इंजिनीअरिंग हे अनेकांना भुरळ घालणारे क्षेत्र. यातील करिअरसंधी नेमक्या काय आहेत, आणि त्या कशा मिळवाव्या याविषयी मार्गदर्शन केले, डॉ जयंत पानसे  (पीएचडी) यांनी. या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि ज्ञानाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा झाला.

वैद्यकीय व्यवसायानंतर अभियांत्रिकी हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे. डॉक्टर होता आले नाही तर इंजिनीअर तरी होऊ, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते. अभियांत्रिकीसाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत मोजक्याच जागा शिल्लक असत. आता मात्र भरपूर जागा असतात. परंतु म्हणूनच की काय, इंजिनीअर झाल्यानंतर नोकरी मिळेच याची शाश्वती देता येत नाही. अनेकदा कमी वेतनावर किंवा वेगळ्याच क्षेत्रातही काम करावे लागते.

अभियांत्रिकी हा एक गंभीरपणे करायचा व्यवसाय आहे. भावनेच्या भरात अभियंता होण्याच्या तयारीला लागू नका. मनात पक्के असेल तरच विचार करा. त्यामुळे ‘मित्र जातो म्हणून मी..’ असा विचार चालणार नाही. तुमचे गणित, विज्ञान हे विषय चांगले हवेतच, पण तर्कशास्त्रही पक्के हवे.

मुंबई विद्यापीठासह आणि तीन ठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. या क्षेत्रात पदवी मिळवायची असेल तर तेथे जाण्याचा मार्ग हा सोपा

नाही त्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. पदविका अर्थात डिप्लोमा केल्यानंतरही डिग्रीला जाता येते किंवा बारावीनंतर परीक्षा देऊ न जाता येते.

एखादा अभियंता संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, आरेखन (डिझाइन) आदी आठ वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकतो. यापैकी कोणते काम आपण करू शकतो, कोणत्या कामात आनंद, समाधान मिळेल याचाही विचार करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेथे जाणार आहात, त्या उद्योग-व्यवसायाची सविस्तर माहिती करून घ्या. आपल्या सर्व क्षमताही (शारीरिक, आर्थिक, मानसिक) तपासून घेणेही आवश्यक आहे. अभियांत्रिकीच्या ज्या शाखेचे तुम्ही शिक्षण घेणार आहात, त्या शाखेविषयी आगामी काळात असलेल्या नोकरी- व्यवसायाच्या संधीचाही अभ्यास आणि विचार करा. शिफ्टच्या कामात अनेकदा डोळ्यात तेल घालून बसावे लागते. हयगय चालत नाही. त्याची तयारी करावी. या नोकऱ्यांसोबतच रिसर्च अर्थात संशोधन करणेही गरजेचे आहे.

साधारण आयुष्याची सात ते आठ वर्षे घालविल्यानंतर या क्षेत्रात यश मिळू लागते. या क्षेत्रात महत्त्वाकांक्षा बाळगणे फार महत्तवाचे असते. तसेच आणखी चार वर्षांनी म्हणजे आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्राची काय परिस्थिती असेल, याविषयीही विद्यार्थ्यांनी माहिती बाळगायला हवी. त्यामुळे संधी, क्षमता, शक्यता अशा सर्व बाबींचा विचार करूनच या क्षेत्रात या!

फक्त चांगली नोकरी मिळेल म्हणून इंजिनीअरिंगला जाऊ नका. या क्षेत्राचा आवाका मोठा आहे. तो समजून घ्या. मग तुमच्यासाठी संधींची कमी कधीच राहणार नाही.

डॉ. जयंत पानसे