|| रेणू दांडेकर
तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्य़ातल्या नागरकोडल या तालुक्यात ‘पूवीधाम’ ही शाळा सुरू आहे. इथे शिकणारं कोणतंही मूल सांगतं, ‘‘आम्ही शिकतो कारण आम्हाला शिकावंसं वाटतं, आमच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, कोणी पाठवतंय शाळेत म्हणून आम्ही जात नाही. आम्ही निसर्गाचा आनंद घेतो. काही टाकत नाही, काही जादाचं आणत नाही.’’
‘पूवीधाम’मध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम, तासिका, अध्यापन यात असलेलं वेगळेपण खूप महत्त्वाचं आहे. इथं मुलं स्वावलंबी आहेत. रवींद्रनाथ टागोरांच्या कल्पक विचारांची, महात्मा गांधींच्या स्वावलंबनाची आणि डेव्हीड ऑसबरो यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया या ‘पूवीधाम’ला आहे. नैसर्गिक जीवनशैली, पर्यावरणाविषयी अहिंसात्मकता आणि प्रायोगिक पद्धतीनं शिकणं अशा तत्त्वांवर ‘पूवीधाम’चा स्वत:चा अभ्यासक्रम आहे.
तो काय आहे? तर पाच मॉडय़ुल्स आहेत. सूर्य, पाणी, अवकाश, हवा आणि पृथ्वी असे या मॉडय़ुल्सचे विषय आहेत. विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि भाषा याच मॉडय़ुल्सशी निगडित आहेत. प्रत्येक पायरीवर (१ली, २री, ३री आणि ४थी, ५वी, ६वी, ७वी आणि ८वी) त्यांचं स्वरूप ठरलंय. याबद्दल शिक्षकांनी खूप काम केलंय. त्यांनी भाषेसाठी या विषयाशी संबंधित कथा, गाणी, नाटकं, निबंध तयार केले आहेत नि दरवेळी मुलांकडून यात भर टाकली जाते. उदाहरणार्थ पहिली आणि दुसरीसाठी गाणी, नाटय़ आणि कथा असतात. तर ३री आणि ४थी साठी यात प्रत्यक्ष प्रयोगांची भर टाकली जाते. ५वी आणि ६वीत प्रयोग, माहिती यांची भर पडते. प्रत्येक गोष्ट करून पाहिली जाते. सात, आठ वर्षे हा अभ्यासक्रम इथे सुरू आहे. रोज सकाळी शाळेत आल्यावर ५वी, ६वीची मुलं बागकामासाठी जातात. यात पाणी व्यवस्थापन जल नियोजन, पाणी अडवणं, नवीन लागवड, धान्य, वनस्पती, पक्षी-कीटक निरीक्षण, सेंद्रिय खतनिर्मिती आणि वापर, त्याच्या मुलांच्या पद्धतीनं केलेल्या नोंदी नि त्याशी निगडित गृहअभ्यास. असं स्वरूप आहे. नैसर्गिक शेतीच्या तत्त्वावर ‘पूवीधाम’ उभे आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून मुलांना आनंद शोधण्याची वाट मुलांना सापडली आहे. लहान मुलगाही धीटपणे सांगतो, ‘आपलं ताट आपण उचला. स्वच्छ धुवा आणि जागच्या जागी ठेवा.’ शिकण्यात आनंद असतो हे मुलांनी जाणणं हे इथे घडतंय.
‘पूवीधाम’ परीक्षा घेत नाही पण मुलांचं मूल्यमापन होतं. एक फळा हा अॅप्रिसिएशन लिहिलेला बाह्य़भागी दिसला नि मुलांबाबतच्या नोंदी (जाणवतील तेव्हा) अण्णा आणि आक्का करताना दिसल्या. या अभ्यासक्रमाचा गाभा निसर्ग आहे कारण तो जगण्याचा आशय आहे. हा निसर्ग जपायला, अनुभवायला, वाढवायला शिकणं म्हणजे शिकणं आणि ते विविध कृतीतून. इथे कोणतंही मूल असं सांगतं, ‘‘आम्ही शिकतो कारण आम्हाला शिकावंसं वाटतं, आमच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, कोणी पाठवतंय शाळेत म्हणून आम्ही जात नाही. आम्ही निसर्गाचा आनंद घेतो. काही टाकत नाही, काही जादाचं आणत नाही.’’
आपल्यासारख्या ठरावीक वेळेच्या तासिका नाहीत. ज्याला गणित शिकायचं तो गणित शिकतो, ज्याला भाषा अनुभवायचीय तो शाळेच्या ग्रंथालयात जाऊन हवं ते पुस्तक घेऊन काम करतो. इंग्रजी आणि तमिळ भाषा पहिलीपासूनच मुलांना बोलता येतात नि तसं वातावरण उपलब्ध होतंय. माध्यमाचा गोंधळ अजिबात नाही. शेतमजुरांची मुलंही आपल्याशी इंग्लिश बोलायचा न लाजता प्रयत्न करतात. ‘पूवीधाम’मध्ये शिक्षा नाही हे सांगायलाच नको. याचा अर्थ मुलांकडून काही घडत नाही असा नाही. एखाद्या मुलानं जर मारहाण केलीच तर त्या गटातील सगळी मुलं ओळीत उभी राहतात आणि मारहाण करणाऱ्या मुलाला सांगतात, ‘‘तू आम्हाला जेवढं मारायचंय तेवढं मार.’’ अशा वेगळ्या रचनेमुळे मुलं ‘पूवीधाम’ मस्त अनुभवतात. गंमत म्हणजे, इथे काम करणारे आक्का आणि अण्णा यांना समाधानकारक मानधन मिळते, पण जर रजा काढली तर मानधनातून रक्कम वजा होते. अण्णा आणि आक्काबरोबर गप्पा झाल्या. ते रोज नवीन शिकतात, नवीन असतात. कोणतीही गोष्ट करण्याची त्यांना लाज वाटत नाही. बाहेर रानात-जंगलात शेतात घेऊन जाणाऱ्या मुलांबरोबर मुलं होऊन त्यांच्याबरोबर काम करतात. वर्गखोलीत लेकुरवाळ्यासारखी अण्णा-आक्का असतात. जेवढे जास्तीत जास्त कृतीयुक्त शिकता येईल तेवढं मुलं नि शिक्षक शिकतात. मुलं सतत प्रश्न विचारतात, काय काय बोलत असतात. कुठेच भीती, तणाव जाणवला नाही. पराकोटीची सहजता नि साधेपणा, समजूतदारपणा नि समानानुभूती जाणवली. जयाक्का चटणी वाटायला वसतिगृहातल्या मुलींबरोबर सहज बसली नि गीताक्कांच्या भोवती मुलांचं कोंडाळं सहज जमत होतं.
अभ्यासक्रमच नाही त्यामुळे ते उरकायचंय, संपवायचंय हा ताण नाही नि परीक्षा नाही त्यामुळे काही उरकणं नाही. प्रत्येक मोडय़ूल पूर्ण व्हायला २/३ महिने लागतात. बकाबक खा आणि ओका असं नसल्यानं, अनुभवातून शिकणं घडत असल्यानं मुलांची इथं ज्ञान ग्रहण करण्याची ताकद खूप वाढलीय. कारण मुलं विषयांचा अभ्यास नाही करत, विषयांचे त्यांचे तास नसतात, नुसती बडबड करणारा शिक्षक नसतो तर ज्ञानाची क्षेत्रं म्हणून भाषा, गणित, विज्ञान म्हणून बघितलं जातं. नैसर्गिक शेतीतून या ज्ञानदालनात मुलांना सोडलं जातं. समजून करणं आणि करत करत समजणं ही पद्धत आहे. खरं तर इथला अभ्यासक्रम सखोलपणे इथे जागेअभावी देता येत नाही म्हणून, पण तो देण्यात कोणतीही आडकाठी किंवा लपवाछपवी नव्हती. तो वापरणं कळेपर्यंत नक्कीच अवघड आहे कारण तिथे साचा नाही तिथे विचारपूर्वकताच हवी. आणि हे सातत्यपूर्ण निर्जीव शिक्षण नाही तर सातत्यपूर्ण प्रयोग, बदल आणि शिकणं इथे घडत असल्याचं जाणवलं. मुलांची चित्र, मुलांच्या वह्य़ा, वह्य़ातलं लेखन, सर्वत्र वावरणं यात ‘पूवीधाम’चा विचार अगदी क्षणोक्षणी जाणवत होता. वर्गात शिकवणं इथं दिसलंच नाही, पण अनुभवातून आणि अनुभवसमृद्ध निसर्गातून हे शिकलं जातं हे इथे जाणवलं. साडेआठला मुलं आली की एक तास रोज काम करतात. मग साबण, मातीकाम, कचरा व्यवस्थापन, चित्रकला, बांधकाम, शिवणकाम, कातरकाम अशा अनेक गोष्टी करतात. ५वी ते ८वीची मुलं शेतात रोज जातात. पालक तक्रार करत नाहीत आमच्या मुलांना कामाला लावतात नि शाळाही मुलांच्या कामाकडे ‘राबवून घेणं’ अशा दृष्टीने शेतीकामाचा विचार करत नाही.
तरीही मनात प्रश्न राहतो काय असेल अभ्यासक्रम! कारण त्याच्यात निसर्गप्रेम – संपूर्ण वसुंधराप्रेम निर्माण झालंय. मुलांना कंटाळा शब्द माहीत नाही. ऱ्हाईम्स, इंग्लिश अॅक्टिव्हिटी, कन्सेप्ट, तमिळ, तमिळ अॅक्टिव्हिटी, कन्सेप्ट, सायन्स, कन्सेप्ट अॅक्टिव्हिटी, मॅथ्स, कन्सेप्ट, अॅक्टिव्हिटी असे एकाखाली एक मुद्दे नि पुढच्या ५/६ रकान्यात स्वरूप, मूल्यमापन, साधने, प्रयोग, साहित्य, उपक्रम, प्रकल्प असे घटक नि हे सारे इयत्तानुसार! शेतमजुरांची मुलं आज त्यांच्या शेतात काम करतात पण अभिमानाने, वेगळा दृष्टिकोन घेऊन!
renudandekar@gmail.com