माणसाला जसे शारीरिक विकार होत असतात त्याचप्रमाणे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात. शारीरिक विकार दृश्य स्वरूपात असतात, परंतु मानसिक विकार वैयक्तिक असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एक जण तरी कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराने बाधित असतो व सुमारे १० ते १२ टक्के माणसं कमी तीव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभीर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रातसुद्धा चालू आहे, जेणेकरून सामान्य माणूस व ग्रामीण जनता यांना त्याचा लाभ व्हावा.

उद्दिष्टे

  • राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
  • आरोग्य सेवेतील उचित अधिकाऱ्यांना कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध कार्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे.
  • विविध सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य, जागरूकता व सोयी-सुविधा यांची माहिती देणे.
  • मानसिक आरोग्य सेवा विकास व अंमलबजावणी यामध्ये जनतेला समाविष्ट करून घेणे.
  • रुग्णालयात मानसिक रुग्ण भरती करताना मानसिक आरोग्य कायदा १९८७ ची अंमलबजावणी.

उपक्रम

  • रुग्ण भरती झाल्यानंतर मानसिक आरोग्य कायद्याअंतर्गत तपासणी
  • मनोविकारतज्ज्ञ परिचारिका यांच्याकडून मानसिक विकारांची नोंद
  • वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शारीरिक तपासणी व शेवटी मानसोपचारतज्ज्ञाकडून संपूर्ण तपासणी व नंतर उपचार