हरीश सदानी saharsh267@gmail.com

स्त्रीचा ‘माणूस’ म्हणून विचार करून तिला प्रत्येक नात्यात समानतेची वागणूक देणारा पुरुषांचा समुदाय वाढवणं, हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून गेली दोन दशकं पुण्यातील कौस्तुभ जोगळेकर  समुपदेशनाचं काम करतो आहे. महानगरपालिके च्या १८ शाळांमध्ये ‘जिज्ञासा’ गट, ‘पुरुष संवाद केंद्र’, ‘स्त्रीमुक्ती संघटना’ आणि ‘नारी समता मंचा’ या संस्थांमध्ये काम करत कौस्तुभनं आतापर्यंत १०,००० पेक्षा जास्त मुलगे, तरु ण व पुरु षांचं समुपदेशन केलं आहे. फलस्वरूप हातावर पोट असलेल्या ९-१० मुलांनी स्वयंप्रेरणेनं ‘समर्थ संवाद गट’ स्थापन करून वस्तीतील कुमारवयीन मुलांना प्रश्न, अडचणी ‘शेअर’ करण्यासाठी एक मंच तयार  केला आहे. जोतिबांच्या कौस्तुभ जोगळेकर या लेकाविषयी..

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

२०१२ मध्ये दिल्लीतील बसमध्ये घडलेल्या ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील आणि त्यानंतर मुंबईच्या शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषी तरुणांविषयी झालेल्या तपासात काही गोष्टी पुढे आल्यात. या प्रकरणात अटक झालेल्या मुलग्यांना (साधारण १७ ते १९ वयोगटातील) पॉर्न फिल्म्स बघण्याची सवय होती. बहुतेकांचे शालेय शिक्षण अपूर्ण होते. निरोगी, सशक्त नातेसंबंध काय असतात, याबद्दल कुठलाही संवाद त्यांच्याबरोबर कधीही घडलेला नव्हता.

वरील दोन प्रकरणांतील उदाहरणं गुन्हेगार पार्श्वभूमीच्या मुलांची असली, तरी सर्वसामान्य, शाळेत शिकणाऱ्या कुमारवयीन मुलग्यांशी तरी या विषयावर संवाद किती होताना दिसतो? हा प्रश्नच आहे. जीवशास्त्र हा विषय शाळांमध्ये शिकवताना वनस्पतींचं पुनरुत्पादन आणि पशूंचं प्रजनन शिकवलं जातं; मात्र मानवी प्रजनन व संबंधित मुद्दय़ांवर पुस्तकात असलेला धडा हा साधारणत: शिक्षक समजावून सांगत नाहीत, हा देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. प्रगतीशील म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातही शालेय मुलांना लैंगिकता शिक्षण (किंवा तत्सम) देण्याविषयी शासनाचं ठोस धोरण आजतागायत दिसत नाही. काही सामाजिक संस्थांद्वारे वा व्यक्तींद्वारे हे शिक्षण दिलं जात असलं, तरी वयात येणाऱ्या/ आलेल्या प्रत्येक मुलामुलीला हे शिक्षण मिळायला हवं. सामाजिक पार्श्वभूमी अशी असताना गेली दोन दशकं पुण्यातील कौस्तुभ जोगळेकर हा तरुणांबरोबर करत असलेलं जीवन-कौशल्यविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशन महत्त्वाचं ठरतं.

पुणे येथील ‘कर्वे इन्स्टीटय़ूट ऑफ सोशल सव्‍‌र्हीस’ या संस्थेतून समाजकार्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कौस्तुभनं ससून रुग्णालयात दोन वर्ष संशोधक सहाय्यकाचं काम केलं. स्त्री सक्षमीकरणासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या ‘स्त्री-मुक्ती संघटना’ या संस्थेनं १९९८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘जिज्ञासा’ हा उपक्रम सुरू केला होता. यात कुमारवय, मूल्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, ताणतणावाशी सामना, व्यसनमुक्ती, लैंगिक शिक्षण अशा सहा विषयांवर इयत्ता आठवी-नववीतील मुलामुलींची संवादसत्रं घेण्यासाठी ‘संवादक’ म्हणून स्वयंसेवक नेमले होते. त्यात कौस्तुभनं दोन वर्ष संवादक म्हणून काम केलं. २००१ मध्ये १३ ते १८ वयोगटातील मुलग्यांच्या शाळेत समुपदेशक म्हणून कौस्तुभ काम करू लागला. पुणे महानगरपालिकेशी जोडलेल्या तीन शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीतील मुलग्यांना अनेक मुद्दय़ांवर कौस्तुभ वैयक्तिक मार्गदर्शन करत होता. त्याचबरोबर पालिके च्या १८ शाळांमध्ये ‘जिज्ञासा’चा समन्वयही तो करीत असे.

‘मुलींबद्दल वाटणारं आकर्षण आणि प्रेम यातील फरक काय? वीर्यपतन झाल्यामुळे कमजोरी येते का? हस्तमैथुन आरोग्यास चांगले की वाईट? लैंगिक संबंधांबाबत स्त्रीला समाधान मिळालं की नाही हे कसं ओळखावं? पॉर्न फिल्म्स पाहिल्यानं मनावर नेमका काय परिणाम होतो? या वयात सेक्स करायची सारखी इच्छा का होते आणि असं झाल्यास काय करायचं?’ अशा प्रकारच्या पौगंडावस्थेत होणारे शारीरिक-मानसिक बदल आणि लैंगिकता यावरील प्रश्नांबरोबरच नातेसंबंध, मैत्री, आरोग्य, पुरुषत्व या संदर्भात मनात असणारे विविध प्रश्न, शंका, गैरसमजुती मुलं कौस्तुभजवळ मांडू लागली. शुद्ध, प्रमाण मराठीत बोलण्याची सवय असलेल्या कौस्तुभला मुलं त्यांच्या बोलीभाषेत (कधी शिवराळही) बोलू लागत, तेव्हा सुरुवातीला अवघडल्यासारखं वाटे. सुरक्षित, सुशिक्षित घरातून आलेल्या कौस्तुभला हे सारं नवीन होतं. त्यांना समजेल असं साध्या-सोप्या भाषेत, अधिक तांत्रिक शब्द न वापरता, त्यांच्या प्रश्नांचं तो हळूहळू निराकरण करू लागला. सर्दी-खोकल्याबद्दल डॉक्टर जसं रुग्णांशी बोलतात तसं सहजतेनं, भीड चेपत, न लाजता कौस्तुभ त्यांच्याशी बोलू लागला. त्याच्याशी या मुलांचं विश्वासाचं इतकं  चांगलं नातं तयार झालं की नंतर नंतर तर ही मुलं त्याच्याबरोबर डबा एकत्र खाऊ लागली. कौस्तुभ या संदर्भात आपले अनुभव सांगतो. ‘‘एकदा नववीत शिकणाऱ्या मुलानं माझ्यापाशी येऊन सांगितलं, ‘माझे वडील दारू पिऊन आईला रोज मारतात, शिव्या  देतात. पण एवढं सगळं होऊनही आई रात्री त्यांच्याजवळ झोपायला जाते, याचा मला प्रचंड राग येतो.’ अशा ‘शेअरिंग’मुळे लिंगभाव (जेंडर), पुरुषप्रधानता, स्त्रियांवरील हिंसा, शिवीगाळ या मुद्दय़ांवरही मुलांशी बोलावं लागलं. ‘जिज्ञासा’अंतर्गत संवादसत्र घेत असताना   मुलं-मुली भरभरून बोलू लागली होती. प्रसंगी त्यांच्यात वादविवाद, तंटेही व्हायचे. या सर्व प्रक्रियेमध्ये काम करताना एक वेगळं समाधान मिळत असे.’’

वाढीच्या वयातील मुलांबरोबर काम करण्याच्या प्रेरणेबद्दल बोलताना कौस्तुभ म्हणाला, ‘‘मी शाळेत असताना अभ्यासात कच्च्या असणाऱ्या मुलांसोबतच वर्गात बसत असे. त्यामुळे कदाचित मला पुढेही याच मुलांबरोबर काम करावंसं वाटलं असावं. माझी आई तिच्या लग्नापूर्वी काही काळ शाळेत शिक्षिका होती- प्रशिक्षक म्हणून काम करण्याचे संस्कार मला आईकडून मिळाले असं मला वाटतं.’’ २०११ मध्ये ‘नारी समता मंच’ या स्त्री-चळवळीतील आणखी एका अग्रगण्य संस्थेत काम करण्याची संधी कौस्तुभला मिळाली. वैवाहिक कलह, तंटे अशा प्रश्नांबाबत कौस्तुभ कुटुंब-समुपदेशकाचं काम करू लागला. विवाहित, वयस्क पुरुषांबरोबरच किशोरवयीन मुलांनादेखील समुपदेशन करण्याचं काम तो इथं करत होता. त्याचबरोबर मंचानं चालवलेल्या ‘डॉ. सत्यरंजन साठे पुरुष संवाद केंद्रा’चा समन्वयक म्हणूनही तो काम पाहू लागला.      २५ ते ५५ वर्ष वयातील पुरुष आठवडय़ातून एकदा या केंद्रात येऊन आपलं मनोगत, अनुभव, भावना खुलेपणानं व्यक्त करू लागले. वैयक्तिक समस्यांसाठी संस्थेचं समुपदेशन केंद्र, तर  स्त्री-पुरुष नातं, पुरुषत्व, पुरुषपणाची कोंडी यांसारख्या मुद्दय़ांवर बोलण्यासाठी-ऐकण्यासाठी ‘पुरुष संवाद केंद्रा’त यावं, अशी कामाची रचना केल्यामुळे कौस्तुभचं अनुभवविश्व समृद्ध होत गेलं. स्त्रियांच्या बाबतीत कोणत्याही  प्रकारची हिंसा न करणारा समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणं व स्त्रीचा ‘माणूस’ म्हणून विचार करून तिला प्रत्येक नात्यात समानतेची वागणूक देणारा पुरुषांचा समुदाय वाढवणं, हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून तो काम करत आला आहे.

आपल्या कामाबद्दल कौस्तुभ सांगतो, ‘‘समुपदेशन (काउन्सेलिंग) करणं म्हणजे उपदेश करणं नव्हे. पण बऱ्याच जणांचा तसा समज असतो. बिघडलेल्या नातेसंबंधांमध्ये घडलेल्या घटनांचा तटस्थपणे पुनर्विचार करून आपल्यासमोर काय काय पर्याय होते आणि आता कोणते पर्याय आहेत, ते तपासून पर्याय निवडण्यासाठी समुपदेशक दिशा देण्याचं काम करू शकतो. अंतिम निर्णय संबंधित व्यक्तीनंच घेणं अपेक्षित असतं.’’

गेल्या ६-७ वर्षांपासून कौस्तुभ ‘पंख’ नावाच्या सामाजिक संस्थेकरिता वरिष्ठ समुपदेशक म्हणून काम पाहातो आहे. इथं पूर्णवेळ शाळा-महाविद्यालयांमधील मुलांना मार्गदर्शन करण्याबरोबर ‘नारी समता मंचा’मध्ये स्वयंसेवक या नात्यानं महिन्यातून दोनदा समुपदेशनाचं काम तो करतो.

‘स्त्रीमुक्ती संघटना’ आणि ‘नारी समता मंच’ या संस्थांमध्ये काम करत असताना कौस्तुभनं आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली आहे. हसतमुख, मितभाषी कौस्तुभनं आतापर्यंत १०,००० हून अधिक मुलगे, तरुण व पुरुषांना समुपदेशन केलं आहे. २००७-०८ मध्ये कौस्तुभच्या ‘जिज्ञासा’मधील सत्रांचा लाभ घेतलेल्या, हातावर पोट असलेल्या ९-१० मुलांनी स्वयंप्रेरणेनं ‘समर्थ संवाद गट’ स्थापन करून वस्तीतील कुमारवयीन मुलांना प्रश्न, अडचणी ‘शेअर’ करण्यासाठी एक मंच सुरू केला आहे. करोना साथीच्या काळातही कौस्तुभचे माजी विद्यार्थी या गटाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एका माजी विद्यार्थ्यांचं लग्न ठरल्यानंतर त्यानं ते अत्यंत साध्या पद्धतीनं, मुलीकडच्यांकडून कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तो कृतीत आणण्यासाठी त्याला सहा महिने घरातल्यांशी लढावं लागलं.

स्त्री-पुरुष समानता, संतापाचं व्यवस्थापन, लैंगिकता, विवाहपूर्व मार्गदर्शन या विषयांवर प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील अनेक महाविद्यालयं, जिल्हा परिषदेच्या शाळा, युवक गट नियमितपणे कौस्तुभला निमंत्रित करत असतात. आज बऱ्याच इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळांमध्ये समुपदेशक नेमले जात असले तरी मराठी, शासकीय शाळांमध्ये समुपदेशकांची कमतरता आहे.

केंद्रीय/ राज्य समाज कल्याण मंडळाकडून मिळणाऱ्या अनुदानातून वा कुठल्याही अनुदानाशिवायही कित्येक वर्ष देशात अनेक सामाजिक संस्था कौटुंबिक समुपदेशनाचा उपक्रम राबवत आहेत. यातील बरीच कौटुंबिक समुपदेशन केंद्रं पीडित स्त्रिया व मुलांनाच प्रामुख्यानं समुपदेशनाची गरज असल्याचं मानून पुरुषांना यापासून अलिप्त ठेवताना दिसतात.

गरजू पुरुषांना विशेषत: तरुणांना शक्य तिथं वेळीच समुपदेशन मिळालं, तर स्त्री-पुरुष नातेसंबंध सुधारण्यास  वाव  मिळेल. कौस्तुभ गेली दोन दशकं करत असलेलं काम त्यासाठीच काळाच्या पुढचं म्हणावं असं विशेष आहे.