त्याच्या डोळय़ातले पाणी पाहून वाटले की, आपल्या घरी कामाला येणारी हे कष्टकरी माणसं चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करून, काबाडकष्ट करून ‘जगणे’ स्वीकारतात. इतके कष्ट करून यांची दमछाक होत नसेल का? या कष्टातच घरातले प्रश्न, अडचणी सोडवत राहतात. उपास-तापास करत देवाला साकडं घालत स्वत:च आलेला दिवस निभावतात.. कसे करू शकतात सगळं हे? कोठून मिळते त्यांना ही ‘ऊर्जा’?
आपल्याकडे काम करणारा कामगारवर्ग असतो ना, मग तो स्त्री असो वा पुरुष त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. प्रत्येकाला तसा अनुभव येत असेलच. मीही त्यातलीच एक. माझ्या घरी काम करणाऱ्या, छोटय़ा छोटय़ा कामासाठी येणाऱ्यांनी मला दाखवून दिली ती स्वकष्टाच्या कमाईतून त्यांना मिळालेली ऊर्जा!
 त्याचे असे झाले, पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करायला संस्थेतील काही लोक आले होते. संस्था माहितीची असल्याने आम्ही मदतही केली. त्या वेळी माझ्याकडे काम करणाऱ्या मावशी तिथेच होत्या. ती माणसे गेल्यावर मला मावशी म्हणाल्या, ‘‘वैनी त्यांना तुम्ही मदत केली हे चांगलेच केले, आम्ही पूर-भूकंप-दुष्काळग्रस्त नाय, पण कष्टग्रस्त नक्कीच हाओत. आमास्नी पैका लागला तर तुम्ही मालक परतफेडीच्या बोलीने देता. खरं हाय की नाय? लोकांना देता हे चांगलं करता, पण या लोकांची तुमास्नी माहितीबी नाई, त्यांना सढळ हातांनी मदत करता. आनं आमी तुमी घरात नसलात तरी इश्वासाने काम करून जातो तरी बी.. ही माणसं देशवासीय अन् आमी कोन? तुम्हास्नी खोटं वाटेल, पहिल्या दोन पोरींची लग्नं करून दिली, पण कोनाकडून बी उसने घेतले नाय! त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या नावानं पैका बँकेत साठवीत होते, पोरींचा बाप कसला हो, निसता नाव लावण्यापुरता. स्वत:चे पैसे दारूत घालवितो. आमची जिंदगीच अशी! कपाळाला कुंकू हाय, म्हणून आमाला बाकीच्यांची भीती नाय! तेवढाच त्या पेताडाचा उपयोग! नाही तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांची वाईट नजर बघतीच रोखून. त्यासाठीच तर दिवसभर कष्ट करायचे, असं रातीला मेल्यागत पडायचं, मी परिस्थितीशी ‘हार’ माननारी नाय! आता तिसऱ्या पोरीचं लगीन काढलंय, हे बघा, सोन्याचं अन् काळे मनी अन् वाटय़ा घरीच ओवल्या.. ती बी काम करते.. थोडे खर्चाला तिला देते, अन बाकीचे पोष्टाचं बचत खातं उघडलं हाय! तिच्या लहानपणापासून. ते आता हिच्या लग्नाला उपयोगी येतील. तिला म्हटलं, ‘आणि मग त्या छोटय़ा टीनाचं काय? ती तर आठ वर्षांची असेल ना!’  त्यावर ती म्हणाली, वैनी, ती जन्माला आली तेव्हापासून एल.आय.सी.मध्ये पैसे भरते, तिच्यासाठी बँकेत खाऊसाठी अन् तिच्या शिक्षणासाठी खातं उघडलं आहे. आमचा घरखर्च जास्ती नसतो. डायनिंगला काम करते, त्यामुळे खायाचा खर्च वाचतो. सणावाराला घरात धान्य भरते. त्या वेळीच नवीन कपडे घेते. बाकी वर्षभर तुमच्यासारख्यांकडून कपडे मिळतात. वैनी, धाकटी पोरगी मोठी झाल्यावर मी जिवंत नसेन, तरी तिच्या लग्नाची तयारी आत्तापासून करून ठेवली आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी मला कोणी तरी म्हणालं, अगं आत्ताच लग्न करून टाक की? मी म्हणाले, नाय, दोन-चार महिन्यांनी पोस्टाचे पैसे मिळतील. मग पोरीचं लग्न करीन? कोणाकडेही उसने मागणार नाय. वैनी, मला असे मागायला नकोच वाटते! आत्तापावेतो निभावलंय कष्ट करून पुढंही असंच चालणार,’’ असं म्हणून ती कामाला लागली.
माझ्याकडे कामाला असणारी दुसरी बाई निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी चार-पाच दिवस आली नव्हती. तिला म्हणाले, ‘काय हो मावशी असे न सांगता ‘खाडे’ का करता?’ त्या म्हणाल्या, ‘खरं सांगू का. रागावू नका, अहो, मी अन् माझी पोरगी निवडणुकीच्या प्रचाराला जात होतो. सकाळी वेगळ्या पक्षाच्या अन् संध्याकाळी वेगळ्या पक्षाच्या. दोन्ही वेळचं जेवण सुटायचं, अन् वरती पैसे मिळायचे. त्यातून कधी-कधी उशीर झाला तर कामाला खाडा टाकायचा. तुम्ही थोडंच कामावरून काढून टाकणार?’ मी म्हणाले, ‘असा खोटेणाचा प्रचार कशाला करता?’ त्यावर ती म्हणाली, ‘निवडून येणारे तरी काय खरेपणाने वागतात का? निवडणुका जवळ आल्या की, नुसती आश्वासनं देतात नंतर आम्हा गरिबांकडे कोण बघतंय! चार पैसे जास्तीचे मिळतात, दोन वेळचं जेवण सुटतं, नवरा मेला. आम्हाला कोण आहे? अहो, इतर काही करण्यापेक्षा असा पैसा बरा नव्हं का? वैनी, रागावू नका, सणासुदीला असा पैसा उपयोगाला येतो, पोटापाण्याचा प्रश्न थोडे दिवस का होईना सुटतो. रोजचं जगायलापण पैसे लागतातच ना.’’
आमच्या बिल्िंडगमध्ये झाडलोट करणारा तुका. त्या आधी पहाटे म्हणजे चार वाजता घर सोडून चार चाकी पुसायचं काम करतो, मग आमच्या बिल्डिंगची झाडलोट करतो. मग दिवसभर एका हॉटेलमध्ये काम करतो. कोकणातून ‘भागत’ नाही म्हणून बायकोला घेऊन आला. पदरात दोन मुली, त्यांना चांगलं शिकायला मिळावं म्हणून चांगल्या नावाजलेल्या शाळेत घातले. पहाटेपासून रात्रीपर्यंत कामाला वाहून घेतलेले, कशासाठी तर बायकोला घरकामाची कामे करायला लागू नयेत आणि मुली शिकल्या पाहिजेत, फक्त गणपतीला दहा दिवस कोकणात जाऊन येतो. बाकी वर्षभर स्वकष्टाची कमाईतून ‘समाधान’ शोधतो.
 सकाळी पेपर टाकून, अन् संध्याकाळी एका कापडाच्या दुकानात काम करून दुपारच्या वेळात कॉलेज अन् क्लास करून आता एमसीएमच्या शेवटच्या वर्षांला असणारा, आमच्याकडे पेपर टाकणारा मुलगा. मी त्याला विद्यार्थी म्हणते. वडील नाहीत. मोठा भाऊ काम करतो. आई आजारी असते, पण याला शिक्षणाची आवड आहे. मला म्हणाला, ‘ताई मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. तुम्ही थोडी मदत कराल का?’ हे मी माझ्या पतीला व मुलाला सांगितल्याबरोबर त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. माझ्या मैत्रिणीला सांगितल्यावर तिने पण लगेच मदत केली. त्याला आमचे ‘आभार’ कसे मानावे हेच कळत नव्हते. आम्ही त्याला म्हटले, ‘अरे तू तुझं शिक्षण पूर्ण कर, असाच शेवटच्या वर्षीपण फर्स्ट क्लास मिळव यातच सर्व आलं.’  त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून वाटलं की, हे सर्व जण चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस करून, काबाडकष्ट करून ‘जगणं’ स्वीकारतात. आपल्या अडीअडचणीला, यातूनही पैसा मिळवता येईल हा विचार न करता, आपल्यासाठी धावून येतात ते फक्त आपल्या प्रेमापोटी. मग हेही आपले देशबांधवच की! मग कधी तरी त्यांचीही अडचण आपण पैशांची परतफेड न स्वीकारता केली तर काय हरकत आहे?
इतके कष्ट करून यांची दमछाक होत नसेल का? या कष्टातच घरातले प्रश्न, अडचणी सोडवत राहतात. उपास-तापास करत देवाला साकडं घालत स्वत:च आलेला दिवस निभावतात.. कसे करू शकतात सगळं हे? कोठून मिळते त्यांना ही ‘ऊर्जा’? बहुतेक ही ऊर्जा त्यांना त्यांच्या स्वकष्टातूनच मिळते. त्या ऊर्जेतूनच ते ‘जगत’ असतात आणि त्या जगण्याच्या समाधानातूनच ते ‘आनंद’ शोधत असतात.