13 July 2020

News Flash

निराधार वृद्धांची यशोदा

निर्मलाताईंनी जेव्हा पुण्यातील ‘निवारा’मध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिथली परिस्थिती भयानक होती. ५५ वृद्ध तिथे राहत होते, पण शिस्त नव्हती. कुठेही जेवायचं, काहीही खायचं. सर्वत्र गलिच्छपणा,

| June 21, 2014 01:01 am

निर्मलाताईंनी जेव्हा पुण्यातील ‘निवारा’मध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिथली परिस्थिती भयानक होती. ५५ वृद्ध तिथे राहत होते, पण शिस्त नव्हती. कुठेही जेवायचं, काहीही खायचं. सर्वत्र गलिच्छपणा, पडकं-झडकं, उदास वातावरण होतं. खरं तर हे दृश्य पाहून एखादीनं पळ काढला असता, पण त्या दीनदुबळ्यांकडे पाहून निर्मलाताईंमधील वात्सल्य जागं झालं आणि त्यांनी त्यांनी ‘निवारा’ हेच आपलं ध्येय ठरवलं. आज ८५व्या वर्षीही उत्साहात काम करणाऱ्या निर्मलाताई सोवनी यांच्याविषयी..

कधी मन धास्तावलेले समोर उंच कडा
धीर देतो प्राजक्ताचा अंगणभर सडा
मुंगीलाही मिळतात इथे मुबलक साखरदाणे तुमच्या-माझ्या प्रेमावाचून
म्हणून फुलतात राने..

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, हे सांगणारी मीरा सहस्रबुद्धे यांची ही कविता आठवायला कारणीभूत ठरली ती देवस्वरूप अशा निर्मलाताई सोवनी यांच्याशी अलीकडेच घडलेली गाठभेट. निराधार व निष्कांचन अशा वृद्धांसाठी चालवल्या जाणाऱ्या पुण्यातील ‘निवारा’ या वृद्धाश्रमाप्रति त्यांनी दिलेलं ३६ वर्षांचं योगदान पाहताना एकच भावना मनात उचंबळून येते.. तेथे कर माझे जुळती!
अमुक माणसाकडून तमुक कार्य करून घ्यायचं आहे हे त्या जगन्नियंत्याने आधीच ठरवलेलं असावं म्हणून तर त्याने निर्मलाताईंना चौथ्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडूनदेखील सहिसलामत ठेवलं. ही घटना १९७२ सालातली. तेव्हा त्यांचं वय असेल ४२/४३च्या आसपास. बाल्कनीबाहेर लावलेल्या कुंडय़ांतील माती वाकून सारखी करताना अकस्मात तोल गेला. पण नशीब बलवत्तर. एवढय़ा उंचावरून पडूनही दोन मणक्यांचा चक्काचूर होण्यावर निभावलं आणि महिन्याभरातच बाई उठून उभी राहिली. एवढंच नव्हे तर आज ८५व्या वर्षीही एखाद्या तरुणीला लाजवेल अशा उत्साहात त्या काम करत आहेत.
निर्मलाताईंचं माहेर नागपूरचं, पण शिक्षण मात्र पुण्यात झालं. मानसशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.ए. केलं. शिकत असतानाच लग्न झालं. लग्नानंतर त्यांनी सोशल वेलफेअर (डी. एस. डब्ल्यू.) हा डिप्लोमा घेतला. कर्वे इन्स्टिटय़ूटतर्फे सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाचा पहिल्या बॅचच्या ८ विद्यार्थ्यांपैकी त्या एक! ताराबाई शास्त्री, शरदचंद्र गोखले, भास्करराव कर्वे.. अशा थोर गुरुजनांच्या सान्निध्यात त्यांच्या तरल मनाची मशागत झाली.
सासरी एकत्र कुटुंब, वयोवृद्ध आजेसासूबाई व अंथरुणाला खिळलेली अपंग पुतणी या दोघींची जबाबदारी निर्मलाताईंनी आनंदाने स्वीकारली. सहा-सात वर्षे या सेवेत गेली. त्यांच्या निधनानंतर डॉ. नातू आणि इंदिराबाई नातू या पुण्यातील समाजसुधारक जोडप्याने त्यांना घराबाहेर पडण्यास उद्युक्त केलं. त्यानुसार त्यांनी डॉ. नातूंच्या महिला क्लबचं काम पाहायला सुरुवात केली.
रोज संध्याकाळी त्या आपल्या मुलांना घेऊन भिकारदास मारुतीजवळील स्काऊट ग्राऊंडवर जात. त्या वेळी तिथे कार्यरत असलेले डॉ. नातू त्यांना म्हणाले, ‘नुसतंच बाहेर थांबता, त्यापेक्षा आत येऊन आम्हाला थोडी मदत करा. तेव्हापासून भारत स्काऊट्स अ‍ॅण्ड गाईड्सशी त्यांचं जे नातं जोडलं गेलं ते आज ५० र्वष उलटली तरी तितकंच घट्ट आहे. आज ८५ व्या वर्षीही त्या रोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळात न चुकता मैदानावर हजर असतात. सध्या तिथे येणारी मुलं ही त्यांच्या हाताखाली घडणारी तब्बल पाचवी पिढी.
डी. एस. डब्ल्यू. या कोर्सनंतर निर्मलाताईंनी ‘कुटुंब नियोजन’ हा एक वर्षांचा अभ्यासक्रम केला. त्यानंतर त्या श्रुतिका सेवा मंदिर या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये काम करू लागल्या, पण मोबदला न घेता. कारण मिस्टर सोवनी यांची मुळी ती अटच होती.. सेवेचं काम करतेस ना, मग त्या कामाचे पैसे नाही घ्यायचे. घरची श्रीमंती होती असंही नाही पण मनाची श्रीमंती मात्र भरपूर होती.
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांना मदत करण्याचं काम त्यांनी थोडं थोडकं नव्हे तर तब्बल २३ र्वष केलं. पण कालांतराने तिथल्या अटी जाचक होऊ लागल्या तेव्हा काय करायचं या विचारात असताना पुन्हा एकदा डॉ. नातूंनीच दिशा दाखवली. म्हणाले, ‘द्या ते सगळं सोडून आणि आमच्या ‘निवारा’त या.’ निराधार दुबळ्या वृद्धांमध्ये आपल्याला काम करायला कितपत जमेल याची निर्मलाताईंना शंका वाटत होती. पण ‘गुरू वाक्यं प्रमाण्म’ मानून त्या ‘निवारा’त येऊ लागल्या. १९७८ पासून गेली ३६ र्वष दुधात साखर विरघळावी इतक्या सहजतेने त्या ‘निवारा’ परिवारात एकरूप झाल्यात.
२०१२-१३ या वर्षांत शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलेल्या ‘निवारा’ वृद्धाश्रमाचा इतिहास निर्मलाताईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘१८६३ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ५ आद्यप्रवर्तक म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सरदार नातू, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, सरदार रास्ते आणि सरदार किबे. त्यांच्या दृरदृष्टीचं त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनीही कौतुक
केलं आणि या प्रकल्पासाठी सदाशिव (नवी) पेठेतील, ठोसरपागेजवळची, मुठा नदीकाठची साडेपाच एकर जागा दिली. त्याबरोबर १०० माणसं इथं राहतील या हिशेबाने महिन्याला माणशी ३ रुपयेप्रमाणे वर्षांचं ३६००० रुपयांचं अनुदानही मंजूर केलं. (सोनं १५ रुपये तोळा होतं त्या काळची ही गोष्ट) पुढच्याच वर्षी सर डेव्हिड ससून या दानशूर व्यापाऱ्याने या आश्रमाला पन्नास हजारांची देणगी दिली. या पैशांतून चहूबाजूने बैठय़ा कौलारू इमारती उभ्या राहिल्या व हा आश्रम ‘डेव्हिड ससून अनाथ पंगुगृह’ या नावाने ओळखला जाऊ लागला. आज ‘निवारा’ असं सुटसुटीत नामकरण झालं असलं तरी कागदोपत्री मूळ नाव कायम आहे.
निर्मलाताईंनी जेव्हा ‘निवारा’मध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिथली परिस्थिती भयानक होती. ५५ वृद्ध तिथे राहत होते, पण त्यांना कसलीच शिस्त नव्हती. कुठेही जेवायला बसायचे. काहीही खायचे. गलिच्छपणा तर पाचवीलाच पूजला होता. सर्वत्र पडकं-झडकं, उदास वातावरण होतं. खरं तर हे दृश्य पाहून एखादीने पळ काढला असता, पण त्या दिनदुबळ्यांकडे पाहून निर्मलाताईंमधील वात्सल्य जागं झालं आणि त्यांनी पदर खोचला. त्या वेळच्या एकेक आठवणी सांगताना त्यांचे डोळे एकसारखे भरून येत होते. असाच एक दिवस १९८० सालचा! कोठीघरातील सगळ्या डब्यांमध्ये दुपारीच खडखडाट झाला होता. आता रात्रीच्या जेवणाचं काय.. निर्मलाताईंची घालमेल सुरू झाली. त्यांनी संस्थेचे विश्वस्त राजाभाऊ माटे यांना फोन लावला. (हे निर्मलाताईंचे ‘निवारा’तील गुरू) ते म्हणाले, ‘घरी या आणि पैसे घेऊन जा.’ खरं तर त्यांच्याकडेही फारसे पैसे नव्हते. पण आत्मीयतेला थोडंच मोजमाप असतं! फोन खाली ठेवला इतक्यात एक बाई आत आल्या. म्हणाल्या, ‘खडकी येथील स्वातंत्र्यसैनिक बाळूकाका कानिटकर यांची मी सून. त्यांनी आपल्या ७५व्या वाढदिवसानिमित्त हे ५००० रुपये ‘निवारा’ला दिलेत.’ निर्मलाताई म्हणाल्या की, त्या वेळच्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. लगोलग बाजारात जाऊन त्यांनी तांदूळ, गहू, तेल, चहा, साखर.. अशा वस्तूंनी कोठी भरून टाकली. त्या म्हणाल्या की त्या दिवसापासून असा एकही दिवस गेला नाही की कमीत कमी १५ ते २० हजारांची मदत आली नाही.
समाजाच्या पाठिंब्याचं आणखी एक उदाहरण त्यांनी सांगितलं. गेल्याच वर्षी पुण्यातील य. स. अध्ये या उद्योगपतीने त्यांना बोलावून १५ लाख रुपयांचा चेक हातात दिला. या पैशांच्या विनियोगासंबंधी मत विचारताच एवढंच म्हणाले, ‘तुमच्या हातात दिलाय म्हणजे त्याचं सोनंच होणार.’ हा विश्वास निर्मलाताईंनी अनेक वर्षांच्या समर्पणातून मिळवलाय. ज्येष्ठ प्रसारमाध्यमतज्ज्ञ विश्वास मेहंदळे यांनी निवाऱ्याच्या स्मरणिकेत म्हटलंय. पुण्यात काय किंवा इतर शहरात काय वृद्धाश्रमांना आज तोटा नाही. त्यांची अर्थकारणंही आखलेली. पण समाजातल्या एकटय़ा-दुकटय़ा दुर्दैवी स्त्री-पुरुषांना आसरा देणारा निवारा मात्र या साऱ्याला अपवाद आहे. पुणे शहराचं ते एक भूषण आहे.
इथल्या बेघर वृद्धांसाठी केवळ पैशांचाच नाही तर सेवेचा हातभार लावण्यासाठीही अनेक जण प्रेमाने येत असतात.. निर्मलाताई सांगत होत्या. कुणी जेवण वाढण्यासाठी तर कुणी कोठीघरातील धान्याचा हिशेब ठेवण्यासाठी. नीलिमा रेड्डी या निवृत्त प्राध्यापिका तर गेली १३ र्वष निवासींसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन करताहेत.
निर्मलाताई व इतर विश्वस्त यांच्या अथक प्रयत्नांनी आज ‘निवारा’चं चित्र पूर्ण बदललंय. वड-पिंपळ, आंबा, फणस, चिंच, नारळ.. अशा झाडांनी सर्व आसमंत हिरवागार झालाय. या झाडांवर अनेक पक्षी येतात आणि पाठोपाठ पक्षीप्रेमीही. अळूचं आणि केळीचं तर बनंच बनलंय. त्याचबरोबर गुलाब, मोगरा, बकुळ.. अशा फुलांनी इथलं वातावरण गंधित केलंय. या वनराईचा दुहेरी उपयोग होतो. एक उत्पन्न मिळविण्यासाठी व दुसरा वृद्धांचे हात गुंतले रहाण्याकरिता. सगळा व्यवहार मात्र काटेकोर. अळूची ५ पानं घरी नेताना निर्मलाताई प्रथम पर्समधून पाच रुपये काढून ठेवणार. ‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने आता ही शिस्त सर्वाना लागलीय.
सध्या ‘निवारा’त ५० पुरुष व ९० स्त्रिया आहेत. निर्मलाताई म्हणाल्या की तुम्ही खाल्ला नसेल एवढा आंबा या मंडळींनी चाखलाय. याचं कारण अनेक जण (विशेषत: मारवाडी समाज) इथे पेटी दिल्याशिवाय घरी आंबा नेत नाहीत. निवासींची प्रकृती चांगली राहावी यासाठी कोणाकडचं शिजवलेलं अन्न घ्यायचं नाही हा निर्मलाताईंनी केलेला नियम. जुन्या कपडय़ांच्या बाबतीतही तेच. त्या म्हणतात, ‘आमचे निवासी भिकारी नाहीत, ते मायेचे भुकेले आहेत. त्यांना सन्मानानेच वागवायला हवं..’ याच भावनेने प्रत्येक निवासीला वर्षांला कपडय़ांचे चार नवे जोड दिले जातात.
खाणं-पिणं, कपडालत्ता, टीव्ही, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम अशा सुविधा विनासायास मिळत असूनही कधी कधी माझं तुझं होतंच असणार, अशा वेळी डोकं थंड ठेवून यांना कसं सांभाळता, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘ही सगळी माणसं छोटय़ा छोटय़ा सुखांना पारखी झाली आहेत. त्यांना आपल्या परीने सुख द्यायचं एवढंच मी ध्यानात ठेवते. निवासी जिवंतपणी अनाथ नसावेत तसेच मृत्यूमुळे बेवारशी गणले जाऊ नयेत हे आमचं ब्रीद आहे. निवाऱ्यात प्रवेश मिळताक्षणीच त्यांच्यावरचा अनाथ हा शिक्का पुसला जातो.
निवासींसाठी आठवडय़ातून चार वेळा डॉक्टर्स येत असले तरी अस्थिभंग व इतर छोटय़ा-मोठय़ा ऑपरेशन्ससाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करावी लागतं. त्यासाठी वर्षांला ५ ते ६ लाख रुपयांची तजवीज करावी लागते. निर्मलाताई म्हणाल्या, ‘सरकारी ग्रॅन्ट कधीही येते. तीही फक्त जेवणापुरती. समाज पाठीशी उभा आहे’ म्हणूनच हे शिवधनुष्य आम्ही उचलू शकतोय. त्याबरोबर उत्पन्नाची एक बाजू चालू राहावी म्हणून संस्थेने पुणेकरांसाठी व्यायामशाळा, फिजिओथेरपी सेंटर, ३५० खुच्र्याचे सभागृह अशा सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय रोजच्या ६५/७० लिटर दुधावरची साय विरजवून केलेल्या लोण्याचीही इथे विक्री केली जाते.
अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांचं घराला ओझं होतं. त्यांना सांभाळणं हीसुद्धा एकप्रकारची वृद्धसेवाच आहे हे निर्मलाताईंनी इतर विश्वस्तांना पटवलं आणि १९८७ पासून ‘निवारा’त बाह्य़रुग्ण विभाग सुरू झाला. या सेवेसाठी मात्र सध्या माणशी ७००० रुपये आकारले जातात.
निर्मलाताईंचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. मुद्रा, रेकी व काही आसनं करून सकाळी आठच्या आत त्या ‘निवारा’त पोहचतात. या वेळी सर्वानी स्वच्छ आंघोळ करून नीटनेटक्या कपडय़ांत समोर दिसलं पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. ‘खरा तो एकची धर्म’ या सानेगुरुजींच्या प्रार्थनेनंतर एकेकाची विचारपूस करत त्या सर्वाना आपल्या हाताने नाश्ता वाढतात. मग ऑफिसची कामं, पत्रव्यवहार, भेटीगाठी, आवारातून कमीतकमी ३ ते ४ फेऱ्या यात दुपारचे दोन वाजतात. त्यानंतर प्रभातरोडवरील आपल्या घरी आल्यावर जेवण. दुपारचा साडेचार ते साडेपाच हा वेळ ब्रिज खेळण्यासाठी. मोजून १६ डाव टाकायचे. जास्तीचा मोह नाही. त्यानंतर स्काऊटचं मैदान गाठायचं. तिथे जाताना वाटेत ‘निवारा’त डोकावून सगळं आलबेल आहे ना ते बघायचं. रात्री आठ वाजता घरी आल्यावर मुलगा व सून यांच्याशी दिवसभराच्या गप्पा. मिस्टर सोवनी आता हयात नाहीत पण सून व जावई ही त्यांच्या आयुष्यात आलेली लाख मोलाची माणसं.
काही माणसांना घडवताना परमेश्वर हातचं रखून ठेवत नाही असं म्हणतात ते निर्मलाताईंकडे बघताना १०० टक्के पटतं. खानदानी सौंदर्य, अंबाडय़ावर मोगऱ्याच्या कळ्यांचा पांढराशुभ्र गजरा आणि त्या शुभ्र कळ्यांसारखंच सात्त्विक, प्रांजळ अंतरंग. पुरस्कारांनी निर्मलाताईंसमोर नतमस्तक व्हावं हे साहजिकच. ती रक्कमही (अंदाजे ३ लाख रुपये) ‘निवारा’लाच अर्पण.
संपूर्ण कुटुंबाची विचारधारा एक.. निराश्रितांच्या डोळ्यातील कृतज्ञता हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 1:01 am

Web Title: nirmalatai sovani of niwara
टॅग Old People
Next Stories
1 परमानंद प्राप्ती
2 रोजचं जगणंच.. आव्हान
3 क्या हुआ? क्या हुआ? क्या हुआ?
Just Now!
X