23 November 2017

News Flash

इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कोकण

कर्जदाराला दोन जामीनदार द्यावे लागतील.

Updated: September 5, 2017 1:00 AM

कोकण विभागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेचा सर्वागीण विकास व्हावा तसेच त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित यांच्या मार्फत अर्थसाहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.

योजना

 • १८ ते ५० वर्षे यादरम्यान वय असलेल्या संबंधित लाभार्थ्यांसाठी राज्य महामंडळामार्फत २५ हजार रुपयांची थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भांडवल योजना तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या ४५ टक्के मार्जिन मनी योजना, महिलांसाठी स्वर्णिमा योजना, मुदती कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी योजना तसेच शैक्षणिक कर्ज योजना इत्यादी योजना राबविल्या जात आहेत.
 • त्या दृष्टीने नारळ विक्री, किराणा दुकान, मेणबत्ती बनविणे, फळ विक्री, फिरता विक्री व्यवसाय, मच्छी विक्री तसेच अन्य तांत्रिक लघुव्यवसाय यांसारख्या कायदेशीर किरकोळ व छोटय़ा स्वरूपातील व्यवसायासाठी राज्य महामंडळाची २५ हजार रुपयांची थेट कर्ज योजनाही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा व्याजदर २ टक्के इतका माफक असून संबंधित लाभार्थी त्रमासिक हप्ता याप्रमाणे तीन वर्षांत धनादेशाद्वारे अथवा रोखीने कर्जाची परतफेड करू शकतात.

अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक

 • तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेला उत्पादनाचा मूळ दाखला.
 • ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थीच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने वार्षिक एक लाखापर्यंतचे मर्यादित उत्पन्न.
 • सक्षम अधिकाऱ्याने दिलेले इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र.
 • शिधापत्रिकेची छायांकित प्रत तसेच निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्डाची छायांकित प्रत.
 • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
 • वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा दाखला.
 • विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लाभार्थीकरिता व्यवसाय स्थळाची भाडेपावती करारनामा व सात/बाराचा उतारा
 • बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

याप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

याशिवाय वैधानिक बाबी व कागदपत्रे म्हणून पुढीलप्रमाणे पूर्तता करणे आवश्यक आहे.

 • कर्जदाराला दोन जामीनदार द्यावे लागतील. यापैकी एक साधा जामीनदार तर एक जामीनदार हा शासकीय/निमशासकीय/सहकार क्षेत्रात कार्यरत वेतन चिठ्ठीधारक असणे आवश्यक आहे. अथवा कर्जदार किंवा जामीनदार यांच्या स्थावर मालमत्तेचे (सात/बारा किंवा आठ अ) कर्ज रकमेचा बोजा नोंद केला जाईल.
 • विहित नमुन्यातील करारनामा अथवा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जामीनपत्र.
 • लाभार्थीच्या बचत खाते असलेल्या बँकेचे धनादेश पुस्तक.
 • नमुना क्र. ८ व ९ हे १ रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवर.

अधिक माहितीसाठी – http://www.mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx

First Published on September 5, 2017 1:00 am

Web Title: other backward financial development corporation limited other backward class