अंजली वर्तक

‘‘१९७७ च्या निवडणुकीतील यशाने आई हरखून गेली नाही, की १९८१ च्या अपयशाने खचूनही गेली नाही. हीच माझ्या कणखर आईची खरी ओळख.. त्यानंतरही जिद्दीने ती पुन्हा विधानसभेत निवडून आली व नंतर विरोधी पक्षनेताही झाली. त्या सर्व चढउतारांतही ती सतत लोकांसाठी काम करतच राहिली. आईने कधी गुंजभरही सोनं घातलं नाही. हातात एक घडय़ाळ आणि साधी हँडलूमची साडी, तरीही ती खूपच सुंदर दिसे. तिच्या साधेपणात व सच्चेपणातच तिचा डौल होता. आई अगदी शेवटपर्यंत अशीच राहिली. आईची तत्त्वं कधी बदलली नाहीत. ना स्वत:साठी बदलली ना तिच्या मुलीसाठी. ती स्वत:च ताऱ्यासारखी स्वयंप्रकाशित होती. आईला कधीही घराणेशाही मान्य नव्हती. तिला मी राजकारणात यायला नको होते आणि मलाही त्यात रस नव्हता. पण आईच्या साधेपणाचा, सच्चेपणाचा, कणखरपणाचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा वारसा मात्र तिने मला निश्चितच दिला आहे,’’ सांगताहेत कन्या अंजली वर्तक, आई मृणाल गोरे यांच्याविषयी..

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

माझे उभे आयुष्य जिने व्यापले ती माझी आई म्हणजे मृणाल गोरे!

माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी माझे वडील बंडू गोरे यांचे आजाराने निधन झाले. तेव्हापासून बाबांचे मित्र आबा करमरकर यांच्या टोपीवाला बंगला येथे मी व आई राहायचो. बाबा गेल्यावर आईने, बाबांचे सामाजिक कार्य पुढे चालवायचे ठरवले. बाबा वारले तेव्हा माझ्या मावशीने (डॉ. कुमुदिनी गुप्ते) आईला सांगितले, ‘‘मी अंजूचा सांभाळ करीन, तू तुझे काम कर.’’ पण आई म्हणाली, ‘‘अंजू घरी आहे म्हणून तिच्या ओढीने तरी मी घरी लवकर येईन व घराला घरपण राहील. त्यामुळे ती माझ्याकडेच राहू देत.’’ आमच्या दोघींचा छान दिनक्रम होता. सुरुवातीच्या काळात आई ‘महिला मंडळ’, ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ यांची कामे करत होती. नंतर ती नगरसेवक झाली. मी प्राथमिक शाळेत असताना शाळेतल्या प्रेमाताई गव्हाणकर व शोभाबाई दाबके टोपीवाला बंगल्यात खालीच राहत असत. बाईंचा हात धरूनच मी शाळेत जात होते. आईने दिलेला अंडा-पाव सकाळी खायचा व तिने दिलेला चपातीचा लाडू घेऊन शाळेत जायचं, हा चौथीपर्यंतचा दिनक्रम! रात्री आई घरी येईपर्यंत मी खालीच असायचे. आमच्या घरातच खालच्या मजल्यावर जायला एक जिना होता म्हणून बरं होतं. मी पाचवीत गेल्यानंतर आईने चोवीस तासांची बाई ठेवली, मला सोबत व्हावी म्हणून. आईने माझा अभ्यास कधीच घेतला नाही; पण ‘अंजू अभ्यास केलास का?’, असं रोज घरी आल्यावर विचारायची. एखादा दिवस अभ्यास झाला नसेल तर तिच्या डोळ्याला डोळा भिडविता यायचा नाही. आई मला रोज एक तरी फळ न चुकता द्यायची. बिस्किटे, चॉकलेट्स इत्यादी कमीच खाल्ली, पण तब्येत उत्तम होती. एक दिवस सकाळी माझ्या अंगात थोडी कणकण होती. आईनं थर्मामीटर लावून पाहिलं, साडे-नव्याण्णव ताप होता. ती म्हणाली, ‘‘शाळेत जायला काहीच हरकत नाही.’’ आणि मीही गेले. तब्येतीची काळजी घ्यायची, पण त्याचा बाऊ करायचा नाही, ही तिची शिकवण मी अजूनही विसरलेले नाही. लहानपणी कधी कधी वाटायचे, आपण आजारी पडावे व आईकडून लाड करून घ्यावे; पण माझी आई इतर आयांपेक्षा निराळीच होती. ती दूरदर्शी होती. तिचे सर्व वेगळेपण पुढे माझ्या हिताचेच ठरले. हे मला मोठं झाल्यावर उमगले.

माझ्या दहावीच्या परीक्षेचे केंद्र मालाडच्या शाळेत आले होते. वर्गातल्या सर्व मुलांचे आई-वडील पहिल्या दिवशी त्यांच्याबरोबर येणार होते; पण आईला त्या दिवशी खूप महत्त्वाचे काम होते. ती म्हणाली, ‘‘अंजू, तुझ्याबरोबर यायची गरज वाटत नाही; तुझा तर सगळा अभ्यास नीट झालाय ना!’’ तेव्हा मला थोडं वाईट वाटलं, पण ते तात्पुरतंच. त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. कुठलेही काम त्यामुळे मी एकटी करायला लागले आणि हेच तर आईला पाहिजे होतं. मी रांगेत उभं राहून रेशन आणायचे, एकटी बँकेत जायचे, सगळी बिलेही भरायचे. आईला मिळणारे मानधन ती माझ्याच हातात सुपूर्द करायची आणि ‘यात तूच भागव’, असं म्हणायची. तेव्हा मी हिशेब लिहायला शिकले. बिस्किटे, केक आपल्याला का परवडत नाहीत, हेही आपोआप समजले. माझी आजी, म्हणजे आईची आई. ती मला आईच्या खूप गमती सांगायची. एकदा आजी व नाना म्हणजे आजोबा (प्रोफेसर नाना मोहिले) यांनी आईला एक सिल्कची महाग साडी आणली होती. आईने लगेचच सांगितले, ‘‘मी कुठे ही भारी साडी नेसणार. त्यापेक्षा तुम्ही पैसेच द्या. मी अंजूला सुका मेवा आणीन.’’ वेगळी असली तरी आईच होती ती. मला तेव्हा तिचा खूप अभिमान वाटला.

आईने गरीब-श्रीमंत असा भेदभाव कधीच केला नाही. आमच्या टोपीवाला बंगल्याच्या हॉलमध्ये कायम आईचे व पक्षाचे कार्यालय होते. हॉलच्या त्याच खुर्च्यावर सर्व मान्यवर मोठी माणसे बसत आणि आईची कपडे नेणारी इस्त्रीवालीसुद्धा. जशी जशी मी मोठी होत गेले तशी आई माझी मत्रीणच झाली. आईने कधी गुंजभरही सोनं घातलं नाही. हातात एक घडय़ाळ आणि साधी हँडलूमची साडी, तरीही ती खूपच सुंदर दिसे. तिच्या साधेपणात व सच्चेपणातच तिचा डौल होता. आई अगदी शेवटपर्यंत अशीच राहिली. आईची तत्त्वं कधी बदलली नाहीत. ना स्वत:साठी बदलली ना तिच्या मुलीसाठी.

अ. भि. गोरेगावकर शाळेत पाचवीत तिने सर्वसामान्य पालकांप्रमाणे रांगेत उभं राहून माझा प्रवेश घेतला. आई तशी अतिशय धीट होती. एकदा चर्चगेट ट्रेनमधून ती गोरेगावला उतरली व गाडी सुटताच तिचा पाय प्लॅटफॉर्म व ट्रेन यांच्यामध्ये अडकला. बाजूने लोक जमून काही काही सल्ले देत होते; पण कशाचाही परिणाम स्वत:वर होऊ न देता तिने संपूर्ण गाडी जाईपर्यंत तो पाय तसाच धरून ठेवला. शेवटी काढला तेव्हा किरकोळ लागले होते.

आई सर्वप्रथम गोरेगाव ग्रामपंचायतीवर निवडून आली व नंतर क्रमाक्रमाने नगरसेवक, आमदार व १९७७ ला खासदारही झाली. आईच्या या सर्व राजकीय कारकीर्दीत अतिशय चांगला मित्रपरिवार लाभला. समाजवादी विचारांचे व आईवर अत्यंत विश्वास असलेले बाबूराव सामंत आणि त्यांच्यासारख्याच सर्व समविचारी सहकाऱ्यांशिवाय आई इतके राजकीय काम करूच शकली नसती. लोकसभेच्या १९७७ च्या निवडणुकीत आई मुंबईतून सर्वाधिक मताने निवडून आली; पण त्या यशाने ती कधी हरखून गेली नाही. तिचे आधीचे काम चालूच होते. पुढे ते फक्त दिल्लीपर्यंत वाढले, इतकेच. एकूणच तो १९७७ च्या निवडणुकीचा काळ आणि त्याच्या अनेक आठवणी आजही मनाशी घट्ट रुतून आहेत.

टोपीवाला बंगला माणसांनी फुललेला असायचा. माझे लग्न होऊन दोन वर्षेही झाली नव्हती. मी आईकडे राहायला आले होते. लग्नानंतर आईची खूप आठवण यायची. मग आम्ही दोघं नवरा-बायको एखादा दिवस टोपीवाला बंगल्यात जायचो. आम्ही लोकांना फक्त चहाच द्यायचो. अर्थात अधिक कोणी कसली अपेक्षाही केली नाही. तर त्या दिवशी सकाळी घराचे दार उघडले, दाराबाहेरच्या बाकावर एक मोठे उद्योगपती घाम पुसत बसले होते. (नाव सांगत नाही) त्यांना मी आत हॉलमध्ये बसवले व आईला बोलाविले. आईच्या हातात त्यांनी एक पशांची बॅग ठेवली व म्हणाले, ‘‘तुम्ही निवडून यायलाच हवे.’’ आईने शांतपणे थोडे पैसे काढून घेतले आणि रीतसर पक्षाची पावतीही दिली. ती म्हणाली, ‘‘मी कोणाकडूनही निवडणुकीसाठी जास्त पैसे घेत नाही.’’

आईला लोकांनी खूप प्रेम दिले; पण जेव्हा जनता पक्ष फुटून आई १९८१ च्या संसदेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उभी राहिली तेव्हा तिलाही अपयशच पत्करावे लागले. १९७७ च्या यशाने आई हरखून गेली नाही, की १९८१ च्या अपयशाने खचूनही गेली नाही. हीच माझ्या कणखर आईची खरी ओळख.. त्यानंतरही जिद्दीने ती पुन्हा विधानसभेत निवडून आली व नंतर विरोधी पक्षनेताही झाली. त्या सर्व चढउतारांत ती लोकांसाठी काम करतच राहिली.

विक्रम आणि मानसी ही दोन नातवंडे; म्हणजे माझी बाळे, तिचा केवढा जीव त्यांच्यावर.. वेळात वेळ काढून त्यांच्यासाठी ती वसईला माझ्या घरी येई.  विक्रम झाला, त्यावेळची एक गंमत आहे. प्रसूतीआधी आठ दिवस मी वसईहून गोरेगावला आईकडे राहायला गेले होते, कारण प्रसूतीसाठी मला माहीमला डॉ. गुप्ते यांच्याकडेच जायचे होते. तेव्हा १९७८ ला आई दिल्लीत होती. गोरेगावला माझ्याबरोबर एक बाई होत्या. पोटात दुखू लागल्यावर मी त्यांना घेऊन रात्री टॅक्सीने माहीमला पोहोचले. वसईहून दिलीप (माझा नवरा) ही पोहोचला. पहाटे साडेचारला विक्रम झाला आणि सकाळी सात वाजता मी नाश्ता करत असतानाच आई येऊन थडकली. नातवाला बघण्यासाठी  दिल्लीहून अगदी धावतपळत आली होती. नंतर मानसी झाल्यावर तर तिच्यासह आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आम्हा सगळ्यांनाच मुलगीच हवी होती.

आईचे काम सतत चालूच असायचे. जेवण करायला बाई होतीच, मीही आईशी रोज फोनवर बोलत होते; पण खाण्याच्या वेडय़ावाकडय़ा वेळा, कामाचा ताण या सर्वाचा एकत्रित परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला. आईची साठीही जवळ आली होती. एके संध्याकाळी आईचा अचानक फोन आला, ‘अंजू, आज राहायला येशील का?’ मी चरकले. काही तरी खास असल्याशिवाय असा फोन ती करणार नाही, हे मला माहीत होतं. मी ताबडतोब आईकडे येऊन थडकले. आई व्यवस्थित वाटली. जीव भांडय़ात पडला; पण नंतर कळले की ‘ट्रस्ट’मध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन’चे शिबीर होते, त्यामध्ये आईला कर्करोगाचे निदान झाले होते. मती शून्यच झाली. न राहून मी रडू लागले तर आईनेच समजूत घातली, ‘‘अगं, अगदी छोटीच गाठ आहे. ऑपरेशनने सहज बरी होईल.’’

सर्वप्रथम मी प्रभूभाई संघवींना फोन केला. समाजवादी नेत्यांच्या सर्व डॉक्टरांच्या अपॉइन्टमेंट्स प्रभूभाई घेत असत. सर्व सूत्रे पटापट फिरली व आठ दिवसांतच आईची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. त्यानंतर आईला कर्करोगाचा त्रास कधी झाला नाही; पण त्या ऑपरेशननंतर आईला मधुमेहाने ग्रासले.  मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय आजगावकर हे तेव्हापासून आईचे डॉक्टर झाले, ते शेवटपर्यंत. तेव्हा प्रथमच आई महिनाभर माझ्याकडे वसईला येऊन राहिली. नाही तर वसईला आली तरी चार-पाच दिवस झाले, की पळायची गोरेगावला. आई आजारी असताना गुपचूप माझं सगळं ऐकायची. आमचं नातं मत्रिणीचं तर होतंच, ते जास्तच घट्ट मत्रीचं झालं होतं. त्यानंतर आईला अनेक आजार झाले. प्रत्येक वेळी वसईला येऊन आराम केला, की ती परत गोरेगावला परतायची. मी अनेकदा तिला म्हणायचे, ‘‘तू आता वसईला येऊनच राहा’’; ती कधी ‘नको’, असं म्हणाली नाही. तरी कृतीतून कळायचेच, यायची ती परत गोरेगावला जायची तारीख ठरवूनच. शक्यतो एकटं राहता येतंय तोवर गोरेगावातच राहावं, हे तिचं मन मला समजत होतं. तिच्या मनाप्रमाणेच तिला जगू दिले आणि मीही जगले.

आईला पैसे खर्च करणे आवडायचेच नाही. मी तिला भारी साडी घेतली तरी आवडायची नाही व मी स्वत:ला भारी साडी घेतली तरी ओरडायचीच. एकदा मी कौतुकाने मला दिलीपने घेतलेली साडी दाखविली. ती म्हणाली, ‘‘खूप छान आहे’’; पण किमतीचे लेबल बघितल्यानंतर मला म्हणालीच, ‘‘अगं अंजू, तू ही एवढी महागाची साडी किती वेळा नेसणार?’’ त्यानंतर एक शिकले, कधीही आईला किमतीचे लेबल लावलेली साडी दाखवायची नाही. माझीही नाही आणि तिला घेतलेलीही नाही. मी, दिलीप व मुले वाढदिवसाला कुठेही मुंबईला फिरायला गेलो तरी येताना सर्वात मोठा स्टॉप गोरेगावचाच. तिथं मुलांच्या या आजीला भेटल्याशिवाय कधीही परत आलो नाही. आईच्या कार्यक्रमांना ‘ट्रस्ट’मध्ये किंवा ‘स्वाधार’मध्ये आम्ही भेटलो तरी आम्हाला खूप गप्पा मारता यायच्या नाहीत. तरी शेवटच्या दहा-पंधरा वर्षांत आठवडय़ाला एकदा तरी आईकडे गप्पा मारायला जायचेच. त्याच दरम्यान, टोपीवाला बंगला पाडल्यानंतर आई उन्नतनगर येथे राहात असे. आई वसईला आली, की नातवंडांतच जास्त राहायची. त्यामुळे गोरेगावला गेल्यावरच आम्ही जास्त गप्पा मारायचो. आईला मासे खूप आवडत. वसईला राहायला आल्यावर आईचा आवडता कार्यक्रम म्हणजे मी बाजारातून आणलेले ताजे मासे करणे व ते खाणे. आई सुगरण होती. तिला वेळ मिळाला की दिलीप आणि मुलांच्या आवडीचे पुडिंगसह इतर पदार्थ हमखास बनवायची. ती करंज्या खूप सुंदर वळायची.

आई प्रचंड संवेदनक्षम होतीच. ‘स्वाधार’मध्ये येणाऱ्या बायकांचे दु:खी जीवन ऐकून मन अगदी विषण्ण व्हायचं, हे लोक का भांडतात? सर्वाचेच आपले आयुष्य लहानच आहे ना? मग ते छान आनंदात का नाही घालवायचं, हा प्रश्न मलाही तेव्हापासून पडायचा, तो आताही कायम पडतोय.. ‘नागरी निवारा परिषदे’चे कामही सोपे नव्हते. त्यांच्यासाठी आई उपोषणाला बसली होती. तेव्हा तिला भेटल्यावरची क्लेशदायक आठवण अजूनही मनात ताजीच आहे.

१९७५ च्या जूनमध्ये आणीबाणी जाहीर झाली. नुकतेच फेब्रुवारीत माझे लग्न झाले होते. प्रथम काही महिने आई भूमिगत राहून काम करत होती. तेव्हा ती नेहमी म्हणायची, ‘‘तुझे लग्न झाले आहे म्हणून मी शांतपणे काम करू शकते. दिलीपसारखा निव्र्यसनी, तुला समजून घेणारा व माझ्या मागे कायम उभा असणारा जावई असल्यामुळेच मी शांतच आहे.’’ आणीबाणीचे ते दिवस वेगळे होते. एकदा मी आईकडे होते. रात्री घराची बेल वाजली. बघतो, तर इन्स्पेक्टर उभे. एरव्ही बंद असणाऱ्या घरात एवढय़ा रात्री लाइट्स लागले म्हणजे त्यांना वाटले आई आली आहे की काय! तेव्हा आई भूमिगत राहून काम करत होती. पण पुढे पकडले गेल्यानंतर आईची रवानगी मुंबई, पुणे, धुळे अशा सर्व तुरुंगांमध्ये करण्यात आली. आईची कधीच कसलीच तक्रार नसायची. तिथेही ती मेणाची फळे बनवायला शिकली आणि माझ्यासाठी बनवलीही. दिलीपसाठी स्वेटर विणला. धुळ्याला तुरुंगामध्ये गेल्यावर मला सांगितले, की आईला एका वेडय़ा बाईजवळ ठेवले होते. तुरुंगामधल्या अनेक गोष्टी ऐकायला यायच्या. ज्यामुळे मन विषण्ण व्हायचे. आईची काळजी वाटायची; पण तेही दिवस गेले. तुरुंगामधून बाहेर आल्यावर आईचे जंगी स्वागत झाले, तेव्हा मात्र मन आनंदाने सुखावून गेले.

आई तिच्या तत्त्वांवर ठाम होती. त्यामुळे कधी कधी इतर कार्यकत्रे दुखावलेही गेले असतील. उदा. आईला अनेक कार्यकर्त्यांच्या लग्नाला जावे लागे; पण तिथे तिने न जेवण्याचा निर्णय घेतला होता. फक्त वधू-वरांना आशीर्वाद देऊन ती निघायची. लोक खूप आग्रह करीत असत, ते पाहून मलाही वाईट वाटायचे. माझ्याच लग्नातील गंमत बघा ना; त्या वेळी लग्नाच्या पंगतीत शंभर जणांहून अधिक माणसे जेवण्याची परवानगी नव्हती. वसईचे वर्तक कुटुंब मोठे, तरीही फक्त शंभर माणसेच लग्नात जेवली. इतर नातेवाईकांना माझे मोठे दीर बाहेर जेवायला घेऊन गेले.

वय झालं तरी आमच्या सर्व सुख-दु:खात आई हमखास वसईत हजर असायची. नातवंडांप्रमाणेच पतवंडांमध्येही ती लहान होऊन खेळली. विक्रम-दीपा आणि त्यांची मुले किआरा, विवान आणि मानसी, शर्वलि यांचा मुलगा कुश, हे शेवटच्या घटकेपर्यंत तिच्या अवतीभवतीच होते. त्यामुळे ती खूश असायची.

आयुष्यात आईने अनेक आजारांना तोंड दिले; पण मनाच्या खंबीरपणामुळे शेवटपर्यंत काम करत राहिली. २०१२ च्या जुलै महिन्यात तशी आई ठीक होती; पण दमलेली वाटत होती. मी तिला वसईला घेऊन आले होते. नेहमीसारखी ती ‘आठ-दहा दिवसच राहणार’, असं म्हणत होती. १५ जुलैला पुण्याला माझा चुलतभाऊ, सुरेश गोरे याच्या मुलीचे लग्न होते. प्रथम आम्ही व आई सर्व जणच पुण्याला जायचे ठरविले होते; पण आईची प्रकृती पाहता मी व दिलीप दोघांनीच सकाळी पुण्याला जाऊन सायंकाळी परत येण्याचा निर्णय घेतला. १६ तारखेला आईला ताप आला.

डॉ. आजगावकरांशी माझा फोनवर सतत संपर्क होताच. १७ तारखेला आईला खूपच अशक्तपणा वाटत होता. ती अस्वस्थच होती. म्हणून वसईच्या ‘कार्डिनल ग्रेशिअस हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. पण सायंकाळी साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. रात्री वसईच्या बंगली येथील ‘लोकसेवा मंडळ हॉल’मध्ये तिचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवले होते. सकाळी पहाटेच ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मध्ये तिला घेऊन पोहोचलो. ‘ट्रस्ट’मध्ये जनसमुदाय उसळला होता. अनेक मंत्री, मान्यवर, माझे सर्व नातेवाईक आणि आईवर प्रेम करणारे सर्व सहकारी यांनी ‘ट्रस्ट’ भरून गेला होता. कुणाच्याही डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. आईच्या जाण्याची पोकळी अजूनही भरली नाही आणि ती भरेल असं वाटत नाही.

लहानपणी माझी आई, हीच माझी आईही होती आणि वडीलही. पुढे ती मला मोठय़ा बहिणीसारखी वाटायची आणि मी आई झाल्यावर तर माझी मत्रीणच झाली. ती स्वत:च ताऱ्यासारखी स्वयंप्रकाशित होती. अशा आईची थोडीफार सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले व तिच्या पुण्याईमुळेच मी माझ्या जीवनात सुखी झाले असे आजही मला वाटते. आईला कधीही घराणेशाही मान्य नव्हती. तिलाही मी राजकारणात यायला नकोच होते आणि मलाही त्यात रस नव्हता. त्यामुळे तो प्रश्नच उद्भवला नाही. आईच्या साधेपणाचा, सच्चेपणाचा, कणखरपणाचा  आणि प्रचंड आत्मविश्वासाचा वारसा मात्र तिने मला निश्चितच दिला आहे.

आईचे निधन झाल्यानंतर मला ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ची विश्वस्त होण्याचा आग्रह झाला. वसईहून येऊन मला काम करायला जमेल का, असा प्रथम संदेह वाटत होता; पण नंतर निश्चय केला, जेवढे जमेल तेवढे तर काम करू. आता सात वर्षे होऊन गेली; पण सांगायला अभिमान वाटतो की, मी ट्रस्टींची एकही बैठक चुकवली नाही. आईने करून ठेवलेल्या कामाची सर्वाना आठवण राहावी, आपल्या पुढच्या पिढीला स्फूर्ती मिळावी, राजकारणातील अभ्यासकांना आईची विधानसभेतील सर्व आणि इतर भाषणे ऐकायला मिळावी, अशी तीव्र इच्छा सर्वच विश्वस्तांना होती व त्यातूनच ‘मृणालताई दालन’ ही संकल्पना आली.

बाबा गेल्यानंतर त्यांच्या समाजवादी मित्रपरिवाराने ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ या स्मृतिदालनाची सुरुवात केली. आता ही इमारत जीर्णावस्थेला आली म्हणून तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही त्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू केले. त्याच गोरेगावच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक छोटा हॉल आहे. त्यामध्ये आईचे हे दालन उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अतिशय अभिनव, नावीन्यपूर्ण आणि कलापूर्ण असणारे हे दालन मार्च-एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होऊन सर्वासाठी खुले होईल..

आईच्या साध्या, पण खंबीर जीवनाचे ते प्रतिबिंब असेल..

anjalivartakvasai@gmail.com

chaturang@expressindia.com