मागील लेखातून आपण राज्यपाल या पदासाठी अटी, पात्रता, राज्यपालांची नियुक्ती आणि त्यांना असलेल्या अधिकारांबाबतची माहिती घेतली. या लेखातून आपण मुख्यमंत्री या पदाबाबत जाणून घेऊ या. यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांची नियुक्ती नेमकी कशी केली जाते? त्यांना कोणते अधिकार असतात? तसेच त्यांचे वेतन आणि कार्यकाळ किती असतो, याचाही अभ्यास करू.

हेही वाचा – UPSC-MPSC : राज्यपालांना नेमके कोणते अधिकार असतात?

राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात; तर मुख्यमंत्री हे शासनप्रमुख असतात. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे पद हे केंद्रातील पंतप्रधान पदासारखेच असते. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यघटनेत अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. राज्यघटनेतील अनुच्छेद १६४ हे मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भात आहे. या अनुच्छेदात राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील, असे नमूद करण्यात आले आहे. पण, याचा अर्थ राज्यपाल कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करू शकत नाहीत. सामान्य संकेतानुसार विधानसभेत बहुमत असणाऱ्या पक्षाच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्रीपदी नियुक्त करतात. अशा व्यक्तीला पुढच्या एका महिन्यात विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आवश्यक असते.

मुख्यमंत्री हा विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो. तसेच कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मुख्यमंत्रीपदी नियुक्त केली जाऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीला पुढच्या सहा महिन्यांत विधिमंडळात निवडून येणे आवश्यक असते; अन्यथा त्याचे मुख्यमंत्री पद संपुष्टात येते.

मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असतो?

राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला नाही. ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. मात्र, असे असले तरी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकत नाहीत. जोपर्यंत त्या व्यक्तीकडे विधानसभेचे बहुमत असते, ती व्यक्ती मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकते. पण, त्याने विधानसभेचा विश्वास गमावला, तर त्याला राजीनामा द्यावा लागतो किंवा राज्यपाल त्याला पदावरून दूर करतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : राज्यपाल; पात्रता, अटी अन् कार्यकाळ

मुख्यमंत्री पदासाठी पात्रता?

राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री पदासाठी पात्र होण्याकरिता पुढील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. १) तो भारताचा नागरिक असावा, २) तो राज्य विधिमंडळाचा सदस्य असावा, ३) त्याने वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. ही पात्रता पूर्ण करणारी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केली जाऊ शकते.

मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देते?

मुख्यमंत्र्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणे आवश्यक असते. ही शपथ त्यांना राज्यपालांकडून दिली जाते. यावेळी मुख्यमंत्री हे भारताच्या संविधानाबाबत श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची, भारताच्या अखंडतेची रक्षा करण्याची, तसेच कोणाविषयी ममत्वभाव न बाळगता सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यंत्र्यांचे वेतन किती?

मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते विधिमंडळाद्वारे ठरवले जातात. मुख्यमंत्र्याला राज्य विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणेच वेतन दिले जाते. त्याशिवाय खासगी खर्च भत्ता, मोफत निवासस्थान व वैद्यकीय भत्ताही दिला जातो.