|| रावी किशोर

नाटकाचे, अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण, मुंबईसारख्या शहरात प्रत्यक्ष नाटकाचे सादरीकरण, नाटय़ क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या विचारांमध्ये खूपच बदल झाला. पहिल्या वर्षांच्या शेवटी फ्रान्सवरून आलेल्या असील रईस सरांनी अनुवादित आणि दिग्दर्शित केलेल्या ‘जिहाद यात्रा’ या हिंदी-उर्दू नाटकातील ‘बेल्ला’ हे पंचविशीतले पात्र साकारल्यानंतर तर माझ्या आत्मविश्वासाला अधिक बळ मिळाले. मी नव्याने मला सापडू लागले होते. हा विश्वास मला कलेमुळे मिळाला. उंबरठा ओलांडल्यावर खूप मोठं आकाश आपलं होतं याची जाणीव या काळात होत होती..

अगदी काही वर्षांपर्यंत जर मला कोणी गंभीरपणे जरी सांगितले असते की, तू कलाकार होशील, तर मी फक्त हसून पुढे गेले असते. कारण मी तसा विचारही कधी केला नव्हता. त्यातच मला डॉक्टर व्हायचे होते, अ‍ॅक्टर नाही. त्यामुळे माझे ते ध्येयही नव्हते; पण दहावीनंतर सायन्सला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे अत्यंत नाउमेदीने ‘कॉमर्स’ला गेले. त्यानंतर किमान बारावीनंतर तरी तालुक्याबाहेर जाऊन शिकता येईल असे वाटत होते; पण तेही शक्य झाले नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतर दोन्ही वेळा मी प्रचंड खट्ट झाले. मनासारखं काहीच होत नव्हतं. प्राथमिक-माध्यमिक शाळेची सुरुवातीची दहा वर्षे आणि त्यानंतरची बी.कॉम.च्या पहिल्या वर्षांपर्यंत मी साधारणत: एकाच प्रकारच्या  शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक वातावरणात होते.

माझं गाव आजरा तालुक्यातलं तेरणोली. घर ते शाळा/महाविद्यालय ते घर असे अत्यंत साचेबद्ध, कसलेच नावीन्य नसलेले ते दिवस होते. मी आजरा महाविद्यालयात बीकॉम करायचे. पहिल्या वर्षांला असताना एकदा लक्षात आले की, शिवाजी विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये लगबग सुरू आहे. त्यातल्या एका पथनाटय़ासाठी मुली पाहिजेत. त्या वेळी मला काय वाटले होते, आता नेमकेपणाने सांगता नाही येणार, पण मी सरांना जाऊन भेटले आणि पथनाटय़ासाठी नाव नोंदवले. वाटले, कदाचित या ठिकाणी आपल्याला थोडं मानसिक समाधान मिळेल.

पण कसचं काय? पथनाटय़ाचं दिग्दर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातून विजय पवार सर आले होते. त्यांनी नाव नोंदवलेल्या सर्व इच्छुक मुला-मुलींना नृत्य करायला लावलं. आवाजाचीही ‘टेस्ट’ घेतली. पथनाटय़ासाठी आवाज खणखणीत असणे अपेक्षित होते. मी मात्र अत्यंत लाजरीबुजरी आणि मान वर करून न बघणारी होते. शिवाय घशातून आवाजच फुटत नसे कधी. शिवाय नृत्य म्हणजे अशक्य गोष्ट होती. झालं, मी दोन्ही ठिकाणी नापास. सोबतची सगळी मुले-मुली मला चिडवत असत. मला खूप रडायला यायचे त्या सगळ्यामुळे.

तरीही विजय सरांनी मला विचारले, ‘‘तू इतर मुला-मुलींसारखी बिनधास्त का बोलत, वागत, नाचत नाहीस? सारखी दबून-दबून का राहतेस?’’ मला त्यांना काय उत्तर द्यायचे ते सुचलेच नाही. माझ्यात त्या दिवसापर्यंत कधीच आत्मविश्वास नव्हता. घरच्या एकूण परिस्थितीमुळे लहानपणापासून दबून, मन मारून राहण्याचीच सवय अंगवळणी पडली होती. मी त्यांच्यासमोर खाली मान घालून उभी. तोंडातून शब्दच निघत नव्हता. त्यांना बहुधा माझी मन:स्थिती कळली असावी. त्यांनी काय विचार केला माहीत नाही. ते म्हणाले, ‘‘या पथनाटय़ाचे निवेदन तूच करायचे.’’ आणि तालमीला सुरुवात केली. महाविद्यालयाच्या मोठय़ा मैदानावर सगळे जण एकत्र येऊन तालमी करत असू. तालमीमध्ये त्यांनी आम्हा सगळ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली. माझा आवाज फुटावा म्हणून ते सर्वासमोर मला ओरडायचे. ..आणि या सगळ्यांचा परिणाम झालाच. कालपर्यंत मी बोललेले माझ्याच कानापर्यंत पोहोचत नव्हते आणि आज संपूर्ण मैदानभर पसरलेल्या सगळ्या मुलांपर्यंत माझा खणखणीत आवाज पोहोचत होता. मला चिडवणाऱ्या सगळ्या मित्रमत्रिणींसोबत मलाही आश्चर्याचा धक्का बसला. विजय सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे माझ्यात आत्मविश्वास जागृत झाला होता. पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या वतीने काही एकांकिका आणि लघुनाटिका स्पर्धामध्ये सहभाग घेतला आणि तिसऱ्या वर्षांला असताना जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सादर केलेल्या एकांकितेतील कामासाठी तर मला चक्क अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळाले. योगायोगाने माझ्या वाढदिवशीच या पारितोषिकाची घोषणा झाली.

खरं तर मला तोपर्यंत ‘नाटक म्हणजे काय?’ हेच माहीत नव्हते. मी कधी व्यावसायिक किंवा प्रायोगिक नाटके बघितलीही नव्हती, कारण त्यांचे प्रयोग आमच्या भागात झाले नव्हते. झाले असतील तरी, मुलींनी जाऊन नाटक-चित्रपट बघावा असे कोणतेच वातावरण नव्हते; पण एक जाणवत होते, हे काही तरी वेगळे आहे. कारण रंगमंचावर असतानाची ‘मी’ ही इतर वेळच्या ‘मी’पेक्षा अत्यंत वेगळी, मोकळी असते, आत्मविश्वासपूर्ण असते. एक कमालीचे समाधान मिळत असे. त्यामुळे हीच आपली दिशा असे मी तेव्हा ठरवले; पण आमच्या गावात, तालुक्यात याबद्दल फारशी सोय नव्हती आणि मी नाटकात काम वगैरे काही करते हे गावात माझ्या आई-आबा आणि दीदी वगळता कोणालाही मी घाबरून सांगितले नव्हते.

दरम्यान, अभिनयाचे पहिले पारितोषिक मिळाल्यानंतर महाविद्यालयातर्फे जिल्ह्य़ातल्या सगळ्या वर्तमानपत्रांत फोटोसह बातमी दिली गेली. कारण तोपर्यंत महाविद्यालयातल्या कुणालाच हे पारितोषिक कधीच मिळाले नव्हते; पण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात फोटो पाहिल्यावर आनंद व्हायच्याऐवजी भीतीच जास्त वाटू लागली. वाटलं, गावातले लोक आता मला ‘काहीबाही’ बोलतील. गावात तेव्हा एसटी बसेस कमी यायच्या. नाटकांच्या तालमी तर महाविद्यालयामधले तास संपले की संध्याकाळी उशिरापर्यंत असायच्या. त्यामुळे गावात ज्या मुलांकडे बाइक आहेत तीच मुले नाटकांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुढे असायची. काही मुलं स्वभावाने चांगली होती. त्यांनी ‘बाइकवरून घरी सोडू’ असे सांगितल्यावर मग मलाही यात भाग घेता येऊ लागला; पण बाइकवर मुलाच्या मागे बसून येणे हे गावात शिष्टसंमत कधीच नव्हते. त्यामुळे बस स्टँडच्या अलीकडेच, कोणी बघणार नाही अशा ठिकाणी त्या मुलाच्या बाइकवरून उतरून, कोणी बघायच्या आधीच खाली मान घालून, घराच्या दिशेने वाघ मागे लागल्यासारखे जावे लागत असे. घराचा उंबरठा दिसेपर्यंत माझ्या जिवात जीव नसायचा.

सुरुवातीला ‘कर’ म्हणणाऱ्या आईनेही मग माझ्या सततच्या अनियमित येण्यामुळे ओरडायला सुरुवात करत, ‘आता बस झालं’ म्हटले होते. अशा वेळी वर्तमानपत्रात फोटोसह बातमी येणे म्हणजे माझ्या मनात धरणीकंपच झाला होता. आता माझे नाटक वगैरे सगळे संपलेच. हातातोंडाशी आलेला घास या प्रसिद्धीमुळे निसटून जातोय असेच वाटू लागले. मी मला दोष देऊ लागले. ‘का उगाच पारितोषिक मिळाले?’ असे वाटू लागले.

पण झालं उलटेच. गावाचं अचानक मनपरिवर्तन झाल्यासारखं माझं सगळीकडे कौतुक सुरू झालं. ‘पोरीनं नाव काढलं’ असं लोक म्हणू लागले. चार-पाच ठिकाणी सत्कार झाले. जिल्हा स्तरावर महाविद्यालयाला मिळालेले तोवरचे ते पहिलेच पारितोषिक. असे असले तरी महाविद्यालयामधले काही सर आणि मित्रमत्रिणी मात्र, ‘या सगळ्याचा काही फायदा नाही. उद्या लग्न झाल्यावर कुठलं नाटक करशील? त्यापेक्षा पुस्तकात लक्ष घाल. शेवटचे वर्ष आहे. नंतर पश्चात्ताप होईल वगैरे वगैरे..’ झालं. मी पुन्हा टेन्शनमध्ये. नाटक सुटत नव्हते आणि या सगळ्यांचे म्हणणे पाठ सोडत नव्हते. अत्यंत विचित्र अवस्थेत बी.कॉम.ची परीक्षा दिली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामुळे थोडं हायसं वाटलं, कारण महाविद्यालयाच्या निमित्ताने ‘नाटक’ यापुढेही सुरूच राहणार होते.

एम.कॉम.ला प्रवेश घेतला; पण त्या दोन वर्षांत नाटकात फारसं काम नाही करता आलं. नाटकामध्ये वेगळे शिक्षण असते हे सांगणारे, हुकमी मार्गदर्शन करणारेही तेव्हा कोणी सोबत, आजूबाजूला नव्हते. अभिनयात करिअर करायचे हे मनोमन ठरवले होते, पण सांगायचे कोणाला? त्यातच आता महाविद्यालयापासून घरापर्यंत ‘पुष्कळ झालं शिकणं, लग्न करून द्या आता हिचं’ असे घरच्यांना सुचवणारेच खूप भेटले. एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांची परीक्षा दिली आणि सगळ्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्याच महिन्यात लग्न करावे लागले. माझी नाटकाची सगळी स्वप्नं विरून गेल्यासारखे वाटू लागले. आपल्याकडे लग्नानंतरही मुलगा त्याला हवं ते करू शकतो, पण मुलगीसुद्धा एक माणूस आहे आणि तिलाही स्वप्न बघण्याचा, तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा, विचार करण्याचा अधिकार आहे हे आपण मान्यच करत नाही.

लग्नानंतर तोवर मिळालेली सगळी प्रमाणपत्रे, पारितोषिके, ट्रॉफीज, पदके घेऊन मी सासरी, मुंबईला गेले होते. अधेमधे आठवण आली की, मी ती बघत बसायचे. लग्नासाठी ‘बघण्याच्या’ कार्यक्रमातच होऊ घातलेल्या नवऱ्याने, किशोरने आवडीनिवडीबद्दल विचारले होते, तेव्हा सगळ्यांसमोर ‘अ‍ॅिक्टग’ असे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यासोबत अध्येमध्ये मी त्याबद्दल बोलत असे. तो म्हणायचा, ‘तू तुझी आवड जोपासली पाहिजे. आपण प्रयत्न करू.’

दरम्यान, लग्नानंतर आम्ही गोव्याला राहायला गेलो. किशोर मला घेऊन ‘गोवा कला अकादमी’त गेला. त्यांच्या ‘रेपट्री कंपनी’साठी संबंधितांकडे विचारणा केली. जून-जुलमध्ये वर्तमानपत्रात जाहिरात येणार होती. आम्ही दोघेही नजर ठेवून होतो. जाहिरात आली. फॉर्म भरला. किशोरचे म्हणणे, ‘ऑडिशनला काही तरी वेगळे कर.’ मग आम्ही ठरवले, अरुण कोलटकरांची ‘वामांगी’ एकपात्री रूपात सादर करायची. माझ्यासाठी ते नवीन होते. मी काही पट्टीची वाचक नव्हते; पण ‘वामांगी’च्या निमित्ताने मग घरातील अरुण कोलटकरांची सगळी पुस्तके वाचून झाली. आशय समजावून घेतला. आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला. कारण ‘वामांगी’च्या सादरीकरणानंतर परीक्षकांनी मला एकूण वाचनाबद्दल, कोलटकरांबद्दल प्रश्न विचारले. मी तोवर ‘कोसला’ आणि ‘चांगदेव चतुष्टय़’ वाचल्यानंतर (भालचंद्र) नेमाडेकाकांना भेटले होते आणि इतर वेळी घरी ग्रेस, अरुण कोलटकर, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड आदी लेखकांबद्दल, पुस्तकांबद्दल सतत काही ना चर्चा सुरू असायची. परीक्षकांच्या प्रश्नांना त्या सगळ्या बेगमीवर त्या वेळी जेवढे आठवेल ते सगळे त्या मुलाखतीत सांगितले.

त्यानंतर दोन वर्षे ‘रेपट्री’मध्ये कोंकणी, मराठी आणि हिंदी भाषेतील नाटकांमध्ये काम केल्यानंतर आम्हा दोघांनाही वाटू लागले की, अजून मी यात पुढचे शिक्षण घेतले पाहिजे. तेव्हा खूप उत्साहाने एनएसडीचा फॉर्म भरला, त्यासाठी मुंबईतून (प्रेमानंद) गज्वीकाकांनी अत्यंत प्रेमाने सर्व ते सहकार्य केले. ‘रेकमेंडेशन लेटर’सुद्धा विनाविलंब दिले; पण एनएसडीच्या नियमानुसार एक नाटक कमी पडत असल्याचे कारण देत गोव्यातील एका नाटय़शिक्षकाने मला ‘रेकमेंडेशन लेटर’ द्यायला नकार दिला. मी हताश झाले. मग ‘ललित’ची परीक्षा दिली; पण पहिल्या यादीत नाव लागले नाही. अधिकच खट्ट झाले. दरम्यान, राकेश (शिर्के) दादाने मुंबई विद्यापीठातील ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’बद्दल आम्हाला सांगितले. माझी इच्छा नव्हती. दोन नकार पाठोपाठ आल्यामुळे मी खूप हताश झाले होते. तरीही शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून अंगात ताप आणि कमालीचा अशक्तपणा घेऊन मी ऑडिशन, लेखी परीक्षा आणि मुलाखत दिली. बाबूराव बागूल यांची ‘वेदाआधी तू होतास’चे नाटय़ सादरीकरण केले आणि त्यानंतर काही दिवसांनी जाहीर झालेल्या पहिल्याच यादीमध्ये माझे नाव बघून सगळा आजार कुठच्या कुठे पळाला.

बी.कॉम.ला असताना आंतरविद्यापीठ स्पध्रेसाठी मुंबई विद्यापीठाच्या ज्या रंगमंचावर एकांकिका सादर करून अभिनयाचे पारितोषिक पटकावले होते त्याच सभागृहात आज पाचेक वर्षांत नाटकाचे शिक्षण घेण्यासाठी मी दाखल झाले होते. मुंबईतली एम.ए. (नाटय़शास्त्र)ची ही दोन वर्षे माझी आजवरची सर्वोत्तम वर्षे आहेत. नाटकाचे, अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण, मुंबईसारख्या शहरात प्रत्यक्ष नाटकाचे सादरीकरण, नाटय़ क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या विचारांमध्ये खूपच बदल झाला. पहिल्या वर्षांच्या शेवटी फ्रान्सवरून आलेल्या असील रईस सरांनी अनुवादित आणि दिग्दर्शित केलेल्या ‘जिहाद यात्रा’ या हिंदी-उर्दू नाटकातील ‘बेल्ला’ हे पंचविशीतले पात्र साकारल्यानंतर तर माझ्या आत्मविश्वासाला अधिक बळ मिळाले.

मी नव्याने मला सापडू लागले होते. हा विश्वास मला कलेमुळे मिळाला. दुसऱ्या वर्षांच्या शेवटी जयंत पवार लिखित ‘अधांतर’ या प्रसिद्ध नाटकाचा कैलास संगर यांनी ‘अभी रात बाकी है’ या नावाने केलेला हिंदी अनुवाद, मिलिंद इनामदार सरांनी दिग्दर्शित केला. त्यातील साठीच्या घरातील ‘अम्मा’ साकारण्याचा मी प्रयत्न केला. त्याच वर्षी महेश एलकुंचवार यांच्या ‘प्रतिबिंब’ नाटकातील ‘बाई’, मंटोच्या ‘सडक के किनारे’तील ‘तरुणी’ अशा वेगवेगळ्या वयोगटांतील भूमिकांतून मी स्वत:ला शोधत होते. दरम्यानच्या काळात काही प्रॉडक्शन हाऊसेसना माझे ‘प्रोफाइल’ पाठवले होते. त्यात सगळ्यात पहिला प्रतिसाद आला तो कन्नड चित्रपटातून. मला कन्नड येत नव्हतेच. काही संबंधच नव्हता, पण तरीही मी होकार कळवला. कारण तोवर किशोरसोबतच्या सततच्या चच्रेतून मी निर्णयापर्यंत आले होते की, पूर्णवेळ अभिनयच करायचा आहे. तोदेखील वेगवेगळ्या भाषांतील नाटक-सिनेमांमध्येच. तोपर्यंत मी फक्त मराठी आणि कोंकणीच बोलत असे. हिंदी अगदीच कामचलाऊ होती. इंग्रजी तर भूत होऊनच मानगुटीवर बसली होती. भाषेइतकी जगणे सुंदर आणि समृद्ध करणारी गोष्ट नाही, हे लग्नानंतर सुरू झालेल्या एकूण वाचनातून कळले. नवी भाषा शिकणे म्हणजे नवा उंबरठा ओलांडणे, उंबरठा ओलांडणारेच पुढे जाऊ शकतात, असे किशोरचे मत. हा उंबरठा ओलांडल्यावर खूप मोठं आकाश आपलं होतं याची जाणीव होत होती.

दरम्यान ‘द स्टेअिरग’ या कोकणी आणि हिंदी भाषेत एकाच वेळी तयार होणाऱ्या चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली आणि याच काळात हैदराबादच्या एका आघाडीच्या कािस्टग डिरेक्टरकडून हैदराबादसाठी बोलावणे आले. तिथे गेले, राहिले. तेलुगू शिकले. तेलुगू भाषेत मालिका केल्या. हे सगळे सुरू असतानाच केरळमधून एका मल्याळम चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आले. ऑडिशन दिली. दिग्दर्शकाने सांगितले, ‘तू मल्याळम शिक आणि इथेच थांब. केरळमधून जाऊ नको.’ निवड झाली. त्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याआधीच त्यांच्या टीममधून एकाने शिफारस केल्यामुळे ‘मोडस ऑपरेंडी’ या दुसऱ्या एका मल्याळम सिनेमात सहअभिनेत्रीची भूमिका मिळाली. आता भाषाही थोडीथोडी जमू लागलीय. त्यामुळे आत्मविश्वासही वाढू लागला. अपघाताने महाविद्यालयाच्या पथनाटय़ापासून सुरू झालेला हा प्रवास आजरा, कोल्हापूर, मुंबई, गोवा, हैदराबाद करत आता कोची किनाऱ्यावर पोहोचलाय.

मला माहीत आहे, मी फार काही वेगळं करत नाहीय; पण हा प्रवास खूप छान, वेगळा आहे. माणूस म्हणून मी शिकते, घडते आहे. मी माझ्या मनाचा उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न करते आहे..

raavikishor@gmail.com

chaturang@expressindia.com