News Flash

यूपीएससीची तयारी : अर्थपूर्ण निबंधासाठी..

आपण कोणत्याही परिस्थितीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर होऊ देता कामा नये

या लेखात आपण अर्थपूर्ण आणि प्रभावी निबंध लेखनासाठी आवश्यक आणखीन काही मुद्दय़ांचा विचार करणार आहोत.मुद्देसूदपणा व अचूकता तुम्ही लिहीत असलेल्या मतांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढणे टाळा. खूप व्यापक मुद्दय़ांना किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालण्याआधी आपल्याकडे आवश्यक अचूक माहिती आहे का? याचा विचार करा.

अचूकतेचा अभाव 

आपण कोणत्याही परिस्थितीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर होऊ देता कामा नये. (हे विधान नुसतेच मूल्यात्मक कल दर्शवणारे आहे. अशा प्रकारचा कल असण्यामागील कारण अथवा युक्तिवाद करण्यामागील भूमिका अचूकपणे मांडलेली नाही.)

अचूक विधान- अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने देशातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण येणे साहजिक आहे. याकरिता देशातील यंत्रणा सक्षम नाहीत. तसेच अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा योग्य आढावा घेतल्याशिवाय असे विधेयक मंजूर होऊन देणे योग्य नाही. (वरील मांडणीमध्ये मूळ मुद्दय़ाबरोबर तशा मतापर्यंत येण्यासाठी आवश्यक कारणे दिली आहेत. म्हणूनच वाचणाऱ्यालाही अधिक स्पष्टपणे एकंदर युक्तिवादाची भूमिका कळते.)

यादी रूपात मुद्दय़ांची मांडणी करणे टाळावे

जरी तुमच्या निबंधामध्ये अनेक प्रमुख मुद्दे येणार असतील तरी ते सर्व मुद्दे यादी रूपात मांडू नयेत. अशा प्रकारची मांडणी केल्याने लेखन उथळ व वरवरचे वाटते. समजा अन्नसुरक्षा विधेयकाविरोधात मांडण्यायोग्य ६-७ वेगवेगळी कारणे तुम्हास माहीत आहेत. परंतु इतके विस्तारपूर्ण लिखाण करण्याचा हेतू बाळगला तर विविध मुद्दय़ांना नुसते स्पर्शून पुढे जावे लागते. या ऐवजी कोणतीही २-३ महत्त्वाची कारणे निवडून त्याबद्दल अधिक बारकाईने लेखन करणे जास्त योग्य आहे. विविध मुद्दय़ांच्या मोठमोठय़ा याद्या केल्याने त्या मुद्दय़ांचे गांभीर्य कमी होते. तसेच यादीत दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. जास्त शब्दमर्यादा असलेला निबंध लिहीत असताना अनेक मुद्दय़ांचा समावेश होतोच. तरीही कोणत्याही स्वरूपाच्या याद्या करणे टाळावे. उदा.- भारतीय शिक्षणव्यवस्थेपुढील आव्हाने या विषयासंदर्भात पुढील वाक्याचा विचार करा. ‘भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, गळतीचे वाढते प्रमाण, शाळांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, स्त्री शिक्षणाचे प्रश्न, शिक्षणव्यवस्थेचे खासगीकरण, अचूक ध्येय नसणारे अभ्यासक्रम, शाळांमधील पायाभूत सोईसुविधांचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत.’ वरील वाक्यातील विविध मुद्दे पाहता आपल्या हे सहज लक्षात येते की, वरील सर्व मुद्दय़ांचे महत्त्व व गांभीर्य सारखे नाही. तरीही या सर्व मुद्दय़ांचा एकाच यादीत समावेश केल्यामुळे लेखनातील ठामपणा कमी होतो.

‘जरी .. तरी’ आराखडा

निबंध लिखाण करत असताना एखादा मुद्दा प्रभावीपणे वाचकाला पटवून देण्यासाठी काही ठरावीक पद्धतीने लेखन केले जाऊ शकते. त्यापकीच एक म्हणजे ‘जरी .. तरी’ आराखडा. यामध्ये एखाद्या गोष्टीविषयीची गरसमजूत खोडून काढता येणे शक्य होते. ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहावयास मिळतात, त्यातला विरोधाभास अशा आराखडय़ातून स्पष्ट करता येतो. ‘जरी आपल्याला हे नसíगक वाटत असले तरी एकंदर पुरावे व दाखले पाहता तसे नाही हे आपल्या लक्षात येईल.’ अशा प्रकारची ही मांडणी आहे.

उदा. (१) जरी महान तत्त्वज्ञांनी आपल्याला साधे व पवित्र जीवन जगण्याचा उपदेश दिला असेल तरी तत्त्वज्ञांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी स्वत: तशा जीवनमार्गाचा अवलंब केलेला दिसत नाही. आपले म्हणणे हिरिरीने मांडणे, छापून आणणे या गोष्टींमध्ये इतर विचारवंतांप्रमाणे तेसुद्धा अडकलेले दिसतात.

(२) जरी संगणकाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी लिहिणे सोपे झाले असले तरी सर्जनशील लेखनामध्ये संगणकाच्या वापरण्याने अडथळे येतात असे दिसून येते.

वरील आराखडय़ाप्रमाणे निबंध लिहीत असताना वेगवेगळ्या शैलींचा वापर करून बघावा. तसेच शैलीबरोबरच निबंधाच्या विषयासाठी आवश्यक मुद्दे कोणते व त्या मुद्दय़ांचे प्राधान्यक्रम कोणते याचे भान ठेवत आराखडा निवडावा.

अपर्णा दीक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 4:44 am

Web Title: upsc exam preparations
Next Stories
1 कॅटचे काऊंटडाऊन सुरू..
2 नोकरीची संधी
3 परदेशी शिक्षणाचा राजमार्ग
Just Now!
X