देशभरातील शेतीविषयक माहिती एका क्लिकवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मराठवाडा कृषी विद्यापीठात लवकरच प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्या प्रकल्पाचे नाव ‘नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन इनग्रो’ असे आहे.

  • या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र विभाग विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर देशातील कुठल्याही भागात सध्या असलेली पीक परिस्थिती, त्या ठिकाणी घेतले जाणारे पीक, हवामानाची स्थिती, हवामानाच्या बदलानुसार पीक नियोजनात केलेले बदल, पावसाचे प्रमाण, वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक सल्ला याबरोबरच कच्च्या मालासाठी बाजारपेठ, बाजारपेठेतील भाव आदी माहिती एकाच ठिकाणी मिळविणे सहज शक्य होणार आहे.
  • अलीकडच्या काळात हवामानात बदल होत आहे. पाऊस अनियमित झाला आहे. त्यामुळे शेतीतही अचूकता आणणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचा सल्ला वापरून शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरेल आणि यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांना फलदायी ठरणार आहे.
  • शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे या बाबींची सांगड घालून शेती करणे गरजेचे झाले आहे. या संगणक कक्षात शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणाची शास्त्रीय माहिती मिळणार आहे. तसेच याच माहितीच्या आधारे पीक नियोजन करणे सोयीचे जाणार असल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • ई गव्हर्नन्सी प्लॅनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात बसून विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे सोपे होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यात त्या गावातील शेतकऱ्यांच्या गटाशी संपर्क साधून शास्त्रीय सल्ला देणे सोयीचे होणार आहे.