03 April 2020

News Flash

सरपंच! : कायापालट

अवघ्या दीड वर्षांत गावाचा कायापालट करणाऱ्या परसोडी-टेंभरी गावच्या सरपंच सुरेखा पंढरे यांची ही यशोगाथा..

(संग्रहित छायाचित्र)

साधना तिप्पनाकजे

परसोडी-टेंभरी गावाची निवड ‘मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना’त झाली. आणि गावात बदलाचे वारे वाहू लागले. दर रविवारी गावकरी एकत्र जमून गाव स्वच्छ करतात. गावात संपूर्ण प्लास्टिक बंदी आहे. गावाने स्टीलच्या ताटवाटय़ा खरेदी केल्या आहेत. कुणाच्या घरी समारंभ असेल ते या ताटवाटय़ा भाडय़ाने घेतात, त्यामुळे स्वच्छता सांभाळली जाते. गाव हागणदारीमुक्त केलं गेलंय. पाणी प्रश्न सुटला आहे, शाळा डिजिटल झाल्यात. दूध उत्पादन अनेक पटीने वाढवून लोकांना आर्थिक सबल केलं गेलंय. अवघ्या दीड वर्षांत गावाचा कायापालट करणाऱ्या परसोडी-टेंभरी गावच्या सरपंच सुरेखा पंढरे यांची ही यशोगाथा..

परसोडी आणि टेंभरी गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे. २०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. नवीन कायद्यानुसार सरपंच थेट निवडणुकीद्वारे निवडायचे होते. सरपंचपद खुल्या गटातील स्त्रियांकरता राखीव होतं. प्रस्थापितांना सरपंचपद निवडणूक बिनविरोध करायची होती. ६४२ मतदार असणाऱ्या गावात तलाठींच्या उपस्थितीत केवळ १७ जणांच्या सहमतीने सरपंच ‘निवड’ सुरू होती. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदी एका स्त्रीला बसवणार, त्याच वेळी सुरेखा पंढरे इतर स्त्रियांसोबत तिथं पोहोचल्या आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर गावात रीतसर निवडणूक जाहीर झाली. आज सुरेखाताईंच्या नेतृत्वाखाली परसोडी-टेंभरी हे ‘मुख्यमंत्री मिशन’मधील गाव आहे. अवघ्या दीड वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे.

सुरेखाताई १९९९ मध्ये लग्न होऊन वर्धा जिल्ह्य़ातल्या आर्वी तालुक्यामधील परसोडी गावी आल्या. सुरुवातीची दहा वर्ष संसारात दोन लेकरांमध्ये कशी गेली कळली नाहीत. नंतर मुलं मोठी झाल्यावर सुरेखाताईंना रिकामं बसवेना. घरची शेती होतीच. त्यांचे यजमान शेतीच करायचे. सुरेखाताईंचं बीए दुसऱ्या वर्षांपर्यंत शिक्षण झालेलं. त्यांनी ‘जमनालाल बजाज फाउंडेशन’मध्ये नोकरीला सुरुवात केली. बचतगट बांधण्याचं त्यांचं काम होतं. बचतगटाचे हिशोब तपासणे, नोंदी करायला मदत करणे अशा स्वरूपाचं काम त्या करत होत्या. या कामातून आजूबाजूच्या ८-९ गावांमध्ये ३५ बचतगट त्यांनी बांधले. स्त्रियांना बँक व्यवहार कसे करायचे हे त्या समजावू लागल्या. त्यांना व्यवसाय करायला प्रवृत्त करू लागल्या. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर घरखर्चाला, मुलांच्या शिक्षणाकरता त्यादेखील हातभार लावू शकतात हा विश्वास स्त्रियांमध्ये आला. बचतगटाच्या माध्यमातून गावांमध्ये गृहोद्योग, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, पार्लर, शिवणकाम यांसारखे उद्योग सुरू झाले. गावात जो उद्योग नाही आणि ज्या उद्योगाला मागणी आहे, अशा उद्योगांवर सुरेखाताईंनी लक्ष केंद्रित केलं. यातल्या कोणत्या उद्योगात बचतगटातील स्त्रियांना, मुलींना रस आहे हे जाणून घेतलं. त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांचे उद्योग सुरू करायला मदत केली. निराधार आणि वयस्कर स्त्रियांनाही विविध योजनांचे लाभ मिळवून दिले. त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून देणे, बँकेची कामे करून देणे अशा सर्व कामांमध्ये सुरेखाताई स्त्रियांची मदत करत असत. ही सर्व कामं करताना पंचायत समितीत त्यांचं येणजाणं वाढू लागलं. त्यामुळे त्यांना शासकीय कामांचीही माहिती होऊ लागली. समाजसेविका म्हणून अधिकाऱ्यांमध्येही त्यांची चांगली ओळख निर्माण झाली. २००९ पासून सुरेखाताईंच्या कामाचा झपाटा सुरू झाला होता. त्यांनी स्वतची वेगळी ओळख निर्माण केली.

२०१७ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत यायचं ठरवलं. त्यांच्या एकत्र, मोठय़ा कुटुंबातून राजकारण किंवा समाजकारणातही कोणी नव्हतं पण सुरेखाताईंना घरातून साथ होतीच आणि गावातील स्त्रियांचीही साथ बऱ्यापैकी होती. त्यांनी सरपंचपदाची थेट निवडणूक लढवण्याचं ठरवलं. पण गावातील प्रस्थापितांना, ते सांगतील त्याप्रमाणे वागणारी आणि अशिक्षित स्त्री सरपंचपदी हवी होती. जेणेकरून त्यांना भ्रष्टाचार विनाअडथळा सुरू ठेवता येईल. या प्रस्थापितांचे गावविकासाशी नाही, तर स्वत:च्या आर्थिक विकासाशी लागेबांधे होते. या लोकांनी तलाठय़ांना खोटी माहिती देऊन बिनविरोध सरपंच निवड असल्याचं सांगितलं. सुरेखाताई आणि त्यांच्या गटातल्या स्त्रियांना याची कुणकुण लागली. त्या बरोबर वेळेत ग्रामपंचायतीत पोहोचल्या. या सर्व स्त्रियांनी सरपंचनिवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. ग्रामसभा बोलवून गावचं मत घ्यायचं आव्हान त्यांनी या लोकांना दिलं. तसा या लोकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर गावात सरपंचपदाची निवडणूक जाहीर झाली. प्रचार अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. सुरेखाताईंच्या गटातील पाच सदस्य बिनविरोध निवडून आले. प्रस्थापितांनी सुरेखाताईंविरोधात तीन स्त्रियांना निवडणुकीला उभं केलं. सुरेखाताई या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या.

२०१७ मध्ये परसोडी-टेंभरी गावाची निवड ‘मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना’त झाली. या अभियानाला ग्रामीण भागात ‘मुख्यमंत्री मिशन’ या नावाने ओळखलं जातं. या अभियानामुळे गावाला मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध झाला. सुरेखाताईंचं स्वच्छ नेतृत्व, पारदर्शी कार्यपद्धती आणि विकासयोजनांना पुरेशा प्रमाणात निधी मिळाल्याने गावात बदलाचे वारे वाहू लागले.

निवडून आल्यावर सुरेखाताईंनी पहिलं काम पाणी प्रश्नावर केलं. गावात तीन सार्वजनिक तर एक पाणी विभागाची विहीर आहे. पाणी विभागाच्या विहिरीतलं पाणी कमी झालं होतं. सुरेखाताईंनी स्थानिक आमदारांशी संपर्क साधला. आमदार निधीतून गावात बोअर विहीर खोदण्यात आली. मे महिन्यातही चाळीस फुटांवर या बोअरला पाणी लागतं. हे पाणी विहिरीत सोडून मग पंपाने टाकीत सोडलं जातं. आणि  पूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. आज गावाला बाराही महिने सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. परसोडी आणि टेंभरी दोन्ही गावांत शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तूर, सोयाबीन आणि कापूस ही इथली मुख्य पिकं. शेतीकरताही शेतातच विहिरी आहेत. सुरेखाताईंनीही पाच शेतविहिरींना मंजुरी दिली.

सुरेखाताईंच्या अजेंडय़ावरचं दुसरं काम होतं स्वच्छता. त्या म्हणतात, ‘आपण घराची स्वच्छता ठेवतो, पण गावस्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. गावस्वच्छताही आपली जबाबदारी आहे.’ त्यांनी महिलासभा घेऊन स्वच्छतेचं महत्त्व पटवलं. दर रविवारी गावकरी एकत्र जमून गाव स्वच्छ करतात. उकिरडा हा प्रकारच आता गावात नाही. गावात संपूर्ण प्लास्टिक बंदी आहे. कोणाकडे प्लास्टिक आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग आणि ‘मुख्यमंत्री मिशन’ रकमेतून गावाकरता स्टीलची ताटं आणि वाटय़ा घेतल्या. देखभालीकरता ही सर्व भांडी एका बचतगटाला देण्यात आली आहेत. बचतगटाने याकरता ग्रामपंचायतीकडे पाच हजार रुपये अनामत रक्कम भरली आहे. ग्रामस्थांना ही भांडी भाडय़ाने देण्यात येतात. ग्रामसभेत ठराव मंजूर करून या भांडय़ांचं भाडं ठरवण्यात आलं आहे. यामुळे बचतगटाला उत्पन्नाचं साधन मिळालं. तसेच भांडी सांभाळून वापरली जातात आणि त्यांची देखभालही होते. साहजिकच गावात कोणत्याही कार्यक्रमासाठी प्लास्टिक वा थर्माकोलच्या प्लेटऐवजी स्टीलचीच भांडी वापरली जातात.

परसोडी आणि टेंभरी गावात केवळ पाचशे मीटरचंच अंतर आहे. पण ही गावं जोडणाऱ्या रस्त्यावर गावकरी शौचाला बसायचे. यामुळे या गावांदरम्यानची बससेवाही बंद होती. सुरेखाताईंनी स्त्री-पुरुषांची पथकं स्थापन केली. ‘लोटाबहाद्दर’ लोकांना गांधीगिरी अभियानाद्वारे शौचालयाचा वापर, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याविषयी ही पथके माहिती देऊ लागली. जे ऐकत नव्हते त्यांना गुलाबाचं फूल देणं, त्यांचे फोटो काढणे, शेवटी पाचशे रुपये दंड असे करत करत त्यांना शौचालयाचा वापर करण्यास भाग पाडले. ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं, तिथं तातडीने निधी देऊन शौचालय बांधण्यात आलं. अशा प्रकारे गाव हागणदारीमुक्त झालं. आता गावात तीन सार्वजनिक शौचालयं बांधण्यात येणार आहेत.

गावात ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा)योजने’तून नांदेड पॅटर्नचे १७५ शोषखड्डे बांधण्यात आले आहेत. गावात ‘पाणी फाउंडेशन’चं काम सुरू असतानाच हेही काम सुरू होतं. घरांमधील सांडपाणी नालीत जमा न होता शोषखड्डय़ात जातं. गावातील विहिरी उघडय़ा असल्यामुळे दोनदा बल पडण्याच्या घटना घडल्या. आणखी काही अपघात घडू नयेत याकरता सुरेखाताईंनी चारही विहिरींना संरक्षक कठडे बसवून जाळ्या बसवल्या. ही सर्व कामं करताना सुरेखाताईंनी चौदाव्या वित्त आयोगातील २५ टक्क्यांहून अधिक रक्कम आणि ‘मुख्यमंत्री मिशन’मधील रक्कम खर्च करून दोन्ही गावांतील शाळांची दुरुस्ती आणि रंगकाम केले. शौचालय बांधले, दारं-खिडक्या नवीन बसवली. एक शाळा डिजिटल केली. परसोडीतील शाळा चौथीपर्यंत आहे तर टेंभरीतील सातवीपर्यंत आहे. शाळेचं बाह्य़रूप सुधारलं आणि तिचा दर्जा सुधारण्याकडेही सुरेखाताईंनी प्रयत्न केले. शिक्षणावर श्रद्धा असणारे शिक्षक आणि मुख्याध्यापिका निवडून शाळेत नेमले. परसोडीतील विद्यार्थी पाचवीपासून चार किमी अंतरावरील शाळेत जायचे. टेंभरीतील शाळेचाही दर्जा सुधारल्याने आता परसोडीतील विद्यार्थी पाचवीपासून इथेच येतात.

गावात शेतीसोबतच दुग्धव्यवसायही होता. सुरेखाताईंनी या व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी कृषी समृद्धी, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ४६ गायी खरेदी केल्या. पुरुषांचे ३ बचतगट स्थापन केले. कृषी समृद्धी स्वयंसेवी संस्थेने दिलेली पन्नास टक्के अनुदानाची रक्कम थेट कर्ज खात्यात भरण्यात आल्याने लाभार्थ्यांकरता कर्ज परतफेडीची रक्कम कमी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मदर डेअरी’चं दूध संकलन केंद्र गावातच सुरू केलं. पूर्वी केवळ २०० लिटर दूध मिळायचं आता गावातून सकाळी १२०० लिटर आणि संध्याकाळी १२०० लिटर दूध संकलित करण्यात येत आहे. गाईंच्या शेणापासून खतनिर्मितीही करण्यात येते. सुरेखाताई गावच्या विकासासोबतच प्रत्येक घटकाच्या विकासाकडे लक्ष देत आहेत. नवरात्रीत सुरेखाताईंनी ‘शासन आपल्या दारी’ हा एक अनोखा उपक्रम राबवला. याद्वारे शासनाच्या विविध विभागांतील एक अधिकारी प्रत्येक रात्री गावात आमंत्रित करण्यात आला. दिवसभराच्या कामातून गावकरीही आणि अधिकारीही मोकळे झालेले असायचे. या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची आणि योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांचं शंकानिरसनही त्यांनी केलं. सुरेखाताई गावात नियमित आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरांचं आयोजन करतात. लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीने शेताकडे जाणारे रस्ते मोकळे केले. त्यामुळे आता थेट शेतापर्यंत वाहनं जातात.

गावात महिलासभा होतच नव्हत्या. ग्रामसभेच्या सहीचं रजिस्टर सभा न होताच गावात फिरत असे. आज प्रत्येक लहान बाबीकरताही महिलासभा घेतल्या जातात. गावातील स्त्रियांची चांगली एकजूट आहे. या स्त्रियांची सुरेखाताईंना चांगली साथ मिळत आहे. ग्रामसभेत गावकरी मोठय़ा संख्येने सहभागी होतात. गाव पूर्णपणे व्यसनमुक्त आहे. गावातील तरुणांकरता गेल्या वर्षी व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. विकासाची ही घोडदौड वेगाने सुरू असताना प्रस्थापित विरोधकांचा विरोधही सुरू असतो. सुरेखाताई म्हणतात, ‘‘विरोध असल्याशिवाय काम करायला ऊर्जा मिळत नाही.’ त्या प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने घेतात. कामाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्या प्रस्थापितांशी जाऊन बोलतात. ‘तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तुम्ही मार्गदर्शन करा.’ असं बोलून त्या विरोधकांना मोठेपणा देतात आणि प्रत्येक विषय ग्रामसभेत मांडून त्यावर चर्चा करतात. त्यामुळे गावचा विकास वेगाने होत आहे. परसोडी-टेंभरी गावाची ओळख आज जिल्ह्य़ात होऊ लागली आहे. सुरेखाताईंना आता त्यांच्या कामाचा परीघ तालुका पातळीपर्यंत वाढवायचा आहे, त्यांची कामाबद्दलची निष्ठा आणि प्रगतीचा वेग पाहता ते हे निश्चीतच करतील अशी खात्री वाटते.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2019 1:16 am

Web Title: sarpanch female sarpanch success stories abn 97
Next Stories
1 आभाळमाया : मायेचा पैस
2 भूमिकन्यांची होरपळ
3 व्यवस्थापन कामाचं
Just Now!
X