गणपतीला मी अजून शोधतेच आहे. तो मला अशा माणसासारखा भासतो, ज्याच्यासमोर मी माझ्या मनातलं मोकळेपणानं बोलू शकते, पण तो मात्र त्याच्या मनातलं काहीच सांगत नाही. त्याच्या अनेक मूर्तीमधनं, चित्रांमधनं मी त्याच्या डोळ्यांतून त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या जन्माच्या गोष्टीपाशी मी किती तरी वेळ थांबून पाहिलं आहे. ती गोष्ट लहानपणी पहिल्यांदा आजीकडून ऐकली तेव्हाच खूप गूढ वाटली होती..
माझं वेगवेगळ्या देवांशी वेगवेगळं नातं आहे. लहानपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या अनेक देव-देवतांच्या गोष्टींमुळे त्या त्या देवाची किंवा देवीची एक माझी प्रतिमा मी माझ्या मनात कळत-नकळत चितारली आहे. त्या देवांमधला सगळ्यात जवळचा कृष्ण वाटला. त्यानं देवासारखा देव असूनही स्वत:चं ‘माणूस’पण इतकं सहज स्वीकारलं. त्याच्यासमोर मी काहीही न लपवता आहे तशी उभी राहू शकते, माझ्यातल्या माणूसपणासकट. तो मी आहे तशीच मला स्वीकारेल असं वाटतं. तो सखा वाटतो. शंकराची भीती वाटते. त्याच्यासमोर सतत शहाण्यासारखंच वागावं लागेल, नाही तर तो चिडेल असं वाटतं.
गणपतीला मात्र मी अजून शोधतेच आहे. तो मला अशा माणसासारखा भासतो, ज्याच्यासमोर मी माझ्या मनातलं मोकळेपणानं बोलू शकते, पण तो मात्र त्याच्या मनातलं काहीच सांगत नाही. त्याच्या अनेक मूर्तीमधनं, चित्रांमधनं मी त्याच्या डोळ्यांतून त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या जन्माच्या गोष्टीपाशी मी किती तरी वेळ थांबून पाहिलं आहे. ती गोष्ट लहानपणी पहिल्यांदा आजीकडून ऐकली तेव्हाच खूप गूढ वाटली होती. ‘एके दिवशी काय होतं, शंकराची बायको पार्वती आंघोळीला निघालेली असते. ती काय करते, ती तिच्या अंगच्या मळापासून एक छोटासा मुलगा बनवते आणि त्याला राखणीला बसवून सांगते, ‘कुणालाही आत येऊ देऊ नकोस.’ पार्वती तर नेहमीच आंघोळीला जात असेल, त्या दिवशीची आंघोळ अशी काय वेगळी होती की, तिला कुणाला तरी राखणीसाठी निर्माण करावंसं वाटलं. तिला पूर्ण एकटं राहावंसं वाटत होतं का.. या सगळ्याला काही वेगळा अर्थ आहे का.. ती तिच्या मळापासून एक मुलगा बनवते हे माझ्यासाठी चित्तथरारक आणि नवं होतं. तोपर्यंत आजीनं सांगितलेल्या इतर काही गोष्टींमध्ये गांधारी नावाच्या कुणाला तरी शंभर मुलं झाल्याचं कळलं होतं. म्हणजे ती शंभर वेळा प्रेग्नंट होती का.. ती नऊशे महिने त्याच अवस्थेत होती का.. तिच्या वयाचं काय वगैरे  लहान वयातले मनुष्य जातीचे प्रश्न माझ्या मनात उडय़ा मारत असताना माझं मीच त्याला ‘देवांच्या राज्यात असं होत असावं,’ असं उत्तर दिलं होतं, पण तरीसुद्धा पार्वतीदेवीनं कुठल्याही पुरुषाशिवाय आपला आपणच एक मुलगा निर्माण करणं मला भन्नाट वाटलं. त्या लहान वयात मुलं होण्यासाठी पुरुष नेमका का लागतो ते माहीत नव्हतं, पण लागतोच हे देवलोकांतल्या इतर गोष्टी ऐकून आणि आसपास बघूनही कळत होतं. त्या कळण्याला पार्वतीनं हलवून टाकलं. मला वाटतं मी जशी हलले तसाच पार्वतीचा नवरा शंकरही हलला असणार, कारण आजीनं पुढे सांगितलेल्या गोष्टीत, तिथे शंकर येतो. तो मुलगा त्याला म्हणतो, ‘आत जाऊ नका.’ शंकराला राग येतो. तो म्हणतो, ‘कोण तू?’ तो म्हणतो, ‘मी पार्वतीचा मुलगा. तुम्ही आत जायचं नाही.’ शंकर संतापतो आणि रागानं त्या इटुकल्याचं डोकंच उडवून टाकतो. आता शंकर कोपिष्ट होता. त्याला राग आला, त्यानं डोकं उडवलं. हे सगळं इतकंचही असू शकतं.. पण असंही असू शकतं- शंकराशिवाय पार्वतीनं बनवलेल्या त्या इटुकल्याचा ‘हा माझ्याशिवाय हिनं निर्माण केलाच कसा!’ म्हणून शंकराला विशेष संताप येतो. देवांना ‘मेल इगो’ असतो का माहीत नाही, शंकराला त्यामुळं जास्त राग आला का.. देवास ठाऊक!(म्हणजे त्याचं त्याला) तर, तिचं तिने बनवलेलं ते इटुकलं गोड पोर असं मुंडक्याविना पाहून पार्वतीचं जे व्हायचं ते झालं असणार. राग, संताप आणि बरंच काही.. त्या ‘बरंच काही’मुळे शंकर-पार्वतीच्या नात्यात काही गंभीर प्रश्नचिन्हं उभी राहिली असतील असं वाटतं, कारण शंकराची पुढची कृती मला सैरभैर आणि घाबरलेली वाटते. त्या काळी घटस्फोट नसले तरी बायकांच्या हातात आपल्या रागानं पुरुषांना घाबरवण्याचे काही वेगळे मार्ग नक्कीच असणार. ते मार्ग पार्वतीनं अवलंबिल्यानं शंकर लगोलग बाहेर पडला, वाटेत जो पहिला प्राणी आला त्याचं डोकं घाईनं उडवून ते त्यानं त्वरेनं त्या मृत इटुकल्याच्या धडावर चिकटवलं. गोष्टीचा हा भाग ऐकताना मला शंकराला वाटेत दिसलेला पहिला प्राणी हत्ती होता याचं हायसं वाटलं. हत्तीच्या मुंडक्यामुळं गणपती इतका गोड दिसतो. शंकराला जर चुकून लांडगा किंवा वाघ दिसला असता तर..? असो. तर गणपतीच्या जन्मामुळं पार्वतीचा राग शांत झाला. तिनं शंकराला माफ केलं. त्या अर्थानं शंकरानं हत्तीचं डोकं त्या इटुकल्याला चिकटवताना त्या इटुकल्याचं शरीर जसं सांधलं तसंच त्याच्या आणि पार्वतीच्या नात्यालाही सांधलं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
आधुनिक काळातला मनुष्यलोकातला एक जीव म्हणून या सगळ्याकडे बघताना मला गणपती अशा गोड मुलासारखा वाटतो, ज्याच्यामुळे विभक्त होऊ घातलेले त्याचे आई-बाबा एकत्र आले. देवलोकात घडलेली ही गोष्ट मी माणसाच्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करते आहे. मला देवांमधलं ‘माणूसपण’ शोधावंसं वाटतं, कारण मी माणूस असल्याने देवांशी जुडण्याचा मला तोच एक मार्ग वाटतो. कृष्णाच्या अनेक गोष्टींमधून, नात्यांमधून मला त्याच्यातला माणूस दिसतो. त्यानं कंसाचा वध करून त्याच्या आई-वडिलांचा सूड घेतला तेव्हा त्याचं माणूसपण दिसलं. शंकर-पार्वतीच्या नात्यातल्या अनेक भांडणांच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांचंही माणूसपण दिसलं. गणेशानं मात्र मला त्याच्या परिघाच्या आत येऊ दिलेलं नाही असं वाटतं. तो खटय़ाळ आहे, चतुर आहे. व्यास महाभारत लिहिताना तो त्यांचा लेखनिक होतो, क्षणोक्षणी त्यांना योग्य प्रश्न विचारून व्यासांनाही त्याच्या बुद्धीची साक्ष देतो, त्याच्या गोष्टींमधून, मूर्तीमधून तो हसरा, आनंदी दिसतो. त्याला मोदक आवडतात. त्याच्या नाचणाऱ्या, पहुडलेल्या, वाद्यं वाजवणाऱ्या कुठल्याच मूर्तीमध्ये दु:ख नाही. स्थितप्रज्ञता आहे, प्रसन्नता आहे, पण तरी त्याला विचारावंसं वाटतं, या सगळ्याच्या आतला तू काय आहेस? कसा आहेस?
कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आम्ही तुझ्या स्मरणानं करतो. ती सुरुवात झाली म्हणजे ‘श्रीगणेशा’ झाला असं म्हणतो आम्ही. तू निराकार आहेस. कोऱ्या कागदावर केवळ एक गोलाकार रेषा ओढली तरी तू त्यात प्रगटतोस. ‘अन्याय माझे कोटय़ानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी’, असं साकडं आम्ही तुला घालत असताना आम्हा कुणालाच आमचे वाढते अपराध पोटात घालून घालून वाढत चाललेल्या तुझ्या पोटाची तमा नाही. तू आमची दु:खं पोटात घालतोस, पण आम्ही तुला तुझ्या मनातलं कधीच विचारलं नाही. तुला तुझ्या जन्माची गोष्ट कळली तेव्हा काय वाटलं? तुझ्या आधीच्या रूपाला शंकरानं मारलं म्हणून तुझ्या मनात त्याच्याविषयी काही अढी राहिली का? यातलं काही तू कुठल्याच गोष्टीतनं बोलल्याचं मला माहीत नाही. स्वत:बद्दल तू कुठेच काहीच बोलत नाहीस.
स्वत:बद्दल काही न बोलणाऱ्या मितभाषी माणसांना आमच्या मनुष्यलोकात ‘गृहीत’ धरतात. त्यांना मग समोरचे हवं तसं वाकवतात. त्यांचा विचार न करता. आमच्यातल्या काही जणांची अरेरावी इतकी वाढली आहे की, आम्ही तुझ्यासारख्या मितभाषी देवांनाही गृहीत धरायला मागेपुढे पाहात नाही. देवांना काय वाटतं, काय आवडतं, देवाचा कशानं कोप होतो हे सोयीस्करपणे माणसांनीच ठरवण्याच्या काळात इतर देवांचा तर होतोच आहे, पण तुझा जरा जास्तच वापर होतो आहे, पण असंही वाटतं आहे, या सगळ्यानंतर तू शांतच आहेस हेही ठीकच, कारण इतरांना काय वाटावं हे जबरदस्ती ठरवणाऱ्या माणसांसमोर तू काही बोलू धजलास तर तू देव आहेस हे विसरून ते तुलाही गोळ्या घालायला कमी करणार नाहीत. तूही घाबर. आम्ही तर घाबरलेले आहोतच.
तरीही हे सगळं बोलू धजण्याचं कारण गणेश चतुर्थी जवळ आली आहे. त्या दिवशी पहाटेच तुझ्या निमित्तानं कर्कश कल्लोळ सुरू होईल. तुझ्या निमित्तानं लावल्या गेलेल्या या कर्कश गाण्याचा आणि तुझा सुंदर डौल, शांत प्रसन्नपणा या सगळ्याशी काय संबंध आहे याचा मी विचार करते आहे. दिङ्मूढ होऊन.
मागे एकदा एका खूप मोठय़ा लेखकावर एक खूप मोठा कार्यक्रम झाला आम्हा मनुष्यलोकात. त्यात त्याचा उदो उदो होत असताना तो लेखक त्याच्या मित्रांना खेदानं म्हणाला, ‘एका वयानंतर जिथे तिथे असे स्वत:चे गणपती बसताना पाहावं लागतं.’ तो लेखक मनुष्य असल्याने अमर नव्हता. तो गेला, सुटला. तू तर देव. तुझी आता या सगळ्यातनं सुटका दिसत नाही.
amr.subhash@gmail.com