08 March 2021

News Flash

संगणक सुरक्षा आणि आपण

थ्रीजी/फोरजीच्या या जगात तर हे सगळे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

आपण सगळेच सध्या सतत ऑनलाइन असतो. फेसबुक म्हणू नका, व्हॉट्सअ‍ॅप म्हणू नका! कधी मोबाइलवर तर कधी संगणक किंवा लॅपटॉपवर.. सतत मेल्स, मेसेज यांचे येणेजाणे सुरू असते. थ्रीजी/फोरजीच्या या जगात तर हे सगळे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. या सगळ्यामुळे जग जवळ आले आहे. आपल्याला एकमेकांबद्दल सगळी माहितीही मिळवता येऊ लागली आहे. पण या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सगळ्यात जास्त फायदा कोण घेत असेल तर ते आहेत, सायबर चोर. सायबर गुन्हेगारी सध्या प्रचंड वाढत आहे. अगदी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इंटरनेट बँकिंगवरून केले जाणारे सायबर गुन्हे असोत किंवा मोठय़ा कंपन्यांना ठकवणारे घोटाळे असोत, सायबर गुन्ह्य़ांची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे. म्हणूनच सायबर सुरक्षा ही देशात सगळ्यात जास्त महत्त्वाची मानली जाते. या क्षेत्रात नोकरीच्या सगळ्यात जास्त संधी आहेत. परंतु हवे तितके प्रशिक्षित मनुष्यबळ या क्षेत्रात नाही. त्यामुळे अनेक खासगी आणि सरकारी कंपन्या आपल्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सायबर सुरक्षा विभागात काम करायला संधी देताना दिसतात. तरीही अनेक लोक या नव्या कामाशी जुळवून घेऊ शकत नाही. या क्षेत्रात काम करायचे तर महत्त्वाचे म्हणजे सायबर चोरांची विचार करण्याची पद्धत समजून घ्यावी लागेल. म्हणजे एखाद्या हॅकरला पकडण्यासाठी हॅकरच्या विचारप्रक्रियेप्रमाणेच विचार करावा लागेल. भविष्यातील इंटरनेट ऑफ थिंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानात तर सुरक्षा हा कळीचा मुद्दा राहणार आहे. कारण भविष्यातील बरीच कामे संगणकच करेल. त्यामुळे अनेक कंपन्या सायबर सुरक्षेला प्रचंड महत्त्व देत आहेत.

सायबर सुरक्षेमधील करिअर

एथिकल हॅकर्स- एथिकल हॅकर्स हेसुद्धा हॅकर्सच असतात पण ते चांगल्या कामासाठी हॅकिंग करतात. उदा. एखाद्या प्रणालीमध्ये काही वैगुण्य राहिले नाही ना, हे पाहण्यासाठी एथिकल हॅकर्स हरतऱ्हेने त्या हॅक करण्याचा प्रयत्न करतात. ती हॅक होऊ शकली नाही तर ती उत्तम आणि मजबूत समजली जाते. जर ती हॅक करता आली तर मग त्या प्रणालीत बदल करण्यात येतो आणि ती अधिक सुरक्षित, मजबूत बनवण्यात येते.

फोरेन्सिक संशोधक- फोरेन्सिक म्हणजे गुन्ह्य़ाची शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी. सायबर सुरक्षेमध्येही अशा तज्ज्ञांची गरज आहेच. एखाद्या डिव्हाइसवर झालेल्या घडामोडींचा अर्थ काढून, कोणता गुन्हा कसा घडला, त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, याचा माग काढण्यासाठी फोरेन्सिक तज्ज्ञ मदत करतात.

मालवेअर संशोधक  – नवनव्या व्हायरस आणि मालवेअरचा अभ्यास करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी मालवेअर संशोधकांची गरज असते.

सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर संशोधक- हल्ली अनेक कंपन्यांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान वापरले जाते.

उदा. फायरवॉल. यावरील अपडेट्स क्षणाक्षणाला पाहावे लागतात. कुठेही काही छिद्र दिसल्यास त्यावर लगेचच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागते. त्यासाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर संशोधकाना २४ तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.

सायबर सेफ्टी इंजिनीअर- सर्वतोपरी काळजी घेऊनही सायबर हल्ला झालाच तर तो परतवण्याचे काम सायबर सेफ्टी इंजिनीअर करतात.

आयटी ऑडिटर- संगणक आणि त्यासोबत येणाऱ्या सर्व गोष्टींसाठी योग्य ती सुरक्षाव्यवस्था पुरवलेली आहे की नाही, याची काळजी आयटी ऑडिटर घेतात. हॅकर्सप्रमाणेच या आयटी ऑडिटरचीही प्रचंड गरज आहे.

सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट- कोणतीही इमारत बांधताना तिच्या रचनेसाठी स्थापत्यशास्त्रतज्ज्ञाचा म्हणजे आर्किटेक्टचा सल्ला  घेतला जातो. त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा व्यवस्थेतील प्रणालींची रचना करण्याचे काम सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट करतात. यांचे मुख्य काम म्हणजे अशा प्रकारची संगणक प्रणाली बनवणे, जी कुणीच हॅक करू शकणार नाही.

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कोणकोणती करिअर असतात याची माहिती आपण घेतली, परंतु ही करिअर करण्यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यायला हवे, याची माहिती उद्याच्या अंकात घेऊ.

(क्रमश:)

(लेखक सायबर सुरक्षा क्षेत्रात एका नामवंत संस्थेसाठी काम करतात.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:06 am

Web Title: computer security and you
Next Stories
1 नोकरीची संधी
2 समाजसेवेतील करिअर संधी
3 यूपीएससीची तयारी : मुलाखत संवाद कौशल्याचा विकास
Just Now!
X