मी आयटी इंजिनीअिरग केले आहे, पण माझा तिसऱ्या वर्षांचा एक विषय राहिला आहे. मी इलेक्ट्रॉनिक  विषयात प्रथम श्रेणीत पदविका प्राप्त केली आहे. मला नोकरीसाठी संधी मिळेल का?
– अजय पाटील
तिसऱ्या वर्षांचा एक विषय राहिल्याने आपण बीई पूर्ण केले असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळणे कठीण जाते. तथापि, त्याचा विचार न करता आपण राहिलेल्या विषयात उत्तीर्ण व्हावे, असे सुचवावेसे वाटते. सीडॅक संस्थेने सॉफ्टवेअर विषयाशी संबंधित बरेच लघु आणि दीर्घ मुदतीचे प्रमाणपत्र/ पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते आपल्या रुचीनुसार करता येतील. अशा प्रकारे सॉफ्ट स्किल्स सतत वाढवत राहाव्यात तरच उत्तम करिअर संधी प्राप्त होऊ शकते. याशिवाय प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करता येणे गरजेचे आहे. अन्यथा, तुम्ही केलेला कोणताही अभ्यासक्रम उपयुक्त ठरत नाही. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी (www.nielit.gov.in/) या संस्थेने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविषयक लघु मुदतीचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
मी बारावी उत्तीर्ण आहे. अभ्यासातून मी एक वर्षांचा गॅप घेतला असून एमपीएससीचे शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. मी पुढच्या वर्षी कृषी, अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ की स्पर्धा परीक्षेची तयारी करू?
– अविनाश घोडके
आपल्या प्रश्नावरून आपण एमपीएससीच्या नेमक्या कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे स्पष्ट होत नाही. साधारणत: एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी किमान अर्हता कोणत्याही विषयातील पदवी असते. त्यामुळे आपण आपल्या आवडीच्या व गती असलेल्या विषयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. कृषी आणि अभियांत्रिकी या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत. अभियांत्रिकी शाखेसाठी गणिताच्या संकल्पना सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. शिवाय केवळ प्रवेश मिळाला, म्हणून उत्तम करिअर संधी मिळतीलच असे नाही. दोन्ही ज्ञानशाखांमध्ये आपल्याला  सातत्याने उत्तम गुणांनिशी उत्तीर्ण व्हावे लागेल. अभियांत्रिकी शाखेत हे सातत्य राखल्यास कॅम्पस प्लेसमेंटमध्ये संधी मिळू शकते. कृषी विषयातील पदवीधरास थेट शासकीय नोकरी मिळत नाही. कृषी उत्पादके, खते, बी-बियाणे, अवजारे, कीटकनाशके आदी कंपन्यांमध्ये कृषी पदवीधराला नोकरी मिळू शकते. मात्र, त्यासाठी सजग राहून  संधींचा शोध घ्यावा लागतो. कृषी पदवीधराला स्पर्धापरीक्षेद्वारे शासनाच्या कृषी, जलसंधारण, वन विभागात आणि इतर सेवांमध्ये नोकरी मिळू शकते. पदवीचा अभ्यास करतानाच या अभ्यासावर परिणाम होऊ न देता स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असल्यास व तशी क्षमता असल्यास ही तयारी करण्यास हरकत नाही.

मी बीए करत आहे. मला अ‍ॅनिमेशनमध्ये करिअर करायचे आहे. यासाठी उत्तम शैक्षणिक संस्था व अभ्यासक्रमांची माहिती हवी होती.
– अबोली पवार
अ‍ॅनिमेशन क्षेत्रात करिअरच्या संधी दिवसेंदिवस विस्तारत आहेत. मात्र, चांगले अ‍ॅनिमेटर अजूनही मिळत नाही असे या उद्योगाचे म्हणणे आहे. या क्षेत्रात सर्जनशीलतेला मोठा वाव आहे, पण ती जर अ‍ॅनिमेशनचा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवाराकडे नसेल तर तशी संधी मिळणे दुरापास्त ठरते. त्यामुळे आपल्याला खरोखरच अ‍ॅनिमेशनमध्ये गती, रस आणि आवड असेल आणि तासन्तास काम करण्याची क्षमता असेल तर या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रम चालविणाऱ्या काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- nid.edu, एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन- mitpune.com, व्हिसिलग वूड इन्स्टिटय़ूट- whistlingwoods.net, एडिट-edit.co.in, माया अकॅडेमी ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स-www.maacindia.com एरिना अ‍ॅनिमेशन- http://www.arena- multimedia.com, डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस- dskic.in/animation अ‍ॅनिमेशननचे सर्वच अभ्यासक्रम चांगले असले तरी सध्या थ्री डी अ‍ॅनिमेशनचा अधिक बोलबाला आहे. यामध्ये रूची असल्यास हा अभ्यासक्रम जरूर करावा.

मी बी.एस्सी मायक्रोबायोलॉजीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे.
मला एम.एस्सीशिवाय इतर अभ्यासक्रमांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? या क्षेत्रातील करिअर संधी कोणत्या?
– भाग्यश्री भिलारे
बी.एस्सीनंतर एम.एस्सी हा उत्तम पर्याय ठरू शकतो, पण आपल्याला त्याखेरीज इतर पर्याय शोधताना व्यवस्थापन शाखेत रस असल्यास आपण एमबीए अभ्यासक्रम करू शकता. नाटय़कलेत रस असल्यास नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊ शकता. जनसंपर्क, जनसंवाद या क्षेत्रात रस असल्यास पत्रकारिता किंवा जनसंवाद  विषयातील पदव्युत्तर पदविका अथवा पदवी घेऊ शकता. विषयाचे उत्तम ज्ञान, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, संगणकीय कौशल्य यांसारखी सॉफ्ट स्किल्स कोणत्याही ज्ञानशाखेतील चांगल्या संधी मिळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

मी सध्या बी.एस्सीच्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे, तिसऱ्या वर्षांसाठी गणित विषय घेणार आहे. मला कॉम्प्युटर सायन्सची आवड आहे. मला एमसीए करायचे आहे. त्याकरता आवश्यक टक्केवारी,  शुल्क आकारणी यांची माहिती हवी होती. बी.एस्सीनंतर कोणत्या कॉम्प्युटर शाखा अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल?
– सागर पाटील
एमसीए करण्यासाठी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश मिळवावा लागतो. शासकीय संस्था आणि शासन अनुदानित संस्थांमध्ये माफक शुल्क आकारले जाते. राखीव संवर्गातील संवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत मिळते. संगणकाच्या कोणत्या विशेषीकरणात तुम्हाला रस अथवा गती आहे याचा विचार करूनच तुम्ही कॉम्प्युटर अभ्यासक्रम निवडा. उदा. काहींना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तर काहींना हार्डवेअरमध्ये रस असतो.

मी बी.कॉम पूर्ण केले आहे. मला  ऑनलाइन शेअर मार्केट अभ्यासक्रम करायचा आहे.
– अविनाश कवाडे
ऑनलाइन शेअर अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* दलाल स्ट्रीट अकॅडेमी- सर्टििफकेट इन स्टॉक मार्केट अ‍ॅण्ड इक्विटी रिसर्च academy.dsij.in
* नॅशनल स्टॉक एक्स्चेंज- ऑनलाइन एनएसई सर्टफिाइड कॅपिटल
मार्केट प्रोफेशनल http://www.nseindia.com
* शेअरखान ऑनलाइन ट्रेिडग अकॅडेमी- http://www.sharekhan.com
* निफ्टी ट्रेिडग अकॅडेमी- बेसिक शेअर मार्केट ट्रेिनग http://www.niftytradingacademy.com
* इक्विटी मास्टर्स ट्रेिनग-earning.equitymaster.com
* धनश्री अकॅडेमी- http://www.dhanashriacademy.com
* एनआरआय इन्व्हेस्ट इंडिया- http://www.nriinvestindia.com
* आयबीबी इंटरनॅशनल – स्टॉक ट्रेिडग कोर्स http://www.ibbint.com

मी बारावी विज्ञान परीक्षा ७४ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहे. मला बीएएमएसला प्रवेश घ्यायचा आहे. यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल? मागासवर्गीय मुलींसाठी कटऑफ  का असतो?
– किशोरी सूळ
शासकीय किंवा खासगी आयुर्वेद महाविद्यालयातील प्रवेशासाठी एमएच-सीईटीचे गुण ग्राह्य़ धरले जातात. चांगले गुण असतील तर मनासारखे महाविद्यालय मिळू शकते, अन्यथा खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. राखीव संवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बारावी विज्ञान शाखेतील परीक्षेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयात सरासरीने किमान ४० टक्के गुण मिळाल्यासच सीईटी परीक्षेला बसता येते. असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेद मेडिकल कॉलेज ऑफ महाराष्ट्र ही संस्था त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील बीएएमएस प्रवेशासाठी सीईटी घेते. ही परीक्षा आपल्याला देता येईल. भारती विद्यापीठासारख्या अभिमत विद्यापीठात स्वतंत्र सीईटी घेतली जाते. शासकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी दरवर्षी प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कटऑफ असतात. त्यामुळे त्या विषयी निश्चित असे सांगता येणार नाही.

माझे बी.कॉम झालेले आहे. माझे वय २९ वष्रे असून मला कोणत्या पदांसाठी परीक्षा देता येईल?
– दीपक फरताळे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या खुल्या संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वष्रे आहे. इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे आणि अनुसूचित जाती/जमाती संवर्गातील उमेदवारांना ५ वष्रे सवलत दिली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वष्रे, इतर मागास वर्ग संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वष्रे आणि अनुसूचित जाती/जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३७ वष्रे आहे. त्यामुळे आपण ज्या कोणत्या संवर्गात असाल त्यानुसार या दोन्ही परीक्षा
देता येतील.
मी २०११ साली इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात बीई केले. त्यानंतर एक वर्ष नोकरी केली. बायोमेडिकल इंजिनीअिरगमधून  येत्या डिसेंबरमध्ये माझे एम.टेक पूर्ण होईल. मी यूजीसी नेट जून २०१५ मध्ये व सीएसआयआर नेट उत्तीर्ण केली आहे. मला अध्यापनात रस आहे. मला शासकीय किंवा खासगी महाविद्यालयामध्ये अध्यापक कसे होता येईल?
– अभिजित वाघमारे
राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतील भरती ही एमपीएससीमार्फत केली जाते. त्याकडे लक्ष ठेवावे. खासगी महाविद्यालयातील भरतीच्या जाहिराती सतत प्रकाशित होतात. त्यांच्यावर लक्ष ठेवावे. खासगी शिकवणीवर्गासाठी अध्यापक भरती केली जाते. त्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतात. यूपीएससीमार्फत एनआयटीमधील प्राध्यापकांची भरती
केली जाते.

मी डीएड आणि बीए यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून केले आहे. मी एसबीआय प्रोबेशनरी अधिकारी पदासाठीच्या परीक्षेला
बसू शकतो काय?
– प्रशांत जाधव
आपण या परीक्षेला बसू शकता.