ऋषिकेश बडवे
अर्थशास्त्र हे मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी मर्यादित संसाधने यांचा ताळमेळ घालणारे शास्त्र आहे. म्हणजेच मनुष्यप्राणी हा स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी विविध निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित संसाधनांचा वापर करून वस्तू व सेवा बनवत असतो व त्याद्वारे आपल्या गरजा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. या सर्वामध्ये एका गोष्टीला मध्यवर्ती स्थान आहे आणि ते म्हणजे संसाधने. संसाधने ही एक व्यापक संकल्पना आहे. संसाधनांचा वापर मानावी जीवनाच्या सर्व पैलूंशी जोडला गेला आहे. किंबहुना मानवी जीवनाचे अस्तित्व हे विविध मार्गानी संसाधनांवर अवलंबून असते.
संसाधनांमध्ये साधने, पैसे, वस्तू, सेवा, कर्मचारी, ऊर्जा, तज्ञता, वेळ आणि व्यवस्थापन अशा विविध गोष्टींचा समावेश होतो व या गोष्टींचा वापर करून मनुष्य प्राणी स्वत:ला फायदे करून घेतो. हे फायदे मुख्यत्वे करून तीन प्रकारचे असतात १. संपत्तीमध्ये वाढ २. एखादी प्रणाली कार्यान्वित ठेवणे व ३. समाजाचे अथवा समाजातील विविध घटकांचे कल्याण साध्य करणे. हे फायदे मिळवणे म्हणजेच विकास साध्य करणे होय. विकास साध्य करण्याच्या प्रयत्नात संसाधने वापरली जातात व संपून जाऊ शकतात. अशावेळी संसाधनांच्या वापरामधून मिळणारे फायदे व संसाधनांचा झालेला ऱ्हास यामुळे पुढील पिढीच्या विकासाच्या क्षमतेवर झालेला परिणाम यांच्यामधील विनिमय अधीनता लक्षात ठेवावी लागते. जेव्हा पुढील पिढीच्या विकासाच्या क्षमतेवर परिणाम न करता संसाधनांचा वापर करून विकास साध्य केला जातो त्यालाच शाश्वत विकास असे म्हणतात.
अशा शाश्वत विकासासाठी संसाधनांचा वापर अतिशय काळजीपूर्वक व विचारपूर्वक करणे आवश्यक असते. संसाधने ही निसर्गनिर्मित (उदा. धातू, कोळसा, कच्चे तेल, जमीन, पाणी इत्यादी) अथवा मानवनिर्मित असतात (उदा. पैसा, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स इ.). त्याचप्रमाणे काही संसाधनांचा वापर करण्याची क्षमता व तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे ज्याला वास्तविक संसाधन (Actual Resource) तर काही संसाधनांचा वापर करण्यासाठी मानव अजूनही प्रयत्नशील आहे ज्याला संभाव्य संसाधन (Potential Resource) असे म्हणतात. उदा. युरेनियमचा वापर करून अणुऊर्जा बनवण्याचे तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे त्यामुळे आपण युरेनियमला वास्तविक संसाधन म्हणू शकतो. परंतु, आपल्या देशात युरेनियमचे पुरेसे साठे नसल्याने आपल्याला ते आयात करावे लागते व त्यावर बहुमूल्य असे परकीय चलन खर्च करावे लागते. त्याउलट केरळ किनारपट्टीवर उपलब्ध असलेल्या मोनोझाईट वाळूमध्ये मोठय़ा प्रमाणात थोरीअम आढळते, परंतु प्रत्यक्षपणे थोरीअमचा वापर करून अणुऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र अजून विकसित होत आहे त्यामुळे थोरीअमला संभाव्य संसाधन मानावे लागेल.
प्रत्येक देशामध्ये उपलब्ध असलेल्या विविध वास्तविक व संभाव्य संसाधनांना एकत्रितरित्या आपण संसाधन संच असे म्हणू शकतो. या संसाधन संचाचा वापर शाश्वत पद्धतीने व्हावा यासाठी नियोजनाची आणि कुशलतेची आवश्यकता असते व त्यासाठी सर्वप्रथम संसाधनांचे एकत्रीकरण (Resource Mobilization) करून त्याच्या वापरासंबंधी योग्य धोरण बनवणे गरजेचे असते. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालानुसार विकसित देश विकासासाठी स्वत:कडे असलेल्या संसाधनसंचामधील ५ टक्के संसाधने दरवर्षी वापरात आणत असतात तर विकसनशील राष्ट्रे २० ते २५ टक्के पर्यंत वापरात आणत असतात. त्यामुळे विकसित राष्ट्रांमध्ये विकास शाश्वत स्वरूपाचा दिसतो. विकसनशील राष्ट्रांमध्ये हा वापर कमीतकमी करून जास्तीतजास्त विकास साध्य करण्यासाठी संसाधनांचा इष्टतम वापर होणे गरजेचे असते व त्यासाठी संसाधन वापरासंबंधी विविध धोरणे राबवून हे उद्दिष्ट साध्य केले जाते.
भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधने ही खासगी व सार्वजनिक मालकीमध्ये पहावयास मिळतात व त्यामुळे संसाधनांच्या एकत्रीकरणामध्ये व वापरामध्ये सुसूत्रतेच्या अडचणी येऊ शकतात. अशावेळी सरकार स्वत:जवळील संसाधनांचा वापर लोक कल्याणासाठी करते व खासगी मालकीच्या संसाधन वापराला ठरावीक दिशा देते जेणेकरून खासगीक्षेत्राची कुशलता व सार्वजनिक क्षेत्राच्या कल्याणकारी उद्दिष्टांचा संगम पाहावयास मिळतो. असे करण्यासाठी सरकारला विविध धोरणांचा, योजनारूपी आमिषांचा आधार घ्यावा लागतो. ही धोरणे व योजना आपल्याला प्रामुख्याने अर्थसंकल्पात व विविध कायद्यांद्वारे पाहावयास मिळतात. यूपीएससीच्या दृष्टीने मुख्य परीक्षेसाठी देशांतर्गत संसाधनांचे एकत्रीकरण हा GS-3 मधील एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकाची तयारी करण्यासाठी थेअरी फार प्रमाणात उपलब्ध नाही. परंतु प्रत्येक महत्त्वाच्या संसाधनाबद्दल सरकारने लागू केलेली धोरणे वेळोवेळी अभ्यासणे गरजेचे असते. यासाठी वर्तमानपत्राचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. उदा. कोळसा खाणकाम व तत्सम ऊर्जेच्या स्रोतांचे एकत्रीकरण व त्यांचा वापर करणे, त्याचप्रमाणे धातू व इतर महत्त्वाची खनिजे, मत्स्यसंपदा, पशुसंपदा, मानवी संसाधन व इतर नैसर्गिक संसाधने इत्यादींचे एकत्रीकरण करून त्यांच्या इष्टतम वापराची धोरणे सरकार वेळोवेळी जाहीर करीत असते.
त्याचबरोबर बऱ्याचवेळा या धोरणांचे नियमन एखाद्या संस्थेकडे सोपवले जाते अथवा त्यासाठी एखादी नवीन संस्था बनवण्यात येते. नुकतेच काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये लिथियमचा मोठा साठा सापडला. या खनिजाचे उत्खनन, एकत्रीकरण व त्याचा भारताच्या विकासाच्या दृष्टीने वापर करण्याबद्दल पुढे जी काही धोरणे जाहीर होतील त्याबाबतची माहिती बाळगणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. त्याचबरोबर राष्ट्रीय जल धोरण, राष्ट्रीय वन धोरण, नुकतेच संसदेने मंजूर केलेले खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) दुरुस्ती विधेयक, २०२३, राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन, डिजिटल इंडिया व त्यासारखी इतर सर्व धोरणे ज्यातून विविध निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संसाधनांचा वापर सुनिश्चित केला जातो अशांची माहिती ठेवणे परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे राहील.