News Flash

यूपीएससीची तयारी : नीतिमूल्य आणि सचोटी

विभाग ‘अ’ व विभाग ‘ब’ अशा दोन विभागांमध्ये सादर केलेल्या पेपरमधील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या बदललेल्या संरचनेनुसार आयोजित केलेल्या २०१३ डिसेंबरच्या परीक्षेमध्ये प्रथमच एथिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रिटी या पेपरचा समावेश करण्यात आला. २५० गुणांसाठी घेण्यात आलेल्या या पेपरमधून आयोगाला या घटकामधून उमेदवाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे गेल्या तीन वर्षांत बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झाले आहे. आजच्या लेखात या पेपरचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत.

सर्वप्रथम लक्षात येणारी बाब म्हणजे इतर सामान्य अध्ययनाच्या पेपरपेक्षा वेगळी असणारी या पेपरची धाटणी. केवळ पुस्तकी ज्ञानामधून उत्तरे लिहिणे या घटकासाठी अपेक्षित नाही. किंबहुना अनेक प्रश्न उमेदवाराला तिच्या/त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग उदाहरणे मांडण्यास प्रवृत्त करतात. तसेच या विषयाकरिता जाहीर केलेल्या अभ्यासक्रमावरून असे लक्षात येते की, या पेपरसाठीचे विषयज्ञान (Subject Knowledge) हे एका विद्याशाखेवर अवलंबून नसून आंतरविद्याशाखीय आहे. नीतीविषयक वा नैतिकतेबाबतचे अनेक प्रश्न हे एकापेक्षा अधिक विचारक्षेत्रात (Domain) मधील आहेत. नैतिक तत्त्वज्ञान (Moral philosophy) व लोकप्रशासन (Public administration) यावर आधारित नीतीनियमविषयक (ethical) प्रश्न हा पेपरचा प्रमुख गाभा आहे.

विभाग ‘अ’ व विभाग ‘ब’ अशा दोन विभागांमध्ये सादर केलेल्या पेपरमधील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. विभाग ‘अ’ मधील प्रश्न एकूण १२५ गुणांकरिता असतात. मात्र प्रत्येक प्रश्नाला समान गुण नाहीत. पहिले तीन-चार प्रश्न नैतिक तत्त्वज्ञानासंबंधांतील साधारण संकल्पना स्पष्ट आहेत किंवा नाही हे पाहणारे असतात. दिलेल्या संज्ञांचा अर्थ, व्याख्या स्पष्ट करणे असे या प्रश्नांचे स्वरूप असते. एक विशेष अधोरेखित करायची बाब म्हणजे गुण व त्यासाठी आवश्यक शब्दसंख्या हे प्रमाण प्रत्येक प्रश्नासाठी वेगळे आहे. उदा. काही प्रश्नांत १० गुणांकरिता १५० शब्द लिहिणे अपेक्षित आहे तर काही प्रश्नांत १५ गुणांकरिता २५० शब्द लिहिणे अपेक्षित आहे. मूल्य व नैतिकता म्हणजे काय? सेवाभाव, सत्यनिष्ठा, बांधिलकी यावरील टिपा, प्रशासकीय सेवांसाठी आवश्यक इतर गुण अशा विषयांवर आधारित प्रश्न अनेकदा विचारले गेले आहेत. एकूण चार-पाच प्रश्नांमध्ये उमेदवाराचे वैयक्तिक मत विचारले जाते. यामध्ये विवेक, अंत:करणाचा आवाज यासारख्या तत्त्वमीमांसेवर आधारित विषयांचा समावेश आहे. अधिभौतिकी (टी३ंस्र्ँ८२्रू२) च्या कडेनी जाणारे हे विषय आहेत. अर्थातच याकरिता फार खोलवर जाऊन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे अपेक्षित नाही. मात्र संज्ञांचे आकलन होण्याइतकी ओळख अपेक्षित आहे. तसेच या आणि अशा प्रश्नांमधून एकंदर पेपरची काठिण्य पातळी अधिक ठेवण्यात आयोगाने यश मिळविले आहे. स्पर्धा कायम राखणे व ती अटीतटीची ठेवणे यामधून साध्य झाले आहे. मात्र या प्रश्नांची संख्या मोजकीच असते. इतर अनेक प्रश्न विषयाचे असलेले ज्ञान व ते आपल्या शब्दांत मांडण्याची हातोटी यामधून उत्तमरीत्या हाताळले जाऊ शकतात. अशा प्रकारे संज्ञांचा अर्थ स्पष्ट करणे, वैयक्तिक अनुभवांची नैतिक मांडणीशी सांगड घालणे यावर काही प्रश्नांमध्ये भर असतो. या पुढील प्रश्न प्रकार म्हणजे महान व प्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांचा कल्पना विस्तार करणे. प्रत्येकी १० गुणांना विचारले गेलेले हे प्रश्न महात्मा गांधी, अब्राहम लिंकन आणि अ‍ॅरिस्टॉटल यासारख्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित असतात. प्रत्येक प्रश्न १५० शब्दांमध्ये लिहिणे अपेक्षित असते. या प्रश्नांकडे लघुनिबंधक अशा स्वरूपात देखील बघता येईल. अर्थात कल्पना विस्तार या निबंध प्रकाराची ओळख व सराव असल्यास कमी वेळात हे लिखाण अधिक परिणामकारक होऊ शकते. सुविचारांमध्ये देखील विषयाचे वैविध्य राखण्याची जबाबदारी आयोग घेत असतो. या विचारांविषयी लिहीत असताना त्या व्यक्तीची एकंदरीत नैतिक विचारप्रणाली माहीत असणे फायद्याचे ठरते. तसेच या विचारांचा उत्तम प्रशासनाशी व त्यातील नीतीनियमविषयक बांधिलकीशी काय संबंध आहे हे अधोरेखित करणे गरजेचे आहे. भावनिक बुद्धिमत्ता व त्याचा प्रशासनात शक्य असलेला वापर यावर देखील प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे विभाग ‘अ’ मध्ये नैतिक तत्त्वज्ञानातील विचार, संज्ञा त्याबद्दल उमेदवाराचा वैयक्तिक दृष्टिकोन आणि व्यापक नैतिक विचारप्रणालींशी ओळख असे या घटकाचे स्वरूप आहे. कामाबद्दलची निष्ठा, बांधिलकी, पाठपुरावा करण्याचे फायदे या संकल्पनांचे स्पष्टीकरण विचारणारे प्रश्नदेखील वारंवार विचारले जातात.

विभाग ‘ब’ हा पूर्णत: केस स्टडीजना वाहिलेला विभाग असतो. एकूण ६ प्रकरणे १२५ गुणांकरिता विचारली जातात. या विभागात देखील प्रत्येक प्रश्नासाठीचे निर्धारित गुण व त्याकरिता नियोजित शब्दसंख्या यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. पूर्व परीक्षेमधील निर्णयक्षमता चाचणी व समस्या सोडवणूक याच घटकाचे एक विस्तारित व अधिक बारकाव्यांची नोंद घेणारे रूप असे या घटकाचे वर्णन करता येईल. अर्थात अतिशय किरकोळ बदल वगळता प्रश्नामधून विचारली जाणारी नैतिक संकल्पना सारखीच आहे. उदाहरणार्थ, २०१३ च्या पूर्व परीक्षेमध्ये विद्यापीठ पातळीवरील पेपर अनधिकृतरीत्या उघड करण्याकरिता आलेल्या दबावाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. याच प्रश्नासारखा, ज्यामध्ये विद्यापीठ, पेपर या ऐवजी तुम्ही वित्त मंत्रालयातील अधिकारी आहात व काही माहिती अनधिकृतरीत्या उघड करण्याकरिता तुमच्यावर दबाव टाकला जात आहे अशा प्रकारची केस २०१३ मध्ये देण्यात आली. केस स्टडीज थोडय़ा फार फरकाने खालील विषयांवर आधारित असतात. माहितीचा अधिकार (माहिती उघड करण्याबाबतची नैतिकता), कमी गुणवत्तेचे काम अथवा निर्धारित वेळेत पूर्ण करावयाचे काम यातील नैतिक द्विधा, बालकामगारांचे प्रश्न, नोकरभरतीतील नातेवाईकांना/जवळच्या व्यक्तींना दिले जाणारे प्राधान्य  व त्याच्याशी निगडित नैतिक प्रश्न, अनधिकृतरीत्या माहिती देण्यातील नीतीनियमविषयक कंगोरे, कामाच्या ठिकाणी अनुभवास येणारे लैंगिक शोषण व त्यासंबंधीचे नैतिक प्रश्न हे साधारण केस स्टडीचे विषय आहेत. या सर्वामधून आपणास असे लक्षात येते की, नीतिमत्तापूर्ण प्रशासन राबविण्यातील प्रत्यक्ष अडचणी व त्यांचा सामना करण्याचे विविध मार्ग यावर या प्रश्नांचा भर असतो. तसेच प्रत्येक केस बरोबरच २ अथवा ३ मार्गदर्शक प्रश्न उपलब्ध करून दिले जातात. जेणेकरून २५० शब्दांमधील प्रतिसाद कोणत्या मुद्दय़ांवर ठळक भर देणारा असावा यासाठीची दिशा निश्चित केली जाते.

एकूण प्रश्नपत्रिकेचा विचार केल्यास प्रमुख सकारात्मक बाब म्हणजे प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल यासारख्या तत्त्वज्ञांच्या अभिजात विचारसरणींवर अनावश्यक भर न देता, भारतीय सामाजिक व नैतिक प्रश्नांशी नाळ जोडणारे हे प्रश्न आहेत. स्वत:चे विचार शब्दात मांडत असताना वेळेचे भान ठेवत वैचारिक मांडणी व तिचा प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेला संबंध यातील दुवा सांधणे हे या पेपरने समोर ठेवलेले सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र लिखाणाचा पुरेसा सराव, महत्त्वाच्या विचारवंतांची व त्यांच्या नैतिक वैचारिक मांडणीचा  सखोल अभ्यास अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिकेची दखल घेण्यास आवश्यक बाबी आहेत.

पुन्हा एकदा यूपीएससीच्या तयारीमधील लिखाणाच्या सातत्याचे महत्त्व या पेपरमधून अधोरेखित झाले आहे. एकंदर संरचनेत प्रमुख बदल स्वीकारत असताना उमेदवाराच्या नैतिक विचारांचा कल तपासून पाहणारा व नीतीनियमविषयक चौकटींच्या ज्ञानाचा कस लावणारा हा घटक निश्चितच सकारात्मक बदल आहे व हा बदल योग्य मनोभूमिकेतून स्वीकारणे व सखोल अभ्यास करणे उचित ठरेल. पुढील काही आठवडे आपण या सदरात आयोगाला अपेक्षित असणाऱ्या अभ्यासक्रमाची, त्यातील महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2017 4:05 am

Web Title: important tips for upsc exam preparation
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र : ई- प्रशासनातील पुढचे पाऊल
3 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
Just Now!
X