गेल्या शतकाच्या उत्तरार्धात एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी खगोलशास्त्रातील विविध क्षेत्रांत मोलाचे काम केले होते. तसेच ते एक मोठे विज्ञान प्रसारक होते. त्यांचे नाव होते कार्ल एडवर्ड सागान. एकदा लहान कार्लला त्याच्या आजोबांनी विचारले की तू मोठा होऊन काय करणार? तेव्हा तो म्हणाला मी खगोलशास्त्रज्ञ होणार. आजोबांनी प्रतिप्रश्न केला, ते सगळे ठीक आहे. पण उपजीविकेसाठी तू काय करणार? आजोबांनी विचारलेला हा प्रश्न आजही विचारण्यात येतो. खगोलशास्त्रात करिअर होऊ शकते, याचीच मुळात अनेकांना कल्पना नसते. ज्यांना करायचे असते त्यांनाही सुरुवातीला हे नेमके कशा प्रकारे होईल, याची कल्पना नसते. खगोलशास्त्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न असतो, जागतिक पातळीवर भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे स्थान काय? त्याचप्रमाणे पालकांचा एक हमखास प्रश्न येत असे की, तू रात्रभर अंधाऱ्या जागेतून काम करणार का? त्यामुळे यावेळच्या ‘वेगळ्या वाटा’मध्ये खगोलशास्त्रातील करिअरवर प्रकाश टाकू.
पूर्वी खगोलशास्त्रात करिअर करण्यास इच्छुकांसाठी दोन मार्ग होते. एक म्हणजे खगोलीय निरीक्षणे, खगोलीय वेध आणि सैद्धांतिक खगोलशास्त्र. यातील फरक म्हणजे, खगोलीय निरीक्षणे किंवा वेध यात दुर्बिणींचा वापर करून वेगवेगळ्या खगोलीय पदार्थाची निरीक्षणे घेण्यात येतात. तसेच त्या निरीक्षणातून अर्थ काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक उदाहरण म्हणजे एखाद्या ताऱ्याचा प्रकाश ठरावीक कालावधीत कमी-जास्त होत असतो. मग तो नेमका कसा होतो आणि त्याच्या मागचे कारण काय असू शकेल, याचा शोध घेणे. तर सैद्धांतिक खगोलशास्त्र म्हणजे, या निरीक्षणांच्या माध्यमातून त्या मागचा सिद्धांत शोधून काढणे. एखाद्या निरीक्षणामागे कुठली भौतिक क्रिया होत आहे याचा सिद्धांत शोधणे आणि मग त्या सिद्धांताच्या आधारे नवीन भाकिते करणे. यांची आपल्या दैनंदिन जीवनात घडणारी अनेक उदाहरणे देता येतील. समुद्रात भरती- ओहटी होणे-त्यांचा चंद्र आणि सूर्याच्या स्थितीशी संबंध असणे, हे झाले निरीक्षणात्मक शास्त्र तर त्याच्यामागचे कारण गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा सैद्धांतिक शोध.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गेल्या ३० वर्षांत खगोलशास्त्रात अनेक नव्या वाटा तयार झाल्या आहेत. संगणकक्रांतीमुळे खगोलशास्त्रीय निरीक्षणाशी निगडित आभासीय वेधशाळा ही नवीन शाखा निर्माण केली आहे. तर निरीक्षणे ही नुसत्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशापर्यंत मर्यादित न राहता आता अंतराळात जाण्याची मजल मारली आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या शोधाने विज्ञानाचे आणखीन एक दालन खुले केले आहे. आता या क्षेत्रात जागतिक पातळीवर भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे स्थान सांगायचे झाले तर सध्या भारताची अशी एक वेधशाळा अंतराळात पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे की ज्याच्यासारखी जगात दुसरी वेधशाळा नाही. पुणे नाशिक महामार्गावर खोडद येथे एका रेडिओ दुर्बिणीचे ३० किलोमीटर परिसरात एक संकुल आहे. ही दुर्बीण म्हणजे जगात आपल्या पद्धतीची सर्वात मोठी दुर्बीण. काही भारतीय शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तके जागतिक स्तरावर पीएचडीचे विद्यार्थी पाठय़पुस्तक म्हणून वापरतात. तर जगातील अनेक शास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्रज्ञांना एखाद्या प्रकल्पातील कामामध्ये सहकार्य करण्यासाठी आमंत्रणे देत आहेत. आता समोर येणाऱ्या नव्या वाटांमध्ये खगोलीय रसायनशास्त्र आणि खगोलीय जीवशास्त्र यांचाही समावेश होतो.
ही लांबलचक प्रस्तावना करण्यामागचे कारण इतकेच की, संशोधन आणि मेंदूची गुणवत्ता हा निकष लावल्यास आपला देश इतरांच्या जरी पुढे नसला तरी फार मागेही नाही. विद्यार्थ्यांनी इथे हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की केवळ आवड आहे म्हणून या क्षेत्रात येऊन चालणार नाही. इथे टिकून राहायचे आणि काहीतरी ठोस, भरीव काम करायचे तर मेहनत आणि तीसुद्धा प्रचंड मेहनत ही हवीच. त्या मेहनतीपुढे आकाशही ठेंगणे पडेल, हे शब्दश: खरे ठरेल.
(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)