12 July 2020

News Flash

कतरा कतरा है जिम्न्दगी

लाकूड कातण्याचे काम करणारी कतारी जमात. पण याचं एकूणच आयुष्य म्हणजे ‘कतरा कतरा मिलती है, जिंदगी,’ असंच आहे.

| May 23, 2015 01:01 am

timuktलाकूड कातण्याचे काम करणारी कतारी जमात. पण याचं एकूणच आयुष्य म्हणजे ‘कतरा कतरा मिलती है, जिंदगी,’ असंच आहे. संपूर्ण देशात यांचे घर नाही, शेत नाही, पिढय़ान्पिढय़ा भटके. खायला पुरेसं अन्न नाही. शिक्षण नाही. रोजचं जगणं हीच आयुष्याची लढाई!
‘‘आमच्या जातीत साडेनऊ पिड आहेत. ‘पिड’ म्हणजे गोत्र. बावरी, पितलाडे, जुनी, भोंड, खिची, राठोड, बिदावत, बेंस, सद्भय्या, अद्रातिया या दहांपैकी अर्धे गोत्र कोणते हे आम्हाला नक्की माहीत नाही. गोत्राची नावे म्हणजेच आडनावे आहेत. पण बहुतेकांची आडनावे कतारी अशीच लागली आहेत. सगोत्र लग्नास बंदी आहे. लग्नासाठी गोत्र वेगळेच पाहिजे. एखाद्याला/एखादीला परजातीतील व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर स्वत:चे गोत्र सोडून दुसऱ्या गोत्राचा कुटुंब प्रमुख त्या परजातीच्या व्यक्तीस आपल्या कुटुंबात ‘बसवून घेण्यास’ तयार झाला पाहिजे. ‘बसवून घेणे’ म्हणजे त्या व्यक्तीस स्वत:ची मुलगी/मुलगा अथवा भाऊ/बहीण मानणे आणि या विचार व कृतीस जातपंचायतीची मान्यता मिळाली की जातीच्या नियमांप्रमाणे रीतसर लग्न होऊ  शकते. अशा निर्णयास जातपंचायतीची मान्यता मिळण्यासाठी पूर्वी सव्वा रुपया फी होती. जातपंचायतीच्या या ‘सव्वा रुपया फी’ला समाजात मोठा मान होता. कालमानाप्रमाणे त्यात बदल होऊन आज ती फी अडीच हजार रुपये झाली आहे. ही फी विवाहेच्छुकांनी भरायची नाही. परजातीच्या विवाहेच्छुक व्यक्तीस आपल्या ‘घरात बसवून घेणाऱ्या’ कुटुंबप्रमुखांनी ती भरायची असते. अशा परजातीच्या व्यक्तीस ‘जांगड’ म्हणतात. तिला विवाहानंतर तिच्या मर्जीप्रमाणे देवधर्माच्या चालीरीती पाळण्याची मुभा आहे. जांगड व्यक्तीशी विवाह करून घेणाऱ्या जातीतील व्यक्तीला जात पंचायतीत कसलाही दंड किंवा खर्च भरावा लागत नाही. अशा तऱ्हेने आमच्यात दलित, मुसलमान महिलांशी आणि धनगर व इतर जातीतल्या पुरुषाशी विवाह झालेले आहेत. म्हणून आमच्यात होळी, दिवाळी, मोहरम, बुद्ध पौर्णिमा हे सारे सण साजरे केले जातात.’’ अशी माहिती पन्नाशी ओलांडलेल्या शांताबाई कतारी सोलापूरकर यांच्यासह जमनाबाई पितलाडे, सीताबाई बावरी, पारुबाई खिची, हिरावती बावरी व इतर पंधरा-वीस महिला आणि पुरुष कार्यकर्ते जयसिंग कतारी व राजेश कतारी यांच्याकडून मिळाली.
आम्ही बसलो होतो वीर हनुमंत वाडी, लातूर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या कतारी या भटक्या जमातीच्या वीस-पंचवीस झोपडय़ांच्या वस्तीत. लातूर परिसरात विखुरलेल्या कतारी जमातीची सुमारे सत्तर कुटुंबे तात्पुरत्या झोपडय़ातून राहतात. यांची लोकसंख्या पाचशेपर्यंत सहज असेल. पारंपरिक माहितीप्रमाणे हे कतारी लोक स्वत:ला मेवाड प्रांतातील चितोडगडचे मूळ रहिवासी समजतात. राणा प्रतापसिंहाच्या काळात तलवारी, जंबिया, गुप्ती, खंजीर वगैरे हत्यारांचे ‘म्यान’ आणि त्या हत्यारांच्या नक्षीदार लाकडी मुठी तयार करणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होय. त्यांच्या तयार हत्यारांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी यांच्याकडे होती. चितोडगडच्या पाडावानंतर, खास करून महाराणा प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर हे लोक उपजिविकेसाठी देशभर विखुरले गेले. गावोगाव भटकून धारदार हत्यारांना म्यान करून देणे व घरगुती उपयोगाच्या लाकडी वस्तू तयार करून विकणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला.
लाकूड कातण्याचे काम करतात म्हणून हे कतारी. चौरंग-दिवाण-पलंगाचे नक्षीदार पाय, पाट, पोळपाट-लाटणे, रवी, मुसळ, उदबत्तीचे स्टँड, कुंकवाचा करंडा, खेळणी आदी लाकडी वस्तू हे लोक बनवतात. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, शहरातले चौक, यात्रा अशा सार्वजनिक ठिकाणी विक्रीसाठी डोक्यावर टोपली घेऊन किंवा अंगाखांद्यावर वस्तू लटकवून फिरतात. गावोगाव फिरून किंवा वेगवेगळ्या आठवडी बाजारात फिरून वस्तू विक्री करण्याचा प्रयत्नही ते करतात.
या जमातीच्या परंपरागत व्यवसायात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. पहाटे पाचच्या आधी उठून दूर उघडय़ावर जात प्रातर्विधी उरकून पाणी, झाडलोट, शेणसडा, स्नान, चहा व लेकरांची न्याहारी ही कामे करावी लागतात. नंतर सकाळी आठच्या आत लाकडी वस्तू बनविण्याचे काम महिलांना सुरू करावे लागते. लाकडी वस्तूंना खाचा पाडणे, खिळे ठोकणे, कापणे, वस्तूंना पॉलिश करणे, लांबी लावणे, शिवाय तयार माल एका बाजूला नीट लावून ठेवणे आणि कताईसाठी आवश्यक माल कताईजंत्रीजवळ  ठेवणे ही कामे महिलाच करतात. महिलांचे पुढचे महत्त्वाचे व मेहनतीचे काम म्हणजे नक्षीदार कताईसाठी जंत्रीला बसविलेली वस्तू वेगात फिरती ठेवण्यासाठी तिला गुंडाळलेली दोरी धरून ताकदीने मागे पुढे सतत ओढत राहणे. टोकदार आणि धारदार हत्याराने पुरुष कातिव काम/कताई करतो. या पद्धतीने दिवसभरात स्त्री-पुरुषांची एक जोडी तीस किलो लाकडाचे काम करू शकते. पाचशे रुपयांच्या लाकडात दिवसभरात ८०० ते ९०० रुपयाचे काम होऊन ३०० ते ४०० रुपयांचा लाभ होऊ  शकतो. पण यासाठी लेकरांबाळांसह घरच्या किमान चार जणांना राबावे लागते. मात्र रस्त्यावर विक्री करताना पोलिसांचा खूप जाच होतो. ‘‘ ते केवळ दंडुके मारून आम्हा विक्री करणाऱ्यांना पळवतात असे नाही. तर विक्रीचा सारा माल जप्त करून दंडुके मारतात व रिकाम्या हाताने आम्हास पिटाळून लावतात. लेकराबाळांना दंडुके खाताना पाहून जीव टांगणीला लागतोच. पण तहान-भुकेची पर्वा न करता मेहनत करून तयार केलेला विक्रीसाठीचा माल तो लुटून नेतो तेव्हा मेल्याहून जास्त दु:ख होते. जंत्री फिरवायची सोपी गोष्ट नाही. त्या पोलीसदादाला पंधरा मिनिटंपण फिरवायला जमणार नाही. रोज तीन-तीन तास रक्त आटवितो आम्ही जंत्री फिरविण्यात. लेकराबाळांना काय खाऊ  घालायचं, सगळंच लुटून नेल्यावर?’’ अशा शब्दात जमनाबाई पितलाडे यांनी, हतबलतेतून आलेले आपले नैराश्य प्रकट केले. रात्री ८ नंतर घरी येऊन स्वयंपाकापासून घरची कामे करावी लागतात. सकाळची न्याहारी होईल अशा तऱ्हेने स्वयंपाक रात्री एकदाच होतो. जेवणही रात्री एकदाच होते. रोज मांसाहार घेणाऱ्या या लोकांना आता तो आठवडय़ातून एकदा घेणेसुद्धा कठीण झाले आहे.
कतारी जमातीचे लोक बहुतांशी हिंदू धर्माच्या चालीरीती पाळतात. परंपरेनुसार होळीचा सण मोठा साजरा होतो. होळीच्या दोन महिने आधीपासून महिला रोज पहाटे उठून घरातील पुरुषांना अंथरुणातच  पाणी टाकून भिजवतात. लहान-मोठय़ांसह सर्वाना भिजवले जाते. तर धुलीवंदनाच्या दिवशी सर्व पुरुषमंडळी धूळ, माती, शेण एकत्र करून घरातील मुली व महिलांना भिजवतात. नाचतात, गातात. होळीच्या दिवशी खास पुरणपोळीचा बेत असतो.

जमातीत प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर जन्मदात्यांना, परंपरेने चालत आलेला ‘जीमनचा कायदा’ पाळावा लागत असे. या कायद्यानुसार, जन्मानंतर तिसऱ्या दिवशी सूर्योदयाला जन्मदाता आपल्या घरासमोर उभा राहून भोवतीच्या आपल्या जातबांधवांना उद्देशून मोठय़ा आवाजात पानसुपारीला येण्याचे निमंत्रण देत असे. सोबत प्रत्येक कुटुंबाला एक शेर गहू व पुरेसा गूळ वाटप करत असे. याशिवाय पाहुणे आले असतील तर ते परत जाताना त्यांनाही असाच शिधा देऊन पाठविले जाई. मात्र आता वाढलेल्या महागाईमुळे हा कायदा पाळणे जाचक ठरत होते. म्हणून २१ फेब्रुवारी २०१२ रोजी लातुर येथे भरलेल्या राष्ट्रीय महापंचायतीने हा कायदा शिथील करून शिधा वाटपाऐवजी सर्वाना एकवेळचे जेवण द्यावे आणि तेही पहिल्या बाळाच्या वेळेसच, असे ठरविले.
 पंचाच्या संमतीने एकमेकांना टिळा लावून लग्न ठरवले जाते. हुंडा पद्धत नाही. लग्न मुलीच्या दारात होते परंतु सगळा लग्नखर्च मुलाकडून केला जातो. मुलीची बाजू गरीब असल्यास तिला काही रोख रक्कम दिली जाते. मूळ परंपरा ७ दिवसांच्या लग्नाची आहे. रोज हळद तेल लावण्याचा कार्यक्रम होतो. सातव्या दिवशी लग्न लागते. त्या दिवसाचे जेवण मात्र मुलीकडून दिले जाते. लातूर येथे झालेल्या राष्ट्रीय महापंचायतीने या सात दिवसांच्या लग्नाऐवजी दोन दिवसांच्या लग्नास मंजुरी दिली आहे. परंपरेनुसार विधवा-विवाहास मान्यता नव्हती. या महापंचायतीने त्यास मान्यता दिली आहे.
 जातीतच पळून जाऊन प्रेमविवाह केला असल्यास आणि दोन्ही कुटुंबांची  विवाहाला मान्यता असल्यास त्या जोडप्याचा विधिवत पुन्हा विवाह लावला जातो. परंतु दोन्हींपैकी एकाने जरी विरोध किंवा नाराजी दर्शवली तर पळून गेलेल्या दोघांना पंचायतीच्या मध्यभागी बसविले जाते. जातीतला ‘जांगड’ पुरुष उठून त्या दोघांच्या डोक्यावर कांदे ठेवून प्रत्येकी पाच जोडे मारतो. यानंतर त्या विवाहास मान्यता मिळते. मुला-मुलींच्या चुकांचा दोष त्यांच्या आईबाबाना दिला जात नाही.
दोन्ही बाजूंनी सहमतीने काडीमोड (घटस्फोट) मागितल्यास पंचायतीकडून मान्यता मिळते. दोघांची सहमती नसेल तर चौकशी होते. मुलाकडे दोष आढळल्यास जिवंतपणीच त्याचे दिवस घालतात (मृत्यूविधी) व मुलीस सुटका मिळवून देतात. अशा मुलाची गत जिवंत असून मेल्यासारखी होते. मुलीबाबत असा विधी करण्याची पद्धत नाही.
सर्व प्रौढ महिला निरक्षर आहेत.  मुलेही नंतर शाळा सोडून घरच्या कामात गुंततात. म्हणूनच गळतीचे प्रमाण मोठे व सुशिक्षितांचे प्रमाण फार कमी आहे. पाचशे लोकसंख्या असून या वस्तीत १२ वी झालेले संभाजी, हिरा व राहुल बावरी हे तीन युवक बेकार आहेत. पुरुषांत दारूचे व्यसन मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी स्त्रियांना नवऱ्यांकडून खूप मारहाण होते. बाळांतपणानंतर तिसऱ्या दिवशी महिला जंत्रीवर कामासाठी बसतात. बहुतेक सगळ्यांची बाळंतपणं घरीच होतात.
यांची भाषा मेवाडी राजस्थानी. संपूर्ण देशात घर नाही, शेत नाही. पिढय़ान्पिढय़ा भटके. गेल्या चाळीस वर्षांपासून लातुर परिसरात आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील येवल्यामध्ये लक्कडकोट परिसरात यांच्या ३५ झोपडय़ा आहेत. त्यांपैकी १५ कुटुंबांकडे दारिद्रय़ रेषेखालील कार्ड आहे. बाकीचे पात्र असून दुर्लक्षित आहेत. १०५ जणांची मतदान यादीमध्ये नोंद आहे; परंतु जातीचे दाखले मात्र कोणाकडेही नाहीत. सांडपाण्याच्या निचऱ्याची सोय नाही.  पावसाळ्यात सर्व झोपडय़ांमध्ये पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात लाकडाचे काम पूर्णपणे बंद राहते. याच अवस्थेत जगणारा कतारी समाज लातूर, पूणे, मुंबई, नाशिकसह सोलापूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्य़ांत विखुरलेला आहे. यांची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे तीस हजार तर भारतात दोन लाखांच्या आसपास असावी.
या समाजाच्या स्वावलंबीपणे जगण्यासाठी आवश्यक संधी व साधन, अन्याय-अत्याचारापासून संरक्षण याची मागणी  प्राधान्याने भागणे गरजेचे आहे. ही किमानतेची मागणी आहे. समतेवर आधारित विकासाची लढाई पुढे खूप दूर आहे.
अॅड. पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2015 1:01 am

Web Title: life of woodcutter community
Next Stories
1 घण लोखंडावर घण आयुष्यावर
2 जगणे झाले अवघड
3  बहिष्कृत जमात?
Just Now!
X