हरीश सदानी saharsh267@gmail.com

पुरुष आपला ‘पुरुष’ पणाचा मुखवटा दूर करून स्त्रियांशी बरोबरीच्या नात्यानं, निर्मळ संवाद साधू शकतील का?.. या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देत हे कसं साधता येईल याचे धडे डॉ. मोहन देस विविध शिबिरांमधून मुलामुलींना देतात. प्राथमिक आरोग्य सेवेत मोलाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते घडवतानाच डॉ. देस यांनी माणसा-माणसांमधील,   विशेषत: स्त्री-पुरुषांमधील नातं निरोगी व्हावं, यासाठी प्रयत्न सुरू के ले. पुरुष कसा असतो किं वा असावा याच्या पारंपरिक व्याख्या कशा दिशाभूल करणाऱ्या आहेत हे तर ते सांगतातच, पण आपल्या दैनंदिन जीवनातली आपल्याला सहजी न जाणवणारी ‘पुरुषी’ आविष्काराची उदाहरणं समोर ठेवून मुलांना अंतर्मुखही करतात. डॉ. मोहन देस या जोतिबांच्या लेकाविषयी.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…

‘‘अगं नको नको नको नको नको..

काय गं बाई, काय गं बाई, काय गं बाई?..

अ‍ॅनिमिया नको गं बाई, मला अ‍ॅनिमिया

नको गं बाई!’’

सुमारे १२ वर्षांपूर्वी मी माझ्या काही तरुण साथींबरोबर औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका आगळ्या संमेलनात सहभागी झालो होतो. तिथे साठीच्या आसपास असलेले एक गृहस्थ हे वर दिलेलं भारूड आवेशानं गात होते. भारतीय स्त्रिया आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक असलेला, पण दुर्लक्षित आजार म्हणजे अ‍ॅनिमिया.

या आजाराबद्दल, म्हणजेच रक्तातील तांबडय़ा पेशींची कमतरता, त्याची कारणं, लक्षणं, उपचार, हे सारं सोप्या पद्धतीनं, गाण्याच्या माध्यमातून ते गृहस्थ जमलेल्या समुदायाला समजावत होते. डॉक्टर म्हणून १७ वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आरोग्याविषयी सामान्यजनांमध्ये- विशेषत: ग्रामीण, वंचित समूहांमध्ये जाऊन संवाद करण्याचा ध्यास घेतलेले ते गृहस्थ म्हणजे डॉ. मोहन देस. (स्वत:ला ‘डी-कास्ट’ करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी आपलं आडनाव त्यागून देस हे आडनाव धारण केलं आहे.)

‘एमबीबीएस’ झाल्यानंतर डॉ. देस यांनी मुंबईत ‘के.ई.एम.’ व ‘महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय’ येथे काम के लं. शिवाय एका अमेरिकन बोटीवर मेडिकल ऑफिसर म्हणून आणि त्यानंतर स्वत:च्या दोन क्लिनिक्समध्येही ते कार्यरत राहिले. अशी मिळून एकूण १७ वर्ष त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस केली. समोरच्या व्यक्तीस केवळ एक रुग्ण म्हणून पाहून त्याच्या रोगाची चिकित्सा करण्याचा आणि के वळ ‘क्लिनिकल’ पद्धतीनं गोष्टींकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनाचा काही फायदा नाही हे हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं. समोरच्या व्यक्तीला त्याच्या सर्व संवेदनांसह एक जिवंत माणूस म्हणून पाहाता न येण्याची सल त्यांच्या मनाला सतत टोचत होती. आरोग्याचे अधिकार  सर्वाना आणि निरंतर मिळावे आणि त्याकरिता आरोग्याविषयी तळागाळातील लोकांबरोबर मोकळा संवाद व्हावा यासाठी त्यांनी आरोग्य संवादकांची फळी निर्माण करायला सुरुवात केली.

पुण्यात आरोग्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. अनंत फडके, डॉ. रमेश अवस्थी, नाटय़कर्मी अतुल पेठे आणि डॉ. देस यांनी चर्चा करून दर वर्षी एक आगळा ‘आरोग्य संवाद मेळावा’ आयोजित करण्याचा उपक्रम सुरू झाला. जिल्ह्य़ाच्या एखाद्या ठिकाणी कमी खर्चीक जागेत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जमून, हक्काधारित जनआरोग्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा घडवून, अनुभवांची देवाणघेवाण करत एकमेकांना समृद्ध करण्याचा विचार अशा मेळाव्याच्या आयोजनामागे होता. या मेळाव्याचा मुख्य भर संवादावर होता. एरवी कुठल्याही संमेलन वा परिषदेला फी भरून सहभागी होऊ न शकणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना या आरोग्य संवाद मेळाव्यात सहभागी होऊन आरोग्याच्या प्रश्नांवर एखाद्या व्यक्तीनं वा संघटनेनं काय व कसे प्रयत्न केले ते तपासण्याची, त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरं करत नवा परिप्रेक्ष्य मिळवण्याची संधी मिळाली. अनुक्रमे पुणे, औरंगाबाद, सांगली, नागपूर आणि सोलापूर येथे असे पाच वार्षिक मेळावे झाले. या संवादी मेळाव्यांना प्रत्येक ठिकाणी सरासरी पाचशे लोक उपस्थित होते.

१९९६ मध्ये ‘आरोग्य भान’ (आभा) नावाची चळवळ डॉ. देस यांनी सुरू केली. आजपर्यंत ‘आभा’ संस्थेनं कास्प प्लॅन, केअर इंडिया, युनिसेफ, एकलव्य, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, यशदा, महाराष्ट्र शासन आणि इतर संस्थांसोबत जोडून घेऊन अनेक स्थानिक कार्यकर्ते, पारंपरिक सुईणी, भगत, अंगणवाडी सेविका, ‘आशा’ आरोग्यसेविका, आदिवासी आश्रमशाळांचे अधीक्षक, शिक्षक यांचं प्रशिक्षण केलं. यांच्यापैकीच काही संवादक-सेविकांना ६७२ छोटे दवाखाने चालवण्याचं काम ‘आभा’नं शिकवलं आहे. या सेविकांना आरोग्य तपासणी करण्याच्या कौशल्यांबरोबर मूलभूत वैद्यकीय साहित्य, औषधं असलेली किट्स दिली आहेत. औषध देता देता (किंवा न देताही) लोकांच्या स्थानिक बोलीमध्ये संवाद, गाणी, चित्र, नाटय़ या माध्यमांचा प्रभावी वापर करून हा आरोग्यसंवाद केला जातो. सुरुवातीला डॉ. देस यांच्याबरोबर वैशाली वैद्य, राजू इनामदार, प्रशांत केळकर, अंजली म्हसाणे या सर्जनशील संवादकांनी ‘आभा’च्या कामाला संवादी आकार दिला. आज हेच काम महाराष्ट्रात आणि इतरही राज्यांत अनेक तरुण संवादक वेगळ्या रीतीनं पुढे नेत आहेत.

गेली १० वर्ष ‘आभा’अंतर्गतच ‘रिलेशानी’ हा  वैशिष्टय़पूर्ण उपक्रम डॉ. देस चालवतात. शानदार, ऐश्वर्यपूर्ण नातं माणसामाणसांत निर्माण होण्यासाठी गप्पाटप्पांच्या स्वरूपात खुली चर्चा व संवादसत्रं आयोजित केली जातात. परस्पर आदर, विश्वास, शेअरिंग, जबाबदारीचं भान, हे सर्व ध्यानात ठेवून नातेसंबंधांतील संवेदनशील, काही अवघड बाबींवर विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण केली जाते. हस्तमैथुन, प्रेमविहीन सेक्स, लिव्ह-इन रिलेशनशिप, नात्यांमध्ये डोकावणारा ग्राहकवाद, मासिक पाळी,          पॉर्न फिल्म्स अशा अनेक विषयांवर तरुण     मुलं-मुली एकत्र येऊन बोलतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी- लहान मुलं, तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, अविवाहित, विवाहित या सगळ्यांकरिता गरजेनुसार विषय ठरवून सत्रं आयोजित केली जातात. कथाकथन, अनुभवनाटय़, गाणी, कविता यांचा वापर करून सर्वाना सामावून घेतलं जातं. शिबिराअंती सहभागी व्यक्ती हे अनुभवतात की नातं हे इंद्रधनुष्यासारखं असतं. काही रंग ही समृद्ध नात्याची सुरुवात असते, काही रंग फिकट होत जाणार, काही रंग नव्यानं येणारे असतात.

‘पौरुषानी ते रिलेशानी’ या विषयावर डॉ. देस अलीकडे मुलांशी सविस्तरपणे बोलत आहेत. इयत्ता आठवीत शिकत असतानाची एक आठवण सांगून गढूळलेल्या संस्कृतीतून आपल्यात विकसित होणाऱ्या दूषित पुरुषी नजरेकडे डॉ. देस लक्ष वेधतात. ते सांगतात, ‘‘शाळेत वर्गातली माझी जागा खिडकीपाशी असायची. वर्ग तिसऱ्या मजल्यावर. खिडकीतून खाली दिसणाऱ्या एका घटनेची मी रोज वाट बघत असे. वरून उघडय़ा असणाऱ्या बाथरूमवजा तट्टयाच्या आडोशामध्ये आंघोळ करणारी एक स्त्री दिसायची. तिची उघडी, ओली पाठ.. माझ्या अंगात, पोटात, पोटाखाली काही तरी उसळायचं..’’

‘‘स्त्रीदेहाकडे अशा सरावलेल्या उपभोगी नजरेनं बघण्याचा अधिकार आपल्याला कसा मिळतो? हा अधिकार कोणत्या तत्त्वावर आधारित असतो? ‘पुरुषलिंग’ हेच तत्त्व. ते तर जन्मापासूनच असतं. कधी कधी हे लिंग शस्त्रासारखं भासतं. अर्थात सर्वच मुलांना असं वाटत नाही. पण लिंगाचा ‘शस्त्रीय’ विचार काही मुलांमध्ये, त्यांच्या शरीरमनामध्ये खोलवर रुजू होतो. नकळत या विचाराचीच नजर तयार होते. लिंगच एखाद्या ‘बायनाक्युलर’सारखं डोळ्यात येतं. हे डोळ्यांतलं ‘मुसळ’ स्वत:ला दिसत नाही. पण ते स्त्रियांना अचूक  दिसतं! त्या कधी कधी घाबरतात. त्यांना ते आवडत नाही. या मुसळाला साध्या ओळखीचीही गरज भासत नाही. प्रेम वगैरे तर दूरच. एका परात्म वृत्तीनं आपण स्त्रीदेह उपभोगू लागतो. एखाद्या वेळी एखादी धीट मुलगी ‘‘काय रे, तुझ्या घरी आई-बहीण नाहीत का रे?’’ असं विचारते, तेव्हा आपण जरा जमिनीवर येतो. पण आपली  आई-बहीण सोडून इतर कोणत्याही स्त्रीकडे आपण ‘तसं’ बघू शकतो असा संदेशही तेव्हा मिळतो.’’ डॉ. देस त्यांचं आकलन तरुणांपुढे मांडतात.

स्वत:च्या पुरुषत्वाचा वेध घेत असताना ते सांगतात, ‘‘एमबीबीएस करत असताना मी शिकलो की पुरुष हा कसा हार्मोन्सचा गुच्छ आहे. टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषाला दाढी-मिशा येण्यात, लैंगिक इच्छा, शुक्राणूंच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतं. मात्र आक्रमकता, शौर्य, धाडस, धडाडी हेही या ‘टेस्टोस्टेरोन’मुळेच असतं असं बरेच पुरुष ठरवून टाकतात. आक्रमकता रक्तातच असल्यानं पुरुषाच्या ठायी असलेली आक्रमक नजर, उद्दामपणा, बेदरकारी व हिंसक प्रवृत्ती आणि त्याचंच ‘एक्स्टेन्शन’ म्हणून विनयभंग, बलात्कारसुद्धा ‘टेस्टोस्टेरोन’च्या वाढीव पातळीमुळे घडतात असं वाटायला लागतं.’’ आपण आत्मसात केलेल्या गोष्टींची पुनर्तपासणी करून त्याविषयी नवा आयाम डॉ. देस देत असतात. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार या हार्मोनची रक्तातली पातळी आणि पुरुषी आक्रमकता यामध्ये काही कार्यकारण संबंध आढळला नाही, तर पुरुषी लैंगिक आक्रमकतेशी पुरुषाचा पूर्वानुभव आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातून त्याला मिळालेले संदेश, यांचा संबंध टेस्टोस्टेरोनच्या पातळीपेक्षा खूप जवळचा असल्याचं आढळलं.

‘‘स्त्रीकडे आई किंवा थेट बाई (मादी) म्हणून पाहाण्यापलीकडे एक माणूस म्हणून पाहायला आपण शिकलोच नाही. स्पर्शाची भाषा आपल्याला अवगत नसते. लग्नानंतर आयुष्यात या गोष्टी नव्यानं पत्नी अरुणाकडून कळल्या. नव्या प्रकारची नीतिमत्ता तिनं शिकवली, मला अनेकदा सावरलं,’’ असं ते सांगतात. आपण डॉक्टर आहोत, तसंच पुरुष आहोत, या दोन्ही गोष्टी नातेसंबंधांमध्ये कशा आड आल्या ते पारदर्शकतेनं डॉ. देस मांडतात. जुनुका या आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर केवळ अंगावरचं दूध पाजणं ही एक गोष्ट सोडून तिच्या संगोपनात केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून अधिक समृद्ध करत गेल्या, असं ते नमूद करतात.

इतिहासातले दाखले देत (टोळी पद्धती, जोहार यांसारख्या घटना, देवदासीसारख्या प्रथा, शिवीगाळ इ.) ते विवेचन करतात. वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रीच्या गर्भाशयावर व योनीमार्गावर सामूहिक मालकित्वाची, स्वामित्वाची भावना कशी वाढीस लागते, यासंबंधी गांभीर्यानं चिंतन करण्याविषयी डॉ. देस बोलतात. या प्रकारच्या नव्या मांडणीचा काहींना धक्का बसू शकतो. हैदराबाद येथे एका डॉक्टर स्त्रीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तिथल्या पोलिसांनी ४ आरोपी पुरुषांवर गोळ्या

झाडल्या. त्यानंतर जी प्रतिक्रिया उमटली, ती पाहाता डॉ. देस यांच्या म्हणण्यातील कळकळ समजू शकते.

आपल्याला पुरुषी नजरेचं हे जड संस्कारी ओझं बाजूला नाही का ठेवता येणार? कायमचं? आणि एक सुंदर, सक्षम, सन्मानाचं, परस्पर – सुखाचं नातं नाही का जोडता येणार? आणि हे केवळ ‘विशफुल थिंकिंग’ नाहीये, तर त्याला वैज्ञानिक आधारदेखील आहे, असं ते म्हणतात.

पुरुषानं मेंदूवरचा मुखवटा काढून बोलण्याची गरज डॉ. देस शिबिरांमध्ये व्यक्त करतात. पुरुषत्वाचा मुकुट परिधान करताना तो कसा काटेरी आहे, रक्षणकर्ता, सांभाळकर्ता म्हणून आपण स्वत:वर लादलेल्या जबाबदाऱ्या पेलत नसल्यानं आपण आपलं स्वत्व गमावून बसलेलो आहोत, याची जाणीव ते आपल्या मनोगतात करत असतात. याच विषयावर साद घालणाऱ्या कविवर्य ग्रेस यांच्या या ओळी एका कार्यक्रमात गाऊन डॉ. देस यांनी आपल्या उत्कट संवेदनांनी सर्वाना अंतर्मुख के लं होतं. ते माझ्या नेहमी लक्षात राहील.

माझे पुरुषाचे मन.. नको माहेराने तोलू

माझ्या बाहुत सावली, नको तिच्याशी तू बोलू

माझ्या अंगणात थांब, लाव अंधाराचा मळा

डोळे खुडून पाहावा, असा पाऊस मोकळा