टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस

संस्थेची ओळख

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

सामाजिक कार्य आणि सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रातील कृतिशील अभ्यासक्रम चालविणारी संस्था म्हणून मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसची (टिस) देशभरात ओळख आहे. मुंबईमध्ये १९३६ साली सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क म्हणून या संस्थेची स्थापना झाली. १९४४ मध्ये या संस्थेला सध्याच्या नावाने नवी ओळख मिळाली. संस्थेने सुरुवातीपासूनच सामाजिक शास्त्रांसाठीच्या समाजाभिमुख अभ्यासक्रमांवर भर दिला. पाठय़पुस्तकी अध्ययनाला तितक्याच भक्कम क्षेत्राभ्यासांची जोड देण्यावर संस्थेने भर दिला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा संघ पाठविण्याची वेगळी परंपरा ही संस्था जोपासते.

देवनार येथील परिसरामध्ये १९५४ पासून संस्थेचे संकुल सुरू झाले. सध्या मुंबईमधील हे संकुल संस्थेचे मुख्य शैक्षणिक संकुल म्हणूनही विचारात घेतले जाते. केंद्र सरकारने १९६४ साली या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त ठरणारे प्रकल्प, त्यासाठीचे संशोधन, अध्यापन आणि प्रत्यक्ष कार्यानुभव या आधारावर ही संस्था विद्यार्थ्यांना सामाजिकशास्त्रांचे धडे देत आहे. संस्थेच्या कार्याची नोंद घेत यंदा केंद्र सरकारने त्यांना अभिमत विद्यापीठ म्हणूनही मान्यता दिली आहे. त्या आधारे परदेशामध्येही आपले अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी संस्थेला मिळाली आहे. देशभरातील विद्यापीठांसाठीच्या एनआयआरएफ मानांकनामध्ये संस्थेने यंदा ३२वे स्थान मिळविले आहे.

टिस, मुंबई

इन्स्टिटय़ूटचे मुख्य केंद्र म्हणून मुंबई येथील शैक्षणिक संकुलाकडे पाहिले जाते. या संकुलामध्ये विविध विषयांना वाहिलेल्या एकूण बारा स्कूल्सच्या माध्यमातून वेगवेगळे शैक्षणिक अभ्यासक्रम चालविले जातात.

स्कूल ऑफ हेल्थ सिस्टीम स्टडिजच्या अंतर्गत चार वेगवेगळ्या केंद्रांमधून सामाजिक आरोग्याच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यामध्ये हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, पब्लिक हेल्थ (सोशल एपिडेमीऑलॉजी), पब्लिक हेल्थ (हेल्थ पॉलिसी, इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड फायनान्स) या विषयांमधील पदव्युत्तर पदवी, तसेच काही पदविका अभ्यासक्रमही चालतात.

स्कूल ऑफ हॅबिटॅट स्टडिजअंतर्गत सेंटर फॉर क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड सस्टेनॅबिलिटी स्टडिज, सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड सोसायटी, सेंटर फॉर अर्बन पॉलिसी अ‍ॅण्ड गव्हर्नन्स ही केंद्रे येतात. त्यामध्ये संबंधित विषयांना वाहिलेले विशेष अभ्यासक्रम चालतात.

स्कूल ऑफ ह्युमन इकोलॉजीअंतर्गत विद्यार्थ्यांना क्लिनिकल सायकोलॉजी किंवा कौन्सेिलग सायकोलॉजी या अ‍ॅप्लाइड सायकोलॉजी विषयाशी निगडित विशेष विषयांमध्ये एम. ए. अभ्यासक्रम शिकता येतो. स्कूलमध्ये मॅरेज अ‍ॅण्ड फॅमिलीथेरपी व स्कूल कौन्सेिलग या दोन विषयांशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालतात.

स्कूल ऑफ लॉ, राइट्स अ‍ॅण्ड कॉन्स्टिटय़ूशनल गव्हर्नन्सच्या अंतर्गत अ‍ॅक्सेस टू जस्टिसविषयक एलएल.एम.चा अभ्यासक्रम चालतो.

स्कूल ऑफ सोशल वर्कअंतर्गत क्रिमिनोलॉजी अ‍ॅण्ड जस्टिस, चिल्ड्रन अ‍ॅण्ड फॅमिलीज, कम्युनिटी ऑर्गनायझेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट प्रॅक्टिस, दलित अ‍ॅण्ड ट्रायबल स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन, डिसअ‍ॅबिलिटी स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन, मेंटल हेल्थ, पब्लिक हेल्थविषयक नऊ अभ्यासक्रम चालतात.

स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कल्चरल स्टडीजच्या अंतर्गत एम. ए. मीडिया अ‍ॅण्ड कल्चरल स्टडीज, तसेच पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी मीडिया हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

संस्थेने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनअंतर्गत २८ बी. व्होकेशनल, ३५ शॉर्ट टर्म,  तर १२२ प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.

याशिवाय, स्कूल ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड लेबर स्टडीज, स्कूल ऑफ रिसर्च मेथडोलॉजी, स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, जमशेटजी टाटा स्कूल ऑफ डिझास्टर स्टडीज, स्कूल ऑफ एज्युकेशन या स्कूल्समधूनही विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुंबईबाहेरील विस्तार-

संस्थेने केवळ मुंबईमध्येच नाही, तर राज्यात ग्रामीण भागामध्येही आपले संकुल उभारले आहे. राज्य सरकारच्या मदतीच्या आधारे संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यात १९८७ पासून आपले शैक्षणिक कार्य सुरू केले आहे. त्यासोबतच गुवाहाटी आणि हैदराबाद येथेही संस्थेच्या नव्या शाखा सुरू झाल्या आहेत. पटना आणि नागालॅण्डमध्ये स्वतंत्र केंद्रांची उभारणी केली आहे. मुंबईबाहेरील संकुलांमधून पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड बी. ए. सोशल सायन्सेस अ‍ॅण्ड एम. ए. हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुळजापूर येथील संकुलामध्ये विद्यार्थ्यांना एकूण नऊ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये बी. ए. सोशल वर्क, बी. ए. सोशल सायन्सेस हा इंटिग्रेटेड बी.ए.- एम. ए. अभ्यासक्रमाचाच एक भाग असलेला अभ्यासक्रम, तसेच रुरल डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट पॉलिसी, प्लॅिनग अ‍ॅण्ड प्रॅक्टिस, सस्टेनेबल लाइव्हलीहूड्स अ‍ॅण्ड नॅचरल रिसोस्रेस गव्हर्नन्स, सोशल इनोव्हेशन्स अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युअरशिप या विषयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही येथे चालविले जातात. वॉटर, सॅनिटेशन अ‍ॅण्ड हायजिन विषयांमधील पदव्युत्तर पदविका, तसेच रुरल डेव्हलपमेंटविषयक इंटिग्रेटेड एम. फिल- पीएच.डी. अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. संस्थेने २०१२ मध्ये गुवाहाटीमध्ये आपल्या स्वतंत्र संकुलाची सुरुवात केली. त्या आधारे संस्थेने ईशान्य भारतातील आठ राज्यांमध्ये व्यापक कार्य सुरू केले आहे. या संकुलामध्ये दोन स्कूल्समधून एकूण आठ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामध्ये एक पदवी अभ्यासक्रम चालतो. संस्थेच्या हैदराबाद येथील संकुलामधील अझिम प्रेमजी स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ जेंडर स्टडीज, स्कूल ऑफ लाइव्हलीहूड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी अ‍ॅण्ड गव्हर्नन्स, स्कूल ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या सहा स्कूल्समधून एकूण ११ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामध्ये एक पदवी, सात पदव्युत्तर पदवी, दोन इंटिग्रेटेड एम. फिल- पीएच.डी. आणि एक डायरेक्ट पीएच.डी. अभ्यासक्रम समाविष्ट आहे. मुंबई येथील संकुलाप्रमाणेच याही संकुलामध्ये विद्यार्थ्यांना एम. ए. ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, चेंज अ‍ॅण्ड लीडरशिप हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.