४ जुलैच्या अंकातील पुण्याच्या ‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या संस्थापिका मीनाक्षी दाढे यांच्यावरील ‘दीपस्तंभ’ हा लेख वाचला. स्त्रियांनी यशस्वीरीत्या चालविलेल्या या बँके चं आता मोठय़ा वृक्षात रूपांतर झालं आहे. या बँके च्या संस्थापिका मीनाक्षी दाढे यांनी त्यांच्या स्त्री सहकाऱ्यांसह बँकेची केलेली स्थापना, बँक मोठी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, स्त्रियांमध्ये निर्माण केलेला विश्वास हे सर्व प्रेरणादायी आहे. स्त्रियांनी पतपेढी, बचत गट, छोटे उद्योग सहकारी तत्त्वावर चालविल्याची अनेक उदाहरणं आहेत; परंतु सर्व नियमांचं काटेकोर पालन करून, व्यवसायातल्या स्पर्धेला तोंड देऊन २८० कर्मचाऱ्यांसह  १८ शाखा असलेली सहकारी बँक चालवणं नक्कीच कौतुकास्पद आहे. सुमारे १४०० कोटींचा व्यवसाय करून त्यामधून २० ते २२ कोटी रुपये नफा तसेच सभासद स्त्रियांना १५ टक्के सातत्याने लाभांश हीदेखील पारदर्शी आणि निरपेक्ष कामाची पावती म्हटली पाहिजे.

– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

लीलाताईंची पुस्तकं मार्गदर्शकच!

‘प्रजासत्ताकाची मशागत’(४ जुलै) हा लीलाताई पाटील यांच्यावरचा समीर शिपुरकर यांचा लेख अतिशय उत्कृष्ट आहे. लीलाताईंच्या स्वभावातले बारकावे, शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान, आनंददायी आणि सर्जनशील शिक्षणाची केलेली सुरुवात याबद्दल त्यांनी योग्य शब्दांत आपले विचार मांडले आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालणारं आणि अतिशय शिस्तबद्धरीत्या काम करणारं ‘फुलोरा’ हे बालक मंदिर बघण्याचा योग आला आणि खूप आनंद झाला. पण लीलाताईंना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत नेहमीच वाटत राहणार. एखादी संस्था चालवण्याचं अवघड काम करत असताना मुलांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात नव्यानं काम करणाऱ्या शिक्षकांसाठी पुस्तकं लिहिण्याचं काम लीलाताईंनी अतिशय समर्थपणे केलं. त्यांचं प्रत्येक पुस्तक पालक आणि शिक्षकांनी पुन:पुन्हा वाचण्यासारखं आहे. ‘अर्थपूर्ण आनंददायी शिक्षणासाठी’ या पुस्तकात त्यांनी मुलांना वर्गात शिकवत असताना मुलं प्रत्यक्षात कसा विचार करतात हे अतिशय सोप्या शब्दांत लिहिलं आहे. आनंददायी शिक्षणाचं स्वरूप, सहज शिक्षण कसं असावं, स्पर्धा हव्यात की नकोत, मुलांचं मूल्यमापन कसं करायचं, याचा सर्वागीण विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. ‘लिहिणं मुलांचं, शिकवणं शिक्षकांचं’ या पुस्तकात शिकवताना आलेले अनुभव लिहिले आहेत. मुलांना एखादा प्रश्न विचारायचा आणि मुलं काय उत्तरं देतात ते लिहून काढायचं. उदा. ‘एक माणूस रस्त्यावरून चालताना त्याला अपघात झाला. तर का बरं झाला असेल अपघात?’ या प्रश्नाची ‘तो दारू प्यायला असेल’, ‘चष्मा लावला नसेल’, ‘गप्पा मारण्यात गुंग असेल’ अशी अनेक उत्तरं मुलांनी दिली आणि त्याची नोंद शाळेनं कशी ठेवली याचा उल्लेख आहे. मराठी भाषा सुधारण्यासाठी एखाद्या अक्षरावरून किती शब्द तयार होतात हे मुलांकडून लिहून घेणं, फळ्यावर एखादं चित्र काढून त्याबद्दल प्रश्न विचारायला सांगणं, मुलांना नवनिर्मितीचा आनंद देणं, असे अनेक उपक्रम ‘सृजन आनंद’मध्ये कसे केले जातात याचं सुरेख वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे.

‘ऐलमा पैलमा शिक्षणदेवा’ या पुस्तकात मुक्त शिक्षण म्हणजे काय, मुलं मोठय़ा माणसांसारखं कसं बोलतात, इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाचं मूळ कशात आहे, शिक्षकपण म्हणजे काय, या आणि अशा असंख्य विषयांवर भाष्य केलं आहे. याशिवाय त्यांची ‘शिक्षणातील ओअ‍ॅसिस’, ‘परिवर्तनशील शिक्षण’, ‘प्रवास ध्यासाचा आनंद सृजनाचा’, ‘प्रसंगातून शिक्षण’, ‘शिक्षण घेता-देता’ अशी अनेक पुस्तकं म्हणजे सर्जनशील, आनंददायी शिक्षण, प्राथमिक शिक्षणातील समस्या आणि मूल्यमापन यांचा परिपाठच आहे.

– निशा किलरेस्कर

‘मला काय त्याचं’ ही वृत्तीच समस्या वाढवणारी योगेश शेजवलकर यांचा ‘थोडं जास्त बरोबर’ (४ जुलै) हा लेख आपल्या ‘मला काय त्याचं’ या वृत्तीवर सौम्य शब्दांत, पण आसूड ओढणारा आहे. आपल्याभोवती घडणाऱ्या अनिष्ट घटनांबद्दल आपण नुसते चरफडत बसतो, पण त्यावर उपाय करायला पुढे येत नाही. पोलीस यंत्रणेवर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना या लेखात उल्लेख केलेल्या घटनेसारख्या लहान घटनांची स्वत:हून दखल घ्यायला वेळ नसतो. पण आपण स्वत: तक्रार करण्यात पुढाकार न घेता उगाच त्यांना दोष देत असतो. समाजानं ही वृत्ती सोडली तर नक्कीच पोलीस यंत्रणा अशा घटनांची दखल घेईल आणि टारगट तरुणांच्या बेदरकार वृत्तीला आळा बसू शकेल.

– रमेश वेदक, चेंबूर, मुंबई</strong>

 तेलातुपाविषयीची माहिती रंजक

आहारातल्या दृश्य व अदृश्य तेलातुपा- विषयीचा डॉ. स्मिता लेले यांचा लेख (४ जुलै) उद्बोधक व रंजक आहे. आपण नकळतपणे किती तेलातुपाचा वापर करतो हे मनात येऊन गेलं. वेगवेगळया ब्रँडच्या आणि वेगवेगळया तेलबियांपासून बनवलेल्या तेलांची त्या-त्या कंपन्या कशी जाहिरात करतात आणि ही सगळी तेलं आपल्या घरात कशी ठाण मांडतात याचाही प्रत्यय आला. आक्रमक जाहिरात तंत्रानं आमचंच तेल-तूप कसं चांगलं हे बिंबवण्यात कंपन्या यशस्वी होतात आणि सर्वसामान्य नागरिक त्याला बळी पडून अनावश्यक तेलयुक्त पदार्थ खाऊन शरीराची हानी करून घेतात.

– राजेश बुदगे, ठाणे</strong>