नीरजा

खरंच नेमका कोणता आतला आवाज दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात या बायका? कदाचित त्यांचं त्यांनाच माहीत असावं ते; पण जाणवू देत नाहीत त्या स्वत:लाही. एवढी वर्ष हा आवाजही ऐकू येऊ नये याची काळजी घेणाऱ्या या बायका आता मात्र विचार करायला लागल्या आहेत. कोणत्या तरी निमित्तानं का होईना, पण संस्कृतीच्या सनातन वाडय़ात बंदिस्त झालेल्या या बायका पाहायला लागल्या आहेत एखाद्या कौलातून दिसणारं चांदण्यांनी भरलेलं आभाळ.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

उपसावे.. उपसावे

आसूओल्या पापण्यांनी

डोहातील काळे पाणी

कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘मृगजळ’ या संग्रहात असलेल्या ‘उपसावे.. उपसावे’ या कवितेत आलेलं हे ‘काळं पाणी’ नेमकं कसलं असतं? अनेक बऱ्यावाईट आठवणींचं? आयुष्य कळायला सुरुवात होण्याच्या वयात पाहिलेल्या, काही खऱ्या झालेल्या, तर काही तुटलेल्या स्वप्नांचं? जन्म आणि मृत्यूमधल्या रस्त्यावर भेटलेल्या भल्याबुऱ्या माणसांचं? त्यांच्यात गुंतलेल्या आपल्या मनाचं? की केवळ त्यांनी दिलेल्या दु:खाचं?

जगताना आलेल्या दुखऱ्या अनुभवांचं नकोसं वाटणारं गाठोडं मनाच्या या डोहात आपण लोटून देतो. ते पडून असतं तिथंच कित्येक दिवस. आपल्या आत लपलेल्या इच्छा-वासनांचा गाळही असाच तळाशी बसून राहत असेल कित्येक वर्ष आणि आपल्याला त्याचा पत्ताच नसेल. बाईच्या तर अशा किती तरी इच्छा-आकांक्षा असतात ज्या ती मनाच्या तळाशी लोटून जगत असते. किती तरी अस्वस्थ करणाऱ्या आठवणी ती लोटून टाकते मनाआड आणि बंद करून टाकते दार घट्ट. त्या साठून राहतात तळाला. मग तीही अशीच या कवयित्रीसारखी एकांतात आसूओल्या पापण्यांनी  उपसत राहत असेल त्या आठवणींचं काळं पाणी.

डोहातील काळे पाणी

उपसता.. उपसेना;

तळ स्वप्नांचा लागेना

पण हे असं उपसणं वाटतं तितकं सोपं नसतंच. त्यांचा इतका मोठा ढिगारा झालेला असतो, की कधीकाळी बाजूला लोटलेली स्वप्नं दबून जातात या ढिगाऱ्याखाली. अनेकदा विसरलीच जातात ती. अशा वेळी त्या स्वप्नांचाही तळ सापडत नाही तिला. हात घालून हा तळ ढवळण्याचं धाडस नसतं तिच्यात. मग आपली स्वप्नं विसरून जाते ती. एखाददुसरी बाई मात्र वर काढते ही स्वप्नं वयाच्या उताराला लागल्यावर. त्या स्वप्नांची माळ गुंफून हातात घेते. त्यावरच फिरवत रहाते आपली बोटं. वास्तवात नाही उतरली तरी ती स्वप्नं तिच्या आयुष्याचा भाग होती हे माहीत असतं तिला. ज्या स्त्रिया काढत नाहीत वर या स्वप्नांना त्या मात्र कुढत राहतात आयुष्यभर. एक प्रकारचा कडवटपणा येत जातो आयुष्यात. सारंच नकारात्मक वाटत राहतं. ‘स्वप्नं नसतातच खरी होण्यासाठी.’ असा सूर असतो त्यांचा. नेणिवेत साचून राहिलेला हा गाळ कधी-कधी आजारातही रूपांतरित होतो. म्हणूनच इंदिराबाई म्हणतात,

तळ स्वप्नांचा लागेना,

तरी ध्यास मनापाशी

उपसावे पाणी.. पाणी

भिडलेले क्षितिजाशी

‘उपसावे पाणी.. पाणी’ असं जेव्हा इंदिराबाई म्हणतात तेव्हा माणसाची ही मानसिक गरज अधोरेखित करतात. हा उपसा करणं कसं गरजेचं आहे हे सांगतात. आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसं, त्यांनी दिलेल्या सुखद आणि दु:खद आठवणी, लहानपणापासून पाहिलेली अनेक स्वप्नं, आपल्यालाही अनोळखी असलेले अनेक प्रदेश, प्रत्येकाच्याच मनाच्या तळाशी लपलेले असतात. त्यांचा असा उपसा सातत्यानं होणं गरजेचं असतं.

आज इंदिरा संतांच्या या कवितेची आठवण झाली ती आपल्या मनातील गाळ उपसून स्वप्नांचा तळ गाठू पाहणाऱ्या काही स्त्रियांना भेटले तेव्हा. अलीकडेच भूतानला जाण्याचा योग आला होता. थिम्पु या भूतानच्या राजधानीतल्या एका हॉटेलमध्ये उतरलो होतो आम्ही. फ्रेश होऊन जरा रूमच्या बाहेर आले आणि एकदम खूप साऱ्या बायकांचा आवाज ऐकू आला. चाळीस ते साठच्या वयोगटातल्या वीस-पंचवीस बायका आपल्या खोल्या कुठे आहेत ते शोधत होत्या. मी एक दिवस जास्त अनुभवी होते त्या हॉटेलात. त्या शोधत असलेल्या त्यांच्या खोल्यांचे नंबर आणि मजले त्यांना सांगितले. एखाददोघींना खोली उघडून देण्यात मदत केली. मग विचारलं, ‘‘कुठून आलात?’’ तेव्हा कळलं, कोणी नाशिक, नगर, तर कोणी कोल्हापूर, जुन्नर, पुणे वगैरे भागांतून आलेल्या. प्रत्येकीच्या अंगात वेगळाच उत्साह संचारला होता.

मी फक्त म्हटलं, ‘‘किती उल्हासला आहात तुम्ही. मला छान वाटलं तुम्हाला बघून. सारी बंधनं थोडय़ा काळासाठी मागे सोडून केवळ स्वत:ला यावंसं वाटलं म्हणून आलात. त्याचं सुख ओसंडून वाहातंय तुमच्या चेहऱ्यावरून.’’ माझ्या या चार शब्दांनीच आमच्यात पूल बांधला गेला. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या ग्रुप फोटोत मी कधी शिरले ते माझं मलाच कळलं नाही. मी त्यांची होऊन गेले. पुढे जिथे जिथे आम्ही जात होतो तिथे तिथे त्या भेटत राहिल्या. काही आग्रहानं त्यांच्या ताटातलं खाऊ घालत होत्या, तर काही त्यांचा अनुभव वाटून घेत होत्या.

नेमकं काय कारण होतं ज्यामुळे जोडल्या गेल्या होत्या त्या माझ्याशी? त्यांचं हे असं तळ ढवळून स्वप्नांना बाहेर काढणं जाणवलं होतं मला म्हणून, की त्यांच्या अशा उनाड मुलांसारखं उधळण्याला मी पसंती दिली होती म्हणून, की त्यांच्या या निर्मळ, निरागस आनंदात सामील झाले म्हणून? कारण काहीही असो, पण त्या क्षणापर्यंत अनोळखी असणाऱ्या आम्ही आमच्या नकळत मत्रिणी झालो होतो एकमेकींच्या.

आयुष्यातली कित्येक वर्ष आपल्या पुरुषांनी फिरायला नेलं तरच फिरायला जाणाऱ्या, तिथं गेल्या तरी नवऱ्याला, मुलांना काय हवं नको ते पाहाणाऱ्या, बॅगा भरणाऱ्या, घर आवरावं तशी हॉटेलातलीही रूम आवरणाऱ्या आणि बाकी काही नाही तरी स्वयंपाक न करता आरामात चार चवीचे पदार्थ खायला मिळतात म्हणून खुशालून जाणाऱ्या किती तरी बायका मी पाहिल्या होत्या. आजही अशा मिळालं आहे तेवढय़ाच अवकाशात खूश असणाऱ्या बायका आजूबाजूला आहेत. माझ्याच ग्रुपमध्ये अशा नवऱ्यांसोबत आलेल्या आणि त्यांच्या सरबराईत गुंतलेल्या काही जणी मी पाहात होते. त्यामुळेच या केवळ स्वत:ला हवं तसं मुक्त जगण्याचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या बायका पाहून छान वाटलं. थोडय़ा काळासाठी मिळालेल्या स्वातंत्र्यातला हा असा आनंद साऱ्या जणी अगदी मनापासून भोगत होत्या. स्वत:ला हवं ते करत होत्या, उधळत होत्या दावं सुटलेल्या गाईसारख्या; पण त्याच वेळी आपल्या या वागण्याचं स्पष्टीकरणही देत होत्या. ‘गावात आजही साडी नेसावी लागते, एकत्र कुटुंबात डोक्यावर पदरही घ्यावा लागतो,’ असं म्हणताना खास टूरसाठी खरेदी केलेले पंजाबी ड्रेस सकाळ-संध्याकाळ बदलून सेल्फीमग्न झालेल्या या साऱ्याच जणी स्वत:लाच समजावत म्हणत होत्या, ‘‘घरी गेल्यावर कपाटात कुठं तरी कोपऱ्यात जातील हे ड्रेस. एवढे पैसे देऊन खरेदी केलेत. ते सगळे वापरायला नकोत का?’’

खरंच किती छोटय़ा-छोटय़ा इच्छा होत्या त्यांच्या. संसाराच्या धबडग्यात मागे पडलेल्या, तळाशी लोटून दिलेल्या या अशा इच्छा, ही स्वप्नं अलवारपणे बाहेर काढत होत्या त्या. हळुवारपणे गोंजारत होत्या त्यांना.

बायका जेव्हा-जेव्हा अशा भेटतात तेव्हा हाताशी न लागलेल्या, पण त्यांच्या काळजात जपलेल्या किती तरी गोष्टी आपोआपच बाहेर येत जातात. केवळ इथंच नाही तर अनेक सभा-संमेलनांत, एखाद्या छोटय़ाशा गावातल्या बायकांच्या छोटय़ा-छोटय़ा समूहात अनेकदा गेले आहे मी. प्रत्येक वेळी बायका भेटतात तेव्हा अशाच उल्हासलेल्या असतात. केवळ स्त्रियांनी स्त्रियांचं आयोजित केलेलं साहित्य संमेलन असो, एखाद्या महिला मंडळाचा कार्यक्रम असो, की लोकल ट्रेनमधली ‘महिला स्पेशल’ असो, आपलं छोटंसं कुटुंब तयार करतात त्या थोडय़ा वेळासाठी अशा ठिकाणी. वाटून घेतात आंबटगोड क्षण. कधी आनंदानं फुलून येतात, तर कधी दु:खाचं टिपटिपणारं गाणं गात भिजून चिंब करतात मैत्रिणींना. गावाकडे जेव्हा त्या मैत्रिणींबरोबर निघतात आठवडय़ाचा बाजार करायला तेव्हा त्यांची पावलं थिरकत राहतात पायातल्या पैंजणांच्या तालावर. बाहेरचा भणाण वारा अंगावर घेताना रंगीबेरंगी साडीचा पदर राहत नाही डोक्यावर; पण त्यांना आवडतो त्या वाऱ्याचा स्पर्श जो लागलेला नसतो कित्येक दिवस बंद दाराआड लोटलेल्या त्यांच्या मनाला. मग करून घेतात त्या या वाऱ्याशी ओळख आणि स्वत:शीही. या उनाड वाऱ्याच्या भयानं अनेकदा पाठवत नाहीत त्यांना त्यांचे पुरुष बाहेर. मग बायका शोधतात बाहेर पडण्याचे अनेक उपाय. त्या ठोठावतात देवळांचे दरवाजे. कधी एखाद्या बठकीचं निमित्त करतात बाहेर पडण्यासाठी. देव आणि गुरू यांच्यावर विश्वास असतो त्यांच्या नवऱ्यांचा, सासवांचा, समाजाचाही. चित्रपट पाहायला, प्रवास करायला, परवानगी देण्याआधी दहा वेळा विचार करणारी ही मंडळी देवदर्शनाला जाणाऱ्या बायकांना लगेच परवानगी देतात. मग बायका बाहेर पडतात देवदर्शनाच्या किंवा कोणत्यातरी बाबा-बापूंच्या बठकीला जाण्याच्या निमित्तानं. मुंबई, गोवा मार्गावर एखाद्या ठरावीक दिवशी अशा नवीन किंवा एकाच रंगाची साडीचोळी ल्यायलेल्या, फुलं माळलेल्या बायकांचे जथेच्या जथे दिसतात. घराबाहेर पडायला मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडत असतो त्यांच्या. यानिमित्तानं भेटतात नेहमीच्या मत्रिणी. त्यांच्याशी बोलताना विसरून जातात त्या स्वत:ला, घराला. प्रचंड बोलत राहतात बायका. सतत अस्वस्थ करणारा स्वत:चा आवाज ऐकू येऊ नये इतक्या मोठय़ानं.

खरंच नेमका कोणता आतला आवाज दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्या? कदाचित त्यांचं त्यांनाच माहीत असावं ते; पण जाणवू देत नाहीत त्या स्वत:लाही. एवढी वर्ष हा आवाजही ऐकू येऊ नये याची काळजी घेणाऱ्या या बायका आता मात्र विचार करायला लागल्या आहेत. कोणत्या तरी निमित्तानं का होईना, पण संस्कृतीच्या सनातन वाडय़ात बंदिस्त झालेल्या या बायका पाहायला लागल्या आहेत एखाद्या कौलातून दिसणारं चांदण्यांनी भरलेलं आभाळ. वर्षांनुवर्ष या सनातन वाडय़ात दबला गेलेला त्यांचा आवाज त्यांना आता सापडला आहे. त्यामुळेच आता या पुरातन वाडय़ाच्या भिंती कोसळण्याचं स्वप्न त्या पाहू लागल्या आहेत. एवढंच नाही तर त्या कोसळाव्यात म्हणून स्वत:च शब्दांचे घण घालू लागल्या आहेत.

कोंदलेलं आयुष्य मागं टाकून

बाहेर पडल्यात त्या वेगानं

मनभर पसरलेली काजळी पुसून

लख्ख झाल्यात बाया

हिरव्यागार शेतातून हुंदडताना

वाटेत लागलेले विहिरीचे तळ नजरेआड करून त्या वाजवू लागल्यात सुरांत

मोडलेल्या मणक्याची मुरली (‘स्त्रीगणेशा’)

स्वच्छ आकाशाचा इवलासा तुकडा हातावर घेऊन त्या पाहताहेत त्याच्याकडे आणि नव्या लिपीतलं नवं अक्षर गिरवताहेत हलक्या हातानं आणि ही नवी लिपी घेऊन परतताहेत पुन्हा एकदा वाडय़ाकडे. नव्या जोमानं रंगवताहेत वाडय़ाच्या भिंती नव्या अक्षरांनी आणि रेखताहेत त्यावर स्वत:ला हवं ते अक्षर.

सगळ्याच बायकांना आत्मभान आलं आहे असं नाही. सगळ्याच बायका या व्यवस्थेच्या विरोधात लढायला सज्ज झाल्यात असंही नाही. अनेकींना तर माहीतही नाही व्यवस्था आणि दुय्यमत्व म्हणजे काय आहे ते; पण आपलेही काही आनंद आहेत, आपलीही काही स्वप्नं आहेत. या समाजाला घाबरून ती लोटून दिली होती एवढी वर्ष बाजूला याची जाणीव झालेल्या बायका आता आत्मविश्वासानं बाहेर पडायला लागल्या आहेत. वेगवेगळ्या रंगांनी भरून गेलेलं चित्र आपल्या आयुष्यात यावं म्हणून प्रयत्न करताहेत. काही करिअर करण्यासाठी, काही उरलेलं आयुष्य मनापासून भोगण्यासाठी, काही आपल्या आवडीचं काही खावं-ल्यावं यासाठी, तर काही एवढी वर्ष नाकारलं गेलेलं एक सुंदर प्रसन्न जग पाहावं यासाठी बाहेर पडू लागल्यात. बाहेर पडल्यावर केवळ बायकांचंच असं जे एक कुटुंब तयार होतं त्या कुटुंबात मुक्त पंख पसरून उडण्यासाठी सज्ज होतात त्या आणि मनमुराद जगून घेतात ते क्षण.

अर्थात यानंतर पुन्हा एकदा शिरायचं असतंच त्यांना त्यांच्या पुरुषांच्या घरात; पण तिथं शिरल्यावरही मनातल्या मनात वाजत राहतात त्यांची थिरकलेली पावलं कोणत्या तरी गाण्यावर, त्यांना हव्याशा वाटणाऱ्या स्वत:च्याच तालावर. मग गुणगुणत राहतात त्या स्वत:ला हवं ते गाणं. हळूच कुजबुजत स्वत:च्याच कानात आणि म्हणतात,

किती दिवस खेळायचा झिम्मा

आणि झुलायचं परंपरांच्या पारंब्यांवर

मला पडायचं आहे बाहेर

चौरंगाच्या चौकटीतून

उतरायचं आहे आता जमिनीवर

थेट पावसासारखं

रुतायचंय खोल आदिम मुळांसारखं

पायाला माती लागली

तर ओळख होईल पुन्हा एकदा

माझी माझ्याशीच नव्यानं

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com