News Flash

व्यर्थ चिंता नको रे :  ‘हॅम्लेट’ झाल्यावर!

‘ज्ञानरूपी विठ्ठला’च्या सहाय्यानं ‘करोना’चं तोंड काळं करायची नामी संधी आपल्याकडे सहज आली आहे.

डॉ. आशीष देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com

प्रत्येकाचा कधी ना कधी ‘हॅम्लेट’ होत असतो! हा ‘हॅम्लेट’ होण्यासाठी फार काही भयंकर किं वा विचित्र परिस्थितीच माणसावर यायला हवी असंही नाही. रोजच्या आयुष्यातले काही निर्णयही कोडय़ात पाडणारे, आपल्या निर्णयक्षमतेचा कस लावणारे असू शकतात. पण राजकुमार हॅम्लेटनं त्याच्यावर गुदरलेल्या प्रसंगातून वाट काढताना त्याच्यापुरत्या अशा काही साध्या कसोटय़ा वापरल्या होत्या. गंमत म्हणजे मानसशास्त्रातही निर्णय घेताना उपयुक्त ठरतील अशा काही कसोटय़ा सांगितल्या जातात. त्यांवर आपले निर्णय पारखून पाहू या.

डेन्मार्कच्या एल्सिनॉर राजवाडय़ाच्या तटावर फिरणारं राजाचं भूत राजकुमार हॅम्लेटला आपला खून हा आपल्याच भावानं- क्लॉडिअसनं राज्य बळकावण्यासाठी केला असल्याचं सांगतं. राजाच्या मरणानंतर हॅम्लेटची आई- जेटर्रूड, जन-मनाची लाज न राखता, पतीच्याच खुन्याबरोबर- म्हणजे आपल्या दिराबरोबर लग्न करून राणी बनते. राजकुमाराला आपल्याच लोकांवरील रागामुळे येणाऱ्या असहायतेत ‘टू बी ऑर नॉट टू बी?’ असा प्रश्न पडतो. बापाच्या बदल्यासाठी आपलीच आई, काका, त्यांच्याच राजमहालात राजसेवेत असलेल्या माणसांना एका भुताटकीच्या सांगण्यावरून देहदंड द्यायचा? मेलेल्या बापाची इच्छा, पितृशोकातून येणारी बदल्याची तीव्र भावना, काकांनी सत्तेसाठी केलेला विश्वासघात नि जन्मदात्या आईनं घेतलेला घृणास्पद निर्णय! विचारांच्या थैमानात मनाचा कडेलोट होत असताना राजकुमार हॅम्लेट आपल्या मित्राला म्हणतो, ‘‘देअर इज नथिंग आयदर गुड ऑर बॅड, बट अवर थिंकिं ग मेक्सइट सो!’’

महत्प्रयासानं तो स्वत:ला सावरतो. भुताकडून मिळालेली माहिती ‘खरी की खोटी’ हे समजून घेण्यासाठी एका नाटक कंपनीकडून क्लॉडिअस आणि जेटर्रूडसमोर ‘सीन ऑफ क्राइम’ घडवून आणतो. खात्री पटल्यावर ‘केवळ बदल्यासाठी नाही, तर न्यायासाठी लढलो नाही, तर आयुष्यभर आपण स्वत:ला माफ करू शकणार नाही, सुखी राहू शकणार नाही,’ हे जाणून क्लॉडिअसला मारण्याचा निश्चय करतो. भावनाविवशतेत हेलकावणारं राजकुमाराचं विव्हल मन ध्येयपूर्तीसाठी लगामात ठेवण्यासाठी सतत झगडत राहातो. त्याच्या मनातलं हे द्वंद्व शेक्सपीअर पुन्हा पुन्हा अविस्मरणीय स्वगतांतून आपल्यासमोर मांडतो. शतकानुशतकं रंगभूमीवर दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी आव्हानात्मक ठरलेलं हे नाटक जसं लाखोंना आजपर्यंत खिळवून टाकत आलं आहे, तसंच एक नाटक आपण सगळेच जगत असतो. आपलं स्वत:चं आयुष्यही असंच थोडय़ाफार प्रमाणात परिस्थिती, नाती, अपेक्षाभंग, आजारपणं आणि संकटं यांनी ग्रासलेलं असतं. आणि या ‘नाटकात’देखील आपण ‘अंत गोड व्हावा’ अशी अपेक्षा धरून असतो. पण त्या निर्णायकतेपर्यंत नेणारा विचार, मार्ग कोणता, हे समजणं बऱ्याच वेळा कठीण होऊन बसतं.

‘थ्रू द लुकिं ग ग्लास’ या कादंबरीमध्ये म्हटल्यासारखं, ‘तुम्हाला कुठं जायचंय हेच माहीत नसेल, तर साहजिकच तुम्ही जो मार्ग निवडाल तो जिथं जातो तिथंच पोहोचाल!’ बऱ्याच वेळा ही परिस्थिती आपसूक बदलेल, माणसं समजून घेतील आणि बदलतील, दैवी शक्ती बदल घडवतील, दगडधोंडे-ताईत-धागे- ग्रह-तारे मदतीला धावतील, अशा वेडय़ा आशेत गुंततो. आयुष्याच्या खाचखळग्यांत दुरावलेला आत्मविश्वास किंवा दुर्लक्ष आपल्यातल्या नाकर्तेपणालाच वाढवतं. मग आयुष्य अशा वळणावर येऊन पोहोचतं जिथं आपल्याला कधीच पोहोचायचं नव्हतं.

‘‘आज माझ्याकडे सगळं आहे, पण या पाठदुखीनं सगळंच असह्य़ झालंय. डॉक्टर म्हणतात ‘हेवी’ काम नाही करायचं. पाठीच्या व्यायामाकडे केलेलं दुर्लक्ष महाग पडलं.’’ गावंडे सांगत होते. गावंडेसाहेबांना चार वर्षांपूर्वी पाठीच्या व्यायामाबद्दल कंपनीतल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तेव्हा, ‘‘माझ्या शरीराला काय धाड भरलीय? दोन दिवसांचं दुखणं आहे हे! उगाच कशाला अजून खर्च करायचा? हे आजकालचे डॉक्टर म्हणजे..’’ आता कामाची आठ वर्ष कशी काढायची, नोकरी गेली तर कुटुंबाचं काय, याचा घोर लागलाय त्यांना.

भारतीय बहुउद्देशीय कंपनीत उच्च पदावर काम, अद्ययावत घर असूनसुद्धा आपल्या मुलीच्या अति हट्टी वागण्यानं सध्या गोन्साल्विस यांचं कामावर लक्ष लागत नाही. मुलगी शाळेत असताना तिच्या शिक्षकांनी खास बोलावून सांगितलं होतं, जरा मुलीकडे लक्ष द्या म्हणून. पण त्याकडे त्यांनी काणाडोळाच केला नि बायकोचंही ऐकलं नाही. कामाच्या ओघात आपण घरी लक्ष कमी दिलं की काय, हा प्रश्न भेडसावतोय गोन्साल्विसना.

५२ वर्षांचे मुर्तझा, स्वत:चं घर, गाडी, चांगलं स्वास्थ्य असूनही, गेली २६ वर्ष एका सहकारी बँकेत काम केल्यावर, आज नोकरी जाण्याची चिन्हं आहेत. १० वर्षांपूर्वी आलेली संगणक प्रशिक्षणाची संधी उगाच दवडली असं आज वाटतंय त्यांना. वाटलंच नाही कधी की बँकेचं काम संपूर्ण संगणकीय होईल!

‘‘आयुष्यभर काम केलं, घर नि नोकरी यापलीकडे विश्वच नव्हतं ठेवलं. आता निवृत्त झालो दीड वर्षांपूर्वी. बायको असते तिच्या कामात, महिला मंडळात नि बाजारहाटीत. मुलं त्यांच्यातल्या त्यांच्यात. उडवाउडवीची उत्तरं मिळतात. माझा वेळच जात नाही. पूर्वी कामावर असताना मित्र तरी भेटायचे. आता सगळेच दूर झालेत. नकोसं झालंय सगळं.’’ बोरड काका सांगतात.

आपल्या प्रत्येकाच्या पुढच्या आयुष्यात (आपण नशीबवान असलो तर!) काही ना काही होणारच! आपला आजचा विचार ठरवणार आहे पुढे काय घडणार आहे ते. म्हणजे आपल्याला सर्वानाच कागद-पेन्सिल घेऊन बसायला पाहिजे नि विचार केला पाहिजे, की माझ्या स्वास्थ्याबाबत/ कुटुंबीयांबाबत/ कामाबाबत काय होऊ शकतं? आता अकस्मात होणाऱ्या गोष्टी आपण नक्कीच टाळू शकत नाही, पण वर दिलेल्या आपल्या मित्रांच्या गोष्टी अकस्मात वाटतात का? त्यांच्या आयुष्यातल्या या वळणांवर त्यांनी स्वत:हून सोडून दिलेली स्वास्थ्याची संधी, नातेसंबंधांत वेळ गुंतवण्याची संधी, प्रशिक्षणाची संधी, कारणीभूत नाही? पण जेव्हा त्या संधी त्यांच्या नजरेसमोरून अलगद निसटत होत्या, तेव्हा त्यांचे विचार वेगळेच होते नि त्या वेळी त्यांना ते योग्यच वाटत होते.

अशा प्रसंगांत आपण जे विचार करतो ते पुढे आपल्यासाठी फायद्याचे ठरणार की नाही, हे पडताळण्यासाठी मानसशास्त्रानं काही नियम सांगितले आहेत. आज आपण ते समजून घेऊ.

राजकुमार हॅम्लेटनं डोक्यात अग्नी भडकला असतानादेखील ‘आपल्याला मिळालेली माहिती खरी की खोटी?’ (इज इट अ फॅ क्ट ऑर माय ओपिनियन?) याची पडताळणी केली. गावंडेंनी डॉक्टरी सल्ल्याकडे केलेलं दुर्लक्ष हे त्यांच्या वैयक्तिक मतावरून केलं. शास्त्रोक्त सल्ला बरोबर की चूक हे समजून घेण्यासाठी ते दुसऱ्या डॉक्टरलाही भेटू शकले असते. त्यांनी जर ‘सत्यावर’ आधारित निर्णय घेतला असता तर पाठीच्या व्यायामाचा सल्ला त्यांना पटला असता नि तसा प्रयत्न करायची शक्यता वाढली असती. तसंच वाढत्या वयात मुलांकडे लक्ष द्यायला लागतं, हे त्रिकालाबाधित सत्य गोन्साल्विस विसरलेले दिसतात. बँकिंग क्षेत्राची संगणकीय वाटचाल अनिवार्य असल्यामुळे सगळ्याच बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचा के लेला प्रयत्न मुर्तझांना निरुपयोगी वाटला. बोरडसाहेबांनी आपण कधी तरी निवृत्त होणार नि तेव्हादेखील आपल्याला मन रमवण्यासाठी समविचारी मित्रसमूहाची गरज भासणार, याकडे दुर्लक्ष केलं, नि आज ते एकटेपणावर इलाज शोधतायत.

राजकुमार हॅम्लेटनं ‘केवळ बदल्यासाठी नाही, तर न्यायासाठी लढलो नाही तर आयुष्यभर आपण स्वत:ला माफ करू शकणार नाही, सुखी राहू शकणार नाही’ हे समजून काय करायचं हा निर्णय घेतला. आजकालच्या डॉक्टरांवर राग जरूर असू शकतो एखाद्याचा, पण त्याचा नि तुमच्या पाठदुखीचा काहीच संबंध नाही हो! प्रश्न तुमच्या ‘स्वास्थ्याचा नि आनंदाचा’ आहे. व्यवसाय-नोकरीत कितीही प्रगती झाली तरी आपल्या कुटुंबीयांच्या अडचणीनं आपल्या सुखाला ग्रहणच लागतं ना? गोन्साल्विसदादांसारखाच मुर्तझाभाईंनीही त्यांच्या प्रसंगात जेव्हा प्रशिक्षण न घ्यायचा निर्णय घेतला, तेव्हा भविष्यासाठी आपण ताटात काय वाढून घेत आहोत याकडे काणाडोळा केलेला दिसतोय.

राजकुमारानं जसं निर्णय घेताना स्वत:ची उद्दिष्टं नीट समजून घेतली (न्यायासाठी) तशीच उद्दिष्टं ‘स्वास्थ्य- नाती- स्थैर्य- ज्ञानवृद्धी- प्रबोधन’ वगैरे असू शकतात. आपलं जे काही ‘उद्दिष्ट असेल त्याकडे नेण्यासाठी आपला निर्णय पूरक आहे की नाही, हे आपल्यालाच तपासायला लागणार ना?

‘ऐकावे जनाचे परी करावे मनाचे’. आपल्या निर्णयानं आपण स्वत:ला सतत शिव्या देत तर बसणार नाही ना, समजून-उमजून घेतलेला निर्णय हा इतर विचारांच्या ‘फायद्या-तोटय़ांचा’ विचार करूनच घेतो ना, म्हणजे परिस्थितीतनं मार्ग काढण्यासाठी घेतलेल्या निर्णयानं नवीन काहूर निर्माण होणार असेल तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशीच स्थिती यायची.

कधी माझ्या निर्णयानं माझे निकटवर्ती दुखावले जाऊ शकतात. त्याची शक्यता ओळखणं नि ती कमी करण्याचा प्रयत्न करणं आपल्यालाच करायला पाहिजे ना? ‘माझी नाती, मी जबाबदार’ हे आपण ऐकतोच आहोत ना सध्या!

हे पाचही नियम सगळ्याच वेळी आपण निर्णय घेताना पाळू शकू असं नाही. असं म्हणतात की, या पाचपैकी निदान तीन नियम जर तुमच्या निर्णयानं पाळले, तर तुमचा निर्णय योग्य असण्याची शक्यता वाढत जाते.

आता बघा, आपण ‘करोना’काळात हे नियम वापरून पाहू या. लस घ्यायची की नाही? योग्य पद्धतीनं (नाक नि तोंड झाकून) मास्क घालायचा की नाही? सॅनिटायझर/ साबण/ वाफारे आणि इतर ‘कोविड’ नियम पाळायचे की नाही? या सगळ्यांबद्दल विचार करताना सत्य नि ‘व्हॉट्सअ‍ॅप सत्य’ यांत गल्लत होते आहे का? मी जो काही निर्णय घेणार आहे, त्याला अनुमोदन माझ्या भीतीचं/ शंकेखोरपणाचं/ अति चिकित्सकतेचं आहे का? नि ते असेल तर त्याचा आणि शास्त्रोक्त निष्कर्षांचा काय संबंध? मग कुठल्या निर्णयानं माझं स्वास्थ्य आणि त्यामुळे आनंद वाढणार आहे? ही ‘करोना’ची जागतिक ब्याद गेल्यानंतर पूर्वीसारखं स्वच्छंदीपणे जगणं हे आपलं उद्दिष्ट आहे का? अति भीतीनं स्वत:ला कोंडून घेऊन किंवा अविचारानं गाफीलपणा करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेणार आणि नंतर स्वत:लाच, नाही तर नशिबाला दूषणं देणार!

मग पाहा हे पाच नियम वापरून. जो निर्णय तीनपेक्षा जास्त नियम पाळतो, तो संत तुकाराम महाराजांच्या अभंगांसारखाच आपसूक तरताना दिसेल. महाराजांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग। अंतर्बा जग आणि मन।। जीवाही आगोज पडती आघात। येऊनियां नित्य नित्य वारू।। तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें। अवघीयांचे काळे केले तोंड।।’

‘ज्ञानरूपी विठ्ठला’च्या सहाय्यानं ‘करोना’चं तोंड काळं करायची नामी संधी आपल्याकडे सहज आली आहे. आपण या स्वास्थ्यसंधीकडे कसं पाहाणार, हे ठरवेल पुढे काय घडणार ते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:04 am

Web Title: follow 5 rules to stop covid 19 coronavirus prevention zws 70
Next Stories
1 मी, रोहिणी.. : ‘फिल्म इंडस्ट्री’शी ओळख
2 वसुंधरेच्या लेकी : निसर्गाचं देणं देण्यासाठी..
3 गद्धेपंचविशी  : कार्यकर्ता ते ‘कार्यकर्ता अधिकारी’!
Just Now!
X