या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-३ मधील आपत्ती व्यवस्थापन या अभ्यास घटकांतर्गत भारतातील शहरी पूर व त्याचे व्यवस्थापन या मुद्यांविषयी चर्चा करू या. सध्या जगभरामध्ये शहरी पुराच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. शहरी पुरांच्या घटनांनी शहर नियोजनकर्त्यांपुढे एक आव्हान उभे केले आहे. शहरे अत्यावश्यक पायाभूत सुविधांसह आíथक घडामोडींची केंद्रे असल्याने त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असते. भारतामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये शहरी पुरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे देशातील मुंबई, चेन्नई यांसारखी महत्त्वाची शहरे गंभीररीत्या प्रभावित झालेली आहेत. बहुतांश पूरप्रवण शहरे दाट लोकवस्तीची आहेत. परिणामी जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, वाहतूक व वीजपुरवठा विस्कळीत होतो. याचबरोबर विविध संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यामुळे काही वेळ मनुष्यहानीही होत असते. याकरिता शहरी पुरांच्या व्यवस्थापनाचा प्राधान्याने विचार करावा लागतो.

शहरी पुरांच्या समस्येला मुख्यत्वेकरून तीन प्रकारचे घटक कारणीभूत ठरतात.

१) हवामानविषयक, (२) जलीय घटक,  (३) मानवजनीत घटक. हवामानविषयक घटकामध्ये पर्जन्य, चक्रीवादळ, तापमान, बर्फवृष्टी, बर्फ वितळणे या बाबींचा समावेश होतो. जलीय घटकांमध्ये जमिनीतील ओलाव्याची पातळी, अतिवृष्टीपूर्वीची भूजलपातळी, पाणलोट क्षेत्राच्या विविध भागातून वाहणाऱ्या प्रवाहांची एककालिकता (Synchronization) तसेच मानवजनीत घटकांमध्ये जमिनीच्या वापरामध्ये बदल. उदा. शहरीकरण, वनांची तोड, पूरमदानांवर कब्जा केल्यामुळे प्रवाहामध्ये अडथळा, सांडपाणी वाहून नेणाऱ्या आधारभूत संरचनेच्या देखभालीकडे दुर्लक्ष आदी घटक कारणीभूत ठरतात. याबरोबरच शहरी पुराशी संबंधित मुद्यांचा ऊहापोह करणे उचित ठरेल. शहरांमध्ये असणारी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रणालीची रचना १२-२० मिमी तीव्रतेच्या पर्जन्य प्रमाणाला अनुरूप आहे.

अतितीव्रतेची पर्जन्यवृष्टी होत असताना अशी निचराप्रणाली अपुरी ठरते. अतिक्रमणे ही शहरांमधील मोठी समस्या आहे. शहरांमधून वाहणाऱ्या नद्या, नाले यांच्या आजूबाजूला वस्त्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे पाणी सामावून घेण्यासाठी अशा नसíगक प्रवाहांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे आवश्यक असते. पण या नाल्यांच्या काठी व नदीच्या पूरमदानामध्ये अतिक्रमणामुळे या प्रवाहांची क्षमता कमी होते व पूरपरिस्थिती ओढवते.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक कचरा व बांधकाम क्षेत्रातील राडा-रोडा इ. घनकचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. बरेचदा असा कचरा नाल्यांमध्ये फेकल्याने त्याची क्षमता कमी होते.

शहरी पुराचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा (NDMA)ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. मागील काही दशकांपासून शहरी पुराच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलेले असतानाही त्याच्या व्यवस्थापनाकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले नाहीत. २००५मध्ये मुंबई येथील पुराच्या घटनेनंतर शहरी पुरांची समस्या वेगळ्या स्वरूपाची असून त्याकरिता वेगळी रणनीती अवलंबण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. २०१०मध्ये NDMA ने शहरी पूर व्यवस्थापनाकरिता मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

नॅशनल हायड्रो-मेटेओरोलॉजिकल नेटवर्कची निर्मिती करणे, ज्याद्वारे देशातील सर्व शहरे या नेटवर्कशी जोडून पूर्वसूचना देऊन शहरी पुरांचे व्यवस्थापन करता येईल. ही जबाबदारी केंद्रीय जल आयोगा (CWC)द्वारे पार पाडली जाणार आहे. याबरोबरच देशातील शहरांना सामावून घेण्यासाठी डॉपलर रडार्सच्या वापराचा विस्तार करणे, पाणलोट क्षेत्रातील निचराप्रणालीमध्ये पाण्याच्या पातळीची नोंद घेणारी अद्ययावत यंत्रे बसवावीत. पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या प्रचलित प्रणालीची वस्तूसूची (inventory) बनवण्यात यावी, ३१ मार्चपर्यंत शहरातील मुख्य नाल्यातील गाळ काढणे, शहरातील प्रत्येक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेिस्टग सुविधा असावी. शहराचे सखली भाग उद्यानांसाठी व वॉकिंग आणि जॉिगग पार्कसारख्या कमी प्रभावी असणाऱ्या मानवी घडामोडींसाठी आरक्षित असावेत, नाल्यांभोवतीच्या अतिक्रमणांकरिता दंडात्मक कारवाईची तरतूद करणे, माध्यमे, अशासकीय संस्था यांना जनजागृतीकरिता सहभागी करून घ्यावे. यासह अनेक मार्गदर्शक तत्त्वे NDMA ने जारी केली आहेत.

डिसेंबर २०१६मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेमध्ये ‘शहरी पूर’ या समस्येवर प्रश्न विचारण्यात आला –

‘मागील काही वर्षांपासून उच्च तीव्रतेच्या पर्जन्यमानामुळे शहरी पुराच्या वारंवारतेमध्ये वाढ झाली आहे. शहरी पुराची परिस्थिती उद्भवण्यामागची कारणे, अशा घटनांदरम्यान जोखीम कमी करण्यासाठीच्या सज्जता यंत्रणेचा आढावा घ्या.’

आपत्ती व्यवस्थापन या घटकावर वरीलप्रमाणे समकालीन समस्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. उपरोक्त प्रश्नामध्ये शहरी पुराला कारणीभूत घटकांचा आढावा घेऊन देशामध्ये शहरी पुरांसारख्या आपत्तीमध्ये असणाऱ्या यंत्रणा सज्जतेचा आढावा घेणे श्रेयस्कर ठरते.