26 September 2020

News Flash

कालमर्यादा हवीच

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

कालमर्यादा हवीच

‘स्पर्धा परीक्षेची लष्करअळी’ हा राजन गवस यांचा लेख (२३ नोव्हेंबर) अतिशय प्रभावी वाटला. काही महिन्यांपूर्वी मराठवाडय़ातील तिघे तरुण भेटायला आले होते. बोलता बोलता भविष्याचे नियोजन, घरची स्थिती अशा विषयांवर गप्पा रंगल्या. लक्षात आले की, यांचे आई-वडील गावी शेतात कष्ट करून यांना खर्चासाठी पैसे पाठवतात. ते दोघे केवळ एका आशेवर होते, की आपला मुलगा एकदा शासकीय नोकरीत लागला, की आपलं जीवन सुखी होईल. हे तरुण २ ते ५ वर्षांपासून या परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रयत्न करत होते. पुण्यात त्यांना येणारा मासिक खर्च सरासरी ५ ते १० हजार. वार्षिक खर्चाचा हिशोब केला तर ही रक्कम खूप मोठी होते. मराठवाडय़ातील गावांतून सुमारे

७० हजारपेक्षा जास्त मुले-मुली पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येतात. याचाच अर्थ, जो मराठवाडा आर्थिकदृष्टय़ा मागास आहे, तिथून दरवर्षी सुमारे पाऊण ते एक कोटी रुपये पुण्यात येतात. त्या तुलनेत किती जागांसाठी ही स्पर्धा असते? हा गांभीर्याने विचार करण्याचा मुद्दा आहे. ही सर्व तरुण मुलं हुशार आहेत. त्यांनी स्वत:साठी दोन ते तीन वर्षांची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. पुण्यात काम करून स्वत:च्या गरजा भागवायला हव्या. स्पर्धा परीक्षा देता देता अन्य काही व्यावसायिक अनुभव, कौशल्य मिळवत कमाई व अभ्यास करावा म्हणजे यश प्राप्त झाले नाही तरी वेळ वाया गेला असे होणार नाही.

– चंदन पाटील, पुणे

वास्तवाची जाणीव नको?

राजन गवस यांचा ‘स्पर्धा परीक्षेची लष्करअळी’ हा लेख वाचला. कटू वास्तवाची नव्याने जाणीव झाली. अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजरोसपणे कितीतरी मुलं-मुली पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या ठिकाणी येऊन दाखल होत आहेत. यशस्वी अधिकाऱ्यांच्या भाषणांच्या भूलभुलयाला बळी पडत आहेत. ‘अमुक ठिकाणी क्लासेस लावले, की लवकर अधिकारी होऊ शकतो,’ असा प्रचारच काही अधिकारी झालेल्यांनी सुरू केला आहे. पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी ‘लोकसत्ता’ वाचत होता, तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘‘मित्रा, राजन गवस यांचा स्पर्धा परीक्षेसंबंधीचा लेखही अवश्य वाच. तर तो म्हणाला, ‘‘नको रे बाबा, वास्तव कशाला वाचायचं, विनाकारण नकारात्मक विचार तयार होतात, मग अभ्यासदेखील होत नाही.’ तो म्हणाला आणि निघून गेला, मी स्तब्ध उभा राहून त्याच्याकडे फक्त बघत राहिलो..

– विष्णू नाझरकर, पुणे

उमेदीची राख

मी ‘चतुरंग’ची नियमित वाचक आहे. माझ्या आयुष्यातले खूप धडे मी या पुरवणीतून घेतलेले आहेत. राजन गवस यांचा भेदक लेख वाचला. मी त्यात सांगितलेली परिस्थिती जवळून पाहते आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे एक ‘व्यसन’ बनत चालले आहे. हा अभ्यास करताना इतर पर्यायांचा विचारच केला जात नाही, परिणामी पदवीनंतरचे शिक्षण घेण्याचे, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील तरुणांना आधी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाची संधी मिळत नसे अन् आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मात्र भरपूर खर्च करूनही त्यांच्या हाती काही लागत नाही. तरुणांची ऐन उमेदीची वय वर्षे २१ ते ३० हा काळ अभ्यासात जातो. या चक्रात अडकून शिकायच्या वयात अभ्यास, कमवायच्या वयात, लग्न करण्याअगोदर अभ्यास, लग्नानंतर, अगदी मुलं झाल्यानंतरही अभ्यास, अशी अवस्था झालेल्या बऱ्याच व्यक्ती मी पाहते आहे. हा प्रवास वयाची अट संपल्यानंतरच थांबतो. वयोमर्यादेपेक्षा तरुण-तरुणींनी स्वत:वर वेळमर्यादा घालून घ्यावी अन् इतर पर्यायांचा विचार करावा.

– रेणुका तपसाळे, लातूर

हे माझेच मनोगत

राजन गवस यांचा लेख वाचला आणि असं वाटलं, की आपल्याच मनातलं कोणीतरी बोलत आहे. मी स्वत: गेली तीन वषेर्ं स्पर्धा परीक्षा देतेय. कधी पूर्वपरीक्षा निघते तर कधी मुख्य परीक्षेत अडकून बसते. मनात खूपदा विचार येतो, की सोडून द्यावं हे.. पण आणि आई-वडिलांचा आशेने भरलेला चेहरा आठवतो. आयुष्यात याशिवायही करण्यासारखे बरेच काही आहे हे समजून घेण्यास लेखाचा आम्हा तरुणांना उपयोग होईल.

– सुजाता पाटील

डोळे उघडणारे वास्तव

राजन गवस यांचा लेख म्हणजे डोळे उघडणारे जळजळीत वास्तव आहे. उमेदीची वर्षे अशा परीक्षा देण्यात जातात, नोकरी मिळत नाही आणि ‘पुढे काय?’ असा भयानक प्रश्न निर्माण होतो. क्लासचालक श्रीमंत होत जातात आणि विद्यार्थी निराश होतात. यावर उपाय काय? युवापिढीला हताश करणारा हा प्रकार असून पालकांनी यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. योग्य प्रबोधन केल्याबद्दल गवस सर आणि ‘लोकसत्ता’ला धन्यवाद.

– प्र. मु. काळे, नाशिक

भुलवणारं जग

‘स्पर्धा परीक्षेची लष्करअळी’ हा लेख वाचला. मीसुद्धा त्याच परिस्थितीतून जात आहे. ग्रामीण भागातील मुलांचे खूप शोषण होत आहे. तरुणांचीही यात चूक नाही, कारण स्पर्धा परीक्षेविषयी वातावरणच असं तयार केलं जातं की ते भुलतात. निराशा येते. वाटतं, आम्ही अभ्यास करणं हा गुन्हा आहे का?

– किशन टोनगे, नांदेड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:27 am

Web Title: chaturang reader response abn 97 6
Next Stories
1 विचित्र निर्मिती : अभिनेते अन् दिग्दर्शक
2  ‘मी’ची गोष्ट : माझ्या कवितेची वेदना ..
3 सृजनाच्या नव्या वाटा : शैक्षणिक प्रयोगशाळा
Just Now!
X