News Flash

पर्णसंभाराचं जग

वेध भवतालाचा

|| अर्चना जगदीश

नलिनी नाडकर्णी या अमेरिकेतील वृक्ष पर्णसंभार संशोधक. १९८५ पासून नलिनी नाडकर्णी झाडांच्या पर्णाच्छादनाचा अभ्यास करतात. एव्हरग्रीन स्टेट कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या नलिनी ‘द क्वीन ऑफ द फॉरेस्ट कॅनॉपी’ म्हणून ओळखल्या जातात. ओघवत्या भाषेत त्यांनी आपल्या तीस-पस्तीस वर्षांच्या संशोधनाचे अनुभव ‘बिट्वीन अर्थ अ‍ॅण्ड स्काय’ या अप्रतिम पुस्तकात मांडले आहेत. त्यांच्या मते झाडांच्या वरच्या भागातील हे जग अनाकलनीय, अचंबित करणारं आहे.

आकाश आणि पृथ्वी यांना जोडणारा दुवा म्हणजे झाडांचा पर्णसंभार! निसर्गप्रेमींच्या मनात जंगल असतं ते एखाद्या पाश्र्वभूमीवर दिसणाऱ्या दृश्यासारखं. पण अनेकदा खरं तर त्यांचं मन गुंतलेलं असतं ते जंगलातल्या छोटय़ा-मोठय़ा प्राण्यांमध्ये, रंगीबेरंगी पक्ष्यांमध्ये किंवा अनेकदा दुर्मीळ तसेच दिसायला, बघायला अवघड असणाऱ्या बेडूक किडे-मकोडे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये. मात्र वनस्पती अभ्यासक आणि तज्ज्ञ सोडले तर झाडांकडे मन लावून बघायला कुणाला वेळ नसतो. कदाचित त्यांची ओळख प्राण्यांइतकी सोपी नाही, कारण जगात हजारो जातींचे वृक्ष आढळतात. शिवाय वृक्ष एकाच जागी स्थिर असतात. त्यांचा अभ्यास कधीही करता येईल म्हणून दुर्लक्ष आणि झाडं काय तोडली तरी हवी तेव्हा, हवी तिथं लावता येतात हा सार्वत्रिक गरसमज! सामान्य निसर्गप्रेमींबरोबरच संशोधकांचंही लक्ष अर्जुनाच्या बाणासारखं फक्त वाघावर किंवा आपला अभ्यास विषय असलेल्या प्राणी-पक्ष्यावर- प्रजातीवर केंद्रित झालेलं असतं. अनेकदा प्रज्ञावंत कलाकार झाडांबद्दल लिहितात, त्यांची चित्रं रंगवतात. पण बालकवींचा ‘औदुंबर’ हे प्रतीकसुद्धा आपल्या मनातून विरत चाललं आहे.

विशाल वृक्ष आणि त्यांची प्राचीन खोडं म्हणजे खरं तर मानवसमूहांचा इतिहास आणि त्यांची अरण्याबद्दलची समज यांची प्रतीकं असतात, पण आता ते अशा हृदयाच्या पातळीवर समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. एखादा महावृक्ष तुटतो तेव्हा त्या अरण्याचा, जागेचा एक अज्ञात इतिहास तर संपतोच; पण माती आणि आकाश यांच्यामधला दुवा निखळतो. हा इतिहास म्हणजे माणसांच्या जगातल्या घडामोडी असं म्हणणं कदाचित कविकल्पना असेल, पण निसर्ग इतिहास आणि त्या वृक्षाच्या जीवनात आजूबाजूच्या वातावरणात होणारे ढोबळ आणि सूक्ष्म बदल यांचं आकलनही त्या वृक्षाबरोबरच नष्ट होतं. झाडं असे बदल सतत शेकडो र्वष सहन करत असतात, त्यांना तोंड देत असतात. झाडांची खोडं आणि पर्णसंभार म्हणजे आपल्याला अजिबात माहीत नसलेलं प्रचंड आणि अज्ञात जग..

झाडांच्या गर्दीतून आकाश दिसत नाही अशी जंगलं आता दुर्मीळ व्हायला लागली आहेत. भारतातल्या संरक्षित जंगलांपकी सह्यद्रीतली ‘पेपारा’ आणि ‘शेंदुर्णी’सारखी अभयारण्यं आणि अरुणाचलमधलं ‘नामदफा’ राष्ट्रीय उद्यान इथं मात्र अजूनही झाडांच्या पर्णसंभारामुळे अवकाश व्यापून जातं आणि सूर्याची किरणं जमिनीवर पोहोचत नाहीत. अशा सावलीखाली वाढणाऱ्या आणखी गच्च हिरवाईत जंगलाची रहस्यं सुरक्षित असतात. उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पानांची छत्री म्हणजे जंगलाचं खरं वैभव. महाराष्ट्रात पानझडी जंगलं जास्त आहेत त्यामुळे या जंगलांत असा पसारा क्वचित दिसत असला तरी रस्त्याकडेच्या मोठय़ा वडािपपळांकडे आपलं सहज लक्ष जातं ते अशा पसाऱ्यामुळेच. आंबोली-महाबळेश्वर-भीमाशंकर अशा घाटमाथ्यावरच्या संरक्षित सदाहरित वनांमध्ये अशा छत्र्या दिसतात. इथे दिवसासुद्धा चालताना एखाद्दोन कवडसे सोडले तर गर्दपणाच प्रामुख्याने जाणवतो. जंगलांमुळे जसा प्राणी-पक्ष्यांसाठी अधिवास तयार होत असतो, तसंच प्रत्येक वृक्षाच्या पर्णसंभाराचीही हजारो वैशिष्टय़े असतात नि त्यातही शेकडो जीवांना आसरा मिळत असतो.

खोडांवर शेवाळी वाढतात, त्यांच्या आश्रयाने अनेक ऑíकड्स आणि परावलंबी वनस्पती वाढतात, फांद्यांच्या बेचक्यात साठणारं पाणी आणि धूळमाती यात इतर वनस्पतींच्या बिया रुजतात, त्यातूनच मूळ झाडाला विळखा घालणाऱ्या वडाच्या प्रजाती फोफावतात. अशा बिया वाहून आणणाऱ्या धनेशासारख्या पक्ष्यांची घरटीदेखील उंच, प्राचीन वृक्षांच्या ढोल्यांमध्ये असतात. गरुडाच्या अनेक प्रजाती विषुववृत्तीय घनदाट अरण्यांमध्ये अशा उंच वृक्षांच्या टोकाकडच्या फांद्यांवर घरटी बांधतात. शेकरूंची घरटीसुद्धा अशाच अवघड जागी असतात. मुंग्या, कीटक आणि मधमाश्या यांच्यासाठीदेखील हे पर्णसंभाराचं जग महत्त्वाचं असतं. म्हणूनच सह्यद्रीतल्या जंगलांमध्ये बेहेडा किंवा भेंडाच्या उंच झाडांवर मधमाश्यांची पोळी दिसतात, तर सातेरीसारख्या माश्या झाडांवरच्या छोटय़ा छोटय़ा ढोल्यांमध्ये पोळी करतात. प्राचीन वृक्षांच्या उंचीमुळे त्यांची खोडं आणि पर्णसंभाराचं हे जग या छोटय़ा-मोठय़ा जीवांना सुरक्षित वाटत असणार. खरं तर या सगळ्यांबद्दलसुद्धा आपल्याला कुतूहल वाटायला हवं आणि जंगल म्हणजे हे सगळंसुद्धा हे आपण विसरता कामा नये.

हे सगळं इथं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे नुकतंच वाचलेलं नलिनी नाडकर्णी या अमेरिकास्थीत, वृक्ष पर्णसंभार (उंल्लस्र्८) संशोधक आणि लेखिकेचं ‘बिट्वीन अर्थ अ‍ॅण्ड स्काय’ हे अप्रतिम पुस्तक. झाडांच्या पर्णसंभारात, फांद्यांमध्ये काय आहे, याचं कुतूहल लहानपणी खोडकरपणे झाडावर चढण्यापर्यंत मर्यादित न राहता त्याचं पर्यावसान त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनात आणि त्याबद्दल जाणीव जागृती करण्याच्या ध्येयामध्ये कसं झालं आणि हे संशोधन करताना त्यांना समजलेल्या पर्णसंभाराच्या अद्भुत जगाची गोष्ट आहे ही!

१९८५ पासून नलिनी नाडकर्णी झाडांच्या पर्णाच्छादनाचा (उंल्लस्र्८) अभ्यास करतात. एव्हरग्रीन स्टेट कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या नलिनी ‘द क्वीन ऑफ द फॉरेस्ट कॅनॉपी’ म्हणून ओळखल्या जातात. ओघवत्या भाषेत त्यांनी आपल्या तीस-पस्तीस वर्षांच्या संशोधनाचे अनुभव त्यात मांडले आहेत. त्यांच्या मते झाडांच्या वरच्या भागातील हे जग अनाकलनीय, अचंबित करणारं आहे. आपल्या संस्कृतीत, धर्मात झाडांबद्दल कितीही सांगितलं गेलं असलं, लिहिलं गेलं असलं तरी आपण मात्र झाडांच्या या जगाबद्दल अनभिज्ञ आहोत. झाडांचे हे जग समजून घेण्यासाठी त्यांनी जगभरातल्या चार खंडांमध्ये भटकून हजारो वृक्षांची, जंगलांची ही दुनिया समजून घेण्यासाठी अभ्यास केला, आपल्या सहकारी संशोधक आणि विद्यार्थ्यांबरोबर झाडांवर चढल्या. त्यांचा विशेष अभ्यास आहे ‘कोस्टारिका’मधल्या विषुववृत्तीय सदाहरित पर्जन्यवनांमधल्या महाकाय वृक्षांचा आणि अमेरिकेच्या वॉिशग्टन राज्यातल्या राखीव जंगलातल्या प्राचीन वृक्षांचा. या झाडांचा अभ्यास करत असताना त्यांना आतापर्यंत माहीत नसलेली अनेक रहस्यं उलगडली म्हणजे, काही झाडांना वरच्या खोडातून, सालीच्या आत पारंब्यांसारखी नवी मुळं फुटतात, ती हवेतून आद्र्रता शोषून घेतात. प्रचंड मोठय़ा वृक्षांच्या शेंडय़ांपर्यंत पाणी आणि पोषकद्रव्यं नक्की कशी पोहोचतात हे अजूनही पूर्णपणे न उलगडलेलं कोडं आहे. नाडकर्णीच्या संशोधनाने त्याबद्दलच्या सिद्धांतांना आणि संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. झाडांच्या बुंध्यांवरचं शेवाळं वाढून त्याचे दाट थर तयार होण्यासाठी शेकडो र्वष लागतात. ते गोळा करून घर -परसातल्या, बाल्कनीतल्या कुंडीतल्या झाडांसाठी विकण्याचा व्यवसाय जगभरात फोफावला आहे. पण असे नसíगक थर ओरबाडले तर ते पुन्हा तयार होणं खूप अवघड असतं हे नलिनी यांच्या संशोधनातून पुढे आलं आहे. झाडांच्या पर्णसंभाराचं महत्त्व अधोरेखित करताना त्या त्यांचे गेल्या तीस वर्षांतले अनेक अनुभव सांगतात. दोन-तीन वेळा झाडावरून पडल्यामुळे त्यांची हाडंदेखील मोडलेली आहेत. पण त्यांचं काम अविरत सुरू आहे. नुसता अभ्यास करून त्या थांबल्या नाहीत तर आपण सर्व जण झाडांच्या जगाशी कसे जोडलेले आहोत हेही त्या कळकळीने सांगत राहतात. हा सगळा अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेली समज फक्त संशोधकांपुरती मर्यादित न राहता निसर्गप्रेमी, लेखक, लहान मुलं या सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या धडपड करतात.

आतापर्यंत त्यांचे ८० शोधनिबंध आणि तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘गुगेनहाइम फेलोशिप’ आणि ‘जे. मॉर्टन स्टìलग अवॉर्ड’ हे त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांपकी. त्यांनी १९९४ पासून आंतरराष्ट्रीय पर्णसंभार नेटवर्क सुरू केलं आहे आणि साठी ओलांडलेल्या नलिनी आजही त्यांच्या कामात गर्क आहेत. त्यांचे वडील १९५२ च्या सुमारास भारतातून अमेरिकेत गेले इतकाच त्यांचा भारताशी संबंध.

सगळीकडे तुटणारी जंगलं आणि विकासाची घोडदौड यामुळे आपल्या परिसंस्था बदलत चालल्या आहेत आणि आपल्याला अनभिज्ञ असलेलं वृक्षाच्छादन-पर्णसंभाराचं अद्वितीय जग नाहीसं होत चाललं आहे याबद्दलची खंत त्या वारंवार व्यक्त करतात. ‘‘जेव्हा मी हृदयाचं चित्र बघते तेव्हा त्याच्यावर मला रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून तयार होणारे वृक्षांचे आणि पर्णसंभाराचे आकार दिसतात, खरंच झाडं तर अनादी काळापासून आपल्या हृदयातच आहेत. जेव्हा आपल्याला निसर्ग जाणवतो, समजतो तेव्हाच आपण आपल्या अंत:स्थ जाणिवेपर्यंत पोहोचतो, मनाला स्पर्श करतो. म्हणूनच आपण सगळे वेगळे असलो म्हणजे इंजिनियर, शास्त्रज्ञ, गायक, चित्रकार, गृहिणी तरीही जर आपण निसर्ग समजून घेतला तर पुन्हा एकमेकांशी समाज म्हणून जोडले जाऊ शकतो.’’

निसर्गाचा अभ्यास करताना, त्याबद्दल लिहिताना स्त्रिया किती अतीव संवेदनशील असतात हेच ‘बिट्वीन अर्थ अ‍ॅण्ड स्काय’च्या पानापानातून जाणवत राहतं.

godboleaj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:16 am

Web Title: article on environmental issues 2
Next Stories
1 मी, माझे आणि इतरांचे..!
2 पर्यावरण रक्षणाचा वसा
3 प्रदूषणमुक्ती
Just Now!
X