News Flash

कॅटचे काऊंटडाऊन सुरू..

१८० मिनिटांत १०० प्रश्न सोडवताना तुमच्या सर्जनशीलता, समयसूचकता आणि गतिमानतेचा कस लागणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम करिअर घडवू पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी कॅट (Common Aptitude Test)  ही राष्ट्रीय स्तरावरील चाचणी परीक्षा होत आहे. ‘आयआयएम’तर्फे येत्या ४ डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात करायच्या अभ्यासाबाबत..

बी-स्कूलमध्ये एमबीए/एमएमएस/पीजीडीएम-सारख्या पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कॅट ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यंदा २ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी कॅटसाठी नावनोंदणी केली आहे. संकेतस्थळावर उपलब्ध झालेले प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड केले असेलच. शिवाय कॅटच्या अभ्याक्रमातल्या तीन विभागांतल्या विषयांचा अतिशय बारकाईने केलेला अभ्यास, सराव चाचण्या अशी जोरदार तयारी सुरू असेलच. या टप्प्यावर एकदा पुन्हा कॅटच्या अभ्यासाकडे वळून पाहा.

कॅट पाठय़क्रमाचे तीन विभाग खालीलप्रमाणे –

१)    संख्यात्मक क्षमता  (Quantitative Ability) ३४ प्रश्न

२)    शाब्दिक आणि वाचन आकलन क्षमता (Verbal Ability & Reading Comprehension) ३४ प्रश्न

३)    डेटाची अर्थनिश्चिती आणि ताíकक विचारक्षमता (Data Interpretation & Logical /Reasoning ) ३२ प्रश्न

या अनुषंगाने तुमची अभ्यासक्रमाची उजळणी अनेकदा करून झाली आहे. पुनरावलोकन करताना एखादा विषय चुकून राहून गेला असल्याचे लक्षात आले तर त्या नव्या विषयाचा ताण घेऊ नका, उलट सुरुवातीपासून अभ्यास व सराव करून आत्मसात केलेले विषयच तुमचे बलस्थान आहे हे ध्यानात ठेवा.

तीन तासांच्या परीक्षेत तुम्हाला तीन विभागांतले एकूण १०० प्रश्न सोडवायचे आहेत, पण प्रत्येक विभागातल्या प्रश्नांची संख्या वेगळी असून एका विभागातून दुसऱ्याकडे वळण्याची मुभा दिलेली नाही हे लक्षात ठेवून प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. गणिती प्रश्नांसाठी ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या सोयीचा उत्तम वापर करा.

१८० मिनिटांत १०० प्रश्न सोडवताना तुमच्या सर्जनशीलता, समयसूचकता आणि गतिमानतेचा कस लागणार आहे. पण तुम्ही खूप सराव केल्याने तुमची ती तयारी उत्तम झाली असेलच. त्यामुळे आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाला सामोरे जा.

सराव परीक्षा सोडवल्याने आपण कुठे कमी किंवा सक्षम आहोत, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच, म्हणून प्रत्येक विभागातले प्रश्न सोडवताना त्याची खालीलप्रमाणे वर्गवारी करा.

* आकलन झालेले, सोडवू शकणारे

* सोडवू शकणारे, पण त्यासाठी वेळ खर्चावा लागेल असे

* न सोडवू शकणारे

यामुळे योग्य ते प्रश्न निवडून त्यांची उत्तरे देण्यासाठी वेळेचे उत्तम नियोजन करता येईल. वरवर कठीण वाटणाऱ्या प्रश्नांना आधी हात घातल्यामुळे त्यातच गुंतून पडत तुलनेने सोपे प्रश्न सोडवायचे राहून जातात, म्हणून आकलन झालेले प्रश्न आधी सोडवा. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह माìकगही आहे. त्यामुळे हातचे गुण जाऊ देऊ नका. क्वचित असेही होईल की परीक्षेतल्या अनपेक्षित बदलामुळे काही वेगळ्याच स्वरूपाच्या प्रश्नांचा सामना करावा लागेल अशावेळी भांबावून जाऊ नका. आत्मविश्वासाने प्रश्न सोडवा.

प्रत्येक विभागात उत्तम गुण मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवा. सराव परीक्षांतील गुणांमध्ये ज्या ठिकाणी आपण कमी पडलेलो असू त्यासाठी थोडा वेळ द्या. तुमच्यापकी बरेच जण पदवीच्या शेवटच्या वर्षांला आहेत तेव्हा कॅटबरोबर पदवीच्या विषयांचा अभ्यास आणि अंतिम परीक्षेच्या तयारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आयआयएम तसेच आघाडीच्या व्यवस्थापनविषयक शिक्षणसंस्थांच्या प्रवेशप्रक्रियेत कॅटबरोबर दहावी/बारावी/पदवीच्या निकालातून निदर्शनाला येणारी शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, क्रीडा-सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमातला सहभाग त्यातून विकसित झालेल्या सर्जनशीलता, संवेदनशीलता व नेतृत्वगुणांच्या पलूंचाही विचार केला जातो.

अभ्यासाबरोबर योग्य ती शारीरिक, मानसिक विश्रांती घ्या. हलक्याफुलक्या करमणुकीतून आपली ऊर्जा आणि उत्साह वाढता ठेवा. नियमित झोप, संतुलित हलका आहार आणि व्यायामाची या क्षणी जास्त गरज आहे. योगाभ्यास, चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग असे सोपे व्यायाम करणे, अभ्यासाच्या दोन सत्रांमधून थोडी सुट्टी घेत बागकाम, स्केचिंग, संगीत अशा तुमच्या एखाद्या छंदात मन रमवण्यातून, तसेच बठय़ा खेळातून थोडा थोडा मोकळा श्वास घ्या. नाहीतर दीर्घकाळ अभ्यास करून ताण येईल. वैताग येईल. त्याचा परीक्षेवर विपरीत परिणाम होईल. कॅटची तयारी करणाऱ्या इतर स्पर्धक विद्यार्थ्यांसोबत केवळ स्पर्धा नको तर मैत्रीही ठेवा. कधीतरी यातलाच एखादा मित्र तुम्हाला कठीण भासणारा प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याचा मार्ग दाखवेल. आपण केलेल्या तयारीवर विश्वास ठेवून संपूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. यश मिळणारच! सर्वाना शुभेच्छा!

प्रा. डॉ. उदय साळुंखे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 4:42 am

Web Title: countdown begin for common aptitude test
Next Stories
1 नोकरीची संधी
2 परदेशी शिक्षणाचा राजमार्ग
3 वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र