‘त्यांनीही.. किती वेडेपणा केलाय हा!.. तुमच्यासारखं त्याच्या वडिलांनीही त्या वेळी फॉर्मवर अगदी हेच लिहिलं होतं. हेच शब्द.. की अतुलने त्यांना चौकशीचा निदान आठवडय़ाला एक तरी फोन करावा, चौकशी करावी.. आपले कष्ट स्मरावे.. शुद्ध खुळचटपणा आहे हा! नाही का?’’

अतुल नेहमीप्रमाणे लवकर ऑफिसमध्ये गेला. त्याला जेवण ऑफिसच्या कँटीनमध्येच मिळायचं. साहिलला स्कूल बसमध्ये चढवून आल्यावर शीखाला मोकळा वेळ मिळायचा. अगदी बारा वाजता स्वयंपाक करायला सुरुवात केली तरी चालायचं, कारण दुपारी जेवायला फक्त ती आणि साहिलच असायचे.
पेपर चाळून झाल्यावर तिने आपल्या आईला फोन लावला. आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याबद्दल फार जागरूक असायची शीखा. दर सहा महिन्यांनी ती दोघांच्या रक्ताच्या चाचण्या करायला लावी, रक्तदाब तपासून घ्यायला लावी. काल सकाळीच रिपोर्ट हाती पडले होते, नॉर्मल होतं सगळं तरी बाबांचा रक्तदाब जरा उच्च दिसत होता. मग आईला फोन करून, बाबांचं लोणचं, पापड बिलकुल बंद करायला सांगून तिनं रोज नेमाने फिरायला जायची गळ घातली व फोन ठेवला. इतक्यात बेल वाजली. कामवाली अकराशिवाय येत नसे त्यामुळे या वेळी कोण आलं असेल बरं? असं प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर ठेवून तिनं दार उघडलं. एक मध्यमवयीन माणूस दारात उभा होता.
‘‘आपण शीखा सबनीस का?.. साहिलच्या आई?’’ त्याने आत डोकावत विचारलं.
‘‘हो.. तुम्ही कोण?’’
‘‘मी साहिलच्या शाळेतून आलोय. आम्ही नवीन मोहीम हाती घेतली आहे.. थोडी माहिती हवी होती.’’
शीखानं त्याला आत घेतलं. ‘‘साहिल अभ्यासात चांगलाच आहे, शिवाय दरवर्षांप्रमाणे याही वर्षी त्यानं बुद्धिबळात ‘इंटरस्कूलची चॅम्पियनशिप’ मिळवली, त्यासाठी त्याचं कौतुक होतंय.. पण मैदानी खेळात तो फारसा चमकत नाही.. म्हणजे भाग घेतो, पण अव्वल येत नाही.. ते असू द्या. पण या वर्षी आम्ही मुलांच्या पालकांचेच इंटरव्हू घ्यायचे ठरविले आहेत.’’ तो माणूस म्हणाला. ‘‘हं बोला, काय विचारायचं आहे तुम्हाला?’’

‘‘आपल्या मुलाबद्दल.. साहिलबद्दल, काय अपेक्षा आहेत तुमच्या?’’
‘‘अपेक्षा?.. काही नाही, त्यानं चांगलं शिकावं.. चांगले मार्कस् मिळवावेत.. खेळातही चमकावं.. एक चांगला विद्यार्थी म्हणून शिक्षकांचा लाडका असावं.’’
‘‘नाही, नाही. अभ्यासाबद्दल, शिक्षणाबद्दल म्हणत नाहीए मी.. एकूण अपेक्षा म्हणजे मोठा झाल्यावर काय अपेक्षा ठेवता तुम्ही त्याच्याकडून?’’
‘‘हं. असं होय!.. सर्वाशी तो चांगला वागावा, त्याच्या वागण्या-बोलण्याचं इतरांनी कौतुक करावं.. मुख्य म्हणजे त्याला आमच्या कष्टांची जाण असावी. त्यानं आमचा आदर करावा, आमच्याबद्दल त्याच्या मनात प्रेम असावं, आम्हाला त्यानं मानानं वागवावं.. आणखी काय?’’ शीखा म्हणाली.
‘‘हं.. हे तर तुम्ही शाळेच्या दाखल्याच्या वेळी दिलेल्या फॉर्मवर भरलंय.. मला वाटतं.. प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते.’’
‘‘होऽ.. आता पाहा ना, मी बी.एस्सी. पदवीधर आहे, पण नोकरी नाही करीत! म्हणजे साहिलचे बाबाच माझ्या नोकरीच्या विरोधात आहेत.. साहिलला आम्ही कसलीच टय़ूशन नाही लावलेली.. मी घरीच त्याचा अभ्यास घेते.. त्याचं खाणं-पिणं बघते. साहिलचे बाबा त्याला सराव असावा म्हणून रोज एक तास त्याच्यांशी बुद्धिबळ खेळतात. शिवाय शनिवार-रविवार आम्ही त्याला घेऊन बाहेर जातो. त्याला पुरेसा वेळ देतो. त्याचे बाबा पुढल्या शिक्षणाची तजवीज म्हणून आतापासूनच ओव्हर टाइम करतात.. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं, याची जाण त्याला मोठेपणी असावी.. आम्हाला दुखलं-खुपलं तर त्यानं पाहावं, एकच मुलगा असल्यामुळे हे सारं वैभव त्याचंच तर आहे, तेव्हा त्याने शक्यतो आमच्यासोबतच राहावं.. आमच्या आज्ञेबाहेर जाऊ नये एवढीच आमची इच्छा! बाकी काही नाही.’’ शीखा म्हणाली.
‘‘आपले मिस्टर.. अतुल सबनीस.. याच हायस्कूलमध्ये शिकलेत, हो ना?’’
‘‘बरोबर!’’
‘‘काय गंमत आहे पाहा! आमच्या ऑफिसमधले जुने रेकॉर्डस् चळताना.. जुने म्हणजे तब्बल बावीस र्वष अगोदरचे!.. तर ते चाळताना मला अतुलच्या आई-वडिलांनी त्यांच्या दाखल्याच्या वेळी भरलेला फॉर्म सापडला.. मला वाटतं अतुलही त्यांचा एकुलता एक मुलगा आहे?’’
‘‘हं..’
‘‘तर त्यांनी.. किती वेडेपणा हा!.. त्यांनी त्या वेळी फॉर्मवर अगदी हेच लिहिलं होतं.. हेच शब्द.. की अतुलने त्यांना चौकशीचा निदान आठवडय़ाला एक तरी फोन करावा, जर तो त्यांच्यासोबत राहत नसेल तर आपण आजारी पडल्यावर चौकशी करावी- सणावाराला घरी यावं.. आपले कष्ट स्मरावे.. अगदी हेच लिहिलं होतं पाहा!. शुद्ध खुळचटपणा आहे हा! नाही का?’’
शीखाला क्षणभर काय चाललंय ते कळेच ना. पण जसं जसं तो माणूस बोलू लागला तसं तिला वास्तवाचं भान येत गेलं. ती शरमेनं काळी ठिक्कर पडली. तिच्या तोंडातून शब्द फुटेना.
‘‘त्यांनाच का.. अहो, सर्वच आई-वडिलांना हे वाटतं.. तुम्हाला आठवतं का? तुमच्या लहानपणी देखील तुम्हाला मांडीवर बसवून तुमचे आईवडील हेच म्हणाले असतील.’’ शीखाला गदगदून येऊ लागलं. तो माणूस म्हणाला, ‘‘सॉरी शीखा मॅडम!.. मी एकदम तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसलो.. तुम्ही विश्वास ठेवा, पण या गोष्टी मला अतुलने नाही सांगितल्या, पण तुम्ही अतुलला आपल्या आई-वडिलांना फोन करण्यापासूनही वंचित ठेवता? त्यांची आई आजारी होती हे कळूनही तुम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही? आणि ते जेव्हा कळलं तेव्हा त्यांना आपल्या आईला भेटायला जाण्यापासून रोखलंत? त्यांच्याशी भांडण काढलंत?.. सॉरी मॅडम, पण तुमचं त्याच्या आई-वडिलांशी नाही पटत! हे माहीत आहे मला.. तुम्हालाही स्वत:चं आयुष्य आहे, ते तुम्हाला हवं तसं जगायचा अधिकारही आहे.. त्याबद्दल तक्रार नाहीच आहे माझी! तुम्ही नमतं घ्या, असंही म्हणायचं नाहीए मला.. पण आपल्या आई-वडिलांवरही जीव असेलच की अतुलचा? त्यांना पाहावं, त्यांच्याशी बोलावं असं वाटत नसेल त्याला? तोही त्यांचा एकुलता एकच मुलगा ना? इथं अतुलची व तिथं त्यांची तडफड होताना तुम्हाला दु:ख नाही होत?.. त्यांनीही आपल्या मुलाबद्दल हज्जार स्वप्नं पाहिली असतीलच ना मॅडम? आता तुम्ही पाहता तशी?.. मी असं नाही म्हणत, की तुम्ही सगळे एकत्र राहा, पण अधून-मधून एखादा चौकशीचा फोन, एखाद्या सणावारी त्यांना भेट.. काय हरकत आहे?.. हे सर्व पाहात साहिलही मोठा होईल.. हे संस्कार त्याच्यावरही होतील.. हो की नाही मॅडम?.. तुमचा वेळ घेतल्याबद्दल क्षमस्व!!..
आणखी एक, मी स्कूलतर्फे वगैरे नाही आलेलो.. मी अतुलचा मित्र, दुबईला असतो. पाच वर्षांनी परततोय.. अतुलच्या आई-वडिलांनी मला खूप प्रेम दिलं.. आई-वडिलांविना पोर, असाच वाढलो, मामांकडे राहायचो!.. अतुलच्या बरोबरीनं लाड केलेत त्यांनी माझे! तुम्ही ऐकून असाल! काल सहज गेलो होतो त्यांच्याकडे. तेव्हा न बोलताही अनेक गोष्टी कळल्या. कसं आहे नं? जाणत्या लोकांना आपल्या सवयी नाही बदलता येत, आम्ही तरुण असून सोपेपणानं आपली मतं, आपल्या सवयी बदलतो का? त्यांना मुरड घालतो का.. बघा! विचार करा. येतो मी!..’’ डोळय़ातल्या अखंड अश्रुपातामुळे तो कधी गेला ते कळलंच नाही शीखाला.
त्या संध्याकाळी श्री आणि सौ. सबनीसांना उगाचच हुरहुर लागून राहिली होती. दोघे सारखे आत बाहेर फेऱ्या घालत होते. दुपारी लॅण्डलाइनवर रिंग वाजली, पण पलीकडून कोणी नाही बोललं.. तो अतुलच होता का? दोघंही आज घरातच बसून होते. आज टी.व्ही. सीरियलही बंद होती नि संध्याकाळचा फेरफटकाही! तशी श्री. आणि सौ. सबनीसांना पैशांची काहीच कमतरता नव्हती.. बक्कळ पेंशन मिळायची. ते निवृत्त बँक अधिकारी होते नि त्या शिक्षिका! पण.. एकटेपण.
अचानक गेटचं दार वाजलं. सवयीप्रमाणे त्या उठू लागल्या. ‘‘तू नको उठूस, गुडघे दुखतात ना? म्हणत सबनीस बाहेर आले नि जागच्या जागी खिळल्यासारखे उभेच राहिले! गाडीतून उतरून नातू धावत आत येत होता.. मागे अतुल!
ते काहीच बोलत नाहीत हे पाहून सबनीसबाई गुडघ्यांना हात धरून हळूहळू उठल्या, बाहेर आल्या नि त्यांनाही कुशीत शिरणारा नातू डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यानं दिसेनासा झाला..