मयूरी देशमुख

माझ्या आयुष्यात पुढे किती यश-अपयश लिहिलंय हे मला नाही ठाऊक; पण मला अभिनेत्री आणि नाटय़लेखक होण्याचं स्वप्न जोपासावंसं वाटलं आणि मी त्याचा पाठलाग केला. यासाठी मी स्वत:चीच ऋणी आहे. कारण या प्रवासाने मला जीवनावश्यक मूल्यं दिली आहेत जी त्या साधं-सोपं आयुष्य जगणाऱ्या मुलीला कदाचित नसती हाती लागली..

‘मीची गोष्ट’ सांगणारा असा कुठलाही लेख लिहायचा म्हटल्यावर आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे आपोआप अवकाशानं बघितलं जातं. जितकं शांतपणे आपण मागे वळून बघू, तितक्या अधिकाधिक स्मृतीआड गेलेल्या आठवणी आपल्यासमोर तरंगतात. आता माझंही तसंच काहीसं होतंय. मी तशी सर्वसामान्य मुलगी आणि आत्तापर्यंतचं आयुष्य सरळ साधंच जगत होते. शिवाय मी सुखीही होते..

चांगली विद्यार्थिनी, आईबाबांची तशी जबाबदार मुलगी, घरची परिस्थितीही चांगली. फालतू लाड वगळल्यास माझे हट्ट बऱ्यापैकी पुरवले जात असत. असं साधं, सरळ, सोपं, आनंदी आयुष्य जगत असताना माझ्या एका स्वप्नानं माझं अवघं आयुष्य, माझी विचारसरणी, माझा आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोण पार बदलून टाकला. माझ्या सरळ-सोप्या-आनंदी आयुष्यात यातायात, शिस्त, अस्थिरता यांचं आगमन झालं. सुरुवातीला मला ही मंडळी माझ्या आयुष्यात अजिबात आवडली नाहीत. नकोशी झाली होती ती मला; पण लवकरच माझ्या लक्षात आलं, की हे न आवडणारे पाहुणे खरं तर आपले हितचिंतक आहेत. यांना आपलंसं केलं, तर हे आपल्याला तावून सुलाखून काढतात आणि असं विश्व दाखवतात, जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. मग माणूस म्हणून समृद्ध होण्यावाचून पर्याय नसतो तुम्हाला! तुमच्या लक्षातच आलं असेल, मी कुठल्या स्वप्नाबद्दल बोलतीये, माझं अभिनेत्री होण्याचं स्वप्न!

माझ्या आयुष्यात पुढे किती यश-अपयश लिहिलंय हे मला नाही ठाऊक, पण हे स्वप्न मला जोपासावंसं वाटलं आणि मी त्याचा पाठलाग केला. यासाठी मी स्वत:चीच ऋणी आहे. कारण या प्रवासाने मला जीवनावश्यक मूल्यं दिली आहेत जी त्या साधं-सोपं आयुष्य जगणाऱ्या मुलीच्या कदाचित नसती हाती लागली..

माझं शिक्षण ‘बॅचलर ऑफ डेंटल सायन्सेस’मध्ये झालं होतं. जगातलं कुठलंही शिक्षण तुम्हाला आयुष्याच्या सगळ्याच परीक्षांना तोंड द्यायला शिकवत नाही; पण मी म्हणेन, अभिनय क्षेत्र तुम्हाला जगण्याच्या अनेक तऱ्हांशी ओळख करून देतो. मुळात लहानपणापासूनच ‘क्रिएटिव्ह’ गोष्टींकडे माझा कल जास्त झुकायचा. मला आठवतंय, माझी पहिली कविता मी ६ वर्षांची असताना लिहिली. तिसरीत मी वादविवाद स्पर्धा जिंकली होती. शाळेतसुद्धा मी आठवीत असताना पहिलं नाटक लिहिलं आणि बसवलं. टीव्हीवरच्या जाहिराती बघून मी त्यांचं अनुकरण करायचे. मित्र-मत्रिणींसाठी ग्रीटिंग कार्ड्स बनवणं, हॅन्डमेड गिफ्ट्स तयार करणं, हे सगळं मनापासून आवडायचं. याशिवाय ड्रॉइंग-पेंटिंगमध्येही मला खूप रस. वयाच्या एका टप्प्यांवर मी खूप ऑइल पेंटिंग्ज केली आहेत; पण याशिवाय मी अभ्यासातही बरी होते. म्हणूनच जेव्हा करिअर निवडायची वेळ आली, तेव्हा मला विज्ञान शाखा निवडण्याचा सल्ला थोरल्यांनी दिला. कारण एके काळी चांगल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखा निवडणं, ही जणू प्रथाच झाली होती. कला आणि वाणिज्य शाखेला तसं दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणूनच, हे सर्जनशील व्यक्तिमत्त्व कला शाखेत प्रवेश न घेता ‘बीडीएस’ (बॅचलर ऑफ डेंटल सायन्सेस) मध्ये स्थानापन्न झालं. माझं कॉलेज छान होतं, अभ्यासही पेलवत होता, चांगले मित्र-मत्रिणी मिळाले म्हटल्यावर, खरं तर मला कसलीच तक्रार नव्हती; पण तरीही दुसऱ्या वर्षांत असताना मला जाणवू लागलं, की आपलं अंतरंग काही वेगळंच सांगतंय.

मग त्या अंतरंगाचा कल नेमका कुठे आहे, हा शोध सुरू झाला. काही दिवस आत्मपरीक्षण केल्यावर मला लक्षात आलं की, मला ‘परफॉìमग आर्ट्स’चं खूप अप्रूप आहे. मी आपोआप त्याच्याकडे खेचली जाते आणि त्यात रमतेसुद्धा. थोडक्यात, मला लक्षात आला की मला ‘अ‍ॅक्टर’ बनायचंय. हे उमगल्यावर माझी झोपच उडाली. मला पदवी मिळवायची होती, त्यामुळे ते शिक्षण पूर्ण केल्यावरच मी माझं हे स्वप्नं जोपासायचं ठरवलं. तर या ‘डेंटिस्ट प्लॅनिंग टु बी अ‍ॅक्टर’च्या उच्चशिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या मध्यमवर्गीय आई-वडिलांना या स्वप्नाबाबतीत बऱ्याच शंका-कुशंका होत्या. मग माझ्यासोबत त्यांचाही प्रवास सुरू झाला या विलक्षण दुनियेकडे. या क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हणजे नेमकी सुरुवात कशी आणि कुठून करायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी छोटे-मोठे वर्कशॉप्स करत होते; पण माझ्या आई-वडिलांच्या मते या क्षेत्रामध्ये ‘लंबी रेस का घोडा होने के लिए’ मला आधी माझा पाया पक्कं करणं आणि त्यासाठीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं महत्त्वाचं होतं.

या माझ्या प्रवासात काही क्षण अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे ठरले. त्यातला एक म्हणजे, जेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला नाटय़-प्रशिक्षण घ्यायला लावलं. मी दोन वर्ष ‘थिएटर आर्ट्स’च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठामध्ये नाटय़शास्त्राचं प्रशिक्षण घेतलं. ‘मास्टर्स इन थिएटर आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला आणि त्या दिवसापासून मी नेमकं काय स्वप्न बघितलंय, याचा मला खराखुरा अंदाज आला. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार याचा शोध सुरू झाला. हळूहळू या शोधाचं पर्यवसान ध्यासामध्ये झालं. असा ध्यास, जो प्रत्येक नटाला मरेपर्यंत पछाडतो. या काळात माझी ‘रिकन्स्ट्रक्शन सर्जरी’ सुरू झाली. बघण्याची नजर बदलली. अधिकच सूक्ष्म झाली. ज्या गोष्टी आधी सहज नजरेस पडायच्या त्यांचं आता बारकाईनं निरीक्षण करायला लागले. कान आधी फक्त बाहेरचा आवाज ऐकायचे; पण आता स्वत:चा आवाज ऐकायला शिकले ते. स्वत:चा आवाज ऐकू यायला लागल्यामुळे आपोआप माझी वाचा बदलायला लागली. इतरांचं बोलणं आणि त्यांच्या बोलण्यातल्या गमतीचा आस्वाद घ्यायला शिकले.

असं म्हणतात, कलाकाराला कुठल्याही व्यक्तीला सोशली, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली डिकोड करता आलं पाहिजे. मला आठवतंय, या काळात मी डायरी लिहायला लागले. कारण माझ्यात झपाटय़ाने बदल होत होते आणि मला ते टिपायचे होते. माझ्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे मी माझ्यात असलेले ‘सुपिरिऑरिटी’ आणि ‘इनफिरिऑरिटी कॉम्प्लेक्सेस’ (न्यूनगंड आणि अहंगंड) कुठले, हे ओळखायला शिकले. मी तेव्हा चर्चगेटला राहायचे. माझ्या लक्षात आले, की चर्चगेट परिसरात वावरताना मला माझा न्यूनगंड वाटायचा, कारण आजूबाजूला खूप उच्चभ्रू लोक राहायचे; पण मी ‘कलिना’ला विद्यापीठामध्ये यायचे, तेव्हा मला माझा ‘सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स’ प्रकर्षांने जाणवायचा. असे अनेक बारकावे गवसल्यावर मी ‘कॉम्प्लेक्सेस’चा समतोल साधायला शिकले. माझ्यात जर का या प्रशिक्षणाच्या काळात सर्वात मोठा बदल झाला असेल, तर तो हा, की मी कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही लोकसमूहात असो, मी माझं अस्तित्व डळमळू देत नाही. हा नटाला फार उपयोगी पडणारा गुण आहे.

प्रशिक्षणाने घडवलेला दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे टीका पचवणे. आम्ही दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक सादरीकरणं केली. प्रत्येक सादरीकरणानंतर चार-पाच दिग्गज त्यावर सगळ्या अंगांनी टीका करायचे, परखड मतं मांडायचे, आम्हाला अधिक चांगलं काय करता येईल, याविषयीच्या सूचना द्यायचे. त्यामुळे आजही माझ्या कामावर जर टीका झाली तर मी ती खूप सकारात्मक दृष्टीने घेते. अन्यथा माझ्या ‘इगो’ने टीकेला हाताळणे अवघड केले असते. या महत्त्वाच्या टप्प्यांवरचे माझे सारथी म्हणजे वामन केंद्रे, शफाअत खान, विजय केंकरे आणि इतर ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’चे माझे शिक्षक. ही नाटक जगतातली थोर मंडळी आम्हाला वेळोवेळी त्यांचे अनुभव, ज्ञान, कौशल्य, कधी शिकवून तर कधी सहज गप्पांमधून सांगत असत.

या माझ्या प्रवासात दुसरा ‘टर्निग पॉइंट’ ठरला जेव्हा मी लिहिलेलं नाटक ‘डिअर आजो’ प्रेक्षकांसमोर आलं. मुळात लिखाणाची मला आवड होतीच, पण ती अधिक जोपासावीशी वाटली, कारण आम्हाला नाटय़लेखन शिकवणारे शफाअत खान सर अत्यंत रंजक पद्धतीने शिकवायचे. त्यामुळे आपण कितपत लिहू शकतो, हे फक्त चाचपडायला म्हणून मी हे नाटक लिहायला घेतलं. हळूहळू रंगवलेल्या पात्रांमध्ये मी केव्हा रंगत गेले आणि हे नाटक पूर्ण केलं, मलाच कळलं नाही. कलाकार म्हणून तुम्ही काम करता तेव्हा लगेच तुम्हाला ‘फीडबॅक’ मिळतो; पण लेखकाचा प्रवास वेगळा असतो. त्याचं लिखाण त्याला आधी निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते अशा बऱ्याच लोकांना पटवून द्यावं लागतं आणि त्यानंतर प्रेक्षकांची अग्निपरीक्षा पार करावी लागते. या प्रवासात तुमचा संयम पणाला लागतो. तसाच माझाही लागला. नाटक लिहून झाल्यावर तब्बल ४ वर्षांनी त्याचं सादरीकरण झालं. या ४ वर्षांत अनेक बरे-वाईट अनुभव आले, ज्याने माझी जिद्द अधिकच वाढली. मुळात माझं वय पाहता, मी काही बरं लिहिलं असेल, याबाबत बऱ्याच जणांना शंका यायची; पण तरीही नाटकाबाबत मी माझ्या मतांवर खूप ठाम होते. काहींना तो वेडेपणा वाटायचा, तर काहींना कौतुक. त्यामुळे जेव्हा मी लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि जी काही दाद मला माय-बाप प्रेक्षकांनी दिली, त्यामुळे माझ्या मनाला एक वेगळाच आत्मविश्वास लाभला. हा आत्मविश्वास म्हणजे, मी जो विचार करते आणि तो ज्या रंजक पद्धतीने मांडते, ते सुजाण प्रेक्षकांना रुचतंय. ही एक प्रकारे खूप सुखावणारी भावना आहे.

मी एक विश्व माझ्या कल्पनेतून निर्माण करू शकते ज्याचा जिवंत अनुभव लोकांना घेता येईल, हा विचार या माझ्या अस्थिर क्षेत्रामध्ये दिलासा देणारा आहे. या नाटकात आजोबांचं पात्र उत्तमरीत्या वठवणारे सहकलाकार संजय मोने नाटकाच्या शेवटी आवर्जून प्रेक्षकांना सांगायचे, ‘‘हे नाटक नातीची भूमिका वठवणाऱ्या मयूरी देशमुखने लिहिलंय.’’ आणि हे ऐकताच टाळ्यांचा कडकडाट अधिकच जोरात व्हायचा. बऱ्याच वेळा नाटक पाहायला आलेला प्रेक्षक लेखकाचं नाव वाचतोच, असं नाही. म्हणूनच संजय मोने, जे स्वत: उत्तम लेखक आहेत, ते अत्यंत प्रेमाने या नाटकाची लेखिका म्हणून माझी ओळख करून देत असत. त्यांच्या या विचारशील कृतीसाठी मी त्यांची कायमस्वरूपी ऋणी असेन.

तर असा हा माझा प्रवास चालू आहे, जो मी मनापासून जगते आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून, निरनिराळ्या लोकांसोबत काम करत, स्वत:ची प्रतिमा अधिक खुलवायचा प्रयत्न करत असते. रोज काही तरी नवीन आपल्या हाती लागलं पाहिजे, हा प्रयत्न कायम असतो. मग ते आयुष्याबाबत असो वा कलेबाबत!

(सदर समाप्त)

mayuri3165@gmail.com

chaturang@expressindia.com