विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर दोन अर्थात  उरअळ च्या परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्त्व पाहिले. आज आपण या पेपरमधील आकलन क्षमता या विभागाची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणती अभ्यासतंत्रे वापरावीत आणि याचा सराव कसा करावा याबद्दल माहिती घेऊयात.

२०१३पासून अर्थात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जेव्हापासून  उरअळचा समावेश झाला आहे तेव्हापासून आकलन क्षमता या घटकावर दरवर्षी ८० प्रश्नांपकी ५० प्रश्नांचा समावेश होतो. या प्रश्नांना पुढील तीन विभागांत विभागता येईल.

मुख्य आकलन क्षमता –

या विभागातील दिलेले उतारे आणि त्यावरील प्रश्न इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये असतात. विद्यार्थी ज्या भाषेमध्ये पारंगत असेल त्या भाषेमधून या विभागातील प्रश्न सोडवू शकतो. या विभागावर साधारणपणे ३५ प्रश्न विचारले जातात. यामधील उताऱ्यांची विभागणी दोन भागांत करता येईल.

  • संकल्पनात्मक, वैचारिक, विश्लेषणात्मक उतारे
  • वस्तुनिष्ठ माहितीपर उतारे, यापकी पहिल्या प्रकारातील उताऱ्यांचा सारांश समजला तरच प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाते. तर दुसऱ्या प्रकारातील उतारे हे निव्वळ माहितीवर आधारित असल्यामुळे या उताऱ्यांतील वस्तुनिष्ठ मथळा अधोरेखित करून आणि माहितीचे नेमकेपण समजून घेऊन प्रश्न सोडविणे अधिक सयुक्तिक ठरते.

मराठी आकलन क्षमता –

या विभागातील उताऱ्यांमधून उमेदवाराचे मराठी भाषेचे ज्ञान तपासले जाते. त्यामुळे या उताऱ्यांचे इंग्रजी भाषांतर दिले जात नाही. या विभागातील प्रश्नांची काठिण्यपातळी थोडी कमी असल्यामुळे विद्यार्थी या विभागातील उतारे कमी वेळात अचूक सोडवू शकतात. यामध्ये साधारणपणे पाच ते सात प्रश्नांचा समावेश असतो.

इंग्रजी आकलन क्षमता –

या विभागातील उताऱ्यांमधून उमेदवाराचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जात असल्यामुळे या उताऱ्यांचे मराठी भाषांतर दिले जात नाही. या विभागातील प्रश्नांची काठिण्यपातळीही कमी असल्यामुळे हे प्रश्नही विद्यार्थी कमी वेळात सोडवू शकतात. या विभागात साधारणपणे पाच ते तेरा प्रश्नांचा समावेश होतो.

गेल्या चार वर्षांत झालेल्या आयोगाच्या पेपर्सचा कल आणि ते  सोडविताना विद्यार्थ्यांना सामना करावा लागणाऱ्या आव्हानांचा विचार करता पुढील बाबी लक्षात आल्या आहेत.

  • बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना उताऱ्याचे आकलनच होत नाही.
  • शब्दसंख्या अधिक असणारे उतारे सोडविताना अधिक वेळ द्यावा लागतो. मग वेळेचे नियोजन कोलमडते.
  • उतारे सोडविताना सहा ते सात मिनिटे एकाच उताऱ्यांवर विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
  • काही उताऱ्यांची भाषा न समजल्यामुळे त्यावरील प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत.

वरील सर्व समस्यांवर मात करून परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उतारे आणि त्यावरील प्रश्न सोडविण्याच्या सरावाबरोबरच स्वत:चा वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्यावरदेखील तितकाच भर देणे आवश्यक आहे. यासाठी नियतकालिकांमधील लेख वाचून, त्यावर विचार करून स्वत:शी आत्मसंवाद साधण्याचा दररोज प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका सोडविताना स्वत:च्या भाषिक आणि आकलन क्षमतेनुसार उताऱ्यांचे तीन गट पाडून सोपे उतारे सुरवातीला सोडवावेत. त्यानंतर गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन दुसरा गट व त्यानंतर उर्वरित गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न व नंतर तिसरा गट आणि त्यानंतर निर्णयक्षमतेचे प्रश्न सोडविले तर या रणनीतीचाही गुणात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

एकूणच या विभागाची तयारी करण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन लेखांचे वाचन, त्यावर विचारमंथन आणि स्वसंवादाबरोबर उतारे आणि त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव करणे अनिवार्य आहे. यासाठी ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख, संपादकीय पानावरील लेख, इंडियन एक्स्प्रेसमधील ‘Editorials’, ‘English Reading comprehension’आणि मराठी आकलन क्षमता या पुस्तकांचा योग्य वापर केल्यास परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. पुढील लेखात आपण गणित, बुद्धिमत्ता व तर्क अनुमान या घटकांच्या तयारीबद्दल जाणून घेऊयात.