मंगला जोगळेकर mangal.joglekar@gmail.com

एखाद्या दैनंदिन कामात स्मरणशक्तीनं दगा दिल्यावर चिडचिड तर होतेच, पण आपला स्वत:वरचा त्याबाबतीतला विश्वासही डळमळीत होतो. त्यावर लोक वैयक्तिक पातळीवर सामान्यत: काय उपाय करतात हे आपण मागच्या लेखात प्रत्यक्ष उदाहरणांमधून बघितलं. आता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शास्त्रीयरीत्या वापरले जाणारे आणि घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय करता येतील. हे उपाय वाचायला कदाचित अगदीच साधे वाटतील; पण अनेकांना स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी त्यांचा फायदा होतो आहे.  

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

मागील लेखात आपण रोज घडणाऱ्या विस्मरणाच्या अनुभवांवर चर्चा केली. हे बघितलं, की असे अनुभव येतच राहाणार आहेत. त्याची नित्य नवीन रूपं आपल्याला दिसणार आहेत. हे अनुभव आपल्याला थांबवता येणार नसले, तरी त्यांचं प्रमाण कमी करणं आपल्याला शक्य आहे. त्यासाठी आपण काही साधे उपायही बघितले. आज  थोडं उपायांबद्दल.

लक्ष द्याल तर लक्षात राहील!

अनुताई ‘डेक्कन’ला गेल्या. पुण्यातल्या पुण्यात थोडी भटकंती, मैत्रिणींबरोबर थोडय़ा गप्पा, थोडी पोटपूजा आणि प्रदर्शन. ‘चार तास कसा वेळ गम्ेला काही कळलं नाही. कसं ताजंतवानं वाटलं कित्ती दिवसांनी,’ अनुताई मनात म्हणाल्या. मैत्रिणींचा निरोप घेऊन त्या त्यांची स्कूटर शोधू लागल्या. कुठे बरं ठेवली? डेक्कन पोस्ट ऑफिसला ठेवली, की चितळेंच्या दुकानाच्या गल्लीत, की आणखी थोडी पुढे? काही केल्या लक्षात येईना. मग काही खाणाखुणा त्यांना आठवू लागल्या. काही तरी लाल रंगाचं होतं समोर.. एक दुकान होतं पाठीमागे- बरोब्बर! चपलांचं दुकान.. तिथे दरवळही होता कसला तरी- डोशाबिशाची गाडी असावी.. इकडेतिकडे बघता बघता सापडली त्यांची सखी; पण ती शोधताना झालेली घालमेल.. पुन्हा असा अनुभव घ्यायचा नसेल, तर ‘उघडा डोळे, बघा नीट’ इतकं च फक्त चालणार नव्हतं! तर काही सुवास येतात का? आवाज येतात का? सगळीकडेच लक्ष द्यायला हवं. अनुताईंनी मनात खूणगाठ बांधली.

सवय आणि शिस्त

अरुणा सांगत होती, ‘‘माझी आई अगदी शिस्तीची होती. तिला सगळ्या पसाऱ्यात, दहा जणांच्या घरात, गडबड- गोंधळात, रात्री- अपरात्रीही कुठली गोष्ट सापडली नाही असं कधीच झालं नाही. आमच्या घरी अमुक एक वस्तू संपली आहे, असंही कधी घडायचं नाही. वस्तू संपायच्या आधी ती आणलेली असायची.’’ आईच्या व्यवस्थितपणाच्या तरी किती गोष्टी.. अरुणा आईच्या आठवणीत इतकी बुडाली की बस्स! तिच्या म्हणण्याला कित्येक जणांनी दुजोरा दिला. किल्ली जागेवर ठेवली की ती सापडणारच; पण शिस्तीच्या आधीची पायरी असते नवीन सवय लावून घेण्याची. घराच्या दाराबाहेरच चपला कशा काढल्या जातात? सकाळी उठल्यावर न चुकता तोंड कसं धुतलं जातं? संध्याकाळ झाल्यावर दिवा कसा लावला जातो? या सगळ्याचं कारण सवय. वर्षांनुवर्षांच्या सवयी. असं समजलं जातं, की नवीन सवय लावायला काही ठरावीक दिवस लागतात. या करोनाच्या काळात आपण कित्येक नवीन सवयी लावून घेऊन त्याचा प्रत्यय घेतलाच आहे. आता मास्क  लावल्याशिवाय आपण बाहेर जात नाही, कुठेही गेल्यावर सॅनिटायझर हाताला चोपडतोच, घरी आल्यावर हात धुतो, मास्क धुऊन जागेवर वाळत घालतो. या नवीन सवयी अंगवळणी पडल्या, कारण त्यामागचं कारण आपल्याला पटलं आणि हा बदल आपल्याला करायलाच हवा हे कळून चुकलं. आपले विस्मरणाचे किती तरी प्रश्न सुटण्यापाठीमागचा हा जालीम उपाय आहे- ‘नवीन सवय लावून ती शिस्तीनं पाळणं’.

आत्मविश्वास वाढवा

माहिती तंत्रज्ञानात काम करणारा एक तरुण माझ्याकडे आला होता. सांगत होता, की मी लहानपणापासून खूप विसरभोळा आहे. त्याची त्यानं विविध उदाहरणंही सांगितली. अलीकडचं एक उदाहरण सांगताना म्हणाला, ‘‘आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा माझ्या डिपार्टमेंटमध्ये लागला. आमची ओळखही झाली. पंधरा दिवसांत मी त्याला तीनदा-चारदा भेटलो. परवा तो मला बाहेर मॉलमध्ये भेटला. त्यानं मला ‘पंकज सर’ म्हणून हाक मारली, आपल्या बायकोची ओळख करून दिली. मी कशीबशी वेळ मारून नेली. दिवसभर ‘हा कोण?’ म्हणून मी विचार करत राहिलो. अजिबात लक्षात आलं नाही. दोन दिवसांनी तो मला ऑफिसमध्ये दिसला आणि कोडं सुटलं!’’ तो म्हणाला, ‘‘माझ्या बायकोला विचारा! घरातील कुठलंही काम मी जबाबदारीनं करू शकत नाही, असं तिचं म्हणणं असतं.’’ मात्र ‘‘तुझी स्मरणशक्ती कमी आहे, तर तू ‘आय.टी.’मध्ये कसा काम करू शकतोस?’’ ‘‘इतका शिकून इंजिनीअर कसा झालास?’’ या माझ्या प्रश्नांना त्याच्याकडे उत्तरं नव्हती. आपली स्मरणशक्ती कमकुवत आहे यावर तो अगदी ठाम होता. माझ्या ‘मेमरी इम्प्रूव्हमेंट’च्या प्रशिक्षण वर्गात हरप्रीत यायची. एकदा वर्गानंतर माझ्याशी बोलण्यासाठी ती थांबली. तिनं सांगितलं की, ‘‘आम्ही दोघं नवरा-बायको एकदा ‘सीनिअर सेंटर’ला गेलो होतो. दुपारी २ वाजता जाऊन संध्याकाळी ६ ला परत आलो. घरी आलो, तर बाहेर आगीचे बंब उभे. घरात शॉर्टसर्किट झालं होतं. मी इस्त्री चालू ठेवली होती.  घराचा एक चतुर्थाश भाग जळाला. तेव्हापासून माझा स्वत:च्या स्मरणशक्तीवरचा विश्वास उडाला.’’ त्या घटनेला चार वर्ष होऊन गेल्यावरही हरप्रीतच्या मनातून ती घटना जात नव्हती. घरात कोणी असल्याशिवाय तिनं बाहेर पडणं बंद केलं, बाहेर पडताना सगळं बंद के लं आहे का, याची चार-चारदा खात्री करूनही तिचा जीव          वर-खाली होत होता. मग तिचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात हरप्रीतच्या घरचेही सहभागी झाले, घरात सीसीटीव्ही कॅ मेरे बसवले. आता हरप्रीत बरीच बदलली आहे. सांगायची गोष्ट अशी, की आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे उगीचच नसलेले प्रश्न तयार होतात, तर कधी छोटय़ाचे मोठे होतात, प्रयत्न करूनही मानगुटीवरून खाली उतरत नाहीत.

स्वत:ची बलस्थानं ओळखा

प्रत्येकाची सगळ्याच गोष्टींमधली स्मरणशक्ती तल्लख नसते. काही जणांना बँकेचा १२ आकडी खाते क्रमांक, पॅन नंबर, आपल्या पासपोर्टचा नंबर, किती तरी फोन नंबर तोंडपाठ असतात. एकदा कोणाच्या घरी जाऊन आले, की काही जणांना त्यांच्या घराचा रस्ता नेहमीसाठी लक्षात राहातो. कोणाला आपल्या आवडत्या नट-नटीबद्दल विचारा, सगळं कसं तपशिलासकट लक्षात! आमचा कट्टीमामा क्रिकेटची आकडेवारी कॉम्प्युटर नसतानाच्या काळात चुटकीसरशी सांगायचा. गेल्याच आठवडय़ात एक चार वर्षांचा छोटू कोठलीही मोटार ओळखू शकतो, अशी बातमी वाचली होती. आपल्या बलस्थानांचा वापर स्वत:चं स्मरण सुधारण्यासाठी करून घ्या.

मेंदूला मदत करा

आपण मेंदूला कशी मदत करणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? पण आपल्या नकळत आपण अशी मदत करतच असतो. असं बघा, मोबाइल यायच्या आधी टेलिफोनच्या जवळ महत्त्वाचे टेलिफोन नंबर लिहिलेली डायरी किंवा बोर्ड घरोघरी असायचा की नाही? सामान आणायला बाजारात जाताना आपण यादी करून जातोच की नाही? आता मोबाइल आपला जवळचा मित्र झाला आहे, त्याचा आपण पदोपदी उपयोग करून घेतो. मोबाइलवरच्या ‘नोट्स’वर यादी लिहितो, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवतो, काही आठवलं नाही की घरी फोन करतो, वेळेवर उठायला ‘अलार्म’ लावतो, इत्यादी इत्यादी. याशिवाय घरातील माणसांचीही आपण मदत घेत असतो. रात्रीची औषधाची गोळी विनायकराव त्यांच्या पत्नीला आठवणीनं देतात, तर त्यांची पत्नी त्यांना बाहेर पडताना मोबाइल घेतला का?, रुमाल घेतला का?, किल्ली घेतली का?, अशी आठवण करते. बऱ्याचदा आपल्या मित्रमंडळींनाही आपण अशी जबाबदारी देत असतो, म्हणजे मित्रांचा कुठे तरी जाण्याचा कार्यक्रम ठरतो तेव्हा रोहनचं कामच असतं, ‘उद्या जायचंय रे’ म्हणून सगळ्यांना निरोप टाकण्याचं. वस्तूंच्या किंवा व्यक्तीच्या सहाय्यानं स्मरणशक्ती नक्कीच विश्वसनीय होते. आपल्या माणसांना त्रास द्यायचा हा हक्क बजावला पाहिजेच की!

स्मरणतंत्रं वापरा

स्मरणतंत्रं शिकण्यासाठी यादी करण्यासारखा ‘एक्सरसाइज’ नाही. तुमच्या घरातील ज्या हाताला येतील त्या १५-१६ वस्तू टेबलावर मांडा. त्यांचं मिनिटभर निरीक्षण करा. त्यावर झाकण घाला आणि किती वस्तू लक्षात राहिल्या ते बघा. मला माहिती आहे की सगळ्या लक्षात राहाणं अवघड आहे. आता एक काम करा- त्या वस्तूंकडे नीट बघा आणि त्या वस्तू तुम्हाला काय सांगतात ते बघा. उदा. त्यातील एखादी कानातल्यांची जोडी तुमच्या मैत्रिणीनं भेट दिलेली असेल, एखादं पेन खूप सुंदर लिहिणारं असेल किंवा त्याचा रंग तुमच्या आवडीचा असेल. पेन आणि पॅडची जोडी जमेल, त्यात नातवाचं/ नातीचं एखादं आवडतं खेळणंही असेल, त्यातील दोन वस्तू पिवळ्या रंगाच्या असतील.. इत्यादी. आता पुन्हा वस्तूंवर झाकण घाला आणि किती वस्तू आठवतात ते बघा. आता जवळ जवळ सगळ्याच आठवल्या की नाही? हा प्रयोग पुन:पुन्हा वेगवेगळ्या वस्तू घेऊन करा. दर वेळी त्या आठवण्यासाठी काही तरी वेगळी क्लृप्ती काढा. त्या वस्तूंची नावं गुंफून गोष्ट तयार करा, वस्तू डोळ्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करा, त्या वस्तू तरंगत, तरंगत तुमच्याभोवती फिरत आहेत असा विचार करा.. हा प्रयोग प्रामाणिकपणे करा. स्मरण वाढताना दिसलं की तो अधिक अवघड करा. कधी वस्तू दुसऱ्या कोणाला तरी मांडायला सांगा, कधी बऱ्याच दिवसांत न पाहिलेल्या वस्तू बाहेर काढा. करत राहा हा प्रयोग. परिणामांची खात्री आहे मला!

स्मार्टफोन वापरायची सवय असेल तर अनेक फ्री अ‍ॅप तुम्हाला स्मरणशक्ती वाढवायला मदत करतील. मात्र ते डाऊनलोड करताना काळजी घेऊन करा.

एका वेळी अनेक कामे करू नका

महेश आज ऑफिसला गेला होता. एका बाजूला त्यानं कॉम्प्युटर सुरू केला. आपल्या कामाकडे नजर टाकत टाकत बॉसशी कामासंदर्भात महत्त्वाचं ‘चॅट’ चालू झालं. त्यातच त्यानं ऑफिसमधील सहाय्यकाला दोन निरोप दिले, सहकाऱ्याला कामाच्या सूचना दिल्या, आलेल्या ‘व्हिजिटर’ला थांबवून काय पाहिजे ते विचारलं. महेश सगळं कु शलतेनं करत होता. घरी परत येताना फोनवर बोलत गाडी चालवताना एकदम ब्रेक लावायला लागला आणि समोरच्या गाडीशी टक्कर होता होता वाचली. महेश एकदम चरकला. हा एकाकी प्रसंग नाही. असे प्रसंग फार वेळा घडतात. एका वेळी खूप गोष्टी करण्यानं मेंदूवर ताण येतो हे आपण बघितलं आहेच. एका वेळी एकच गोष्ट करून मेंदूचा ताण कमी केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते. नुसती एकाग्रता वाढते असं नव्हे, तर निरीक्षणक्षमतादेखील वाढते.

एक ऐंशी वर्षांच्या आजी आपल्या स्मरणशक्तीच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. त्यांच्याशी बोलून, प्रश्न विचारून डॉक्टरांच्या लक्षात आलं, की आजींचा मेंदू अगदी तल्लख आहे. डॉक्टर म्हणाले, ‘‘जे तुमच्या लक्षात राहात नाही त्याचं निरीक्षण करायला सुरुवात करा.’’ महिनाभरानं आजी बटाटेवडे घेऊन डॉक्टरांकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘‘तुम्हाला धन्यवाद द्यायला आलेय. माझा स्मरणशक्तीचा प्रश्न सुटला.’’

वारंवार उजळणी करा

एकदा उषाताईंकडे गेले असता एका कोपऱ्यात मायक्रोवेव्ह ठेवलेला दिसला, पण तो वापरला जात आहे असं दिसत नव्हतं. त्यांना विचारलं असता म्हणाल्या, ‘‘अगं, तो मागचा इतका छान होता. तो बिघडला. हा नवीन आणला आहे, त्यात खूप फंक्शन्स आहेत. गोंधळ उडतो माझा. नकोच वाटतो मला वापरायला.’’ कीर्तीताईंना मुलानं ‘अ‍ॅपल’चा फोन पाठवला. टाळेबंदी चालू झाल्यावर त्यांना अनेक वेळा फोन करूनही तो उचलला जात नव्हता. शेवटी मी त्यांच्या मुलाला फोन के ल्यावर कळलं, की नवीन फोनचं तंत्र आईला जमत नसल्यामुळे ती कोणाचेच फोन उचलत नाही. नवीन गोष्टींना हात लावायला आपल्याला भीती वाटते. महागाच्या गोष्टी उगीच आपल्या हातून खराब व्हायला नकोत असं वाटतं; पण या वस्तूंमुळे आपलं आयुष्य सुखकर होतं. आपण काही तरी नवीन शिकतो, बघतो, ऐकतो. त्यामुळे त्याचे फायदे भरपूर आहेत. आपल्याला असलेल्या वेळाचा सदुपयोग करून वस्तूबरोबर आलेलं मॅन्युअल वाचलं तर गोष्टी समजायला लागतात. एकदा वाचून कळणार नाही हे माहिती आहे. म्हणूनच या परिच्छेदाचं शीर्षक ‘वारंवार उजळणी करा’ असं आहे. इंग्लिशमध्ये याला ‘ओव्हरलर्निग’ म्हणतात. सध्या इंटरनेटवर सगळ्या गोष्टी शिकवणारे व्हिडीओ असतात, नातवंडंही मदत करायला उत्सुक असतात. एकदा एक गोष्ट जमली की मग नवीन करून बघण्याचा धीर वाढतो.

आजच्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर नजर टाकली तर ते सगळे ‘स्वत:मध्ये परिवर्तन करा’ असंच सुचवत आहेत. ते अवघड की सोपं आपणच ठरवणार!