07 July 2020

News Flash

‘रानभूल..  चकवा.. झोटिंग..’मधील विधानांना वैज्ञानिक पुरावे नाहीत

पडसाद

संग्रहित छायाचित्र

 

‘रानभूल..  चकवा.. झोटिंग..’मधील विधानांना वैज्ञानिक पुरावे नाहीत

‘मनातलं कागदावर’ या सदरातील जयमती दळवी लिखित ‘रानभूल.. चकवा.. झोटिंग..’(६ जून) या लेखात लेखिकेनं म्हटलं आहे की, ‘रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव’.  याविषयी कोणताही वैज्ञानिक पुरावा लेखिकेनं सादर केलेला नसून हे विधान अवैज्ञानिक आहे, असं आमचे मत आहे.  लेखिका लिहिते, ‘काही झाडांच्या संपर्कात आल्यास काही वेगळंच चैतन्य जाणवू शकतं. मनाची बेचैनी थांबते. उदा. उंबर आणि कोजाब.’  जाणीव ही व्यक्तीसापेक्ष आहे. कोणत्या व्यक्तीला कोणत्या झाडाच्या सान्निध्यात, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी वेगळं चैतन्य जाणवेल किंवा बेचैन वाटेल, हे त्या-त्या व्यक्ती व वेळेप्रमाणे बदलू शकतं. याचं सार्वत्रिकीकरण करता येणार नाही.

त्यांनी असंही लिहिलं आहे, की ‘जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते. ठरावीक परिसरात ती आढळते.’ या वाक्यास कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘समोरच्या व्यक्तीच्या मनातील दुष्ट भावना उमजून झाडं भीतीनं आकसतात,’ असं लेखिका लिहिते. याकरिताही कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. काही झाडांची पानं सूर्यास्तानंतर मिटतात किंवा फुलं कोमेजतात. याचं कारण माणसाच्या त्या झाडांप्रति वाईट भावना नसून त्या झाडांच्या दैनंदिन चलनवलनाशी हे निगडित आहे. ‘वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे’ असा उल्लेख लेखात आहे. प्रकाश संश्लेषण ही वनस्पतींमधील एक जैविक क्रिया आहे- ज्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरून अन्न तयार केलं जातं आणि या प्रक्रियेत ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते. तसंच वनस्पती इतर सर्व सजीवांप्रमाणे श्वासोच्छ्वास करतात- ज्यात ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो. या दोन्ही जैविक प्रक्रिया आहेत. यात समजून उमजून काहीही केलेलं नसतं.

‘वनस्पतींना माणसाप्रमाणे गंधाचं व चवीचं ज्ञान आहे.अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते.’ या वक्तव्यासही कोणताही शास्त्रीय आधार नाही. वनस्पतींना मनुष्याप्रमाणे पंचज्ञानेंद्रियं आणि पंचकर्मेद्रियं असतात याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. वनस्पतींची इंद्रियं वेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला जे गूढ जाणवतं, ते तसंच त्यांना जाणवत असेल याला शास्त्रीय आधार काही नाही.

लेखिका चकवा, रानभूल किंवा झोटिंग म्हणजे काय, याचं विस्तृत वर्णन करते. यात माणसांवर होणाऱ्या परिणामांची अनेक लक्षणं सांगितली आहेत. यात गुंगी येणं, मेंदू बधिर होणं, दिशांचं भान हरपणं, स्मृतिभ्रंश होणं आदी अनेक लक्षणं दिली आहेत आणि हे केवळ वनस्पतींनी पानाफुलांतून उग्र गंध सोडल्यानं होतं, असं लेखिकेनं लिहिलं आहे. हा कार्यकारणभाव ओढून-ताणून आणलेला आणि अतिरंजित आहे, असे आम्हाला वाटते, कारण अशा प्रकारच्या घटनांबाबत कोणतेही शास्त्रीय पुरावे लेखिकेनं नमूद केलेले नाहीत.

‘कमकुवत मनाच्या आणि खंबीर, भक्कम मनाच्या व्यक्तींवर या रानभुलीचा वेगवेगळा परिणाम होतो,’ याबाबतीतही मानसशास्त्रातल्या अभ्यासाचा कोणताही पुरावा लेखिकेनं दिलेला नाही. ‘आफ्रिकेत माणूस गिळंकृत करणारं झाड आहे,’ असं लेखिका म्हणते; पण ते आफ्रिकेत नक्की कुठे आहे आणि त्या झाडाचं शास्त्रीय नाव काय किंवा त्याबद्दलचा कोणताही शास्त्रीय शोधनिबंध यांचा उल्लेख लेखिका करत नाही. शेवटी लेखिकेनं वर्णन केलेल्या प्रसंगातून त्यांनी जे अनुमान काढलं आहे की, ‘स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं.’ ते पाहाता आणि एकू णच या लेखात शास्त्रीय तथ्य फारच कमी प्रमाणात आहे.

बरंचसं काल्पनिक आणि अतिरंजित असं वर्णन आहे. सर्वाना याबाबतचं शास्त्रीय सत्य माहीत असेलच असं नाही. या लेखाकडे ललित म्हणून न पाहता शास्त्रीय म्हणून पाहिलं, तर विनाकारण काही जणांच्या मनात काल्पनिक भीती निर्माण होऊ शकते.

– सीमा हर्डिकर, ‘फर्न’, ठाणे,

– डॉ. अपर्णा वाटवे,

‘एम.आय. टी. वल्र्ड पीस युनिव्हर्सिटी’, पुणे,

– डॉ. मंदार दातार, आघारकर संशोधन संस्था,

– डॉ. स्वप्ना प्रभू, ऑस्ट्रेलिया,

– डॉ. मधुकर बाचूळकर, कोल्हापूर

आम्हीही ‘म्हातारे अर्क’!

‘ थोर वयाचा थोर खेळ’ हा मंगला गोडबोले यांचा आम्हा ज्येष्ठ नागरिकांवरचा लेख ( २३ मे) आवडला. ‘ऑफिशियली’ माणूस केव्हापासून म्हातारा धरला जातो, असा प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आला आहे. पण आम्हा ज्येष्ठांना- म्हणजे म्हाताऱ्यांना स्पष्टपणे ‘म्हातारा’ कधी म्हणावं आणि कधी ‘यंग’ ज्येष्ठ म्हणावं हे हल्लीची तरुण पिढी त्यांच्या सोयीप्रमाणे (मतलबीपणे) ठरवतात असा आमचा दावा आहे.  म्हणून गोडबोले यांनी लेखात मांडलेले काही मुद्दे एकतर्फी वाटतात. तरुण पिढीला वडील मंडळींकडून बाहेरची किंवा घरातली काही शारीरिक कामं करवून घ्यायची असतील तेव्हा आम्ही ‘यंग’ ज्येष्ठ असतो, इतर वेळेला आम्हाला नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, चावणार नाही, या वयात झेपणार नाही, वगैरे वगैरे अशी स्वत:ची ‘ऐच्छिक’ मतं लादून अलगद आम्हाला बाजूला ठेवतील. असो.. पण या तरुण पिढीनं लक्षात ठेवावं- तुम्ही ‘तरुण तुर्क’ असाल, तर आम्ही ‘म्हातारे अर्क’ आहोत!

– श्रीनिवास  डोंगरे, दादर

चित्रपरंपरा जपणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं

‘चित्रकर्ती’ हे प्रतिभा वाघ यांचं सदर नेहमीच अभ्यासनीय असतं. ‘बंधन बांधणीचं’ ( ३० मे) या लेखात रंग, त्यांचा वापर, कापडावरील नक्षीकाम यांबद्दलची दिलेली माहिती आणि अगदी सिकंदरच्या काळापासूनचा पारंपरिक वस्त्रकलेचा प्रवास थक्क करणारा आहे. अमिनाबेन खत्री आणि तायना खत्री यांच्या कुटुंबीयांचं कौतुक आहे. त्यांनी नेटानं ही सुंदर परंपरा आजतागायत सुरू ठेवली आहे. माझ्या मते नैसर्गिक रंगांचा वापर खरंतर या कलाकारांनी बंद न करता सुरूच ठेवला पाहिजे. लेखात नमूद केलेली कारणं, व्यापारी व बाजारी मानसिकता अशा सुंदर चित्रपरंपरा संपवून टाकतात. रंगनिर्मितीसाठी पूर्वी वापरल्या जाणाऱ्या डाळिंबाचं साल, गंजलेलं लोखंड इत्यादी साहित्याबद्दल संशोधन करून ते जागतिक पातळीवर आणलं पाहिजं. तसंच रंग आणि त्यातून व्यक्त होणारे भाव हे सर्व अभ्यासाच्या कक्षेत आणलं पाहिजे. प्रतिभा वाघ यांचे आभार. अशीच माहिती त्यांच्या लेखांमधून आम्हाला मिळत राहो. अशा माहितीचं संशोधन आणि त्या परंपरा जपणारे लोक यांना माध्यमांमधून योग्य न्याय देत समोर आणायला हवं. बारा बलुतेदार, कला, कौशल्य हे जाती बंधनांमधून बाहेर काढत नव्या पिढीला तयार केलं पाहिजे.

– रंजन जोशी, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:30 am

Web Title: chaturang readers response letter abn 97 2
Next Stories
1 टाळं लागलेलं जिणं
2 पावसाचं येणं.. टाळेबंदी उठणं..
3 जीवन विज्ञान : प्रथिनयुक्त आहार
Just Now!
X