07 August 2020

News Flash

संवादाची भाषा

मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही.

| March 14, 2015 01:01 am

ch18मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही. उलट बोलणं, परस्पर खर्च करणं, मुला-मुलींची एकमेकांबद्दल ओढ, त्यांचे कपडे, आपल्याला सगळ्याचाच राग येतो, काळजी वाटते. या सगळ्या काळात आपण जवळीक निर्माण करण्याऐवजी दुरावा निर्माण करतो.

मुलांशी बोलायची भाषा वेगळीच असते असं दिसतं. साधारणपणे मुलं समोर आली की ‘काय रे? कुठल्या शाळेत जातोस? कितवीत आहेस?’ असं पाहुणे हमखास विचारतात. मुलांनी निमूटपणे उत्तर दिलं तर तो शहाणा नाही तर एवढं पण नाही का सांगता येत? हा शिक्का! दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच लागले असले तर त्या मुलांवर ‘किती टक्के?’ याचं उत्तर देण्याचं संकट. का विचारायचे असे मार्क? त्यावरून मुलाची ओळख होते का? काही पाहुणे मुली समोर आल्या की हमखास ‘छान आहे हं फ्रॉक तुझा! आणि गळ्यातलं पण सुंदर आहे’ असं म्हणतात. हे काय मुलीचं कौतुक झालं का? असं बोलून मुलींनी म्हणजे छान-छान कपडे, दागिने घालायचे आणि इतरांनी त्यांचं कौतुक करायचं अशीच त्यांची प्रतिमा करून टाकतो आपण. त्यापेक्षा आपल्याला जे येत असेल ते मुलांना करून दाखवावं. त्यामुळे संवाद चांगला होण्याची शक्यता असते.
शिवाय मुलांना आज्ञा करणं, उपदेश करणं, प्रवचन देणं हा मोठी माणसं आपला हक्क समजतात. उपदेश, प्रवचन हा संस्कारांचा शॉर्टकट समजतात. काही वेळा गोष्टी समजावूऽऽऽन सांगण्याचा मुलं धसका घेतात त्यामुळे पालक फार वेळ बोलतायत असं झालं तर मुलं आपले कान बंद करून घेतात. दहा-बारा वर्षांची झाली की मुलांना वाटतं, ‘‘आता आपल्याला मोठय़ा जबाबदार माणसांसारखी वागणूक मिळावी’’ आणि होतं उलटंच. ही धड ना मोठी धड ना लहान मुलं! त्यांना आपण कधी लहान करून टाकतो तर ‘आता तुला हे कळायला हवं’ म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो. जसजशी मुलं अधिक स्वतंत्रपणे वागू लागतात, उर्मट वाटावं असं बोलू लागतात तसतसा आपल्यातला पालक पालकत्वाच्या उंच सिंहासनावर जाऊन बसतो आणि मुलांकडून आज्ञाधारकपणाच्या अपेक्षा करतो. कडक नियम करू पाहतो.
आमची मुलगी वयात आली तेव्हा मी सहज तिला म्हटलं, ‘आता तुला थोडं सावधगिरीनं, काळजीपूर्वक वागायला हवं. घरी परत यायला उशीर करायचा नाही.’ ती म्हणाली, ‘का?’ आता काय सांगावं? मी म्हटलं, ‘बाहेर मुलांपासून धोका असतो, ती त्रास देऊ शकतात.’ ती लगेच आपल्या अडीच वर्षांनी मोठय़ा भावाबद्दल म्हणाली, ‘मग त्यालाही सांग ना घरी वेळेवर परत यायला. त्याच्यापासून नाही का इतर मुलींना धोका?’ किती खरं होतं तिचं म्हणणं! मला तर माझ्या सांगण्यात खूपच दोष दिसत होते! अनेकदा मोठी माणसंच मुलींना त्रास देतात. बरोबरचे मित्र देतीलच असं नाही आणि रात्री लवकर ये म्हणजे दिवसा मुली सुरक्षित असतात, असं मानतो की काय आपण? परत असं सांगून सगळ्यांच्याबद्दलच अविश्वास, भीती निर्माण करतोय की काय तिच्या मनात? पण तरी तिला हे सांगणं भागच होतं. असे प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा मुळात मुलांशी आपला संवाद चांगला असला तर सोपं जातं.
मुलांशी बोलताना आपण असं काही बोलतो, वागतो की, त्यांना आपल्याशी बोलावंसंच वाटत नाही. म्हणजेच आपल्या संवादाच्या मार्गावर आपण अडथळे उभे करतो. काय काय करतो आपण? दुर्लक्ष करतो मुलांकडे. लहान वयात त्यांच्या हाका मारण्याकडे दुर्लक्ष करतो. वाढत्या वयात त्यांच्या बदलत्या वागणुकीस समजूत न घेता उपदेश करतो. आपण ठरवलेले कार्यक्रम घरावर लादतो. त्यांचं स्वत्व जागं होत असतं त्यामुळे ती सहज गोष्टी मान्य करत नाहीत. त्याला आपण ‘वाद घालू नको’ म्हणून निकालात काढतो. इतकी वष्रे गोड वागणारं आपलं मूल असं कसं झालं? असं आपल्याला वाटतं की नाही? मुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांना लहान समजून वागतो. कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही. उलट बोलणं, परस्पर खर्च करणं, नको ती संगत असणं, मुला-मुलींची एकमेकांबद्दल ओढ, त्यांचे कपडे, आपल्याला सगळ्याचाच राग येतो, काळजी वाटते. या सगळ्या काळात आपण जवळीक निर्माण करण्याऐवजी दुरावा निर्माण करतो.
कधी कळत, कधी नकळत शेवटी मुलांकडे आपलं दुर्लक्षच होतं. काही पालक मात्र दुर्लक्ष व्हायला नको या विचारापायी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. कधी जासूसी करतात, हाही मार्ग नव्हे लक्ष देण्याचा. दुर्लक्ष न करणं याचा अर्थ संवाद चांगला ठेवणं. मोकळेपणाने बोलणं, बोलू देणं, त्यांचं बदलत विश्व समजून घेणं. देवदत्त दाभोळकरांनी रूपांतर केलेली एक कविता सगळ्या पालकांनी पाठ करावी अशी आहे-
उगाचच टीका करू नका
बाळ केवळ िनदा शिकेल

उगाच कुणाचा कराल द्वेष
बालमनात तेच ठसेल

कराल बाळाची हेटाळणी
तसेच खुरटून जाईल झाड

सदा न् कदा लाजच काढाल
कशी त्याची व्हावी वाढ?
थोडे त्याला समजून घ्या

शिकेल शांती समाधान
थोडे उत्तेजन द्याल तर
रुजेल ताठ स्वाभिमान
जरा थोडे कौतुक करा

त्याचे होईल मन उदार
बरे वाईट नीट सांगा

शिकेल न्याय धारदार
सुरक्षित वातावरणात

श्रद्धा त्याची उमलू दे
चांगले ते चांगले म्हणा
आत्मविश्वास फुलू दे
आपुलकी प्रेम जिव्हाळा

यात त्याला नाहू दे
प्रेम कळू दे जगाचे
अन् प्रेम जगाला देऊ दे

तुमच्यासाठी कोणी केले
केले नाही – विसरूनऽऽ॥
तुमच्या बाळासाठी तुम्ही
निदान एवढे करीत जाऽऽ ॥

हा तर संवादाचा पायाच झाला! आपण तर रस्सीखेच करण्यात गुंतलेले असतो! आपली सत्ता गाजवू पाहात असतो. मुले नकार मान्य करत नाहीत, हट्टीपणा करतात. आक्रमक होतात तेव्हा आपण धमक्या देतो, ती ऐकत नाहीत, नुकसान करतात तेव्हा आपण शिस्त लावू पाहतो. आपण मुलांची इतर मुलांशी तुलना करतो त्यानं ती अधिकच दुखावतात. त्यांचा इंटरनेट वापर बंद करणं, त्यांचा मोबाइल काढून घेणं, अशी आपण आपली सत्ता गाजवतो. बेशिस्त आहेस, उर्मट आहेस, निष्काळजी आहेस, आमच्या कष्टांची तुला किंमत नाही, बेजबाबदार आहेस इ. गोळ्या आपल्या बंदुकीतून सटासट निघत असतात. रागावणं, मारणं हे आपल्याला शॉर्टकट वाटतात, पण त्यामुळे काहीच चांगलं घडत नाही. १०-१५ वर्षांपर्यंत मुलांना मारायचं नाही (आणि नंतर ती आपला हात धरू शकतात) हे लक्षात ठेवायचं.
खरं तर पालकत्वाची आपली सत्ता ही न वापरण्यासाठी असते. त्या सत्तेचा उपयोग मुलांच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी, चांगलं माणूस होण्यासाठी करायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 1:01 am

Web Title: communication language
टॅग Kids,Parents
Next Stories
1 मजूर, आदिवासी स्त्रियांचा झुंजार लढा
2 सुखात सुखावले, दु:खात सावरले
3 उन्हाळ्यावर उपाय
Just Now!
X