदावरी नदी प्रणाली
Population Of Maharashtra
UPSC-MPSC : महाराष्ट्राची लोकसंख्या भाग १ : घनता, वैशिष्ट्ये टक्केवारी अन् निष्कर्ष
Sustainable Development Goals
UPSC-MPSC : शाश्वत विकास म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपाययोजना कोणत्या?
Financial Planning in India
UPSC-MPSC : भारतामधील आर्थिक नियोजनाची पार्श्वभूमी काय होती? त्यासाठी कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या?
planning commission
UPSC-MPSC : नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
Five Year Plans In India
UPSC-MPSC : दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट कोणती? योजनेदरम्यान कोणते विकास प्रकल्प सुरू करण्यात आले?
Maharashtra Tourism
UPSC-MPSC : महाराष्ट्रातील भौगोलिक व नैसर्गिंक पर्यटनस्थळे कोणती? त्यांची वैशिष्ट्ये काय?
State Legislature
UPSC-MPSC : राज्य विधिमंडळ; रचना, कार्यकाळ सदस्यांची पात्रता अन् शपथ

भारतातील पहिले ओडिशा हे राज्य १९४८ मध्ये निर्माण केले गेले. त्यानंतर स्वातंत्र्योतर काळात भाषावार राज्यांची रचना केली गेली. याआधी बॉम्बे, मद्रास, बंगाल व उत्तर प्रांत हे मुख्य प्रांत होते. त्यातून भाषा या तत्त्वावर राज्यांची प्रशासकीय सोय या मुख्य उद्देशाने विभागणी केली गेली. सध्या भारत हे २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश, अशा एकूण ३६ घटकांचा समावेश असलेले एक संघराज्य आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतीय उपखंडाची निर्मिती कशी झाली? भारताची भौगोलिक रचना कशी?

भारतातील राज्ये म्हणजे स्वयंशासित प्रशासकीय विभाग आहेत. प्रत्येकाचे राज्य सरकार आहे. राज्यांचे प्रशासकीय अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सामायिक केले जातात. भारताचे वर्णन एक अविनाशी संघ म्हणून केले गेले आहे. कारण- भारतातील घटना ही देशाच्या प्रादेशिक अखंडतेची हमी देते; परंतु देशातील वैयक्तिक राज्यांच्या स्वातंत्र्याची हमी देत नाही. तसेच भारत देश अमेरिका (United States of America)सारख्या राज्यांनी केलेल्या करारातून अस्तित्वात आलेला नाही. भारतातील राज्यांची निर्मिती ही प्रशासकीय, सांस्कृतिक, प्रादेशिक, भाषावार रचना या बाबींचा विचार करून झाली आहे. त्यामुळे भारताला ‘विनाशकारी राज्यांचे अविनाशी संघ’ (Indistructible union of destructible states), असे म्हणतात.

२६ जानेवारी १९५० रोजी लागू झालेल्या भारताच्या संविधानाने भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवले. नवीन प्रजासत्ताक ‘राज्यांचे संघराज्य’ म्हणून घोषित केले गेले. १९५६ मध्ये १४ राज्ये व सहा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक बॉम्बे राज्याची स्थापना केली गेली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधून १ मे १९६० ला बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० अंतर्गत महाराष्ट्र प्रांत वेगळा करून, सौराष्ट्र व कच्छ भाग मिळून १५व्या गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली.

नागालँडच्या माजी केंद्रशासित प्रदेशाने १ डिसेंबर १९६३ रोजी राज्याचा दर्जा प्राप्त केला. पंजाब पुनर्रचना कायदा, १९६६ मुळे १ नोव्हेंबर रोजी हरियाणाची निर्मिती झाली आणि पंजाबच्या उत्तरेकडील जिल्ह्यांचे हिमाचल प्रदेशात हस्तांतर झाले. या कायद्याने चंदिगडला केंद्रशासित प्रदेश आणि पंजाब व हरियाणाची सामायिक राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आले. २१ जानेवारी १९७२ रोजी मणिपूर, मेघालय व त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांची स्थापना करण्यात आली. १९७३ मध्ये म्हैसूर राज्याचे नाव बदलून, ते कर्नाटक असे करण्यात आले.

१६ मे १९७५ रोजी सिक्कीम हे २२ वे राज्य बनले. १९८७ मध्ये २० फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश व मिझोरम ही राज्ये बनली. त्यानंतर ३० मे रोजी गोवा हे २५वे राज्य म्हणून स्थापन झाले. नोव्हेंबर २००० मध्ये पूर्व मध्य प्रदेशातून छत्तीसगड, वायव्य उत्तर प्रदेशातून उत्तरांचल (२००७ मध्ये उत्तराखंड असे नाव बदलले) व बिहारच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमधून झारखंड, अशी तीन नवीन राज्ये निर्माण झाली. ही निर्मिती अनुक्रमे मध्य प्रदेश पुनर्रचना कायदा, २०००, उत्तर प्रदेश पुनर्रचना कायदा, २००० व बिहार पुनर्रचना कायदा, २००० च्या अंमलबजावणीसह करण्यात आली. वायव्य आंध्र प्रदेशातील १० माजी जिल्ह्यांमधून तेलंगणा या २८ व्या राज्याची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली. अशा प्रकारे सद्य:स्थितीत भारतात एकूण २८ राज्ये आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : बुद्धिवंतांचे स्थलांतर म्हणजे काय? त्याचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणाम कोणते?

भारतातील केंद्रशासित प्रदेश

भारतात २०२० पासून एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. ते पुढीलप्रमाणे :

१) अंदमान आणि निकोबार बेटे : बंगालच्या उपसागरात ज्वालामुखीचा उगम असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटांची साखळी आहे. त्यांची संख्या सुमारे ५५६ आहे; त्यापैकी ३७ बेटांवर कायमची वस्ती आहे. येथे अनेक टेकड्या आणि अरुंद दऱ्या आहेत. ते हिरव्यागार जंगलांनी व्यापलेले आहे. ६°४५’ अक्षांशावर स्थित इंदिरा पॉइंट (ला हेंचिंग) हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक आहे.

२) लक्षद्वीप : हा प्रवाळे असलेला ३६ बेटांचा समूह आहे. त्यापैकी फक्त ११ बेटांवर वस्ती आहे. ही बेटे केरळ किनार्‍यापासून सुमारे २८० ते ४८० किमी अंतरावर अरबी समुद्रात आहेत. त्याची राजधानी ही कावरत्ती समुद्रसपाटीपासून फक्त एक ते दोन मीटर उंचीवर आहे. मासेमारी, कोपर-प्रक्रिया, मासे जतन व नारळाची लागवड हे मुख्य व्यवसाय आहेत. पर्यटन हा लोकांच्या उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे.

३) पुदुचेरी : पूर्वी पाँडिचेरी म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश १३८ वर्षे फ्रेंच राजवटीत होता; जो १ नोव्हेंबर १९५४ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाला. तो पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि तिन्ही बाजूंनी तमिळनाडूने वेढलेला आहे. पुदुचेरीपासून सुमारे १५० किमी दक्षिणेस पूर्व किनाऱ्यावर कराईकल आहे. माहे हा केरळने वेढलेल्या पश्चिम घाटावरील मलबार किनाऱ्यावर वसलेला आहे.

४) चंदिगड : १ नोव्हेंबर, १९६६ रोजी हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. चंदिगड हे सुनियोजित शहर आहे. त्याची मांडणी फ्रेंच वास्तुविशारद ले कॉबसायर (Le Corbusier) यांनी तयार केली होती. ही हरियाणा व पंजाब या दोन्ही देशांची राजधानी आहे.

५) दादरा नगर हवेली आणि दमण दीव : दादरा आणि नगर हवेली गुजरातच्या दक्षिणेस आहे. ते पूर्वेला गुजरात, पश्चिमेला अरबी समुद्राने बांधलेले आहे. दीव हे दोन पुलांनी जोडलेले बेट आहे. दीवच्या शेजारचा जिल्हा गुजरातचा जुनागड आहे. गोव्यासह दमण व दीव ही स्वातंत्र्यानंतरही पोर्तुगीजांची वसाहत होती. १९६१ मध्ये तो भारताचा अविभाज्य भाग बनला. हा केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो.

६) दिल्ली (N.C.T.) : उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वेशिवाय दिल्ली हे शहर सर्व बाजूंनी हरियाणाने वेढलेले आहे. हे शहर सुमारे तीन हजार वर्षे जुने आहे आणि देशाच्या उत्तर-मध्य भागात आहे.

७) लडाख : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. या तारखेपूर्वी लडाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा प्रदेश होता. लेह, कारगिल ही त्याची राजधानी आहे. लडाखमध्ये विधानसभा नाही.

८) जम्मू आणि काश्मीर : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी लडाखसोबतच जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला. हा प्रदेश जम्मू आणि काश्मीर प्रदेशाला उत्तरेला अफगाणिस्तान आणि चीन, पूर्वेला तिबेट (चीन), दक्षिणेला हिमाचल प्रदेश व पंजाब आणि पश्चिमेला पाकिस्तान यांनी वेढलेला आहे.