आईची कुटुंबातील भूमिका आत्तापर्यंत खूप महत्त्वाचीच होती आणि ती राहणारच आहे, परंतु आताच्या या सामाजिक बदलात कुटुंबातील जाणत्या पुरुषांची र्सवकष भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या मुलांच्या जडणघडणीत माझा मोलाचा वाटा असायलाच हवा. बायकोच्या जबाबदाऱ्या, तिचं जगणंही मला समजून घ्यायला हवं, ही मानसिकता वाढायला हवी आहे. समाधानाने भरलेलं, आनंदी, कणखर घर हा प्रत्येकाचा हक्क आहे.
कुटुंब म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू’, असे अठराव्या शतकातील अमेरिकन तत्त्वज्ञानी विल डय़ुरान्ट याने म्हटले होते. ते कधी नव्हे इतके आता अचूक ठरते आहे, कारण आजच्या सामाजिक आव्हानांचे स्वरूप पाहता याचे कारण कुठेतरी बदललेल्या कुटुंब व्यवस्थेशी निगडित आहे, असे प्रकर्षांने पुढे येते आहे. म्हणूनच हरवत चाललेल्या नातेसंबंधांना उबदार, आनंदी घर हे चपखल उत्तर ठरू शकते. व्यक्ती म्हणून आपल्या जडणघडणीत, आपल्या पालकांचा, कुटुंबाचा असणारा प्रभाव किती महत्त्वाचा असू शकतो हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
माणूस म्हणून जन्माला आल्यावरही माणूस म्हणून घडायला आपल्या आजूबाजूला माणूसपणाचेच वातावरण लागते हे मानसशास्त्राने सिद्ध केले आहेच. नवजात शिशूला माणूस म्हणून घडवण्याची सुरुवात कुटुंबातून होते. प्रत्येक मूल आपापल्या कुटुंबातून कळत-नकळतपणे अनेक गोष्टी घेऊन वाढत असते. घरातल्या व्यक्तींच्या संस्कारातून मूल घडत असते. पूर्वीच्या काळात हा महत्त्वाचा संस्कार असायचा आईचा, मात्र जग जसे जसे बदलत गेले तसे आई या भूमिकेला इतर जबाबदाऱ्यांचे पदर येत गेले. त्याप्रमाणे कुटुंबातील पित्याची भूमिकाही बदलली, मात्र ती काळाच्या कसोटीवर उतरली का? नवनवीन आव्हाने स्वीकारताना कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचा सहभाग नेहमीच कुटुंबकेंद्री नव्हता. त्याचा मुलांच्या जगण्यावर, वाढण्यावर परिणाम होत गेला. म्हणूनच आज जो समाज आपल्या समोर उभा आहे, तो अधिकाधिक आनंदी, समाधानी व्हावा, यासाठी गरज आहे ती कणखर घराची! आई-वडिलांच्या एकत्रित संस्कारातून आलेल्या सशक्त घराची!
घर म्हणजे नुसत्या चार भिंती नि छप्पर असे नव्हे, तर घर म्हणजे कुटुंबाचा बिनशर्त पाठिंबा, नात्यांची ऊब आणि आपली हक्काची जागा. म्हणून कणखर घराचा विचार करताना कुटुंबाची, पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजचे पालक आधीच्या पिढीच्या पालकांपेक्षा अधिक सजग आहेत. त्यांना स्वत:चे करिअर, नोकरी व मुलांची जबाबदारी एकाच वेळी समर्थपणे पेलण्याचे आव्हान आहे. त्यातूनही अधिक जबाबदार पालक होण्यासाठी ते जाणीवपूर्वक शिस्त स्वत:मध्ये बाणवत मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत, मुलांना जगण्याची दिशा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, प्रश्न असा आहे की आजच्या विभक्त किंवा एकल कुटुंबात मुलांना देण्यासाठी, त्यांच्याबरोबर असण्यासाठी जो वेळ हवा, जे संस्कार हवेत ते देण्यात आजची कुटुंबं कमी पडताहेत का? आई-बाबा ऑफिसला गेल्यावर त्यांच्या अनुपस्थितीतील ‘घर’ पुरेसे संस्कारक्षम वातावरण देऊ शकते का? आणि जर नसेल तर कोणती पर्यायी मूल्यव्यवस्था आपण समाज म्हणून यासाठी उभी केली आहे, करणार आहोत, हा आहे.
अनेकदा मुलामुलींना वाईट संगत लागली की त्यांच्या पालकांचा हमखास उद्धार होतो. पण आजच्या रॅटरेसमध्ये अडकलेला पती व करिअर-घर यांच्या कचाटय़ात सापडलेली स्त्री हा एक वर्ग आणि अतिआधुनिक जगात वावरणारी मुलं आणि त्यांच्या तुलनेत त्यांच्या जगाची फारशी माहिती नसलेले त्यांचे पालक हा दुसरा वर्ग. यात आजच्या समाजातला मोठा भाग झगडतो आहे. हा समाज अस्वस्थ आहे, नैराश्याच्या घेऱ्यात आहे.  म्हणूनच आजच्या कुटुंबातल्या पालकांनी अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांना घडवण्यासाठी आवश्यक वेळ त्याच्याकडे आहे का? हा एक प्रश्न, तर दुसरीकडे पारंपरिकता की आधुनिकता  याच्या झगडय़ात पालकांची पिढी अडकली आहे. संभ्रमावस्थेतली ही पालकांची पिढी त्यातून गोंधळ वाढवते आहे का, हाही प्रश्न महत्वाचा आहे.
याचे घरावर काय परिणाम होतात, हे विशद करणारे उदाहरण देतो. माझ्या माहितीतील एका कुटुंबातील ‘आई’ एक अतिमहत्त्वाकांक्षी बाई होत्या. फारच प्रसिद्ध आणि लोकप्रियही, पण स्वत:च्या करिअरपुढे त्यांना घर-संसार ‘टिपिकल’ वाटत होता. महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांच्या भूमिका अतिआधुनिक होत्या. ‘दहावीनंतर मुलीने कसं आणि काय शिकावं, कसं जगावं, हे तिचं तिनं ठरवावं. ते तिचं आयुष्य आहे’, अशी त्यांची विचारसरणी होती. वडील फारच अलिप्त होते. व्हायचे तेच झाले, मुलीला वाईट संगत लागली.  आपण कोणाबरोबर जातो, काय करतो हे विचारण्याचा आई-वडिलांना हक्क नाही आणि त्यांना तितका वेळही नाही, हे मुलीला माहीत होते आणि आई-वडिलांनीही या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या नाहीत. पालक झाल्यावरही माणूस म्हणून स्वत:च्या गरजा न संपलेले आई आणि वडील आपल्या मुलीला
 कोणत्या तऱ्हेचे आत्मघातकी आयुष्य देऊ शकतात, हे या सत्य उदाहरणातून दिसते. आई, वडील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्ध झाले, मात्र मुलीची अभिमानाने ओळख करून द्यावी असे मुलीचे काही कर्तृत्व नव्हते. किंबहुना तिचं आयुष्य सैरभैर झाले. श्रीमंत, यशस्वी आई-वडील असे पाठबळ असूनही मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.. ‘आपल्याला आईने वेळीच सावरायला हवे होते,’ असे आता मुलीला वाटते.
मुलांच्या जडणघडणीत पालकांच्या उपदेशांचा नाही तर पालकांच्या इतर माणसांशी आणि मुलांशी प्रत्यक्ष वर्तनाचा फार मोठा परिणाम होत असतो. वागण्यात अत्यंत मोकळीकही नको आणि अत्यंत कडक शिस्तही नको असते, हे भान महत्वाचे. अन्यथा अनेकदा ही मुले मोठी होऊन स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत:च घेऊ लागतात तेव्हा पालकांना मोठा धक्का बसतो. आजच्या तरुण मुलांमध्ये असे प्रयोग करणाऱ्या मुलांचे आणि मुलींचे प्रमाण वाढते आहे. एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते. नोकरीनिमित्त मी हैदराबादसारख्या शहरात काही वर्षे वास्तव्यास होतो. घरापासून पहिल्यांदाच दूर राहणाऱ्या अनेक मुली तिथे भेटल्या. घरातील अत्यंत कडक शिस्तीमुळे घरी जीन्स न घालणाऱ्या मुली इथे मात्र जीन्सशिवाय दुसरे काही घालत नसत किंवा ज्यांच्या घरी मुलांशी बोलण्याचीही बंदी होती त्या मुलींना पहिल्या चार महिन्यांतच बॉयफ्रेंड भेटलेला असे. या मुली सुशिक्षित घरातल्या होत्या, कुणाचे वडील इंजिनीअर तर कुणाचे सरकारी सेवेतले. परराज्यात मुलींना पाठवण्याइतक्या मुलीही हुशार होत्या. मात्र घराची कडक शिस्त, पारंपरिक वातावरण वा मर्यादित स्वातंत्र्य यामुळे ज्या ज्या गोष्टींचे दमन केले गेले, संधी मिळताच त्या वृत्ती उसळी मारून बाहेर पडल्या. अनेकदा कौटुंबिक दुराव्याची ठिणगीही इथेच पडते कारण घरी परत जायचे तर असतेच, मग?
 मुलींचे उदाहरण यासाठी प्रातिनिधिक, कारण तुलनेने मुलींवर बंधने अधिक असतात. मात्र मुलग्यांच्याबाबतही हे घडू शकते. मुलांचे अनधिकृत लैंगिक शिक्षण हे मित्रांच्या बरोबरच्या अश्लील बोलण्यातून अनेकदा होत असते. कामाच्या पद्धती बदलल्यामुळे तरुण मुले-मुली एकत्र उशिरा रात्रीपर्यंत आणि अनेक ताणांखाली काम करत आहेत. अशा वेळी त्यांना त्याच्या मागे उभं राहणाऱ्या घराची जास्त गरज आहे. जितके ‘घर’ अस्थिर आणि मुलांच्या- तरुणांच्या गरजा न ओळखणारे असेल तेवढी त्यांची घराशी असणारी वीण उसवत जाणार हे नक्की.
 आज जशी नोकरी, करिअर, नाती यांच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत, तशाच सुख, मजा, आयुष्य उपभोगणे यांच्याही व्याख्या बदलत गेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सगळ्या घराबरोबर एकत्र राहणे, हे आयुष्य यशस्वीपणे जगल्याची खूण असायची. आता पसे साठवून एकटय़ानेच परदेशवारी करणे, वीकेंडला मनसोक्त दारू पिऊन लोळत राहणे, मोबाइल, इंटरनेटच्या आभासी जगात, जास्तीतजास्त एकटे करत जाणाऱ्या जगात राहणे हे आयुष्य होते आहे. त्याच्यापलीकडे जाऊन मनावरचे ताण हलके न झाल्यामुळे जगण्याचे प्रयोजन, कशासाठी जगायचे याच्या फसव्या व्याख्याही तयार होत आहेत. आणि त्यालाच वास्तव मानून चालणं सुरू आहे, या सगळ्याला समजावून घेणारे त्यातल्या वास्तवाचे भान देणारे कणखर घर आता हवे आहे.   
 नोकरी-व्यवसाय करिअर हे आता स्त्रियांसाठीही त्यांच्या बौद्धिक गरजेसाठी आणि आर्थिक गरजेसाठी महत्त्वाचे ठरते आहे, परंतु त्यातले तणाव वाढत जाताहेत. कारण अनेकदा त्यासाठी जो कुटुंबाचा पाठिंबा हवा तो तिला मिळत नाही, त्यामुळे ही स्त्री घर आणि करिअर यात भरडली जाते, त्याचे दुष्परिणाम आता समाजासमोर येत आहेत. व्यसनमुक्ती केंद्रात आता स्त्रियांचीही भरती होते आहे. याचा अर्थ, दिवसेंदिवस व्यसनाधीन होणाऱ्या स्त्रियांच्या संख्येतही वाढ होते आहे, इतके ताण तिच्या आयुष्यात आहेत, पण त्यावर आपण काहीतरी केले पाहिजे, असे घरच्यांना वाटते आहे का?  व्यसनाधीन स्त्रीचा नवरा तिची काळजी घेतो का? शहरी भागातील उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या आणि लग्न नाकारणाऱ्या मुलींच्या आयुष्यात असा प्रश्न असेल तर त्या मुलीचे वडील, भाऊ या पुरुष नात्यांवरही जबाबदारी येते. या जबाबदारीच्या बाबतीत पुरुष म्हणून आपण किती सक्षम आणि मोकळ्या मनाचे आहोत, हेही पुरुषांना तपासून बघावे लागेल. अनेक व्यसनाधीन पुरुषांच्या बायका अकल्पनीय आंधळ्या विश्वासाने नवरा एके दिवशी बदलेल, व्यसनमुक्त होईल, असे मानून आयुष्य कंठतात. आता बायकोचे/ बहिणीचे /मत्रिणीचे पिणे वाढले आहे हे लक्षात घेणारा आणि त्यातून तिला बाहेर काढण्यास, तिचे ताण जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न  करणारा पुरुष हवा आहे आणि असे ताण निरसन करणारं कणखर घर हवं आहे. व्यसनाधीनता हा टोकाचा मुद्दा असेल, पण तणावामुळे स्त्रियांना जाणवणारा मानसिक थकवा, शारीरिक वा आरोग्याशी निगडित समस्या दूर करण्यासाठी पुरुषांच्या सहकार्याची, त्यांच्या ठोस पाठिंब्यांची गरज आहे, कारण स्त्री-पुरुषांच्या परस्पर सामंजस्यावर कुटुंबाचा डोलारा उभा असतो.
 समाजशास्त्र सांगते की, उत्पादन व्यवस्था बदलली की कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था, शिक्षण पद्धती यातही बदल घडून येतो. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या जसजशा नव्या पिढय़ा येतील, तसतसे स्त्रियांच्या अर्थार्जनाचे, स्त्रियांचे सामाजिक अधिकार वाढल्याचे दिसून येतीलच. सार्वजनिक- खासगी उत्पादन व्यवस्थेमध्ये स्त्रियांनी स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे सामाजिक पडसाद उमटणारच. मात्र कुटुंब व्यवस्थेसाठी भरभक्कम आधार अशी स्त्रीची पारंपरिक भूमिका व कौटुंबिक पातळीवरही आत्मविश्वासाने वावरणारी स्त्रीची नवी भूमिका ही घुसळण ही आज स्त्री-पुरुष नात्यांमध्ये तणाव निर्माण करते आहे.
हा तणाव घेऊनच आई-वडील या भूमिकेत पालक शिरले तर साहजिकच हा तणाव नात्यांमध्ये कायम राहतो व त्याचे पडसाद कुटुंबावर पडतात.
परदेशात मात्र काहीसे वेगळे चित्र दिसते. परदेशात लहान मुलाची काळजी घ्यायला घरात आई आणि वडील अशी दोनच माणसे आहेत, असे गृहीत धरून नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आणि त्यांच्या पतीला पालकत्वाची रजा दिलेली आहे. तिथे त्यांचे आई-वडील बाळंतपण करायला येणार नसतातच. कारण स्वातंत्र्य आणि स्वावलंबन या दोन्ही मूल्यांची या व्यवहाराशी त्यांनी गाठ घातलेली आहे. आईच्या गर्भारपणात वडिलांचेही नाव संबंधित कोर्सला घालतात, कारण वेळ पडली तर घरातही सुरक्षित प्रसूती करता यायला हवी आणि ती बाळाच्या बाबांची जबाबदारी आहे, हे मूल्य स्वीकारलेले आहे. भारतातून परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या जोडप्यांना बाकीच्या सोयीच्या व्यवस्थांसारखी बाळाच्या जन्माची जबाबदारी का बरे घेता येऊ नये? याही पद्धतीमध्ये बाळासोबत वडिलांचे नाते अधिक घट्ट होण्याचा फायदा त्या कुटुंबांना मिळतोच की.
अलीकडल्या काळात कुटुंब व्यवस्थेला हादरे मिळालेले निमित्त म्हणजे दोन पिढय़ांतले वैचारिक अंतर. यामुळे विभक्त कुटुंब पद्धती आता आपल्याकडेही रुजली आहे. मात्र विभक्त कुटुंब पद्धतीची स्थिती लक्षात घेऊन त्यासाठी गरजेची व्यवस्था जर समाजात निर्माण झाली नाही तर कठीण होणारच आहे. आत्ताच्या स्थितीतून आपण शिकलो नाही तर भविष्यातील नव्या कुटुंबांच्या नव्या प्रश्नांना कालसंगत उत्तरे आपल्याला मिळणार नाहीत. सामाजिक बदलाच्या या पायरीवर नव्या कुटुंब व्यवस्थेत पाळणाघरे, वृद्धाश्रम, वृद्धांसाठी डे केअर यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता कुटुंबाचा विस्तार म्हणून पाहावे लागेल.
सामाजिक बदलाच्या लाटेत कुटुंबातील जाणत्या पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या मुलांच्या जडणघडणीत माझा मोलाचा वाटा असायलाच हवा. बायकोच्या जबाबदाऱ्याही, तिचं जगणंही मला समजून घ्यायला हवं ही मानसिकता वाढायला हवी. मुलांच्या मत्रिणी, पोंगडावस्थेतील लैंगिकता, लग्नाची-नात्याची संकल्पना अशा संवेदनशील विषयावर घरात पाल्यांचे वडीलच बोलू शकतात. आता मला या विषयावर बोलायचा संकोच वाटतो किंवा मला बोलता येत नाही, अशी सबब सांगता येणार नाही. कारण घरातून जर या विषयावर चर्चा करण्याची कोंडी फोडली गेली नाही तर पालक व पाल्य अशी बेटं घरात तयार होतील. लैंगिकतेसारख्या अवघड विषयावरची चर्चा कुटुंबात घडणारी घरं मोठय़ा प्रमाणावर तयार व्हायला हवीत. कारण आजच्या व्यस्त, बदललेल्या जीवनशैलीच्या काळात संवादाची गरज अधिकाधिक वाढते आहे. तरुणांना कोणत्याही व्यसनापासून दूर ठेवण्याची ताकद घरातल्या नात्यात आणि नात्यांमधील संवादात आहे.
 म्हणूनच कणखर घर हवे असेल, मुलांची काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक जडणघडण करावी लागेल, कारण वाढत्या वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेली मुले आई-वडिलांकडे त्यांच्या वार्धक्यात मायेने सांभाळण्याचे धडे कुठून शिकतील. म्हणून मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडवताना, भावनाशील, जबाबदार माणूस घडवण्याची सामाजिक जबाबदारी कुटुंबाची पर्यायाने घराची आहे. मुलांना निर्णय घेऊ द्या, त्यांच्याशी संवाद ठेवा, मात्र मुलांनी घेतलेले निर्णय चुकले तरी खंबीरपणे मुलांच्या पाठीमागे उभं राहणारं घर असायला हवं. कुटुंबातल्या सगळ्यांना गुणदोषासकट स्वीकारणारे परिपक्व घर ही आजच्या काळाची खरी गरज आहे.     

आजची व्यस्त स्त्री आणि अपराधभाव
 नोकरी-करिअरमध्ये व्यस्त असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात आपण आपल्या कुटुंबीयांकडे पुरेसं लक्ष देत नाही हा अपराधभाव एकदा तरी येतोच. पण काही वेळा तिथे थांबून चालत नाही. त्यातून मार्ग हा काढावाच लागतो. काय असतात आव्हानं एका नोकरदार वा व्यवसायात व्यस्त असणाऱ्या स्त्रियांची. घर आणि करिअर सांभाळताना होणारी तारांबळ, त्रेधातिरपीट आणि येणारा अपराधभाव यांची सांगड कशी घातलीत तुम्ही? कोणता शोधला सुवर्णमध्य? आम्हाला पाठवा तुमचे अनुभव. तुमची त्रेधातिरपीट कशी उडाली याचे विस्तृत वर्णन कृपया पाठवू नका तर तुम्ही त्यातून कसा मार्ग शोधलात ते प्रसिद्ध करायला आम्हाला आवडेल. तेव्हा पाठवा २०० शब्दांत तुमचा अनुभव. मात्र पाकिटावर विषयाचा स्पष्ट उल्लेख करायला विसरू नका.
आमचा पत्ता ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  chaturang@expressindia.com

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान