UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) केंद्र सरकारकडून भारतातील क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी ४५ हजार कोटी रुपयांची घोषणा

केंद्र सरकारच्या बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून भारतातील क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी ३५ हजार कोटी रुपये जहाजांसाठी, तर १० हजार कोटी रुपये क्रूझ टर्मिनलसारख्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहेत. कोलकाता येथे झालेल्या अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेच्या (IWDC) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या लेखातून आपण नदी क्रूझ पर्यटनासंदर्भात भारतातील काही राज्यांच्या क्षमतेविषयी तसेच या पर्यटनाचे संभ्याव्य फायदे आणि आव्हानांविषयी जाणून घेऊया.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मधील सरकारची कार्यकारी यंत्रणा, न्यायपालिका, मंत्रालये आणि विभागांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली तसेच विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे, हस्तक्षेप, त्यांची रचना आणि अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

या योजनेनुसार, भारतात क्रूझ पर्यटनाचा विस्तार आठ जलमार्ग ते २६ जलमार्गांपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच २०४७ पर्यंत क्रूझ सर्किट्सची संख्या १७ वरून ८०, तर नदी क्रूझ टर्मिनलची संख्या १६ वरून १८५ करण्यात येणार आहे.

नदी क्रूझ पर्यटनासाठी कोणत्या राज्याची किती क्षमता?

गंगा नदीचे खोरे :

उत्तर प्रदेश आणि बिहार : वाराणसी, अयोध्या, पाटणा आणि बोधगया यांसारखी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शहरे लाखो लोकांना आकर्षित करतात. क्रूझ पर्यंटनाद्वारे येथील घाट, मंदिरे आणि हेरिटेज साइट्सचा विलक्षण अनुभव पर्यटकांना देता येईल.

पश्चिम बंगाल : ऐतिहासिक शहर कोलकाता आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेले सुंदरबन वन्यजीव अभयारण्य कायमच पर्यटकांना आकर्षित करतात. क्रूझ पर्यंटनाद्वारे ही दोन्ही ठिकाणे ऐकमेकांशी जोडले जाऊ शकतात.

आसाम : ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ पर्यंटनाद्वारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, गुवाहाटीतील कामाख्या मंदिर आणि जगातील सर्वात मोठे नदी बेट माजुली येथील पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते.

ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे :

अरुणाचल प्रदेश आणि नागालँड : येथील निसर्गसौंदर्य, आदिवासी संस्कृती आणि मोठ्या प्रमाणात असलेले भिक्षुविहार साहसी पर्यटनाच्या संधी देतात. क्रूझ पर्यटनाद्वारे येथील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधता दाखवली जाऊ शकते. अर्थात, या भागात क्रूझ पर्यटन हे आव्हानात्मक असेल.

मेघालय : पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाण असलेले चेरापुंजी आणि ‘पूर्वेकडील स्कॉटलंड’ अशी ओळख असलेले शिलाँग, या दोन्ही ठिकाणी क्रूझ पर्यंटनासाठी मोठ्या संधी आहेत. या ठिकाणी पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येईल.

गोदावरी आणि कृष्णा नदीचे खोरे :

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा : नदी क्रूझ पर्यटनाद्वारे अमरावती, काकीनाडा आणि विजयवाडासारख्या ऐतिहासिक स्थळांना बेलम लेणींशी जोडता येऊ शकते, त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.

कर्नाटक : कृष्णा नदीतील क्रूझ पर्यटनाद्वारे पश्चिम घाट, हम्पीसारखी प्राचीन शहरे आणि दांडेलीसारख्या वन्यजीव अभयारण्यांमधील पर्यटनात भर घालता येईल.

नर्मदा आणि ताप्ती नदीचे खोरे :

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र : नदी क्रूझ पर्यटनाद्वारे ओंकारेश्वर आणि अजिंठा-एलोरा लेणी येथील पर्यटन वाढवता येईल. या ठिकाणी पर्यटकांना आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव मिळेल.

गुजरात : नर्मदा नदीतील क्रूझ पर्यटनाद्वारे शूलपाणेश्वरसारखी वन्यजीव अभयारण्ये, भरुचसारखी ऐतिहासिक स्थळे आणि सुरतसारखी शहरे दाखवता येतील.

केरळ बॅकवॉटर :

केरळ : केरळमधील विद्यमान हाऊसबोट पर्यटनाचे परिवर्तन क्रूझ पर्यटनामध्ये करता येईल. याद्वारे पर्यटक या भागातील स्थानिक गावे आणि बाजारपेठांना भेटी देऊ शकतील.

इतर नद्या :

गोवा : मांडोवी नदीतील क्रूझ पर्यटनाद्वारे पणजी, जुना गोवा आणि अगुडा किल्ला पर्यटकांना दाखवता येईल. या ठिकाणी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावरील जीवन अनुभवता येईल.

ओडिशा : महानदीतील क्रूझ पर्यटनाद्वारे कटक, भुवनेश्वर आणि कोणार्क सूर्य मंदिर येथील पर्यटनालाही चालना देता येईल.

नदीतील क्रूझ पर्यटनाचे संभाव्य फायदे :

नदी क्रूझ पर्यटनाद्वारे स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पायाभूत सुविधांचा विकास होईल. याशिवाय पर्यटनाद्वारे होणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. क्रूझ पर्यटनाद्वारे शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल आणि नदी परिसंस्थांचे संरक्षण करता येईल.

नदी क्रूझ पर्यटनासमोरील आव्हाने?

नदी क्रूझ पर्यटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करणे हे केंद्र सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असेल. तसेच क्रूझ पर्यटनासाठी सुरक्षा मानके निश्चित करणे आणि या पर्यटनादरम्यान प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे, हे देखील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकंदरितच नदी क्रूझ पर्यटनामध्ये भारताच्या पर्यटन क्षेत्रात बदल घडवण्याची, आर्थिक आणि प्रादेशिक विकास घडवण्याची अफाट क्षमता आहे.