शाळेपासून महाविद्यालयात जाईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक बदल होत असतात. विद्यार्थ्यांचे करिअरचे निर्णय, शैक्षणिक अनुभव आणि मानसिक आरोग्यावरील परिणाम या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यातील या निर्णायक काळात एकमेकांवर परिणाम करत असतात. बऱ्याचदा, मानसिक आरोग्याच्या समस्या उच्च शिक्षणाच्या बाबतीतील निर्णय आणि मर्यादित जागरूकता किंवा साथीदारांच्या दबावासह केलेल्या करिअरच्या निवडीमुळे उद्भवतात. करिअर निर्णयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चिंता, निराशा आणि गोंधळ या महत्त्वाच्या समस्या आहेत, असे अनेकदा आढळून येते.

करिअरबाबत निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना विचारात घेतलेल्या महत्त्वाच्या घटकांमध्ये आपली आवड, व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये, कौशल्ये, क्षमता आणि छंद तसेच भविष्यातील योजना, आकांक्षा, रोजगाराच्या शक्यता, दृष्टिकोन आणि संभाव्य उत्पन्न यांचा विचार करावा.सखोल अभ्यास करून किंवा करिअर समुपदेशकाची मदत घेऊन व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक जीवनाविषयी अधिक शहाणपणाने निर्णय घेणे योग्य ठरते.

समुपदेशक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाच्या समस्या, न्यूनगंड, त्यांच्या शंका यासह अनेक समस्यांसाठी मदत करू शकतात. विद्यार्थ्याच्या महत्त्वाकांक्षा आणि उद्दिष्टांमुळे मानसिक आरोग्यावरही मोठा प्रभाव पडतो. योग्यतेशी जुळणारे करिअर निवडले तर मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही.अनुभवी व्यक्तींचे शैक्षणिक अनुभव करिअर निवडीसाठी मोठी मदत करतात. त्यासाठी अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.

अपयशाच्या भीतीने नकारात्मक येऊ शकतो. ती टाळण्यासाठी आपण ज्या शैक्षणिक संस्थेत शिकणार आहोत, तेथे भेट देऊन पाहणी करा. प्राध्यापक, वर्ग खोल्या, प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांशी संबंध, महाविद्यालयातील वातावरण याची पाहणी केल्यास आणि ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेतल्यास पुढे येणारा तणाव टाळता येतो.