डॉ. मृण्मयी भजक

डॉक्टर म्हणून छान सुरू असताना ते सोडून मुंबईत लोकलने प्रवास करत, पाठीवर ‘शूट’साठीच्या सामानाची बॅग, एका हातात पर्स धरून गर्दीतून चालत असते. पण तरीही मनावर काही ओझं नसतं. मन आनंदी असतं. डॉक्टर ते अँकर हा प्रवास माझी मलाच गाठ घालून देणारा ठरतोय.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?

आजपासून दहा वर्षांनंतर मी काय करत असेन? माहिती नाही, पण दहा वर्षांपूर्वी मी काय करत होते हे ठळकपणे आठवतंय आणि आज मी स्वत:ला त्या ‘मी’ तून बाहेर काढलं आहे, खऱ्या अर्थाने जगते आहे, याचा आनंद वाटतो आहे. अर्थात, हे सगळं विवेचन फक्त माझ्यापुरतं आहे. ती नकोशी ‘मी’ ही माझ्यापुरतीच होते, आणि आताची हवीहवीशी वाटणारी ‘मी’ ही माझ्या पुरतीच आहे. कदाचित इतरांचा, समाजाचा या दोन्ही परिस्थितींकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णत: उलटा असू शकतो.

म्हणजे तसं पाहायला गेलं, तर दोन चित्रं अशी आहेत – दहा वर्षांपूर्वी, पुण्यात असताना, मी ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट आणि शर्ट घालून, लॅपटॉपची बॅग घेऊन, माझ्या कारमधून उतरून ऐटीत डॉक्टर म्हणून सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत माझ्या केबिनमध्ये बसत असे आणि आता दहा वर्षांनंतर मुंबईमध्ये बऱ्याचदा वाहतूक कोंडी वाचवण्यासाठी लोकलने प्रवास करत, पाठीवर ‘शूट’साठीच्या सामानाची बॅग, एका हातात पर्स धरून गर्दीतून चालत असते. पण तरीही त्या गर्दीतून, धक्काबुक्कीतून, पाठीवर-हातामध्ये ओझं घेऊन जाताना, मनावर मात्र काही ओझं नसतं. मन आनंदी, सकारात्मक आणि जीवनाविषयी प्रचंड आसुसलेलं असतं. लौकिकार्थाने हा शुद्ध वेडेपणा असेलही कदाचित. हे सगळं काय? तर एक प्रवास – डॉक्टर ते अँकर असा! मोक्याच्या जागी, घराच्याजवळ क्लिनिक होतं.. सगळं कसं छान चाललेलं पण ‘आहे मनोहर तरी..’ असं काहीसं होतं..

इतक्या छान सुरू असलेल्या आयुष्यात मंगेश पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ची बाधा मला झाली आहे, असं अधूनमधून वाटे.. काय करावं कळत नव्हतं. एकीकडे सूत्रसंचालक म्हणून विविध कार्यक्रम आणि दुसरीकडे दवाखाना असं समांतर सुरू होतं. सुरुवातीला छानच वाटत होतं, पण आता दोघांपैकी एकच निवडलं पाहिजे या वळणावर येऊन पोहोचले, तेव्हा निर्णय फारच अवघड झाला. चांगलं चाललेलं क्लिनिक बंद करून सूत्रसंचालन, लेखन आणि संवादाच्या क्षेत्रात यायचं असं मी ठरवलं. ठरवलं म्हणजे खूप विचार करून या धाडसी निर्णयाप्रत पोचले.  ‘निवेदनच तर करायचंय ना? मग दवाखाना बंद करायची काय गरज आहे? दोन्ही सुरू ठेवायचं.’ हा अनेकांकडून येणारा प्रांजळ सल्ला. तर, मेडिकलची एक सीट ‘वाया’ घालवलीस म्हणून काहींची हळहळ आणि थोडा रागही जाणवतोच.

शाळा-महाविद्यालयामध्ये जरी मी नेहमी स्टेजवर असायचे, नाटक, एकांकिका, वक्तृत्व यांमध्ये भाग घेत होते, सांस्कृतिक क्षेत्रातल्या माझ्या मुशाफिरीची कल्पना माझ्या परिसरात होती, तरी सूत्रसंचालनाची पुन्हा सुरुवात केली तेव्हा मी पुण्यात आले होते, लग्न करून. शून्यातून सुरुवात करायची होती. पुणे दूरदर्शन, साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम, थोडंबहुत लेखन, संपादन अशी कामं सुरू केली. नवनव्या लोकांशी जोडली जाऊ लागले. प्रत्येक कार्यक्रम नवा, विषय नवा, त्यामुळे वेगवेगळ्या विषयातील माहिती घेणे, सतत अभ्यास करणं असं सगळं सुरू  झालं. माझं मलाच उमजलं, की मला हा अभ्यास करायला आवडतो. गाण्यांच्या एखाद्या कार्यक्रमासाठी रात्रभर जागून, ती गाणी ऐकून, त्यातली शब्दकळा समजावून घेऊन, संगीतातले बारकावे टिपून मग संहिता आकार घेऊ लागते तेव्हा ते एक सर्जनाचं रूपडंच समोर येतं. प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा त्याची तयारी अधिक सुंदर आहे, हे जाणवलं तेव्हा वाटलं, हो मी योग्य मार्गावर आहे.  एक काम बघून दुसरं काम, ते बघून तिसरं अशी एकातून एक कामं मिळू लागली आणि हळूहळू मी रुळू लागले.

व्यवसाय बदलला, की बऱ्याच गोष्टी बदलतात. तुमचं राहणीमान, जीवनशैली, भाषा वगैरे.. डॉक्टर म्हणून एक ठरावीक वेळापत्रक होतं. आता ‘फ्रीलान्सिंग’ म्हटलं की सगळंच काहीसं विस्कळीत वाटायचं. ‘प्रत्येक दिवस, नवा दिवस.’ असं वाचायला कितीही छान वाटलं तरी ‘एक विशिष्ट रुटीन नाही’ ही गोष्ट सुरुवातीला पचनी पडायची नाही. वाचन आणि थोडंफार लेखन तर लहानपणापासून होतंच सोबतीला, नंतर नियमितपणे लिहू लागले. सदराची डेडलाइन असली, की लिहून होतंही. मधल्या वर्षांत वाटत होतं, की लेखनाचा झरा आटला. नियतकालिकांच्या सदरांमुळे मात्र हात पुन्हा लिहिता झाला. ‘अमेरिका खट्टी-मिठी’ हे ‘ग्रंथाली’नं प्रकाशित केलेलं पुस्तक माझ्याकडून लिहिलं गेलं.

अगदी नव्याने दवाखाना बंद केला होता तेव्हाची गोष्ट, कुणाला तरी भेटायला एका कार्यालयामध्ये गेले होते. पूर्वनियोजित वेळ घेऊनही बराच वेळ थांबावं लागलं. त्यावेळी मला जाणवलं की ‘वैद्यकीय प्रॅक्टिस करताना अगदी रोजच्या रोज माझ्यासाठी किती तरी रुग्णांना थांबावं लागत असे, तेव्हा त्यांच्या थांबण्याबद्दल मी फार विचार केला नव्हता.  कुणासाठीही थांबायची सवयच नव्हती मला. पण.. अगदी पहिल्याच माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आले होते आणि सकाळी नऊ वाजता सुरू होणारं चित्रीकरण दुपारी एक वाजता सुरू झालं त्यावेळी वाट पाहाणं हा प्रकार भयानक वाटला होता. पुढे असे अनेक अनुभव येऊ लागले. सुरुवातीला खूप राग यायचा, मग त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी उपाय शोधत गेले. एकदा तर  कुणाचीही काहीही चूक झालेली नसताना तांत्रिक बिघाडामुळे एका एपिसोडचं चित्रीकरण तीन वेळा करावं लागलं होतं. पण यातूनच हळूहळू माझा संयम वाढू लागला आणि नंतर टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम सुरू झाल्यावर ‘थांबणे’ हा प्रकार थांबला.

असं अकारण थांबायला लागलं, की मला माझी दवाखान्यातली रोलिंग खुर्ची, तिचा रुबाब आठवायचा. पुढे आकाशवाणीवर तशीच खुर्ची आणि तसाच माहोल मिळाला. म्हणजे खुर्चीत मी निवांत एकटी.. आधी मी केबिनमध्ये असायचे, आता स्टुडिओमध्ये होते. आधी माझ्यासमोर रुग्ण असायचे, आता निर्जीव फेडर, कॉम्प्युटर आणि विविध उपकरणं.. पण फरक होता तो हा, की आकाशवाणीवर मला ऐकणारे हजारो कान होते आणि त्या कानांपर्यंत माझा आवाज पोहोचवण्यासाठी मी उत्सुक होते. लहानपणी गावातून लाऊडस्पीकर जायचा. मी सहा-सात वर्षांची असेन तेव्हा.. तेव्हा वाटायचं, की त्या स्पीकरमागचा आवाज आपला असावा. रेल्वेच्या उद्घोषणा ऐकतानाही असंच वाटायचं. आज स्टुडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करताना, ती लहानपणीची इच्छा पूर्ण होताना छान वाटतं.

‘साम संजीवनी’या कार्यक्रमाचे संचालन करताना माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग झाला, तर ‘दूरदर्शन सह्य़ाद्री’वर आता सुरू असलेल्या ‘सखी सह्य़ाद्री’चं सूत्रसंचालन करताना  जगाच्या कानाकोपऱ्यात राहून माणसं किती मोठं काम करत असतात हे कळलं. ‘आनंदवना’तील डॉ. विजय पोळ, रत्नागिरीच्या शिल्पाताई पटवर्धन, कोल्हापूरच्या पल्लवी कोरगांवकर, वीरमाता अनुराधा गोरे, धारावीचा कायापालट करणारे ‘बीएमसी’मधील सुभाष दळवी अशी किती तरी मोठी यादी आज माझ्याजवळ आहे.

सोलापूरचा तरुण आनंद बनसोडे एव्हरेस्ट पार करतो. आयआयटीमधील दोन होतकरू तरुण ग्रामीण भागातील गर्भवती स्त्रियांसाठी खास अ‍ॅप बनवतात, कुणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतं, कुणी प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करताना स्वत:च्या घरात जखमी प्राण्यांना आसरा देतात. सख्या तर किती वेगवेगळ्या भेटल्या.. कुणी भिंतीवर चित्रं काढणारी, कुणी स्त्रियांसाठी काम करणारी, कुणी कचरा वेचक बायकांसाठी राबणारी, कुणी उच्चविद्याविभूषित, तर कुणी अल्पशिक्षित पण सगळ्या पदव्या तिच्या कामापुढे नतमस्तक व्हाव्यात अशी!

बुद्धिमत्ता किती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते हे मला जवळून अनुभवता आलं आणि आपण अजून किती ‘लहान’ आहोत याचीही जाणीव झाली. सुधा मूर्ती, अण्णा हजारे, अ‍ॅड. उज्ज्वल निकम, रामदास भटकळ, अशा मान्यवरांसोबत मंचीय कार्यक्रमातून संवाद साधता आला. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यासारखं झुंजार तृतीयपंथी व्यक्तिमत्त्व पाहता आलं. साहित्य, सिनेसृष्टीतील मान्यवरांशी संवाद साधता आला. मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. मोठय़ा उंचीवर जाऊन नम्र असलेली माणसं भेटली तशी उगीचच बढाया मारणारीसुद्धा भेटली. हळूहळू माणसं ‘वाचता’ येऊ लागली.

या प्रवासात एक गोष्ट मात्र जाणवली ती म्हणजे, आपली आवडती गोष्ट एकच असते पण ती करण्यासाठी काही नावडत्या गोष्टीही कराव्या लागतात. मेकअप लावणे-काढणे, साजेशी वेशभूषा, साजेसे दागदागिने, हा सगळा प्रांत माझ्यासाठी अगदी अनोळखी आणि तसा नावडता होता. गरज म्हणून मग हळूहळू ते सगळं शिकले. आता त्यातली कला, त्यातली नजाकत समजू लागली.

कोणत्याही क्षेत्रात शिकण्यासारखं खूप आहे. तिथे प्रगतीला नेहमीच वाव असतो. शब्दोच्चार, चांगले आणि मोजके शब्द वापरणे, चांगलं ऐकणे, पाहणे हे चालू आहे. आज उपलब्ध असणाऱ्या असंख्य क्षेत्रांमध्ये निवेदन हे छोटंसं क्षेत्र पण त्यातही जितकं खोलात शिरावं तितका तळ आणखी खोल असल्याचं जाणवतं. मी एक प्रवासी आहे, शिकते-शिकवतेही आहे. निवेदन, संवाद कार्यशाळा घेताना अनेक गोष्टी नव्या नजरेने पाहते आहे आणि या शिकण्या-शिकवण्यातून. स्वत:ला रोजच्या-रोज शोधते आहे. सगळ्या क्षेत्रांप्रमाणे इथेही प्रचंड स्पर्धा आहे पण स्वत:वर काम करणे ही एकच गोष्ट मला महत्त्वाची वाटते. नवनवे अनुभव घेत राहताना कवयित्री संजीवनी बोकील यांच्या ओळी आठवतात –

‘कुणाचे तरी आभार मानावेसे वाटतात मला असे घडवल्याबद्दल की, माथ्यावर चंद्र-सूर्य तळपत असतानाही जपाविशी वाटते आतली ठिणगी विश्वास ठेवावासा वाटतो तिच्या प्रकाशावर!’

प्रेक्षक संख्या पन्नास असो, की पन्नास हजार, कार्यक्रम तितक्याच तन्मयतेने करते आहे.. एकदा मुंबईबाहेरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अक्षय कुमार येणार होते. मी मंचावर जायच्या आधी मला सांगण्यात आलं, की पन्नास हजाराच्यावर प्रेक्षक जमा झाले आहेत. मला वाटलं, एवढे प्रेक्षक पाहून ताण येईल, की काय.. पण मंचावरून तो एवढा मोठा प्रेक्षकवर्ग प्रत्यक्ष पहिला आणि मनात आनंदाला भरतं आलंय असं वाटू लागलं. पुन्हा अंतर्मनानं ग्वाही दिली, की मी योग्य मार्गावर आहे. आणि फ्लॅशबॅकमध्ये मला मी दिसू लागले. वक्तृत्व, अभिनय स्पर्धामध्ये हिरिरीने भाग घेणारी. कोणतीही वक्तृत्व स्पर्धा म्हणजे माझी आवडीची आणि बक्षीस मिळवून देणारी. या बक्षिसांचं कोण कौतुक असायचं तेव्हा. पण आत्ता जाणवतंय, की बक्षिसांपलीकडे जाऊन तो ‘अनुभव’ किती शिकवणारा होता. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व, अभिनय, एकांकिका स्पर्धा, नंतर राज्यनाटय़ स्पर्धा, यांची धुंदी काही औरच होती.

‘मुलगी झाली हो’, ‘हुंडा नको गं बाई’, ‘बाप रे बाप’ अशा चळवळीतल्या नाटकांमध्ये शाळेत असल्यापासून काम करत होते. नाटकाचे दौरेही केले. त्यावेळी चळवळीच्या विचारांची छाप मनावर पडली. एक वैचारिक बैठक, विवेकवाद तयार झाला. वैचारिक बैठक तयार झाली, तरी ‘वैचारिक चौकट’ तयार होऊ नये, असं वाटतं. आज नवनवीन विचारप्रवाह जाणून घ्यायला आवडतात. आणि त्यातून ‘डी-लर्निंग’ही कळायला लागलं.

आपण स्वत:भोवती अनेक बिरुदं लावत असतो. एका अर्थी स्वत:ला वेगवेगळ्या चौकटीत बसवत असतो. कधी-कधी आधार वाटतो चौकटीचा, काही हव्याही असतात. तरीही त्या आपल्यातलं काहीतरी ‘बंद’ करणाऱ्या चौकटी असतात. सगळ्या चौकटींबाहेर आपल्याला पडता येईल का? असाही विचार येतो. स्वत:चा शोध सुरू असतो. आता या आत्मशोधातून दहा वर्षांनंतर कुठे असेन माहीत नाही पण कुठेही असले तरी अधिक सजग आणि समृद्ध झालेली असेन असा आशावाद याक्षणी वाटतोय.

drmrunmayeeb@gmail.com

chaturang@expressindia.com