आईच्या जॉब सॅटिस्फॅक्शनचा बाबानं उल्लेख केला तेव्हा प्रियांका जरा उडालीच. आईचा बँक जॉब. मुंबईबाहेर ट्रान्स्फर नको म्हणून तिने कटाक्षाने न घेतलेलं प्रमोशन. आईने सध्याच्या नोकरीबाबत काही तक्रारही केली नाही कधी. कधी कधी म्हणतेही की बँक जॉब्स आता पूर्वीसारखे नाही राहिले. दोन वर्षांपूर्वी तिची ट्रान्स्फर जरा दूरच्या ब्रँचला झाली तेव्हापासून म्हणते आहे, प्रवासाचा कंटाळा येतो, बाकी तिथे गेल्यावर मजा येते. प्रियांकाला तर नेहमीच वाटत आलं आहे की, आई तिचा जॉब खूप एन्जॉय करते आहे. आईचं जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे नोकरीतील समाधान असं काही कधी नव्हतं आलं तिच्या मनात. तिला जरा ओशाळल्यासारखंच वाटलं.
तिने दुसऱ्या दिवशी आईकडे विषय काढलाच.
‘‘तुझं जॉब सॅटिस्फॅक्शन-असं नव्हतं आई कधी मनात आलं.’’
आई हसलीच, ‘‘माझ्या मनातही नाही आलं म्हणा फारसं कधी इतक्या वर्षांत. म्हणजे असं म्हणू या – मी येऊ दिलं नव्हतं.’’
प्रियांकाची प्रश्नार्थक नजर पाहून आई पुढे बोलू लागली. ‘‘मला फार विचित्रच वाटलं, पहिल्या नोकरीतच तुझी एवढी चिकित्सा सुरू झाली आहे. पिढीचा फरक म्हणायचा, की प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा? गेल्या दहा वर्षांत किती गोष्टी घडल्या आपल्याकडे. तू नववीत गेलीस आणि आजोबा गेले. तेव्हापासून आजीच्या तब्येतीच्या कुरकुरी वाढू लागल्या. आजोबा असेपर्यंत घराचं गाडं एकदम सुरळीत सुरू होतं. त्यांचं तर काही आजारपणही नव्हतं. बाबांच्या नोकरीतलं ट्रॅव्हलिंग तर कायमचं होतं, पण आजोबा असेपर्यंत ते आपण सगळेच छान मॅनेज करू शकलो,’’ आई पुढे सांगू लागली..
‘‘बाबांची तेव्हाची नोकरी फिरतीची. प्रोजेक्ट साइटवर काम चाले, त्यामुळे काही आठवडे-महिने ते दूर असायचे. त्यात महिन्यातून दोन-तीनदा जमेल तसं यायचे. पुढचा प्रोजेक्ट नेईल तिथे पुढचा डेरा. बाबांच्या अशा जॉब प्रोफाइलमुळे मी प्रमोशनचा, ट्रान्स्फरचा विचार करणं काही शक्य नव्हतं. पण आजीच्या तब्येतीचं वर खाली सुरू झालं तो मात्र खरा कसोटीचा काळ होता. तुझी दहावी त्यातच पार पडली.’’ प्रियांका कान टवकारून ऐकू लागली.
‘‘बारावीचे क्लासेस आणि नंतर सी.ए.च्या एण्ट्रन्स एक्झाम्स यात तू बिझी झालीस – म्हणजे थोडक्यात मला मनुष्यबळ म्हणून तुझा फारसा काही उपयोग नव्हता. माझी फार तारांबळ व्हायला लागली. त्या काळात अगदी नोकरी सोडून द्यावी असंही मनात येत गेलं. पण तेव्हा बाबांनी मला थांबवलं. ते म्हणाले, मी बदलतो नोकरी.’’
प्रियांकाला उडालीच. मग तिला एकदम साक्षात्कार झाला! ‘‘हो, आजीचं आजारपण फार अवघड गेली आपल्याला. म्हणूनच माझ्या फर्स्ट ईयर बी. कॉम. ला बाबांनी नोकरी बदलली ना?’’
‘‘हो ना. पण तेव्हा नोकरी बदलताना बाबांनी काय निकष लावले, याची फारशी चर्चा नाही झाली तुझ्याशी. सर्वात मुख्य निकष मुंबईत स्थिर असणं हा होता, आधीच्या नोकरीच्या तुलनेत थोडय़ाशा कमी पगाराचा जॉब स्वीकारला त्याने. त्याला दोन ऑफर्स होत्या हातात. एक त्यांच्या आधीच्या जॉब प्रोफाइलच्या जवळ जाणारं प्रोफाइल. आणि दुसरा क्वालिटी मॅनेजमेंटचा. पूर्ण नवीन क्षेत्र. नव्याने सुरुवात, पण त्यात फारसा प्रवास नव्हता. मुंबईत असणं आणि फारसा प्रवास नाही हा मोठा प्लस पॉइण्ट होता. बाबानं मग क्वालिटीतला जॉब घेतला आजीच्या आजारपणाच्या पाश्र्वभूमीवर.’’
किती स्वत:च्या जगात होतो आपण असं प्रियांकाला वाटून गेलं.
‘‘आणि खरंच त्यांचा निर्णय किती योग्य होता, असं वाटावं अशीच परिस्थिती होत गेली ना आजीची! पण बाबा होते, त्यामुळे खूप वेगळं झालं सगळं.’’
आई पुढे सांगत गेली .. ‘‘हो ना, ते ही म्हणायचेच की कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत हे सर्वात महत्त्वाचं. अख्खी प्रोजेक्ट साइट उभी करून जे प्रचंड समाधान मिळतं ना, ते काय असतं हे मी सांगू नाही शकणार तुम्हाला, असं ते नेहमी म्हणायचे पूर्वी आम्हाला. पण नंतर नंतर म्हणायला लागले होते – फार घोर लागतो, आई आजारी असली की. मग त्यापुढे ते साइट उभी करण्याचं समाधानही पुरत नाही.’’
‘‘तुम्हा मोठय़ांना किती गोष्टींचा विचार करायला लागतो! म्हणजे मग नोकरीत किती समाधान मिळतंय, शिकायला मिळतंय, पुढे जायला मिळतंय, पैसा मिळतोय, जबाबदाऱ्या झेलायला मिळताहेत याचा काहीच संबंध नसतो का? तुम्ही या ‘आवांतर’ गोष्टींचाच जास्त विचार करताना दिसता?’’ प्रियांका आता गोंधळलेली दिसत होती.
‘‘नको होता का करायला? आजीच्या तब्येतीचा, तुझ्या शिक्षणाचा, कुटुंबाच्या स्थैर्याचा?’’
‘‘तसं नाही आई.. म्हणजे सॉरी.. पाहिजे ना करायला..’’
‘‘मग?’’ आईनं मुद्दामच ताणून धरलं.
‘‘पण.. पण मग मी आता केवळ माझ्या नोकरीवरचं काम कसं असेल, मला त्यात मजा येईल का, पुढे त्यातून काय प्रकारचे करिअर करता येईल, पैसा किती मिळेल याचा विचार करणं चुकीचं आहे का?’’
‘‘काय वाटतं तुला? चुकीचं आहे असं वाटतं?’’ आई तिला जाणीवपूर्वक विचार करायला भाग पाडत होती.
‘‘नाही वाटत.. म्हणजे या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात.. मी या गोष्टींचा विचार न करणं चुकीचं वाटतं मला.’’
आई हसली. ‘‘मी कुठे म्हणतेय तू चुकीचं करते आहेस?’’
आता प्रियांका खरोखरीच चक्रावून गेली. ‘‘पण मग मी ही या ‘इतर’ गोष्टींचा विचार करायचा का?’’
‘‘किती गोष्टींचा विचार करायचा हे तुझ्यावर अवलंबून आहे प्रियांका. शेवटी नोकरीवरचं समाधान हे नोकरीपुरतं कधीच नसतं हे आता मला वाटतं तुला थोडं बहुत कळलय.’’
‘‘कळलंय म्हणून तर मला आणखीनच काही कळेनासं झालय! एकीकडं सुब्बू अंकलसारखे लोक आहेत जे सगळं घरदार विसरून आपलं काम एके काम करतात. दुसरीकडे तू-बाबांसारखे लोक आहेत.’’ प्रियांकाचा सूर आता उद्विग्नतेचा होऊ लागला.
आईनं तिला ओढून जवळ बसवलं, पाठीवर थोडं थोपटलं आणि मग ती पुढे बोलू लागली..
‘‘प्रियांका, तरुणपणी जॉब सॅटिस्फॅक्शनची व्याख्या साधी सुटसुटीत असते. तू मघाशी म्हणालीस तसं – नोकरीवरचं काम कसं असेल, मला त्यात मजा येईल का, पुढे त्यातून काय प्रकारचे करिअर करता येईल, पैसा किती मिळेल.. तेव्हा हातात जणू एकच चेंडू असतो. कितीही उडवावा, झेलावा, त्याच्याशी हवं तसं खेळावं. वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातात तसे हातातले हे चेंडू वाढत जातात, दोन, तीन, चार .. आणि ते सगळे उडवत झेलत ठेवावे लागतात. जॉब सॅटिस्फॅक्शन हे जगलिंग बनून जातं. नोकरीतलं समाधान, प्रवास, दगदग, झोप, खाणं-पीणं, तब्येत, कुटुंबाबरोबरचा वेळ, इतर हॉबीजसाठी वेळ .. अशा अनेक गोष्टींची ती गोळाबेरीज बनून जाते. आता कुठले चेंडू आपल्याला महत्त्वाचे हे ज्याने त्याने ठरवायचं. एक मात्र लक्षात ठेवायचं.. किती चेंडू जगल करता येतील यालाही काही मर्यादा असते.’’
पहिल्याच नोकरीत जॉब सॅटिस्फॅक्शनचा एवढा बाऊ केल्याचं प्रियांकाला आता लाजिरवाणंच वाटू लागलं. ‘‘आई, म्हणजे चुकलंच माझं इतका एकांगी विचार करणं.’’
‘‘अगं तसं नाही. तुझ्या वयाला आता तुझ्या कामाचं स्वरूप इतपत तुझा विचार असणं काही चूक नाही.’’ आई तिला समजावू लागली.
‘‘नाही आई, मला ते चुकीचच वाटतं आहे.’’
‘‘मग आणखी कसला विचार तुला करायचा आहे?’’
‘‘तुझा.’’
‘‘माझा?’’
‘‘हो, आई तुझा. माझं शिक्षण आता पूर्ण झालं. बाबांनीही मनासारखी कामं करून आता तो इकडे सेटल झाला आहे, आपल्या जवळ. आता तुझी टर्न आहे. या सगळ्या फेजमध्ये तू एकखांबी तंबूच्या खांबासारखी कुटुंबाला आधार देत राहिलीस, स्वत:चं प्रमोशन डावलत आणि बदली टाळत. आता तू मोकळी झाली आहेस आई. घे ते पुढचं प्रमोशन. होऊ दे झाली तर ट्रान्फर. मी आणि बाबा काही काळ घर सांभाळू. तू काळजी करू नकोस. वरच्या ग्रेडवर रिटायर झालीस तर पेन्शनही जास्त मिळते ना?’’ आईचे डोळे पाणावले. त्या अवस्थेतही तिनं अर्धवट हसत प्रियांकाला विचारलं, ‘‘पण मग तुझ्या जॉब सॅटिस्फॅक्शनचं काय होणार?’’
प्रियांकाने नुसतेच डोळे वटारले. (उत्तरार्ध)
मिलिंद पळसुले palsule.milind@gmail.com
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
करिअरनीती : नोकरीतील समाधान
‘बाबांची तेव्हाची नोकरी फिरतीची. प्रोजेक्ट साइटवर काम चाले, त्यामुळे काही आठवडे-महिने ते दूर असायचे.
Written by मिलिंद पळसुले

First published on: 25-07-2016 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job satisfaction