गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

संस्थेची ओळख

ugc marathi news, ugc academic year marathi news
शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? युजीसीने दिल्या सूचना…
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

राज्यातील सर्वात तरुण विद्यापीठ म्हणून ओळख मिळाली आहे, ती गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला. अकृषिक सरकारी विद्यापीठांच्या यादीमध्ये सर्वात नवे विद्यापीठ म्हणून राज्यभरात या विद्यापीठाचा विचार केला जातो. या विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या काळात नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा भाग असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ांसाठी म्हणून २७ सप्टेंबर, २०११ रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. स्थापनेवेळी नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा भाग असलेली जवळपास १६५ महाविद्यालये नव्याने स्थापन होत असलेल्या गोंडवाना विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात गोंडवाना भूमीच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठीची एक महत्त्वाची संस्था म्हणून या विद्यापीठाला गौरविले जात आहे. गडचिरोलीमधील एमआयडीसी रोड कॉम्प्लेक्समधून सध्या या विद्यापीठाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्य चालते. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा तुलनेने मागे असलेल्या भागाच्या विकासासाठी म्हणून या विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ांमधील विशिष्ट समस्या, विशिष्ट संस्कृती आणि त्यानुसार आवश्यक असलेल्या ध्येय-धोरणांचा पाठपुरावा करण्यासाठीचे शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रम राबविण्यासाठी हे विद्यापीठ सध्या प्रयत्नशील दिसते. सध्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ांमधील जवळपास अडीचशे महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक प्रशासन हे विद्यापीठ चालविते.

विभाग आणि सोयी-सुविधा

विद्यापीठाच्या माध्यमातून कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, होम सायन्स, अभियांत्रिकी, लॉ, आरोग्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या मूलभूत विषयांशी निगडित नानाविध अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या संकुलामध्ये सध्या पाच पदव्युत्तर विभाग चालविले जात आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना इतिहास, वाणिज्य, इंग्रजी, गणित आणि सोशिओलॉजी या पाच विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण गडचिरोलीमध्ये राहून घेणे शक्य झाले आहे. तसेच या पाच विषयांसोबतच, इतर विषयांमधून पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठामधून पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी २० टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्याची एक सुविधा राज्य सरकारने या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच या भागातील विद्यार्थ्यांना केवळ उच्चशिक्षणाच्या संधींपुरते न थांबता कौशल्याभिमुख अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे प्रयत्न सातत्याने अधोरेखित होत आहेत. त्यातून कौशल्याभिमुख अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांच्या माध्यमातून कमी शिकलेल्या मात्र हाती कौशल्ये असणाऱ्या स्थानिक तरुणांना उद्योजकतेकडे घेऊन जाण्यासाठी कामही विद्यापीठामार्फत सुरू झालेले दिसते.  याव्यतिरिक्त या विद्यापीठामध्ये आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभाग आणि राज्य सरकारने विशेषत्वाने मान्यता दिलेले सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरही चालविले जाते. स्थानिक संस्कृतीच्या अभ्यासासाठी सुरू झालेल्या आदिवासी संस्कृती व अभ्यास केंद्राच्या माध्यमातूनही विविध संशोधनपर उपक्रमांवर भर देण्याचा या विद्यपीठाचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने या विद्यापीठासाठी केलेल्या तरतुदींच्या आधारे या विद्यापीठाने आपल्या विस्तारासाठी दोनशे एकर जागा खरेदीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तसेच विद्यापीठाच्या स्वत:च्या अशा २२ पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचा प्रस्तावही सरकारकडे सादर केला आहे.

सध्या या विद्यापीठामध्ये एक मॉडेल कॉलेजही चालविले जाते. याच परिसरातील पाच मॉडेल स्कूल्स या मॉडेल कॉलेजशी जोडून या भागातील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी केजी टू पीजीची यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्नही प्रस्तावित आहेत. विद्यापीठाने आपल्या परिसरामध्ये दोनशे विद्यार्थ्यांसाठीचे नवे वसतिगृह अलीकडेच उभारले आहे. अशा नानाविध उपक्रमांच्या मदतीने हे विद्यापीठ सध्या आपली सुरुवातीच्या टप्प्यातील वाटचाल अधिकाधिक विद्यार्थीभिमुख बनविण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. अगदी अत्यल्प काळात इतर विद्यापीठांच्या तुलनेत या विद्यापीठाने मारलेली मजल ही या भागातील विद्यार्थ्यांसाठी आश्वासक अशीच ठरणारी आहे.

योगेश बोराटे – borateys@gmail.com