सागर भस्मे
मागील लेखातून आपण नदी, हिमनदी आणि वाऱ्याच्या अपक्षय व निक्षेपण कार्याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांविषयी जाणून घेऊ या.
वाळवंटी प्रदेशात पाण्यामुळे निर्माण होणारी भूरूपे
प्लाया (Playa) : प्लाया मैदानाला लवणपटल, असेही म्हणतात. वाळवंटी प्रदेशामध्ये वाहणाऱ्या नद्या आखूड असून, त्या १२ महिने वाहणाऱ्या नसतात. तसेच त्या थेट समुद्रात न मिळता, एखाद्या खंडांतर्गत भागात नामशेष होतात. बहुतांश वेळी या नद्या खोलगट भागात जाऊन मिळतात आणि तिथे सरोवराची निर्मिती करतात. अशा सरोवरात क्षारांचे प्रमाण भरपूर असते. या सरोवरातील पाणी बाष्पीभवनाने नाहीसे होऊन सरोवराच्या तळाशी क्षारांचे पांढरे कण मोठ्या प्रमाणात जमा होतात. त्याला ‘लवणपटल’ किंवा ‘प्लाया’, असे म्हटले जाते. प्लाया सामान्यत: जगातील अर्धशुष्क ते शुष्क प्रदेशात तयार होतात. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये अशा प्रकारचे ‘प्लाया’ मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये जैसलमेरच्या उत्तरेकडे या स्वरूपाची अनेक सरोवरे तयार झाली आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे भूरूपे कशी तयार होतात?
बजदा (Bajada) : बजदा या भूरूपाची निर्मिती प्लाया आणि त्याच्या सभोवतालच्या पर्वतांदरम्यान होते. बजदा म्हणजे अल्पजीवी नद्यांनी या खोलगट भागात वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने तयार झालेला भाग होय. बजदा तीव्र प्लाया तलाव असतात. बजदा हे सामान्यतः कोरड्या हवामानात निर्माण होतात. तसेच ओल्या हवामानाच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी प्रवाह सतत गाळ जमा करीत असतात, त्या ठिकाणीसुद्धा याची निर्मिती होते. त्याचबरोबर या भागातील वारे डोंगरउतारावरील माती सखल भागात वाहून आणतात आणि ‘बजदा’च्या निर्मितीस हातभार लावतात. आफ्रिका खंडामध्ये लिबिया देशात ‘बजदा’ची निर्मिती पाहावयास मिळते.
शिलापद (Pediment) : वाळवंटी प्रदेशामध्ये पर्वतांच्या पायथ्याशी झीज होऊन जी सपाट मैदाने तयार झालेली आहेत, त्यांना शिलापद, असे म्हटले जाते. त्यांना अवतल उतार किंवा कमी होत जाणारा उतार म्हणूनही ओळखले जाते. शिलापद विलीन झालेल्या जलोढ पंखांच्या गटांसाठी संपूर्ण जगभरातील बेसिन-आणि-श्रेणी (basin-and-range) प्रकारच्या वाळवंटी भागात अधिक प्रमाणात असतात. ज्याप्रमाणे पाणी व वारा यांच्या निक्षेपण कार्याद्वारे ‘बजदा’ची निर्मिती झाली आहे, त्याप्रमाणे पाणी व वाऱ्यांच्या अपक्षरण कार्याद्वारे शिलापद निर्माण झाले आहेत. शिलापद व बजदा दूरवरून बघण्यास सारखेच दिसतात.
दूर्भूमी (Badland) : वेगवान नद्या, तसेच छोटे जलप्रवाह यांमुळे वाळवंटी भागामध्ये दऱ्याखोऱ्यांची निर्मिती होते आणि त्या वाळवंटी प्रदेशाला अत्यंत ओबडधोबड, असे स्वरूप प्राप्त होते. अशा ओबडधोबड स्वरूपाच्या प्रदेशाला दूर्भूमी, असे म्हटले जाते. अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात दूर्भूमी आढळतात. जेथे गाळाचा प्रदेश आढळत नाही, तेथे अनेकदा पायी मार्गाने जाणे अवघड असते. ते प्रदेश शेतीसाठी अयोग्य असतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या निक्षेपणामुळे भूरूपांची निर्मिती कशी होते?
बोल्सन मैदान (Bolsan Plain ) : वाळवंटी प्रदेशामध्ये ज्या वेळेस आकस्मिक वृष्टी होते, त्या वेळेस काही आंतरवाहिनी नद्या तयार होऊन दऱ्यांची निर्मिती करतात. या दऱ्या पर्वतांनी वेढलेल्या असतात. या नद्यांमुळे पर्वतांची झीज होऊन तयार होणाऱ्या मैदानाला ‘बोल्सन मैदान’, असे म्हणतात. अशा प्रकारचे मैदान टेक्सासच्या पश्चिमेकडील ट्रान्स-पेकोमध्ये, दक्षिण न्यू मेक्सिकोमधील मेसिला येथे व मेक्सिकोच्या ईशान्य भागामध्ये आढळतात.